नूतन एक संघर्ष ( भाग १५ अंतिम )

नूतन नावाच्या स्त्रीच्या आयुष्यातील संघर्षाची कथा


विषय - कौटुंबिक कथामालिका

नूतन एक संघर्ष ( भाग १५ अंतिम )

वीस वर्षांत भास्करांना सात वेळा अटॅक येऊन गेले. त्यात आता सासूबाईंची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. जेव्हा तब्येतीने चांगल्या होत्या तेव्हा आमच्याकडे यायला तयार नसायच्या आता त्यांना अंथरुणावरून उठता देखील येत नसल्याने त्यांच्या घराला लॉक लावून त्यांना आमच्या घरी आणले. भास्कर तर पेशंट होतेच आता सासूबाईंचे देखील सगळं जागेवर करायला लागायचे. माझी तर पूर्ण दमछाक होत होती. दरम्यान मी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. कारण मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मी खचले होते. भास्कर देखील पुढील वर्षभरात रिटायर्ड होणार होते. सासूबाई देखील गेल्या. भास्करांना आई गेल्याचे भयंकर दुःख झाले. त्यांचा आईवर फार जीव. माझ्या सासूबाई मी त्यांची शुश्रूषा करायचे हे पाहत असूनही त्यांच्या जीवात जीव असेपर्यंत त्या माझ्याशी कधीचं प्रेमाने बोलल्या नाहीत की प्रेमाने मला हाक मारली नाही. औपचारिक तर कोणीही कोणाशी बोलतं. माझ्या हातून सेवा मात्र त्यांनी करून घेतली. दुसऱ्या मुलाने आणि सुनेने तर शेवटपर्यंत आईवडिलांना ढुंकून पाहिले नव्हते.

माझी परदेशी स्थायिक नणंद आणि लेक ( वेदा ) सासूबाई गेल्यावर आम्हाला भेटायला आल्या. दरम्यान माझ्या नणंदेचे पती वयोपरत्वे गेले तरी नणंद एकटीच तिथेच परदेशात राहत होती. एक महिना दोघी भारतात राहून नंतर त्या आपापल्या देशात निघून गेल्या.

भास्कर रिटायर्ड झाले. ऑफिसतर्फे त्यांचा सेंडऑफ केला. त्यांना इतके अटॅक येऊनदेखील त्यांनी प्रामाणिकपणे नोकरी केली. अटॅक आल्यावर थोडे दिवस विश्रांती घेऊन ते पुन्हा कामावर रुजू होत असत. त्यामुळे त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक झाले.

वेदा आणि तिचा नवरा दरवर्षीप्रमाणे भारतात सगळ्यांना भेटायला आले. वेदा आम्हा दोघांना परदेशात तिच्या घरी येण्याचा खूप आग्रह करायची पण प्रत्येक वेळी हे वेदाला म्हणत असत, " मी नाही येणार तुझ्या घरी. तुझं घर बघायची इच्छा आहे पण मला काही फॉरेनचं ऍटरॅकशन नाही. कितीतरी तास विमानात अधांतरी बसायचं मला नाही जमणार. तू तुझ्या मम्मीला घेऊन जा. तिला आवडतं फॉरेन." वेदा ह्यांच्यावर इतकी वैतागायची आणि बोलायची की, " लोकांना बाहेरगावी जायला मिळत नाही आणि तुम्हाला चान्स मिळतो आहे तर यायचं नाही."

वेदा भारतात आली की पहिल्यांदा तिच्या सासरी राहायला जायची. तिच्या नवऱ्याला जास्त ऑफिसमधून सुट्टी मिळत नसल्याने तो पहिला पुढे ऑफिससाठी निघून जायचा. वेदा आमच्याकडे मग थोडे दिवस राहायची. ती आमच्या घरी आली की आम्ही खूप भटकंती करत असू. त्याचप्रमाणे आम्ही निनादला आदल्यादिवशी संध्याकाळी एअरपोर्टला सोडलं. वेदा आमच्याकडे राहायला आली. दुसऱ्या दिवशी आम्ही तिघे सकाळी लौकर उठून फिरायला बाहेर पडलो. वृंदाला आमच्याबरोबर येतेस का विचारलं असता तिने मला आज जमणार नाही म्हणून सांगितले. आम्ही टॅक्सीत बसून मुंबई फिरत होतो. कुलाबा कॉजवेला जाऊन सटरफटर खरेदी केली. दुपारी हॉटेलमध्ये जेवलो. मग आम्ही महालक्ष्मीच्या मंदिरात गेलो. मी आणि वेदाने देवीची ओटी भरली. देवीकडे मी अखंड सौभाग्य मागितलं. बराच वेळ मंदिरात बसून आम्ही घरी येण्यासाठी निघालो. हे म्हणाले की, " घरी जाऊन साधा वरणभात लावा आता पुन्हा बाहेरचं खायला नको."

आम्ही तिघे टॅक्सीत बसलो खरे पण टॅक्सीत बसल्याबसल्या ह्यांना प्रचंड खोकला सुरू झाला. आम्ही दोघी घाबरून गेलो. वेदाला सी - लिंक बघायचे असल्याने आमची टॅक्सी तिथून चालली होती पण ह्यांच्या खोकल्यामुळे आमचा बाहेर बघण्याचा कसलाच मूड नव्हता. वेदाने तिच्या भाऊजींना म्हणजेच महेश यांना फोन लावला की, " पप्पांना खोकला लागला आहे, थांबत नाही." महेशनी सांगितले की, " पप्पांना कुठल्यातरी चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा." समोर लिलावती हॉस्पिटल दिसत होतं तर हे बोलले, " मी तसा बरा आहे. मला पहिलं घरी न्या." त्याप्रमाणे त्यांना घरी नेले. खोकला थांबायचे नाव घेत नव्हता. ह्यांना आम्ही लगेच आमच्या जवळच्या डॉक्टरकडे नेले. डॉकटरांनी ह्यांना संपूर्ण चेक केलं असता ह्यांचे रिपोर्ट खूप चांगले आले. आयुष्यात पहिल्यांदा ECG चांगला आला. महेश यांनी माझ्या दादाला फोन करून सांगितले की, " मामा तुम्ही जवळ आहात तर ताबडतोब पप्पांना घेऊन गेले आहेत त्या डॉक्टरकडे पोहचा, मला तिथे पोहचायला थोडा वेळ लागू शकतो तर कोणीतरी आपलं माणूस तिथे असलं तर बरं होईल." यासाठी माझा दादा लगेच डॉक्टरांकडे पोहचला. हे दादाशी छान गप्पा मारत बसले. आश्चर्य म्हणजे ह्यांचा खोकला देखील कमी झाला होता. एक रिपोर्ट यायचा बाकी होता म्हणून आम्ही सगळे डॉकटरांकडे बसलो होतो. तो रिपोर्ट देखील चांगला आला म्हणून आम्ही डॉक्टरांच्या दवाखान्यातून बाहेर पडलो आणि क्षणार्धात भास्कर डॉकटरांच्या दवाखान्याच्या पायरीवर कोसळले. त्यांना हा आठवा आणि शेवटचा अटॅक आला होता. लगेच डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी चेक केले असता त्यांना समजले होते तरी त्यांनी सांगितले की, " ताबडतोब जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा " त्याप्रमाणे त्यांनी चिट्ठी लिहून दिली. पटकन भास्करांना टॅक्सीमध्ये घालून आम्ही हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघालो. टॅक्सीमध्ये ह्यांची काहीच हालचाल होत नव्हती. हॉस्पिटलमध्ये पोहचल्यावर तिथल्या डॉकटरांनी ह्यांच्या हृदयावर दाब देण्यास चालू केले पण भास्कर त्यांचे शरीर कधीच सोडून निघून गेले होते. ते पायरीवर कोसळल्यावरचं ऑन द स्पॉट त्यांचा मृत्यू झाला होता. ते मला म्हणायचे तसेच घडले," क्षमा माझा मृत्यू असा येईल की तुला समजणार देखील नाही."

भास्कर गेल्यावर पुन्हा नवरा गेल्याचं दुःख. मी एकटक भास्करांच्या निश्चल देहाकडे पाहत होते. अवघे बासष्ट वर्षांचे त्यांचे वय. आम्ही सगळे शोकाकुल अवस्थेत घरी आलो. वेदाने निनादला पप्पा गेल्याचा फोन केला असता निनाद म्हणाले, " वेदा काय सांगतेस काय ? अग काल तर पप्पा मला एअरपोर्टवर आलेले सोडायला आणि आज ते आपल्यातून कसे निघून जातील ?" आणि पुढे निनाद जे बोलले त्याने आमच्या सगळ्यांच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला. निनाद म्हणाले की, अगदी थोडयावेळापूर्वी मी पाणी प्यायला उठलो असता मला पप्पांसारखी अस्पष्ट आकृती माझ्याकडे बघत आहे असे दिसली. निनादना वाटलं की, त्यांना कसलातरी भास झाला आहे. पण तो भास नव्हता. भास्करांचा प्राण गेल्यावर भास्करांच्या आत्म्याने निनादला वेदाचा फोन जायच्याआधी वेदाचं परदेशातील घर, तिचा संसार बघितला.

माझ्या तिन्ही मुलांनी मला सौभाग्यलेणं काढायचं नाही म्हणून सांगितलं. पण माझा खरा दागिना हरपल्यावर त्या मंगळसूत्राला काय किंमत राहिली होती ?

भास्कर गेल्यावर वेदा मला काही महिने तिच्या घरी परदेशात घेऊन गेली. मला तिकडची प्रेक्षणीय ठिकाणे, स्थळे फिरवली. भास्करांनी त्यांचा शब्द खरा केला होता. मी वेदाकडे एकटीच गेले.

साठेंची आठवण आली आणि माझ्या डोळ्यांसमोर माझा जीवनपट उभा राहिला. जबाबदाऱ्यांवर जबाबदाऱ्या पेलल्या, खूप काही सोसलं आयुष्यात. आज तिन्ही मुलं माझी काळजी घेत आहेत. वेदाला देखील मुलगी झाली असल्याने आज मला दोन नाती आहेत. वेदा, निनाद, नावीन्या वर्षातून एकदा कमी दिवसांसाठी का होईना पण आम्हाला भेटायला येतात. वेदाची लेक नावीन्या माझ्याशी व्हिडिओ कॉल करून बोलते. तिची शाळेतली मजा सांगते. डान्स करून दाखवते. पियानो वाजवून दाखवते. तिची खेळणी दाखवते. खूप मज्जा वाटते तिच्या बाळलीला बघायला.

भास्करांनी व्यवस्थित गुंतवणूक करून ठेवली असल्याने मला पैसा - अडका, खाणं - पिणं कसलीच कमतरता भासत नाही पण काही झालं तरी स्त्रीला नवऱ्याचा आधार हा हवा असतोच नाही का ? आणि विशेष करून ह्या उतारवयात तर जास्तच.

( समाप्त )

सौ. नेहा उजाळे

ठाणे जिल्हा विभाग

🎭 Series Post

View all