नूतन एक संघर्ष ( भाग ११ )

नूतन नावाच्या स्त्रीच्या आयुष्यातील संघर्षाची कथा


विषय - कौटुंबिक कथामालिका

नूतन एक संघर्ष ( भाग ११ )

भास्कर आणि माझे आता लग्नंच होणार असल्याने भास्कर आमच्या घरी आठवड्यातून एक - दोन वेळा तरी येत असत. घरच्यांची परमिशन घेऊन ते मला आणि वृंदाला फिरायला घेऊन जायचे. कधी पिक्चर, तर कधी चौपाटीवर, तर कधी म्युझियम, तर कधी गेट वे ऑफ इंडिया अशा ठिकाणी आम्ही तिघे फिरत असू. त्यांच्या अशा वागण्याने वृंदा देखील त्यांच्यासोबत खुलू लागली होती. भास्कर मुद्दाम आमच्याबरोबर वृंदाला घेत असत म्हणजे तिला अचानकपणे मी तुझा पप्पा आहे असं सांगायला नको. एकदा का लग्न झालं की ती आपोआप पप्पा म्हणून स्वीकारेल. तशी वृंदाला कल्पना तर आली होती फक्त ती बोलून दाखवत नव्हती. वृंदा तशी लहानपणापासून परिस्थितीमुळे एकदम गुणी आणि परिपक्व झाली होती.

भास्करांनी माझ्यासाठी लग्नात नेसायला गर्द हिरवी कांजीवरम साडी आणली. माझ्या पसंतीचे मंगळसूत्र केले. आई - बाबांनी भास्करांना सोन्याची चेन केली तसंच मी त्यांना सोन्याची अंगठी केली.

भास्करांचे बाबा लग्नाला उपस्थित राहणार होते. भास्करांच्या बाबांनी सांगितले की, " भास्करच्या आईला तुम्ही दोघे लग्न करूनच पाया पडायला जा. एकदा का लग्न झाले की, आपसूकच तुला सून म्हणून स्वीकारावे लागेल आणि तुम्ही दोघे वेगळे राहा कारण भास्करच्या आईच्या मर्जीविरुद्ध हे लग्न होत आहे." म्हणून माझे जे घर होते तिथे मी व्यवस्थित संसार मांडला. आईने संसाराला लागणारी आवश्यक भांडी दिली. थोडी आम्ही दोघांनी विकत घेतली. घराला रंगरंगोटी केली.

लग्नाचा दिवस उजाडला. मुलांना माझ्या एका काकांच्या घरी सोडलं आणि आम्ही सगळे रजिस्टर ऑफिसमध्ये पोहचलो. माझ्या घरची माणसे आणि भास्करांचे बाबा इतक्याच माणसांमध्ये आमचे लग्न झाले. मला आणि भास्करांना आमच्या लग्नात वंदनाला बोलविण्याची खूप इच्छा होती पण वंदनाचे दिवस भरत आले होते. भास्करांनी माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातले. माझ्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले. मी आठ वर्षे कुठलाही साजशृंगार केला नव्हता. आज मंगळसूत्राने एक वेगळेच तेज माझ्या चेहऱ्यावर आले होते. हाताला मेहंदी, पायात जोडवी, हातात हिरव्या बांगड्या, गर्द हिरवी साडी, केसांत चार - पाच मोगऱ्याचे गजरे, कुठलाही भडक मेकअप न करता देखील माझे रूप खुलून आलेले. भास्करांनी माझे नाव बदलून क्षमा ठेवले.

सगळ्यात पहिलं आम्ही भास्करांच्या घरी गेलो त्यांच्या आईच्या पाया पडायला. आम्हाला बघून भास्करांची मधली बहीण जीचे लग्न झाले नव्हते ती पुढे आली. तिने आम्हा दोघांना ओवाळले. तांदळाने भरलेले मापटे ओलांडून मी घरात गेले. सासरे व सासूबाईंच्या पाया पडले तर सासूबाई रागावल्या होत्या पण काही बोलल्या नाही. फक्त माझ्याकडे बघत राहिल्या. आम्ही दोघे देवाला पाया पडलो. सासऱ्यांनी आणि नणंदेने मात्र तोंडभरून आशीर्वाद दिला. धाकट्या दिराने माझे चांगले स्वागत केले. अगदी \" वहिनी, वहिनी \" हाका मारत होता. भास्करांचे घर तसे लहान होते. माझ्या नणंदेने पटापट स्वयंपाक केला. मला खरंतर सासरी राहायचे होते पण सासरे म्हणाले की, " भास्करची आई रागावली आहे तर इथे राहू नका. मधेमधे भेटायला येत जा म्हणजे तिचा राग कमी होईल." आम्ही जेवून दादाच्या घरी आलो. वृंदा माझी वाट बघत होती. वृंदासमोर कसं जायचं ? मला सजलेल्या वेशात पाहून तिची प्रतिक्रिया काय असेल ? असे अनेक प्रश्न मनात घोळत होते.

आम्हाला दारात थांबवून आईने आमच्या दोघांच्या अंगावरून भाकरतुकडा ओवाळून टाकला. आम्ही दोघे घरात शिरताच वृंदाने मला कडकडून मिठीच मारली. तिला घट्ट कवटाळून माझ्या डोळ्यांत अश्रू उभे राहिलेले. भास्करांनी वृंदाला जवळ घेतले. वृंदा इतकी समजूतदार की तिने भास्करांना \" पप्पा \" अशी हाक मारली. त्याक्षणी सगळ्यांना भरून आले.

दादाने सगळ्यांसाठी व्हॅनिला आईस्क्रीमचे कप आणून ठेवले होते. दादाकडून आईस्क्रीम खाऊन आम्ही आमच्या घरी निघालो. भास्करांसोबत एक नव्या आयुष्याची सुरुवात करायला.

दुसऱ्या दिवशी आम्हाला पहाटे उठून ट्रेनने नाशिकला जायचे होते. भास्करांची सगळ्यात मोठी ताई नाशिकमध्ये राहत असे. भाऊजी सरकारी नोकरीत वरीष्ठ अधिकारी पण कधी भ्रष्टाचार त्यांनी केला नव्हता. पाच पैसे कधी कोणाकडून घेतले नव्हते. एकदम स्वच्छ चारित्र्य. ताईंना चार मुलं. दोन मुली, दोन मुलगे. सगळे शाळा - कॉलेजमध्ये शिकणारे. आम्ही ताईंकडे सकाळी अकराच्या सुमारास पोहचलो. ह्यांनी भाऊजींना आमच्या लग्नाची सगळी कल्पना दिली होती. ताई - भाऊजींनी आमचे चांगले आदरातिथ्य केले. मुले तर अगदी आनंदाने मला \" मामी - मामी \" करत होते. त्यांच्याकडे एक रात्र राहून आम्ही देवदर्शनासाठी दुसऱ्या दिवशी सकाळीच निघालो. निघताना ताईंनी माझी साडी - चोळीने ओटी भरली.

जेजुरी, ज्योतिबा, कोल्हापूरची अंबामाता सगळ्या देवी - देवतांचे दर्शन घेऊन जवळपास सात - आठ दिवसांनी आम्ही मुंबईत आलो. पुढचे दोन दिवस ऑफिसला सुट्टी घेतली. दोन दिवसात आईकडे आमचा पाहुणचार झाला. मला माझ्या घरात स्वयंपाक करावा लागला नाही. आता एकदा आम्ही दोघे ऑफिसला जायला लागलो की सकाळी उठून आमच्या दोघांचा डब्बा मला बनवायला लागणार होता. आईने मला सांगितले की, " इतक्यात वृंदाला नेऊ नकोस तुझ्याकडे. तुझ्या नवीन संसारात पहिला तुझा व्यवस्थित जम बसव मग पुढचं पुढे बघूया. तसंही वृंदाला मामा लोकांकडे राहायला आवडतेच. तू तिची काही काळजी करू नकोस." त्यामुळे वृंदा मामाकडे राहत होती.

आम्ही लग्नानंतर पहिल्यादिवशी ऑफिसला गेलो तर ऑफिसमध्ये सगळ्यांनी आमचे स्वागत केले. ज्या लोकांनी नावे ठेवली होती त्यांनी देखील आमच्या तोंडावर आम्हाला शुभेच्छा दिल्या. वंदना नेमकी बाळंतपणासाठी रजेवर गेली होती. तिला दुसरा मुलगा झाला होता. वंदनाला कधी एकदा भेटते असे मला झाले होते म्हणून त्याचं दिवशी संध्याकाळी आम्ही वंदनाला भेटायला तिच्या घरी गेलो. आम्हाला दोघांना एकत्र पाहून वंदनाला प्रचंड आनंद झाला. मला तर तिने कडकडून मिठीच मारली. तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले. वंदनाच्या सासूबाईंनी आम्हाला कांदेपोहे केले. चहापाणी करून वंदनाच्या लेकीला खाऊ आणि बाळाच्या हातात पैसे ठेऊन आम्ही दोघे तिच्या घरून निघालो. मी निघताना वंदनाच्या सासूबाईंनी माझी ओटी भरली.

घरी आल्यावर मला थोडा थकवा जाणवला कारण पूर्ण आठवडा दगदग झाली होती आणि पहाटे उठून स्टोव्हवर स्वयंपाक केला होता. दादाकडे मला स्वयंपाक करायला लागायचा नाही कारण आई आणि वहिनी मिळून स्वयंपाक करत असत. घरी आल्यावर फ्रेश होऊन थोडा वरणभात शिजवून आम्ही दोघांनी खाल्ला. अशा रीतीने माझा संसार चालू झाला होता.

क्रमशः

सौ. नेहा उजाळे

ठाणे जिल्हा विभाग

🎭 Series Post

View all