नूतन एक संघर्ष ( भाग ९ )

नूतन नावाच्या स्त्रीच्या आयुष्यातील संघर्षमय कथा
विषय - कौटुंबिक कथामालिका

नूतन एक संघर्ष ( भाग ९ )

भास्करांना भेटून घरी आले तर सगळेच माझी वाट पाहत होते. भास्कर आणि माझ्यामध्ये काय बोलणे झाले आहे याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली. मी सगळ्यांना अगदी इत्यंभूत घडलेले सांगितले. सगळ्यांनी आता भास्करला आम्हाला भेटंव असा घोषा लावला. आईने तर लागलीच देवापुढे साखर ठेवली.

दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेले असता भास्कर आणि मी केवळ नजरेनेच बोललो. लंचटाईमला वंदनाला सगळं काही सांगितले. तिला प्रचंड आनंद झाला. संध्याकाळी घरी जायच्या वेळेस भास्कर ऑफिसच्या गेटपाशी आमच्या दोघींची वाट पाहत होते. आम्ही गेटजवळ आलो असता भास्कर म्हणाले, " नूतन मी येत्या रविवारी तुझ्या घरी येईन." मी \" चालेल \" इतकंच बोलले आणि वंदनाचा हात घट्ट दाबून ठेवला. अशा अचानक जीवनात आलेल्या कलाटणीला कसं सामोरं जाऊ तेच समजत नव्हते.

रविवारी ठीक सहा वाजता भास्कर आमच्या घरी आले. प्रसाद आणि स्वाती देखील दादाच्या घरी भास्करांना भेटण्यासाठी आले होते. भास्कर येण्याआधीपासूनच माझ्या छातीत धडधडू लागले होते. आईने सर्वांसाठी गोड शिरा केला होता. दादाने भास्करांना बसण्यास खुर्ची दिली. माझ्याकडे बघून दादा म्हणाला, " नूतन सर्वांची ओळख तर करून दे ह्यांना."

मी भास्करांना सर्वांची ओळख करून दिली. दादा आणि बाबांनी भास्करांना त्यांच्याविषयी, त्यांच्या फॅमिलीविषयी अनेक प्रश्न विचारले. भास्कर देखील नम्रपणे त्यांना उत्तर देत होते. आईने गरमागरम शिरा पुरुष मंडळींना दिला. आईच्या हातच्या शिऱ्याची तारीफ करत भास्करांनी शिरा संपवला. एकंदरीत भास्कर सगळ्यांना आवडले. भरपूर गप्पा मारून भास्कर त्यांच्या घरी जाण्यास निघाले. वृंदा आणि माझी भाचवंडे हॉलच्या गॅलरीतून हळूच सगळ्यांना बघत होती. भास्करांची नजर बहुतेक वृंदाला शोधत होती. मी दादाला सांगितले की, भास्करांना वृंदाला पहायचे आहे. दादाने वृंदाला बाहेर ये म्हणून हाक मारली असता वृंदा थोडी बिचकतंच गॅलरीच्या बाहेर आली. भास्करांनी वृंदाला जवळ घेतले. तिच्याबद्दल, तिच्या शाळेबद्दल, तिच्या आवडीनिवडीबद्दल भास्करांनी खूप खेळीमेळीने प्रश्न विचारले. पहिलंपहिलं वृंदा भेदरलेली पण भास्कर तिच्याशी इतक्या प्रेमळपणे बोलत होते की ती नंतर त्यांच्याशी मोकळेपणाने बोलली. मी दारापर्यंत भास्करांना निरोप द्यायला गेले. दादा आणि प्रसाद भास्करांना बिल्डिंगच्या गेटपाशी सोडायला गेले. ते तिघे तिथे बराच वेळ बोलत उभे होते.

दादा घरात शिरल्या शिरल्या आईने दादाला बाजूला घेऊन विचारलं की, " प्रशांत काय म्हणाले रे भास्कर ? बाहेर देखील इतक्या गप्पा रंगल्या होत्या तुमच्या. काही लग्नाबाबत वगैरे बोलणी झाली का ?" दादा म्हणाला, " भास्कर म्हणाले की, मी माझ्या आईवडिलांशी नूतनबाबत बोलतो मग तुम्ही माझ्या आईवडिलांना भेटा. भास्कर खूप चांगला मुलगा आहे. आपल्या नूतनला सुखी ठेवेल. नूतनची आता काळजी मिटली. लौकरात लौकर भास्करच्या घरी जाऊन दोघांच्या लग्नाची बोलणी करूया." भास्कर आमच्या घरात सगळ्यांना पसंत पडले होते. घरातल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आज समाधान होते. रात्री वृंदाला थोपटत असता वृंदा मला विचारले की, " मगाशी आपल्याकडे कोण आले होते ?" मी तिला सांगितले ते आमच्या ऑफिसमधले आहेत. वृंदाला बहुतेक काहीतरी समजले असावे तिने पुढे काही विषय वाढवला नाही.

सोमवारी ऑफिसमध्ये गेल्यागेल्या वंदनाला सगळं सविस्तर सांगितले. वंदनाने आनंदाच्या भरात मला मिठीच मारली. तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले आणि ती म्हणाली, " नूतन मी आज खूप खुश झाले आहे. तुला तुझ्या तरुणपणात किती दुःख सोसावं लागलं ? आता भास्करांच्या रूपाने तुझ्या आयुष्यात सुख चालून आले बघ. मी रोज देवाकडे तुझ्यासाठी प्रार्थना करायचे त्याचे फळ आत्ता मिळाले."

लंचटाईम मध्ये भास्कर आमच्या टेबलजवळ आले आणि मला बोलले की, " नूतन तुझ्या घरातील सगळी माणसे खूप चांगली आहेत. माझा आपुलकीने आदरसत्कार केला. माझ्याशी प्रेमाने बोलले. वृंदा खूप गोड मुलगी आहे. तिच्याकडे बघून माझ्या हृदयात कालवाकालव झाली. मी तिला वडिलांचं प्रेम देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन." भास्करांच्या बोलण्याने मला भरून आले.

ऑफिसमध्ये खूप कमी स्टाफ असल्याने आम्ही दोघे लग्न करणार आहोत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. काहींनी अगदी तोंडभरून आम्हाला शुभेच्छा दिल्या तर काहींनी नाकं मुरडली. ऑफिसमधल्या दोघी तिघी बायका ज्या माझ्या देखील कलीग होत्या. त्या आपापसात कुत्सिस्त भावनेने कुजबुजत होत्या, त्यातली एक बोलली की, " कसा काय भास्कर नूतनशी लग्न करणार आहे ? तिला एक मुलगी पण आहे आणि हा अजून अविवाहित आहे." लगेच त्यावर दुसरी म्हणाली, " नूतनने भास्करपासून लपवले असेल तिला मुलगी असल्याचे." त्यांचे हे शब्द माझ्या कानावर पडले आणि मला एकदम कसेनुसे झाले. काही लोकं किती वाईट विचार करू शकतात. तसं तर साठे गेल्यापासून लोकांचे खूप वाईट अनुभव घेतलेच होते. खूप टोमणे सहन केलेले. पण आता जर माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडणार होतं ते सुद्धा काहींना बघवत नव्हतं याचं वाईट वाटलं. भास्करांना त्या बायकांचे बोलणे सांगितल्यावर भास्कर मला म्हणाले, " नूतन लोकांकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. लोकं दोन्ही बाजूनी बोलतात. आपण लग्न करणार आहोत कुठलं पाप नाही. अशा लोकांच्या घाणेरड्या वृत्तिकडे दुर्लक्ष करायचं. आणि आता तू एकटी नाही, मी तुझ्यासोबत आहे." भास्करांचे दिलसादायी शब्द, त्यांचे माझ्याविषयीचे प्रेम, त्यांचे उच्चविचार, भास्करांच्या स्वभावाचे अनेक पैलू मला दिसत होते आणि दिवसेंदिवस मी त्यांच्या प्रेमात आकंठ बुडत होते.

क्रमशः

सौ. नेहा उजाळे

ठाणे जिल्हा विभाग

🎭 Series Post

View all