विषय - कौटुंबिक कथामालिका
नूतन एक संघर्ष ( भाग १४ )
माझ्या भाच्याचे आम्हाला त्याच्या मुलीच्या निकिताच्या वाढदिवसाचे आमंत्रण आले म्हणून आम्ही दोघे त्याच्या घरी गेलो. घरातल्या घरात वाढदिवस साजरा होणार होता पण भाच्याने आणि सुनेने वाढदिवसाची जय्यत तयारी केली होती. बिल्डिंगच्या टेरेसवर खाण्यापिण्याची सोय केली होती. लहान मुलांसाठी तसेच मोठया माणसांसाठी खेळ आयोजित केले जाणार होते. घरात रंगीबेरंगी फुग्यांचे डेकोरेशन आम्ही सगळ्यांनी मिळून केले.
संध्याकाळी निकिताची ओवाळणी केली. केकची ऑर्डर दिली असल्याने मोठा सुंदरसा केक कापला गेला. लहान मुलांसाठी खेळ, गाणी यांनी वातावरण भारावले गेलेले. खाण्यापिण्याची तर इतकी चंगळ होती की काही विचारण्याची सोय नाही. समोसे, रगडा पॅटिस, पावभाजी, पाणीपुरी, छोले - भटूरे, पुलाव यांची जणू खाद्ययात्राचं होती. गोड पदार्थांमध्ये आईस्क्रीम, गाजरहलवा, मस्तानी यांची रेलचेल होती. भास्कर आधीच खवय्ये. त्यांना खाण्याचंच व्यसन त्यामुळे त्यांनी मनसोक्त प्रत्येक पदार्थांचा आस्वाद घेतला. आम्ही घरातील सगळे त्यांच्याकडे बघत होतो पण नेहमी नेहमी खाण्यासाठी काय बोलायचं म्हणून गप्पपणे त्यांना बघत रराहिलो होतो. वाढदिवस छान साजरा झाला. आम्ही सगळे निकिताचे गिफ्ट बघत होतो, गप्पा मारत होतो. आम्ही सगळे झोपायला जाणार तितक्यात ह्यांच्या छातीत कळा मारायला लागल्या. इतका दरदरून घाम फुटला की अंगातून नुसतं पाणी वाहत होतं. अंगावरचे कपडे जणू नुकतेच धुतल्यासारखे चिप्प भिजले. त्यांना काही एक अक्षरही बोलता येत नव्हतं. त्यांची अशी अवस्था पाहून माझ्या दोन भाच्यांनी त्यांना उचललं आणि गाडीत घालून थेट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. त्यांना सिव्हिअर अटॅक आला होता. भाचीच्या ओळखीने ताबडतोब ICU मध्ये त्यांना भरती केलं.
डॉक्टरांनी लगेच उपचार सुरू केले. त्यांची कंडिशन इतकी वाईट होती की उपचाराला त्यांचे शरीर काही प्रतिसाद देत नव्हते. हृदयाचे ठोके सुद्धा कमी प्रमाणात चालत होते. काही तासांनी डॉक्टरांनी जाहीर केले की, तुमच्या जवळच्या नातेवाईकांना बोलवा, वाचण्याचा खूप कमी चान्स आहे. डॉक्टरांच्या बोलण्याने माझ्या पायाखालची जमीन सरकली. ताबडतोब जावयाच्या कानावर घातले. वृंदा, महेश, वेदा, संचित लगेच नाशिकला यायला निघाले. माझ्या डोळ्यांतील अश्रू थांबत नव्हते, हातपाय जणू थिजून गेले होते तरी त्यांच्या आयुष्यासाठी मी ICU च्या बाहेर देवाचा धावा करत होते.
त्यांच्या मॉनिटरवरील रेष पूर्ण सरळ झाली. डॉक्टर बाहेर पेशंट गेल्याचं येऊन सांगणार तर माझ्या भाचीला ह्यांच्या तोंडातून अस्पष्ट कणल्ह्याचा आवाज ऐकू आला. तिने ताबडतोब ह्यांच्या छातीवर दाब द्यायला सुरुवात केली असता काही क्षणातच तिच्या प्रयत्नांना यश आले आणि भास्करांना पुन्हा जीवनदान मिळाले. ह्यावेळेस भास्कर तर पार स्वर्गाचे दार ठोठावून परत माघारी फिरलेले. जर माझ्या भाचीने ह्यांचा अस्पष्ट आवाज ऐकला नसता तर ते त्याच वेळी मृत घोषित झाले असते.
माझ्या नशिबी तर आता फक्त हॉस्पिटल आणि नवऱ्याची, सासूची सेवा करणे हेच होते. जवळपास पंधरा - वीस दिवसांनी ह्यांना डिस्चार्ज मिळाला. मी ह्यांना म्हटले की, " आता हा तुम्हाला पुनर्जन्म मिळाला आहे समजा आणि आता तरी पथ्य, आरोग्य सांभाळा."
आता मी ह्यांच्या तोंडाला आळा बसेल याची काटेकोरपणे काळजी घेत होते. सगळं पथ्याचं जेवण करून, घर आणि मुलांना सांभाळून ऑफिसमध्ये देखील जायचे. ह्यांना अजून पंधराएक दिवस तरी विश्रांतीची गरज होती. वंदना माझी तारांबळ पहायची. ती एकमेव माझी मैत्रीण होती की, जिला माझी अवस्था समजत होती.
दरम्यान माझी आई देखील गेली. आईच्या जीवाचे मरताक्षणी खूप हाल झाले होते. अन्न - पाणी सुद्धा तिला जात नव्हतं. तिची त्या यातनेतून सुटका व्हावी असे मनोमन वाटायचे. आपल्याला आपलं माणूस हवं असतं पण तिच्या अशा यातना बघून जीवाचं पाणी पाणी होत होतं. आईने कधी दारात आलेल्याला विन्मुख पाठवले नव्हते आज तीच आई शेवटच्या क्षणी अन्नपाण्याशिवाय गेली याचं मनाला प्रचंड दुःख झालं. आई - बाबा दोघांचं छप्पर आता गेलेलं.
आई गेल्यावर खूप भावनाविवश झालेले मी. पण दुःख तरी किती करत बसणार शेवटी संसारचक्र चालवायचे होतेच. काळ कोणासाठी थांबतो म्हणा.
आमची नात रेवा आमच्या घरी आली किंवा आम्ही तिच्या घरी गेलो तर आमच्या मनाला आनंद मिळायचा. आता तर ती शाळेतही जाऊ लागलेली. अभ्यासात अतिशय हुशार. आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत तिचा नंबर तीनच्या आत अगदी ठरलेला. संस्कृत श्लोक पाठांतर अतिशय दांडगे त्यामुळे त्यातही बक्षीस मिळायचे तिला. आजोबांना दर रक्षाबंधनाच्या दिवशी येऊन राखी बांधायची. हे तिला कौतुकाने पैसे देत असत.
हे आता खाण्यापाण्यावर जरी कंट्रोल करत असले तरी त्यांना पुन्हा सहावा अटॅक आला. पुन्हा हॉस्पिटलची वारी सुरू झाली. स्वतःची बायपास करायला तर अजिबात तयार नव्हते. वृंदा त्यांना मस्करीत \" अटॅकप्रूफ मॅन \" म्हणत असे. मला ते नेहमी म्हणत \" क्षमा माझा मृत्यू असा येईल की तुला समजणार देखील नाही.\"
माझ्या भाचवंडांची एक - एक करून लग्न होत होती. जो तो आपापल्या संसारात व्यग्र होता. वेदाने देखील स्वतःचे लग्न स्वतः ठरवले. तिच्या नवऱ्याचे स्वप्न म्हणजे त्याला कायमचे बाहेरगावी परदेशी कामकाजासाठी जायचे होते आणि तिथेच स्थायिक व्हायचे होते. त्याप्रमाणे वेदा आणि तिचा नवरा निनाद दोघेही परदेशी स्थायिक झाले.
काळ किती भरभर पुढे सरकतो नाही ? आमची नात रेवा देखील कॉलेजमध्ये जाऊ लागली. दहावीत तिला डिसटिंकशन मिळाले होते त्यामुळे तिला नावाजलेल्या कॉलेजमध्ये सहज ऍडमिशन मिळाली. ह्यांनी तिला भारीतलं घड्याळ गिफ्ट म्हणून दिले. आम्ही सगळे खूप खुश होतो आणि सुखाचे क्षण माझ्यासाठी वावडे असल्याने भास्करांना पुन्हा सातवा अटॅक आला.
क्रमशः