नूतन एक संघर्ष ( भाग १० )

नूतन नावाच्या एका स्त्रीच्या आयुष्यातील संघर्षाची कथा


विषय - कौटुंबिक कथामालिका

नूतन एक संघर्ष ( भाग १० )

भास्करांनी मला लग्नाचे वचन दिले खरे पण त्यांना त्यांच्या आईला कसं राजी करायचे हेचं समजत नव्हते. त्यांचे वडील त्या काळातले सुशिक्षित, आधुनिक विचारसरणीचे आणि खेळाडू वृत्तीचे असल्याने वडिलांनी नक्कीच विरोध दर्शवला नसता याची भास्करांना खात्री होती. तरी त्यांनी थोडं घाबरतंच वडिलांकडे विषय काढला, " बाबा तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचे होते."

" हां ! बोल."

" बाबा, मी एका माझ्या ऑफिसमधल्या मुलीवर प्रेम करतो."

" कोण आहे ती मुलगी ? कुठे राहते ?"

" बाबा खरंतर ती कुमारिका नाही तिला आठ वर्षांची मुलगी आहे. तिच्या पतीचा मृत्यू ती गरोदर असतानाच एका अपघातात झाला. बाबा तुम्ही आधुनिक विचारांना प्राधान्य देता तर कदाचित तुम्ही मला सपोर्ट कराल अशी आशा वाटली म्हणून तुम्हाला सांगितले. मी तिला लग्नाचे वचन दिले आहे. आईच्या कानावर कसं घालू तेच समजत नाही. तुम्ही ह्या विषयावर बोलाल का आईशी ?"

" हे बघ भास्कर, मी पहिल्यांदा त्या मुलीला भेटतो. ती मुलगी मला चांगली वाटली तरंच तुझ्या आईकडे विषय काढेन." बाबांच्या बोलण्याने भास्करांना दिलासा मिळाला.

भास्करांचे बाबा मला दुसऱ्याच दिवशी ऑफिस सुटल्यावर संध्याकाळी भेटायला आले. आम्ही तिघे एका हॉटेलमध्ये बसलो. माझ्या तर घशाला कोरड पडली होती. भास्करांचे बाबा काय निर्णय देतील याचीच मनात धाकधूक होती. भास्करांचे बाबा अतिशय दिलखुलास व्यक्तिमत्त्व. ते माझ्याशी खूप छान बोलले. माझी सगळी माहिती विचारून घेतली. मला न दुखावता माझ्या पूर्वाश्रमीबद्दल, वृंदाबद्दल आपुलकीने चौकशी केली. भास्करांच्या बाबांना एकंदर मी सून म्हणून आवडले होते. आता खरी परीक्षा भास्करांच्या आईची संमती मिळवण्याविषयी होती. भास्करांची आई जमदग्नीचा अवतार होती. त्यांच्याकडे हा विषय काढणं म्हणजे जरा अवघडचं होतं.

भास्करांच्या बाबांनी आईचा मूड पाहून आमच्या लग्नाचा विषय काढला. भास्कर एका मुलीवर प्रेम करतो असे ऐकल्यावर त्यांना फारसं वेगळं वाटलं नाही पण भास्कर एका आठ वर्षाच्या मुलीच्या आईशी आणि एका विधवेशी लग्न करणार असे ऐकल्यावर त्यांनी आकांडतांडव केला. त्यांचे असे वागणे एका आईच्या दृष्टीने काही अयोग्य नव्हते म्हणा. कुठल्या आईला आवडेल आपल्या अविवाहित मुलाने लग्नाबाबत असे पाऊल उचलल्यावर ? भास्करांच्या आईला हा एकदम अनपेक्षित धक्काच होता. त्यांनी भास्करांशी आणि त्यांच्या बाबांशी बोलणे टाकले. नंतर दोन / तीन दिवसांनी भास्करांना मी कुठे राहते वगैरे दरडावून चौकशी केली. भास्करांनी मी कुठे राहते ते सांगितले.

दोन दिवसांनी रविवार होता. साहजिकच सगळे घरात होते. अगदी प्रसाद आणि स्वाती देखील आले होते. दुपारची वामकुक्षी झाल्यावर संध्याकाळी साडेचार - पाचच्या सुमारास आम्ही घरातील सदस्य एकत्र गप्पा मारत बसलो होतो तोच भास्करांच्या आईंनी ओरडाआरडा करतचं आमच्या घराची बेल वाजवली. आम्ही सगळे एकदम शांत झालो आणि काहीच कळेना की बाहेर इतका आरडाओरडा कोण करत आहे ? दादाने पुढे जाऊन दार उघडले असता त्या एकदम भांडणाच्या आवेशात घरात शिरल्या. मला खूप वाईटसाईट बोलल्या. आमच्या घरात इतके मोठे भांडण आणि इतका मोठा आवाज कधीच झाला नव्हता. दादा, प्रसाद, आई, बाबा त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते पण त्या जरासुद्धा ऐकून घेत नव्हत्या. मुलं तर घाबरून गॅलरीत लपून बसली. मुलांनाही समजेना ह्या कोण बाई आल्या आहेत आणि इतक्या जोरजोरात बोलत आहेत. माझ्यावर भरपूर तोंडसुख घेऊन त्या घराबाहेर पडल्या. त्यांनी त्यांच्या घरी गेल्यावर सांगितले की, " भास्कर तुझं लग्न होणं शक्य नाही. मी आता तिच्या घरी गेलेले आणि खूप वाटेल तसे बोलून आले तिला."

जसं भास्करांना समजले त्यांची आई आमच्या घरी येऊन गेली आणि तिने खूप गोंधळ घातला तसं लगेच भास्करांनी पायात चपला चढविल्या आणि तडक आमच्या घरी आले. आल्याआल्या त्यांनी बाबा, आई, दादा, प्रसाद आणि माझी माफी मागितली. त्यांनी दादाला वचन दिले की, \" काहीही झालं तरी मी लग्न करेन तर फक्त नूतनशीच.\" त्या दिवशी कोणीही काही बोलण्याच्या आणि भास्करांचे आदरातिथ्य करण्याच्या मनस्थितीतचं नव्हते. केवळ पाणी पिऊन भास्कर निघून गेले. मला तर काहीच सुचत नव्हते आणि घरातले लोकंही धास्तावले होते.

तेव्हा मुलं आताच्या मुलांसारखी पालकांना प्रश्न विचारत नसत त्यामुळे मुलांनी काही एक प्रश्न विचारला नाही. बिल्डिंगमधल्या शेजारीपाजारी लोकांनी पण आम्हाला काही विचारलं नाही तरी त्यांची नजर काहीशी गोंधळलेली, प्रश्नार्थक अशी दिसत होती.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी भास्करांचे बाबा आमच्या घरी आले आणि त्यांनी भास्करांच्या आईच्या वतीने सर्वांची माफी मागितली आणि सांगितले की, " भास्करच्या आईच्या अशा वागण्याने तुम्हा सर्वांना नक्कीच मानसिक त्रास झाला असेल. भास्करच्या आईचा जरी ह्या लग्नाला विरोध असला तरी मी ह्या दोघांचे लग्न लावून देईन. तुम्ही काही काळजी करू नका. मला वाटंत नाही की, भास्करची आई ह्या दोघांच्या लग्नाला मान्यता देईल त्यामुळे आपण लौकरात लौकर रजिस्टर पध्दतीने ह्या दोघांचे लग्न लावून देऊ."

भास्करांच्या वडिलांच्या दिलसादायी शब्दांनी सगळ्यांच्या डोक्यावरील ताण नाहीसा झाला. चांगला मुहूर्त पाहून लग्नाची तारीख ठरवली गेली. रजिस्टर ऑफिसमध्ये एक महिनाआधी आम्ही लग्नाची नोटीस दिली. हे दुसरं लग्न देखील रजिस्टर पध्दतीने अगदी साधेपणाने होणार होते. म्हणजे पहिल्या लग्नात सासुनेच आक्षेप घेतला होता आणि दुसऱ्या लग्नासाठी देखील सासुनेच. भास्करांचे तर पहिलेच लग्न होते. त्यांना त्यांच्या लग्नात कुठलीही हौसमौज करायला मिळणार नव्हती. मला त्यांच्याविषयी वाईट वाटत होते पण ते तटस्थ होते.

क्रमशः

सौ. नेहा उजाळे

ठाणे जिल्हा विभाग

🎭 Series Post

View all