नूतन एक संघर्ष ( भाग ७ )

नूतन नावाच्या स्त्रीच्या आयुष्यातील संघर्षाची कथा
विषय - कौटुंबिक कथामालिका

नूतन एक संघर्ष ( भाग ७ )

दुसऱ्याच दिवशी मी ऑफिसच्या गेटपाशी पोहचले तर वंदना माझी तिथे वाट पहात उभी राहिली होती.

" नूतन, तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. ऑफिसमध्ये बोलता येणार नाही म्हणून इथे थांबले."
वंदना एकतर दोन जीवाची आणि माझ्यासाठी किती वेळ उभी होती कोणास ठाऊक ?

" काय झालं वंदना ? काय बोलायचं आहे ? आणि किती वेळ तू उभी आहेस ? तुला त्रास होईल ना ग." मी वंदनाला काळजीच्या सुरात बोलले.

" नाही मला काही त्रास नाही होत. अग ! काल ऑफिस सुटल्यावर भास्कर मला तुझ्याविषयी विचारत होता. तो तुझ्या प्रेमात पडला आहे आणि त्याला तुला भेटून सगळं सांगायचं आहे."

वंदनाच्या बोलण्याने मला हृदयात चर्रर्र झालं पण दुसऱ्याच क्षणात मनाला आवर घालत मी बोलले, " वंदना, अग तू का नाही सांगितलंस भास्करांना की, मी विधवा आहे म्हणून ? मला एक मुलगी आहे. मी कसा विचार करू दुसऱ्या लग्नाचा ? माझ्या मुलीसकट माझा कोण स्वीकार करेल ?"

" नूतन, तुझा नवरा गेला ह्यात तुझा काय दोष ? आणि जर पुन्हा तुझं आयुष्य सावरू पहातंय तर का मागे फिरतेस ? एक नवरा नाही म्हणून तुला जगण्याचा काहीच अधिकार नाही का ? तुला, तुझ्या लेकीला भास्करचा आधार मिळेल. वृंदाला वडिलांचं प्रेम मिळेल जे ती शोधते आहे. बघ भास्करशी बोल. तो जर तुझ्यावर प्रेम करत असेल तर त्याच्या प्रेमाचा स्वीकार कर."

" वंदना, मी बोलेन भास्करशी पण त्याने माझ्या लेकीचा स्वीकार केला नाही तर ? मी माझ्या लेकीला सोडून माझा स्वार्थ मुळींच साधणार नाही."

" ठीक आहे नूतन, तू तुझ्या मनातलं सगळं भास्करला सांग आणि मग ठरव. भास्कर माझ्याकडे तुझ्यासाठी निरोप देणार आहे कधी, कुठे भेटायचं. त्याला भेट आणि निर्णय घे."

आम्ही दोघी ऑफिसमध्ये शिरलो. भास्करने त्याचा निरोप माझ्यापर्यंत पोहचला आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी वंदनाकडे आशेने पाहिले. वंदनाने देखील डोळ्यांच्याच इशाऱ्याने त्याला प्रत्युत्तर दिले.

भास्करने वंदनाकडे रविवारी संध्याकाळी पाच वाजता दादर चौपाटीला भेटण्याचा निरोप दिला. वंदना मला पुन्हा म्हणाली, " नूतन भास्करला भेट. तुझ्या मनातलं सारं काही सांग. तुझ्या लेकीबद्दलची अट सांग. तो या गोष्टी मान्य करत असेल तर त्याच्या प्रेमाचा स्वीकार कर. लोकं काय म्हणतील याचा विचार करत बसू नकोस. तुझं आयुष्य पुन्हा फुलायची संधी आली आहे ती गमावू नकोस."

वंदनाच्या प्रेमळ बोलण्याने माझ्या डोळ्यांत पाणी तरळले. किती जीव तुटत होता वंदनाचा माझ्यासाठी.

संध्याकाळी घरी आले तर वृंदा अगदी खुश होऊन माझ्याजवळ आली, " मम्मी मला निबंधात १० पैकी १० मार्क मिळाले आहेत."

" हो का ? बघूदे काय लिहिलं आहेस ?" वृंदाच्या हातातली वही मी घेतली तिने \" बाहेरगावी गेलेल्या ति. बाबांना पत्र \" या विषयावर दहा ओळी निबंध लिहिला होता.


ति. बाबांना पत्र

प्रिय बाबा, मी तुमच्याबद्दल काय लिहू कळत नाही कारण मी तुम्हाला अजून पाहिले नाही. आई सांगते मी तीन वर्षांची असताना तुम्ही बाहेरगावी गेले पण मला माहिती आहे तुम्ही देवाघरी गेले आहात. आजी म्हणते तू देवबाप्पाला सांग तुझ्या बाबांना लौकर परत पाठवायला. मी रोज देवबाप्पाला तुम्हाला लौकर परत पाठवायला प्रार्थना करते. खरंच, तुम्ही आता लौकर आलं पाहिजे. तुम्हाला पण वाटंत नाही का तुमच्या मुलीला भेटावं म्हणून ? तुम्ही माझ्यासाठी खाऊ आणि खेळणी नाही आणली तरी चालतील पण तुम्ही लौकर आले पाहिजेत. तुम्ही आलात की मी खूप लाड करून घेणार आहे तुमच्याकडून. पहिली तर थोडी गट्टी फू करेन तुमच्याशी मग तुम्ही बट्टी घेतली तरंच तुमच्याशी बोलेन मी. बाबा लौकर या ना. मी तुमची खूप खूप वाट बघतेय.

कळावे

तुमची वाट बघणारी मुलगी

वृंदा

वृंदाचं तिच्या बाबांसाठी लिहिलेले पत्र वाचून मला रडूच कोसळले. वृंदा लहान वयात किती समजूतदार झाली होती. वृंदाला कवटाळून मी रडत राहिले. वृंदाचे वडिलांसाठी लिहिलेले पत्र वाचून आई, बाबा, दादा, वहिनी यांच्या डोळ्यांतून देखील पाणी आले. वृंदाला समजेना ही सगळी मोठी माणसे का रडत आहेत ? वृंदा सगळ्यांकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होती.

ह्या निबंधावरून एक वृंदाचा गुण दिसून आला तो म्हणजे लिखाणाचा गुण तिने वडिलांचा उचलला होता. तिच्या बालसुलभ भावना तिने किती छान व्यक्त केल्या होत्या.

वृंदाच्या ह्या पत्रातून ती किती वडिलांच्या प्रेमासाठी आसुसलेली आहे असे समजत होते. दादा मला वृंदाला दत्तक दे म्हणत होता. दादाने तिच्यावर वडिलांसारखे प्रेम केले असते याबद्दल शंकाचं नव्हती. मी वृंदाला दादाकडे सुपूर्त न करून चूक केली का ? वृंदावर मी अन्याय केला का ? भास्करांनी वृंदाला स्वीकारलं तरी भास्कर तिला वडिलांचे प्रेम देतील का ? शेवटी ते कितीही झाले तरी परकेचं. दादाशी तर आपलं रक्ताचं नातं. वृंदाच्या बाबतीत माझा चुकीचा निर्णय तर नाही ना झाला ? आज मी आईकडे भास्करबद्दल बोलणार होते पण वृंदाने इतकं भावनिक केल्यावर त्या विषयावर बोलावंसं वाटलंचं नाही. आज बुधवार, रविवारी भास्करने भेटायला बोलावलं आहे तर आईकडे उद्याचं बोललं पाहिजे. मनात विचारांचे कल्लोळ उठलेले आणि केव्हातरी पहाटे पहाटे माझा डोळा लागला.

क्रमशः

सौ. नेहा उजाळे

ठाणे जिल्हा विभाग

🎭 Series Post

View all