नूतन एक संघर्ष ( भाग ८ )

नूतन नावाच्या स्त्रीच्या आयुष्यातील संघर्षाची कथा


विषय - कौटुंबिक कथामालिका

नूतन एक संघर्ष ( भाग ८ )

गुरुवारी म्हणजेच दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यावर आईला जवळच्या साईबाबांच्या मंदिरात घेऊन गेले. आईकडे खूप महत्त्वाचं बोलायचं असल्याने वृंदाला सोबत घेतले नाही. वृंदाला अभ्यास करावयास सांगून आम्ही दोघी निघालो. तसंही मी आईला घेऊन बऱ्याच वेळा कुठल्या ना कुठल्या मंदिरात जात असल्याने घरातल्यांना काही वेगळे वाटले नाही.

देवळात गेलो तेव्हा आरती चालू होती. धूप, कापूर, अगरबत्तीच्या सुवासाने मन प्रसन्न झाले होते. साईबाबांचे दर्शन घेऊन देवळातल्या एका बाकड्यावर आम्ही मायलेकी बसलो. आईकडे भास्कारांचा कसा विषय काढू तेच समजत नव्हते. मी खाली मान घालून पदराशी चाळा करत बसलेले. आईने कसे काय माझ्या मनातले ओळखले, " नूतन तुला माझ्याशी काही बोलायचे आहे का ?"

" हो आई, पण..... कसं बोलू तेच समजत नाही."

" अग काय बोलायचं आहे ते मनमोकळेपणाने बोल. मनात काही ठेऊ नकोस. अशाने खूप त्रास होतो जीवाला."

आईच्या बोलण्याने थोडा धीर आला. " आई अग, माझ्या ऑफिसमध्ये एक मुलगा आहे. त्याने वंदनाजवळ मला निरोप दिला आहे की, त्याला मी खूप आवडते. तो माझ्यावर प्रेम करतो आणि त्याने मला रविवारी संध्याकाळी भेटायला बोलावलं आहे."

" कोण आहे तो मुलगा ? चांगला आहे का ?"

" आई, असातरी चांगलाच वाटतो एकदम सभ्य, शांत. कोणाच्या अध्यात मध्यात नाही. आपलं काम भलं आणि आपण भलं असा आहे तो."

" हो का ? बघ भेटून त्याला काय बोलतो तो. चांगला असेल तर तुझ्या लग्नाचा विचार कर. तसंही मला खूप टेन्शन असतं तुझं. तुझ्या आणि वृंदाच्या विचाराने रात्र रात्र झोप लागत नाही. इतकी तरुण मुलगी, पदरात एक पोर. कसं होईल तुझं पुढे ? कालचं पाहिलंस ना वृंदाला तिचे स्वतःचे बाबा हवे आहेत. आता आम्ही दोघे अजून जिवंत आहोत. आमच्यापाठी कोण विचारेल की नाही विचारणार तुला. किती असंख्य विचार असतात. भेटून बघ त्या मुलाला. काय म्हणतो ते बघ."

" आई, मी भेटते त्याला. पण आई जर त्याने वृंदासकट मला स्वीकारलं तरंच मी त्याला होकार देणार आहे नाहीतर नाही."

" हे बघ, वृंदाची काळजी करू नकोस. तिचे दोन्ही मामा तिच्यावर खूप माया करतात." आईचं बोलणं मी अर्धवट तोडत बोलले, " आई, मी वृंदाला टाकून स्वतःचा स्वार्थ नाही साधणार."

" बरं बाई ! ठीक आहे. जशी तुझी मर्जी. त्या मुलाला भेट तरी आणि बोल सगळं तुझ्या मनातलं. नाव काय म्हणालीस त्याचं ?"

" भास्कर काटकर." आईशी बोलून मन हलकं झालं होतं. घरी सर्वांना सांगण्याची जबाबदारी आईने घेतली होती त्याप्रमाणे आईने सगळ्यांना समजावून सांगितले. भास्करला भेटण्यासाठी कोणीही आक्षेप घेतला नाही.

रविवारी हलकीशी फिकट आकाशी कलरची त्यावर ऑरेंज रंगाची फुले अशी जॉर्जेटची साडी नेसले. केसांची सैलसर वेणी घातली. साठे गेल्यापासून केसांत तर एकही फुल माळले नव्हते. त्याकाळी नवरा गेला म्हणजे स्त्रीला शृंगार व्यर्ज. त्यामुळे एकदम साधे पण टापटीप राहायला मला आवडायचे. बरोबर पाच वाजता मी दादर चौपाटीवर वंदनाने सांगितलेल्या ठिकाणी पोहचले. भास्कर तिथे आधीच येऊन उभा होता. भास्करला पाहून माझ्या हृदयात धडधड वाढली. आम्ही दोघे वाळूवर बसलो. दोघांना खरंतर काय बोलायचे सुचत नव्हते. मी तर उगीच वाळूत रेघोट्या ओढत होते. शेवटी भास्करनेच बोलायला सुरुवात केली.

" नूतन, तुला वंदना मॅडम बोलल्या असतील तरी मी तुला सांगतो की, मला तू खूप आवडतेस. तुझी तयारी असेल तर तुझ्याशी मी लग्न करायला तयार आहे."

" भास्कर, जरा स्पष्टचं सांगते, तुम्ही समजता तशी मी कुमारी मुलगी नाही. मी एक विधवा असून मला आठ वर्षांची मुलगी आहे. मला तुम्ही जर माझ्या मुलीसकट स्वीकारणार असाल तरंच मी लग्नाचा विचार करणार आहे."

माझ्या बोलण्यावर भास्कर एकदम शॉक लागल्यासारखा दोन मिनिटे शांत बसले. " नूतन मला तुझ्याबद्दल काही माहीत नव्हते पण मला तुझा स्पष्टवक्तेपणा आवडला. मला तसं वंदना मॅडम बोललेल्या की, तुझ्या आयुष्यात खूप दुःख आहे पण नेमके मला माहित नव्हते. तुला असं वाटलं असेल की मी तुझी अट ऐकून माघार घेईन पण तसं मी करणार नाही. मला तू खरोखरंच खूप आवडतेस. आता तर तुझ्याबद्दल एक आदर निर्माण झाला. मला तुझ्या मुलीला भेटायचं आहे. भेटवू शकशील ?"

भास्करच्या बोलण्याने माझ्या डोळ्यांत पाणी उभे राहिले. भास्करने त्याच्या बॅगमधून गुलाबाचे फुल काढून माझ्यासमोर धरले, " हे केसांत माळ ना तुझ्या. तुझ्या लांबसडक केसांची मला भुरळ पडली आहे. किती छान दिसेल हे गुलाब तुझ्या केसांमध्ये."

" पण भास्कर, मी हे नाही माळू शकत. मला चार लोकं नावे ठेवतील." माझ्या बोलण्यावर भास्कर उत्तरला, " आता लोकांचा विचार करू नकोस. लौकरचं आपण लग्न करू. मग जर तुझ्या नवऱ्याला तू केसांत फुल माळलेलं आवडत असेल तर तू नाही घालणार का ? मी लौकरचं तुझ्या घरी येऊन तुला मागणी घालेन आणि तुझ्या लेकीला पण भेटेन. नाव काय आहे तिचं ?"

" वृंदा." भास्करच्या आश्वासक बोलण्याने त्याच्याबद्दल एक वेगळाच आदर निर्माण झाला होता. मुळात म्हणजे त्याने वृंदाला स्वीकारण्याची तयारी दाखवली होती. थोडया गप्पा मारून, एकमेकांचा निरोप घेऊन आपापल्या घरी जावयास निघालो. आज भास्कर सोबत होते तर एक मनात वेगळी ऊर्जा जागृत झालेली, मला आणि वृंदाला एक भक्कम आधार लाभणार होता.

क्रमशः

सौ. नेहा उजाळे

ठाणे जिल्हा विभाग

🎭 Series Post

View all