ओ मेरे राजकुमार (भाग १)

O mere rajkumar

'माया उठ ग! आवरून घे आता..किती वेळ झोपा काढतेस?' आईच्या अती मधुर आवाजाने माया उठलीच..
'काय ग आई रविवार आहे आज तरी झोपू दे. किती छान स्वप्न पाहत होते मी'
हे रोजचं संभाषण माया आणि आईचं.. आई म्हणजे सुगंधा. रोज माया स्वप्नात तिच्या राजकुमाराला पहायचा प्रयत्न करायची पण तो यायची चाहूल लागली की  सुगंधा ताई बॅकग्राऊंड साऊंड द्यायचा.. बस तो राजकुमार यायचाच नाही बिचारा ..
अशी रोजची ताटातूट होऊन ही माया ऑफिस ला वेळेत जायची.. आज खूप पाऊस पडत होता आणि मायाला अजिबात पाऊस आवडायचा नाही. तिच्या मैत्रिणी मित्र पावसाळी सहल काढायचे, तिला बोलवायचे पण ही जायची नाही. ऑफिस च्याच वेळेत नेमका पाऊस आणि मग काय बाईसाहेब चिडलेल्या. एकदाची अंधेरी ला पोहचून ऑफिस गेट वर पोहोचली . मुंबईचा पाऊस म्हणजे भिजवणाराच मग काय तणतण करत क्युबिकल मध्ये बसली. कामाला सुरुवात करते तोच प्रिया आणि राज तिला हाक मारतात.
'काय मग आज त मॅडम एन्जॉय करत आल्या पाऊस' प्रिया राज कडे पाहते. हे दोघं आज मुद्दाम तिला डेस्क जवळ येऊन चिडवत असतात. 
राज आणि प्रिया सोबत मायची मैत्री ऑफिस मध्ये झाली. तीन वर्ष झाली असली तरी ते तिघे घनिष्ठ मित्र होते. एकमेकांची मस्करी करायची एक संधी सोडत नसत पण मदतीला सुद्धा कायम हजर!!
माया आणि पाऊस हे कनेक्शन दोघांना माहित असल्याने कायम माया ही टार्गेट असायची. पण माया चिडायची नाही. उलट ते दोघे आले की त्यांच्यात गुंतून जायची. 
“माया,तुझा राजकुमार तू स्वप्नात पाहतेस तेव्हा पाऊस पडतो का ग?” 
“राज कसं आहे ना मला पाऊस आवडत नाही सो माझ्या राजकुमाराला ही पाऊस आवडत नाही.” 
“हे काय लॉजिक आहे? जर त्याला पाऊस आवडत असेल तर? तू नाही का त्याला हो म्हणणार?” 
“नाही!” माया फाईल चेक करत राज ला सांगते.
“ मी पैज लावते तुझ्याशी तुला असा राजकुमार मिळेल की पाऊस म्हणजे त्याचा जीव की प्राण असेल. मग बघू तू काय करतेस!” प्रिया कुचकट हसत मायकडे पाहते.
“अर्थात तुझे पैज जिंकण्याचे चान्सेस शून्य टक्के किंवा त्याचा खालीच आहेत माय डिअर प्रिया. माझा राजकुमार मी पारखून घेणारच ना. “
“देखते है देखते है.. “
“हो का राज! तुम्ही बघणारच ना”
आता तिघही आपल्या कामाला लागतात. ऑफिस संपल्यावर थोडी कॉफी घेऊन तिघे आपल्या घरच्या वाटेला लागतात. जाताना पाऊस नसल्यामुळे माया उत्साही असते. ती प्रियाला नजरेनेच चीडवते. 
घरी आल्यावर फ्रेश होऊन आई सोबत गप्पा त्या दोघी जेवण बनवतात. रात्री बाबा आल्यावर तिघही जेवायला बसतात. 
“मग काय आजचा दिवस कसा गेला मयलेकिंचा??” सुरेशराव विचारतात. सुरेश मायाचे बाबा. आई बाबा दोघेही हसमुख, उत्साही आणि नवीन विचारांचे. पण परंपराही तितकीच जपणारे. आपल्या एकुलत्या एक लाडक्या मुलीला त्यांनी कायम प्रेम आणि प्रोत्साहन दिलं होतं. कुठल्याही बाबतीत तिला अडवायचे नाहीत पण तिला लाडावून ठेवलं नव्हतं. मायाचा तिच्या बाबांवर जास्त जीव होता.
“मस्त बाबा. पण नेमका पाऊस सकाळी. तुम्हाला तर माहीतच आहे मला पाऊस कित्ती आवडतो.”
“मला आणि तुझ्या आईला पाऊस खूप आवडतो. तूच अशी कशी ग वेगळी? काय ग सुगंधा बरोबर ना?”
“ते जाऊ द्या. आमचा दिवस छान गेला दोघींचा एवढं पुरेसं आहे आत्ता. चला जेवून घ्या!”
तिघेही आवरून खोलीत निघून जातात. माया बेड वर पडते आणि विचार करते की खरंच इतकं काय आहे पावसात की सगळ्यांना आवडतो. विचार करता करता तिला झोप लागते. आता काय रोजचं स्वप्न पाहण्यात मॅडम बिझी.. छान फुलं, सगळीकडे रंगांची उधळण, आणि तो येतोय तिच्या जवळ.. तिच्या हृदयाची धडधड वाढते.. एक एक पाऊल पुढे येतोय. आणि पाऊस हे काय? तो कुठे आहे? ई ई किती पाऊस…
मायाला जाग येते. आपण स्वप्न पहात होतो हुश्श.. तेवढ्यात सुगंधा ओरडत येते. बघतात तर काय ही मुलगी उठून बसली असते.. आज बॅकग्राऊंड साऊंड शिवाय जागी झाली होती माया.. सुगंधा विचार करत असते असं कसं झालं आणि माया अर्थात हे मी काय पाहिलं.

क्रमशः
(पुढे काय होईल? उत्सुकता तुम्हाला असेलच. पण काही इंटरेस्टिंग गोष्टी घडणार आहेत एवढं नक्की. )
(मी पहिल्यांदा कथामालिका लिहीत आहे. कथा पूर्ण काल्पनिक आहे तरी चूकभूल माफ असावी. तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा, कमेंट करा. नाही आवडली तरी कमेंट करा. तुमच्या कमेंट मुळे लिहायला हुरूप येतो)

© स्वराली सौरभ कर्वे

🎭 Series Post

View all