Mar 03, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

नूतन एक संघर्ष ( भाग १३ )

Read Later
नूतन एक संघर्ष ( भाग १३ )


विषय - कौटुंबिक कथामालिका

नूतन एक संघर्ष ( भाग १३ )

संचित तीन महिन्यांचा झाल्यावर मला कुठला विचित्र आजार जडला होता त्यातून मी बाहेर पडले होते. वेदा आणि संचित दोघे आजी - आजोबांकडे वाढत होते. दरम्यान साठेंचे मामा - मामी मला आणि भास्करांना भेटून गेले. भास्करांसारखी चांगली व्यक्ती माझ्या आयुष्यात आली आणि त्यांनी माझ्या जीवनाला नवीन आकार दिला म्हणून मामा - मामींना समाधान वाटले. माझा नवीन संसार बघून आम्हा दोघांना मनापासून आशीर्वाद दिला. साठेंच्या मामा - मामी दोघे माझ्यावर पहिल्यापासूनचं मुलीसारखी माया करत असल्याने त्यांना माझ्याबद्दल काळजी वाटायची. माझ्या लग्नाबद्दल समजल्याने त्यांना माझा नवरा, नवीन संसार बघायचा असल्याने ते दोघे आम्हाला प्रेमाने भेटायला आले होते.

माझ्या मोठया नणंदेच्या मोठया मुलीचे लग्न ठरले. आम्ही दहा - पंधरा दिवस आधी तिच्या लग्नासाठी गेलो होतो. रीतीने सगळ्यांचा मानपान केला. माझ्या भाचवंडांना मामाचे अतिशय अप्रूप त्यामुळे मामाला म्हणजेच ह्यांना लग्नामध्ये भलताच मान होता.

वेदा, संचित यांना सुट्टीच्या दिवशी आम्ही आमच्या घरी आणत असू. त्यांनाही आईवडिलांचे प्रेम मिळाले पाहिजे होतेच ना. वृंदा आता कधी माझ्याकडे तर कधी मामा लोकांकडे राहायची. वृंदाचा दोन्ही भावंडांवर अतिशय जीव. ते दोघे घरी आले की तिन्ही मुलांची चंगळ असे. आम्ही मुलांना भरपूर खाऊ, आईस्क्रीम, केक आणत असू.

मी माझ्या मधल्या नणंदेकरिता स्थळं बघायला सुरुवात केली. एकतर तिचे शिक्षण नाही, नोकरी नाही आणि अधू त्यामुळे तिचे कुठेच लग्न जमत नव्हते. तरी मी चिकाटीने तिच्यासाठी वरसंशोधन चालूच ठेवले.

वृंदा दहावी पास होऊन कॉलेजमध्ये जाऊ लागली. आम्ही दोघांनी तिला कॉलेजला जाण्यासाठी बरेच नवीन कपडे आणले. भास्कर खूप प्रेम करायचे वृंदावर पण कधी - कधी ह्यांच्यात आणि वृंदामध्ये थोडी कुरकुर होत असे. आणि मला वृंदा बरोबर असली किंवा चुकीची असली तरी भास्करांची बाजू घ्यावी लागे. एकतर वृंदा वयात येत होती त्यात तिचे त्या अडनीड्या वयातील आमच्याविषयी थोडेबहुत गैरसमज अशा वातावरणात ती एका मुलाच्या प्रेमात पडली आणि कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना तिने त्या मुलाशी म्हणजेच महेशशी लग्न केले. ह्यांचा पहिला विरोध होता तिच्या लग्नाला. ते महेशशी बोलत देखील नसत. पण वृंदाने पसंत केलेला मुलगा म्हणजेच माझा जावई इतका चांगला की त्याने प्रेमाने सासऱ्यांचं मन जिंकून घेतलं. नंतर तर अशी परिस्थिती निर्माण झाली की, जावयाशिवाय ह्यांचे पान देखील हलत नसे.

वृंदाच्या लग्नानंतर लगेच माझ्या नणंदेचे देखील लग्न झाले. लग्नात माझ्या नणंदेची चाळीशी उलटून गेलेली. आता तिचे लग्न जमेल अशी आशाच आम्ही सोडलेली. पेपरमध्ये एक जाहिरात आलेली की, परदेशी स्थायिक असलेल्या गृहस्थांना एका जोडीदाराची सोबत हवी होती. त्यांची प्रथम पत्नी वारली होती. त्यांना मुले होती पण ती दुसरीकडे राहत होती. त्यामुळे त्यांना सोबतीसाठी दुसरे लग्न करायचे होते. विशेष म्हणजे त्यांची जाहिरात वाचून त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांना माझी नणंद पसंत पडली आणि लग्न करून ते तिला परदेशी घेऊन गेले. वेदा आणि संचितला आम्ही आमच्याकडे आणले कारण आता सासूबाईंना मुलांचं करायचं तितकं जमत नव्हतं. सासरे घरी येऊन वेदा आणि संचितचा अभ्यास घ्यायचे.

भास्करांना गोड खाण्याचे प्रचंड वेड असल्याने त्यांना डायबिटीस जडला. आणि शुगर वाढून सुद्धा त्यांनी गोड खाण्याचे काही कमी केले नाही त्यामुळे त्यांना पहिला एंजाईना अटॅक आला. त्यावेळी त्यांचे वय अवघे पंचेचाळीसच्या दरम्यान असेल. ब्लॉकेज तयार झाले असल्याने ताबडतोब त्यांची एन्जोग्राफी करावी लागली. माझी परिस्थिती त्यावेळी खूपच वाईट झाली होती. डॉक्टरांनी सूचनांचा पाढा वाचून दाखवला. आहारावर नियंत्रण, व्यायाम अगदी नेटाने करावे लागेल असे सांगितले. आता सगळं पथ्याचं जेवण मी त्यांच्यासाठी बनवत असे. व्यायामाच्या नावाने बोंबचं होती. डॉक्टरांनी त्यांना एक किलोमीटर तरी चालायला सांगितले तर ते रोज न चालता केव्हातरी चालायचे आणि ते सुद्धा तीन ते चार किलोमीटर. म्हणजे काही करायचं नसेल तर काहीच नाही, नाहीतर एकदम वेगळं टोकं गाठायचं. तसा त्यांचा हट्टी स्वभाव होता.

घरी मी ह्यांना कटाक्षाने पथ्याचं जेवण द्यायचे आणि आम्ही कुठे लग्नसमारंभात किंवा अन्य कार्यक्रमात गेलो तर गोड खाण्यासाठी असे तोंड सोडायचे की जसे दुष्काळातून आले आहेत. आता त्यांच्या भाचवंडांची देखील लग्न झाली. प्रत्येक लग्नात ह्यांनी गोडावर आडवा हात मारला. ते गोड खाताना मी त्यांच्याकडे डोळे वटारून बघत असे कारण सगळ्यांसमोर कसं ओरडणार त्यांना गोड खाण्यापासून ? संधीचा मस्त फायदा उचलायचे ते. माझ्या डोळे वटारण्याकडे लक्ष न देता खाण्यावर लक्ष केंद्रित करायचे. परिणाम हाच झाला की त्यांना पुन्हा अटॅक आला. हॉस्पिटल, घर, नोकरी हे सांभाळताना माझी तारेवरची कसरत व्हायची. तरी जावई आणि लेक असायचे मदतीला. माझी धाकटी भाची डॉक्टर झाली होती ती सुद्धा तिच्या मामाला पथ्य सांभाळ म्हणून सांगायची पण ऐकतील ते भास्कर कसले ?

वृंदाला दिवस गेले आणि तिला मुलगी झाली. तिचे पहिले बाळंतपण म्हणून आम्ही केले. नात झाली म्हणून आम्ही दोघेही खूप खुश होतो. वेदा आणि संचित मावशी आणि मामा झाले म्हणून अतिशय खुश झाले. नात एक महिन्याची झाल्यावर भास्करांच्या वाढदिवशी तिचे बारसे केले. तिचे नाव \" रेवा \" ठेवले भास्करांच्या पसंतीचे. पहिली नात असल्याने तिचे अतिशय लाड होत होते. आम्ही दोघे ऑफिसमधून घरी येताना पहिलं वृंदाच्या सासरी जाऊन रेवाला भेटत असू आणि मग आमच्या घरी येत असू.

वयोपरत्वे माझे बाबा गेले. आईची तशी काळजी नव्हती आम्ही तिघे होतो तिच्यासाठी. पण शेवटी इतक्या वर्षांचा बाबांचा सहवास होता. नवरा गेल्यावर बाईचे तेज निघून जाते नाही का ? मंगळसूत्र, हिरव्या बांगडया हे लेणं काढलं जातं नवऱ्याबरोबर स्त्रीच्या अंगावरचं. खरंच खूप विचित्र पद्धती आहेत ह्या. आता थोडा काळ बदलत चालला आहे म्हणा.

भास्करांची अटॅकची जणू मालिकाचं तयार झाली होती. एव्हाना त्यांना चार अटॅक येऊन गेले होते. डॉक्टरांनी त्यांना बायपास करण्याचा सल्ला दिला होता पण त्यांना बायपास करून शरीराची चिरफाड करायची नव्हती. आता सासरे सुद्धा थकले होते. त्यांचं आजारपण काढलं. ते देखील काळाच्या पडद्याआड गेले. ते जायच्या आधी माझा सगळ्यात धाकटा दिर तापाचे निमित्त होऊन गेला.

क्रमशः

सौ. नेहा उजाळे

ठाणे जिल्हा विभाग
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Neha Ujale

पूर्णवेळ गृहिणी

मी इरा वर नवीनच लेखिका म्हणून आले आहे. मला वाचन आणि लिखाणाची प्रचंड आवड आहे.

//