नूतन एक संघर्ष ( भाग १२ )

नूतन नावाच्या स्त्रीच्या आयुष्यातील संघर्षाची कथा


विषय - कौटुंबिक कथामालिका

नूतन एक संघर्ष ( भाग १२ )

माझा नवीन संसार सुरू झाला. रोज पहाटे लवकर उठून स्टोव्ह पेटवून भाजी - पोळी बनवायचे. पाणी भरणे, कपडे, भांडी, कचरा, लादी करायचे. दोघांचे डब्बे भरायचे मग आवरून आम्ही दोघे ऑफिसला जायला निघत असू. संध्याकाळी घरी आलं की पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक. भास्कर अतिशय खवय्ये असल्याने त्यांना व्यवस्थित जेवण लागत असे. त्यांच्या आईच्या पद्धतीने मी जेवण बनवू लागले. आठवड्यातून चार वेळा वृंदाला भेटायला आम्ही दादाकडे जात असू तर सुट्टीच्या दिवशी आम्ही भास्करांच्या घरी जात असू. सासूबाईंचा राग निवळत चालला होता पण माझ्याशी त्या बोलत नसत. सासरे तर एकदम दिलखुलास व्यक्तिमत्त्व. त्यांची तर मी मुलगीच झाले होते.

वृंदाला भास्करांनी आपले स्वतःचे नाव दिले. त्यामुळे माझ्याबरोबर वृंदाचेही नाव बदलले गेले.

जावई म्हणून भास्करांचे आईकडे खूप कोडकौतुक होत असे. आईने त्यांचे वर्षभराचे सण मोठया उत्साहाने केले. भास्कर मुळातच नम्र त्यामुळे माझ्या दोन्ही भावांचे लाडके भाऊजी झालेले.

मला नुकतेच दिवस गेले होते. ह्यांना खूप आनंद झाला होता. मला काय खावंसं वाटतं, काय नाही याची ते काळजी ते घेऊ लागले. गरोदरपणाचे तेज माझ्या चेहऱ्यावर दिसत होते.

सातव्या महिन्यात आईने माझे ओटीभरंण केले कारण वृंदाच्या वेळी माझे कुठलेच कोडकौतुक झाले नव्हते. नववा महिना पूर्ण भरल्यावर मी एका मुलीला जन्म दिला. बाळ खूप छान होते. गोरेपान, भरपूर जावळ, कुरळ्या कुरळ्या केसांचे. वृंदा तर खूप खुश होती की तिला बहीण मिळालेली. वृंदा तर सारखी बाळाला घेऊन बसायची. तिच्यासाठी तिला तर हलणारी - डुलणारी बाहुलीचं मिळालेली. आई आणि वहिनीने माझे बाळंतपण केले. रोजच्या आहारात डिंक - हळीवचे लाडू, बदामाचा शिरा, खसखसशीची - हळीवची पेज यांचा जामानिमा असे.

बाळाचे बारसे घरातल्या घरात पण खूप थाटामाटात केले. बाळाचे नाव \" वेदा \" ठेवले.
वेदाला भास्करांच्या आई - बाबांकडे ठेवले कारण वृंदा मामाकडे राहत होती तर पुन्हा दुसऱ्या मुलीचा भार त्यांना कशाला द्यायचा आणि तेव्हा पाळणाघर वगैरे संकल्पना आलीच नव्हती. आपल्या मुलाची मुलगी म्हणून सासूबाई वेदाचा खूप मायेने सांभाळ करत होत्या. त्यांचं तसं एक चांगलं होतं की, सासूबाईंनी वृंदाचा कधी तिरस्कार नाही केला. ताईंची मुले आजोळी राहायला आली की, वृंदा देखील तिथे राहायला जायची. ताईंकडे नाशिकला राहायला जायची. तिच्याशी सगळे प्रेमाने वागत.

भास्करांच्या घरी तसे भास्कर एकटेच कमावणारे. घरी जी बहीण होती ती भास्करांपेक्षा वयाने दोन - तीन वर्षांनी मोठी त्यात ती अधू होती त्यामुळे तिचे लग्न जमत नव्हते. लहान भाऊ काही नोकरीधंदा करत नसे. त्यामुळे जो काही उदरनिर्वाह चालायचा तो भास्करांच्या एकट्याच्या जीवावर. धाकट्या दिरापेक्षा थोडा मोठा आणि भास्करांपेक्षा थोडा लहान असा अजून एक भाऊ भास्करांना होता पण तो त्याच्या कुटुंबासकट वेगळे राहत असल्याने तो आई - वडिलांना विचारत नसे. कधी त्यांना भेटायला देखील येत नसे. भास्करांना संसारासाठी आता माझी जोड मिळालेली. जरी आम्ही दोघे कमवत असलो तरी आम्हाला दोन - दोन संसार बघावे लागत होते. त्यात वृंदाच्या खर्चासाठी मला माहेरी पैसे द्यायला लागायचे. खूप काटकसरीने आणि काटेकोरपणे आम्हाला संसाराचा गाडा हाकावा लागत होता.

मला मुलाचे अतिशय वेड म्हणजे अगदी वेदाच्या वेळी असे वाटायचे की, मला मुलगाच व्हावा. एक मुलगा व्हावा म्हणून मी ह्यांच्याकडे सारखा हट्ट धरत होते. हे म्हणायचे देखील की, " कशाला तुझा इतका हट्ट आहे मुलासाठी. आपल्याला दोन मुली आहेत तर बास झाले ना ?" तरी मी माझा हट्ट सोडलाच नव्हता. ह्यांनी मला समजावले की, " पुन्हा जर मुलगी झाली तर काय करशील ? दोन मुली आहेत ना ? उगीच मुलाचा हट्ट नको धरुस." त्यावर मी म्हणाले, " तिसरी मुलगी झाली तर ऑपरेशन करेन पण मला मुलासाठी प्रयत्न करायचा आहे."

माझ्या मुलासाठीच्या प्रबळ इच्छेकरिता वेदा अडीज वर्षाची झाल्यावर मला पुन्हा दिवस गेले आणि मला मुलगा झाला. मुलगा झाल्याचा मला कितीतरी आनंद झाला होता.

आपल्या मुलाला मुलगा झाला म्हणून सासूबाईंनी माझ्यासाठी डिंकाचे लाडू बनवले पण ते मी काही खाऊ शकले नाही कारण माझी तब्येत अचानक बिघडली. रात्रीची झोप लागेना, काही खाणं -पिणं जात नव्हतं. कितीतरी डॉक्टरी उपचार केले. कशाला म्हणून गुण येईना. कुठला नक्की आजार आहे याचेही परीक्षण होत नव्हते. डॉक्टरी उपायांना यश येत नव्हते म्हणून नाईलाजाने बाहेरची बाधा झाली आहे का ते पाहिले. ते देखील कोण काही सांगेल ते उपाय केले. त्यानेही काही फरक पडेना. ह्या विचित्र आजारपणामुळे मला बाळासाठी दूधही आले नाही. वृंदा तेरा वर्षांची असल्याने तिला आतातर खूप समज आली होती. घरात जरी सासूबाई, नणंदबाई असल्या तरी वृंदा बाळाचे सगळं प्रेमाने करू लागली. बाळ रात्री उठून रडले तर उठून बाळाला बाटलीतून दूध पाजू लागली. इतक्या लहान वयात तिला आलेल्या समजेमुळे तिचे सगळ्यांना कौतुक वाटायचे.

लेकाचे बारसे करायचे होते पण माझ्या अंगात काही त्राण उरला नव्हता तरी कशीबशी तीन - चार तास बसले. कित्येक दिवस झोप नाही म्हणून डोळे ताठरलेले, गालफडं आत गेलेली, काळवंडलेला चेहरा अशा अवस्थेत बाळाचे बारसे पार पडले. बाळाचे नाव \" संचित \" ठेवले. ह्या बाळाची सांभाळण्याची जबाबदारी पुन्हा भास्करांच्या घरच्यांनी घेतली.

आईकडे असताना मी \" एकटा जीव सदाशिव \" होते. वृंदाची जबाबदारी होती पण दादाच्या कुटुंबात आम्ही दोघी समावल्याने संसाराची कसली चिंता नव्हती. आता तर जबाबदाऱ्या आणि अपेक्षांचे ओझेचं माझ्या पाठीवर होते.

क्रमशः

सौ. नेहा उजाळे

ठाणे जिल्हा विभाग

🎭 Series Post

View all