ओ मेरे राजकुमार (भाग १२)

Love story

माया आणि समीर वाट पाहत असलेला रविवार उजाडतो.. माया बरोबर ९ वाजताच तयार होऊन बसते. 
“माया, हा घे डब्बा. तू त्या आश्रमात चालली आहेस ना? मी तिथल्या मुलींसाठी चिवडा केला आहे.. सांभाळून जा बरं का?”
“हो आई, अगं आमचे सर येणार आहेत मला न्यायला..”
“हो का? म्हणजे ते बाबांना भेटायला आले होते ते का? छान आहे हो मुलगा.. किती काळजी करतो सगळ्यांची”
“हो ग आई.. तो तसाच आहे.. प्रेमळ.”
“आ? काय?”
“काही नाही संध्याकाळी उशीर होऊ शकतो असं म्हंटल मी..”
तेवढ्यात बाहेर गाडीचा हॉर्न वाजतो.. समीरही लवकरच येतो.. माया बाहेर जाऊन समीरला आत ये असं म्हणते.. समीर घरात जातो.. मायाच्या आई बाबांना भेटून, कॉफी पिऊन दोघं निघतात..
मायाने निळ्या रंगाचा ड्रेस घातलेला असतो. त्यावर छोटेसे मोत्याचे कानातले, केस मोकळे सोडलेले, हातात निळसर ब्रेसलेट खूपच सुंदर दिसत होती..
“माया एक सांगायचं होतं चिडू नकोस लगेच हा..”
“अरे समीर बोल की इतकं काय?”
“काय?? समीर?? बोल की?? असं कसं झालं?”
“आता मैत्री झाली ना.. आणि एकदा म्हंटल की समीर आज जरा जास्त फ्रीली हाक मारली एवढंच.. काय सांगायचं आहे?”
“ तू खूप छान दिसत आहेस आज..”
“ धन्यवाद… मला माझं असं कौतुक आवडतं बरं का?”
माया च एकूण बोलणं, वागणं पाहून समीरचा आत्मविश्वास जरा वाढला होता.. गप्पा मारत ते आश्रमात पोहोचतात.. गाडी पार्क करून समीर काही सामान काढतो.. समीरने खूप भेटवस्तू आणलेल्या असतात.. मायाला कौतुक वाटतं. ती तिच्या चिवड्याचा डब्याकडे बघत बसते.. 
“काय ग.. कसला विचार करतेस?”
“ काही नाही.. तू एवढे गिफ्ट आणले आहेत.. आणि मी बघ..”
“काय आहे त्यात? अगं गिफ्ट देणं गरजेचं नाही.. तू इथे आलीस हेच खूप मोठं आहे.. ह्या सगळ्या जणींना नवीन माणूस भेटेल आज..”
“ह्यात चिवडा आहे.. आय होप त्यांना आवडेल.”
“आवडेल म्हणजे काय? आवडेलच.. चल आतमध्ये”
जसा समीर आतमध्ये जातो तसं एक छोटीशी मुलगी दादा दादा करत त्याला बिलगते.. समीर आल्याचं कळताच सगळा घोळका त्याचा भोवती जमा होतो.. समीर सगळ्यांना गिफ्ट देतो.. ती छोटी मुलगी समीरच्या बाजूलाच बिलगून असते त्याला.. माया उत्साहाने हे सगळं बघत असते.. तिचं सगळं लक्ष समीरकडे असतं. त्याचं हसणं, प्रत्येकाला गिफ्ट देणं, लहान मुलींशी लहान होऊन बोलणं.. किती भाबडा आणि खरा आहे हा.. 
त्या लहान मुलीचं लक्ष मायाकडे जातं.. “ दादा ही वहिनी का रे??”
समीर अवाक होतो तिच्या प्रश्नाने आणि हळूच डोळा मारून सांगतो, “तसच समज.” 
झालं….. ती मुलगी वाहिनी वाहिनी करून तिच्याकडे धावत सुटते.. मायाला काहीच कळत नाही हे काय चाललं आहे. ती मुलगी मायाला येऊन बिलगते आणि म्हणते, “तूच आमची वाहिनी आहेस ना? किती गोड दिसतेस तू.. आम्हाला खाऊ आणलास का?” 
माया समीरकडे बघते आणि तो तिला इट्स ओके असा इशारा करतो.. 
“मी काही तुझी वाहिनी नाही पण खाऊ नक्की आणला आहे तुम्हाला..”
लगेच सगळ्या डब्बा उघडून चिवडा वाटून खाऊ लागल्या.. काही जणी गिफ्ट फोडण्यात बिझी होत्या.. समीर मायाजवळ जातो आणि तिला विचारतो, “मग कसं वाटतंय?”
“खूप छान. किती आनंदी झाले ह्यांचे चेहरे.. स्पेशली तुला बघुन तर खूप..”
समीरकडे आश्रमाचे व्यवस्थापन बघणाऱ्या बाई येतात.. “दादा तुम्ही अगदी बरोबर लिस्ट प्रमाणे घेऊन येता न विसरता.. इतकं कोणी करत नाही हो! ह्या ताई कोण?”
“ही माझ्या ऑफिस मध्ये काम करते. ४-५ दिवसापूर्वी नाही का त्या ताईंना घेऊन आलो होतो.. तेव्हा ही सोबत होती.. तिला आश्रम पहायचा होता म्हणून आणलं.”
“ बरं का ताई, आमचे दादा मोठ्या कंपनी चे मालक पण आई आणि हे मिळून न चुकता काही ना काही आणतात.. आई बाहेर गेल्या आहेत ना? नाहीतर आल्या असत्या.. मी येते मला आता ह्या सगळ्यांना घेऊन बाहेर जायचं आहे खेळायला..”
“बरं आम्ही जरा आश्रम पाहून येतो..” त्या बाई निघून जातात..
“ कंपनी चे मालक?????”
समीरला घोळ लक्षात येतो.. तो पटकन बोलतो, “अगं त्यांना वाटतं की मी बॉस आहे ना बऱ्याच जणांचा म्हणून मालकच झालो.. तू नको लक्ष देऊ चल..”
मायाला काही पटत नाही पण खरंच तो बॉस असतोच की. ह्या बाईंना तसं वाटत असेल.. त्या कुठे गेल्या असतील ह्याला ऑफिस मध्ये बघायला? असा विचार करून ती त्याच्यासोबत निघते….
सगळं फिरून झाल्यावर ते गार्डन मध्ये येतात.. कोणी खेळत असतं, कोणी व्यायाम करत असतं.. अचानक जोरात पाऊस सुरू होतो.. सगळ्या पळत पळत व्हरांड्या मधे जातात.. माया तर धावत आधीच पोचलेली असते.. “आला हा पाऊस.. काही चांगलं असलं की येतोच.. शी भिजले मी.. म्हणून मला नाही आवडत.. आता हे असं ओलं बसून राहायचं का मी??समीर कुठे गेला? त्याला सांगते आपण निघू नाहीतर मी जाते एकटी..”
ती इकडे तिकडे बघते समीर तिला कुठेच दिसत नाही.. समोर बघते तर समीर हात पसरून पावसात उभा असतो.. चेहऱ्यावर पाण्याचे थेंब पडत असतात.. तो सगळ्यांना पावसात भिजायला येण्याची खूण करतो.. मग काय सगळ्या पावसात भिजायला लागतात.. माया समीरकडे वेड्यासारखं बघत बसते.. पाऊस आवडत नसला तरी समीरच ते रूप, ओल्या शर्ट मुळे उठून दिसणारे पिळदार शरीर तिला मोहक वाटत होते.. समीरची आणि तिची नजरानजर होते. तो तिला ये अशी खूण करतो.. ती नाही म्हणते.. मग समीर स्वतः तिच्याकडे जातो..
“माया चल.. किती सुंदर पाऊस आहे बघ सगळे भिजतायत..”
“नाही मला पाऊस आवडत नाही माहिती नाही का??”
“अगं चल ग.. माझ्यासोबत तुला पाऊस आवडेल येऊन तर बघ.. नेहमी काय चिखल नसतो.. ओली माती पायाला लाऊन तर बघ.. पाणी चेहऱ्यावर घे एक एक थेंब तुला किती आनंद देईल..”
समीर जवळपास तिला ओढतच नेतो.. नाही नाही म्हणत माया पावसात जाते.. का माहिती आहे? समीरने तिचा हात हातात घेतला असतो.. त्याचा स्पर्श होताच ती मोहरुन गेली असते.. समीर सोबत ती सुद्धा हात पसरून पावसात उभी राहते बराच वेळ.. डोळे बंद करून पाण्याचा आवाज ऐकत असते.. एक एक थेंब तिला स्पर्शून जात असतो.. तिला डोळे बंद करून पण समीर दिसत असतो.. तो जवळ येत होता अगदी जवळ आणि माया अशी हाक मारतोय…
“माया……..” तिला समीर खरंच हाक मारतो.. माया डोळे उघडते तर समीर गुलाबाच फुल घेऊन उभा असतो..
“ तू कशीही रिअॅक्ट हो, हो म्हण किंवा नाही म्हण पण आज मी तुला माझ्या मनातलं सांगणार आहे.. माया माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुझ्या सवयी, तुझं दिसणं, बोलणं, हसणं, अगदी तुझी खुन्नस ह्या सगळ्यावर माझं प्रेम आहे. तुला रोज बघता बघता मी प्रेमात पडलो.. असं कधी कुठल्या मुलीच्या बाबतीत झालं नाही बट यू आर स्पेशल.. आय लव्ह यू..”
माया त्याचाकडे बघत असते आणि तो मायाकडे.. ती त्याला काय उत्तर देईल ह्याची पाऊस सुद्धा वाट बघत असतो.. कारण आज त्याला जोरात बरसायच असतं…..

क्रमशः
© स्वराली सौरभ कर्वे.

🎭 Series Post

View all