नूतन एक संघर्ष ( भाग ६ )

नूतन नावाच्या स्त्रीच्या आयुष्यातील संघर्षाची कथा
विषय - कौटुंबिक कथामालिका

नूतन एक संघर्ष ( भाग ६ )

मला छान - छान साड्यांचे अतिशय वेड त्यामुळे मी हिंदी चित्रपटामधील हिरोईनने नेसलेल्याप्रमाणे साड्या खरेदी करायचे. तेव्हा चित्रपट जास्त प्रमाणात रिलीज होत नसत. पण हिरो - हिरोईनच्या कपड्यांची स्टाईल लगेच मार्केटमध्ये येत असे. सुंदर सुंदर साड्या मी ऑफिसला जाताना नेसायचे. माझ्या व्यवस्थित, टापटीप राहणीमानामुळे मी एका मुलीची आई असेल असे कोणालाही वाटत नसे.

असेच एके दिवशी ऑफिसला गेले असता आमच्या सेक्शनमध्ये एक नवीन मुलगा एम्प्लॉयी म्हणून रुजू झाला. त्याने आम्हा सर्वांना त्याची ओळख करून दिली. " मी भास्कर काटकर, मी बी.एस.सी.असून परळ मुंबई येथे राहतो. मला आपणा सर्वांची देखील ओळख करून द्या."

सर्वांनी आपापली नावे सांगितली. मी देखील खाली मान घालून माझे नाव सांगितले. नाव सांगितल्यावर थोडीशी मान वर करून बघितले तर तो भास्कर एकटक माझ्याकडे बघत होता. माझी नजर त्याच्याकडे गेली असता लगेच त्याने त्याची नजर दुसरीकडे फिरवली. भास्कर दिसायला खूपच देखणा होता. गोरा रंग, कुरळे कुरळे केस, अगदी तिशीतला. साठे गेल्यापासून मी कुठल्याच मुलाकडे पाहिले नव्हते पण आज ह्याला बघून मनात काहीतरी चलबिचल झाली.

रोज भास्कर ऑफिसमध्ये काम करत असताना माझ्याकडे हळूच एक नजर टाकायचा. याबाबत मला काहीच माहिती नव्हते. माझी ऑफिसमधील मैत्रीण वंदनाने ह्या गोष्टीची जाणीव करून दिली, " नूतन तुला माहिती आहे का ? तो भास्कर तुझ्याकडे चोरून चोरून बघत असतो. तुझं लक्ष नसेल पण मी निरीक्षण करते त्याचं."

" चल ग ! काहीतरीच काय ? तुझं उगीच काहीतरी." मी वंदनाला दटावले.

वंदनाला तर दटावले पण ती खरंच बोलते आहे का बघायला म्हणून मी काम करता करता भास्करकडे एक चोरटा कटाक्ष टाकला तर तो माझ्याकडेच पाहत होता. आमची नजरानजर झाली असता आम्ही दोघांनी पटकन नजर दुसरीकडे फिरवली. माझ्या हृदयात एक वेगळीच कालवाकालव झाली. तो एकचं क्षण पुन्हा मी भास्करकडे पहायचे नाही असे मनाला समजावले. मी अशी एक विधवा स्त्री त्यात मला आठ वर्षांची मुलगी. भास्करसारख्या अविवाहित, कोवळ्या मुलामध्ये मी माझा जीव का गुंतवू ? त्या दिवसापासून मी भास्करकडे एकदाही मान वर करून पाहिले नाही.

वंदना माझी खूप जिवलग मैत्रीण असल्याने तिला माझी अवस्था समजत होती. वंदनाला माझ्याबद्दल खूप वाईट वाटायचे. ती माझी हितचिंतक होती. वंदना दुसऱ्या वेळेला गरोदर होती. एके दिवशी भास्करने डब्ब्यात भरलं वांग आणि भाकरी आणलेली त्या वासाने वंदनाला भास्करच्या डब्यातले जेवण खावेसे वाटले. ती सरळ भास्करपुढे उभी राहिली आणि त्याला एक घास तरी तुझ्या डब्ब्यातली भाजी - भाकरी मला दे असे सांगितले. भास्करने त्याचा डब्बा तिच्यापुढे धरला आणि सर्व तुम्हीच संपवा असे सांगितले. वंदनाला थोडे ओशाळल्यासारखे झाले तर भास्कर म्हणाला, " मॅडम, मी मनापासून सांगतो, तुम्ही माझा डब्बा संपवा, मला तुमचा डब्बा द्या हवा तर." वंदनाने लागलीच तिचा स्वतःचा डब्बा भास्करला दिला आणि स्वतः त्याच्या डब्ब्यावर ताव मारला.

ऑफिसमधली लोकं वंदनाला बघून हसू लागले पण वंदनाला त्याचे काही पडले नव्हते तिच्या पोटातल्या बाळाने तिला खाण्यासाठी प्रवृत्त केले होते. बिचारा भास्कर वंदनाची कमी तिखटाची तोंडलीची भाजी निमूटपणे गिळत होता. त्या दिवसापासून भास्कर आणि वंदना दोघे छान गप्पा मारू लागलेले. भास्कर थोडं जास्तच जेवण वंदनाकरता आणू लागला. मी आणि वंदना लंच टाईमला एकत्र जेवत असू. आता भास्कर देखील आम्हा दोघींमध्ये कधीतरी येत असे. भास्कर आमच्यामध्ये येऊन बसला की मला अगदीच कसेनुसे होई.

ऑफिसमध्ये भास्कर आपलं काम भलं आणि आपण भले अशा वृत्तीचा असल्याने त्याचा जास्त मित्रपरिवार नव्हता. अगदी एक - दोन नावाला त्याचे कलीग होते. त्यांच्याचकडून वंदनाला समजले की, भास्करचा आवाज खूप छान आहे. तो अतिशय सुंदर गातो. लागलीच आमच्या वंदना मॅडमने लगेच भास्करकडे गाण्याची फर्माइश केली असता थोडे आढेवेढे घेऊन भास्कर गाणे म्हणाला, \" तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं, तुम किसीं और को चाहोगी तो मुश्किल होगी.\" मी भास्करकडे न बघताच त्याचे गाणे ऐकत होते पण ते गाणे तो माझ्याकरताच गात होता हे समजत होते. त्याचा आवाज अगदी मुकेश सारखा मंत्रमुग्ध करणारा होता. गाणे संपले, सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याची प्रशंसा केली. मी आपली मान वर न करता टाळ्या वाजवल्या. भास्करच्या गाण्याचे कौतुक कितीतरी दिवस ऑफिसमध्ये चाललेले होते.

एके दिवशी मी ऑफिसमधून हाफ डे घेऊन घरी जाण्यासाठी लौकर निघालेले. वृंदाचा शाळेत कार्यक्रम होता. मला तिने घरी लौकर येण्याविषयी दहा वेळा तरी बजावलेलं.

ऑफिस सुटल्यावर भास्करने वंदनाकडे माझा विषय काढला, " मॅडम तुमची मैत्रीण मुकी - बहिरी आहे का ?"

" असं का विचारता भास्कर ?"

" नाही म्हणजे ती माझ्याशी काहीच बोलत नाही, माझ्याकडे बघत देखील नाही."

" भास्कर तुम्ही प्रेमात पडला आहात का तिच्या ?" वंदनाच्या बोलण्यावर भास्कर एकदम लाजला आणि \" हो \" म्हणाला.

" भास्कर, तुम्ही जर तिच्यावर खरंच प्रेम करत असाल तर तिच्याशी जाऊन बोला. ती जीवनात अतिशय दुःखी आहे. तुमचा जर तिला खरंच आधार, प्रेम मिळालं तर तिचं जीवन पुन्हा फुलेल." वंदनाच्या बोलण्यावर भास्करने वंदनाला विचारले," नक्की काय दुःख आहे नूतनच्या आयुष्यात ?"

" मी सांगण्यापेक्षा तुम्ही तिच्याचकडून जाणून घेतलंत तर बरं होईल."

" मॅडम मी बोलेन तिच्याशी. फक्त तुम्ही तुमच्या मुक्या मैत्रिणीला सांगून ठेवा की, भास्कर तुझ्याशी बोलायला आला तर बोल बाई."

वंदनाने भास्करला हसून सांगितले, " भास्कर तुमचा निरोप मी नक्कीच नूतन पर्यंत पोहचवेन."

क्रमशः

सौ. नेहा उजाळे

ठाणे जिल्हा विभाग

🎭 Series Post

View all