विषय - कौटुंबिक कथामालिका
नूतन एक संघर्ष ( भाग ५ )
वृंदाचा एक वर्षाचा वाढदिवस मात्र खूप छान साजरा केला म्हणजे अगदी घरातल्या घरातंच. तिला कृष्णाची वाडी भरली होती. बाबांनी तिला सोन्याची चेन केली. घरातील कॅमेऱ्यात आणि स्टुडिओमध्ये नेऊन तिचे भरपूर फोटो काढले.
काही महिन्यांनी वहिनीला दिवस गेले. वृंदा दोन वर्षांची झाल्यावर घरात पुन्हा मुलगा बाळ आले. दादा - वहिनीचा मुलगा त्या दोघांप्रमाणे सुंदर होता. दोन्ही मुले अगदी सख्ख्या भावंडांप्रमाणे वाढत होती.
एके दिवशी दादाने मला विचारले की, " तुला चालत असेल तर मी वृंदाला दत्तक घेतो. वृंदा अजून लहान आहे ती मोठी झाल्यावर तिच्या वडिलांविषयी नक्कीच विचारेल तर तू काय उत्तर देणार तिला ? त्यापेक्षा मी वृंदाला दत्तक घेतो आणि माझं नाव लावतो. तसंही वृंदा हिला आई बोलते. माझंही एक मुलगी आणि एक मुलगा असं चौकोनी कुटुंब तयार होईल आणि पुढेमागे तू दुसऱ्या लग्नाचा विचार केलास तर तुला तुझ्या मुलीसकट कोणी स्वीकारेल का ? बघ सारासार विचार करून सांग, काही घाई नाही."
खरंतर दादाने माझ्या पुढ्यात ठेवलेला प्रस्ताव अजिबात वाईट नव्हता. दादा आणि वहिनीने तिला पोटच्या पोरासारखे वाढवले असते ह्यात शंकाच नव्हती. वृंदा कोणी परक्याकडे जाणार नव्हती. आई आणि बाबांनी देखील मला दादाच्या प्रस्तावावर विचार कर असे समजावले पण तरीही मी वृंदाला नऊ महिने पोटात वाढवून जन्म दिला होता, माझे दूध पाजले होते. मला दादाला वृंदाला दत्तक देण्यास मन धजावेना. दादाला मला वृंदाला दत्तक देण्यास धीर होत नाही असे सांगितले. दादानेही मोठया मनाने माझे म्हणणे ऐकले.
आमच्या घरी माझी चुलत भावंड शिकण्यासाठी किंवा नोकरीच्या निमित्ताने येऊन राहायची. सगळ्या मामांचा - मावश्यांचा वृंदावर अतोनात जीव. सगळ्यांची लाडकी होती वृंदा. अगदी प्रसादच्या मित्रांची देखील ती लाडकी. सगळ्या मामा - मावशींच्या गळ्यातला ताईतच होती वृंदा.
वृंदा तीन वर्षांची झाल्यावर तिला शाळेत घातले. रोज शाळेत जायला ती आकांडतांडव करत असे. शाळेत माझी आणि वृंदाची कथा शिक्षकांना समजलेली म्हणून सगळे शिक्षक वृंदाकडे मायेने लक्ष देत. वहिनीने वृंदाला शाळेत सोडलं की ती भोकाड पसरून रडायची. वहिनीच्या मागे \" आई, आई \" करून धावायची. काही दिवस वहिनी वृंदाची शाळा सुटेपर्यंत तिच्या वर्गाबाहेर तीन तास बसून राहायची. वृंदाचं सारं लक्ष वर्गाबाहेर असायचं आई बसून राहिली की नाही बाहेर. मग मधे मधे येऊन ती बघायची आई आहे की नाही ते. बिचारी वहिनी अगदी आईच्या मायेने वृंदाचं सगळं काही करायची. वृंदा वहिनीला आई बोलायची म्हणून मी तिला मला मम्मी बोलायला शिकवले.
वृंदा शाळेत जाऊ लागली. वर्गातल्या काही मित्र - मैत्रिणींचे वडील देखील त्यांना शाळेत सोडायला येत. तिच्या बालसुलभ विचारांमध्ये आपले वडील दिसत नाहीत हे तिला प्रकर्षाने जाणवले. तिने तेव्हा विचारले देखील की, " मम्मी माझे पप्पा कुठे आहेत ?" मी तिला काहीबाही सांगायचे म्हणून सांगितले की, " तुझे पप्पा विमानाने फॉरेनला कामासाठी गेले आहेत. येतील लवकरात लवकर."
माझे उत्तर तिला पटले असावे. आमच्या घरात सगळ्यांना गाण्याचे वेड असल्याने रेडिओ तर चालूच असायचा. ती पाच - सहा वर्षांची असताना तिने रेडिओवर गाणे ऐकले असेल \" पप्पा जलदी आ जाना, सात समुंदर पार करके, अच्छी गुडीया ले आना, गुडीया चाहे ना लाना, पप्पा जलदी आ जाना \" हे गाणे वारंवार आकाशात विमान दिसले की बोलायची. अक्षरशः पोटात खड्डा पडायचा माझ्या.
दरम्यान प्रसादला एक मुलगी आवडू लागलेली स्वाती नावाची. आमच्याच समोरच्या बिल्डिंगमध्ये राहणारी. प्रसाद आता कॉलेजमध्ये जाऊ लागलेला. स्वातीचे आईवडील दोघेही नोकरी करत. प्रसाद वृंदाला घेऊन स्वातीच्या घरी गेल्यावर स्वाती वृंदाला खूप छान नटवून पाठवायची. स्वातीला मुलींना नटवण्याची फारच हौस आणि लहान मुलांची.
दादाने नोकरी सोडली आणि त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्याने आमच्याच परिसरात स्वतःचे घर घेतले. आम्ही सर्वजण नवीन घरात राहायला गेलो. दादा - वहिनीला दुसरी मुलगी झाली.
स्वातीच्या घरात तिच्या प्रेमाची कुणकुण लागल्यावर तिच्या घरातल्यांनी विरोध केला कारण प्रसाद अजून काही व्यवस्थित कमवत नव्हता. स्वातीच्या बाबांनी फक्त स्वातीच्या प्रेमासाठी तिला लग्नासाठी मान्यता दिली आणि प्रसादचे लग्न वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी झाले. दादाने त्याला आपल्या व्यवसायात सामील केले. मी सुद्धा माझ्या पगारातील काही पैसे घरखर्चासाठी देत होतेच. वृंदाला कपडे, खाऊ आणला की भाचवंडांसाठी देखील कपडे, खाऊ आणायचेच.
स्वाती माझ्यापेक्षा जरी लहान असली तरी स्वाती आणि मी एकमेकींशी अगदी मैत्रिणी सारख्या होतो.
आमच्या घरात सगळे संगीतप्रेमी. आमच्याकडे ग्रामोफोन होता आणि खूप साऱ्या हिंदी, मराठी, इंग्लिश गाण्यांच्या रेकॉर्ड होत्या. नंतर टेपरेकॉर्डरचा जमाना आला. कितीतरी कॅसेट प्रसाद घेऊन यायचा. बॉनि - एम अल्बमच्या कितीतरी कॅसेट प्रसादने आणल्या होत्या. आमच्या घरात सर्व प्रकारचे संगीत चोखंदळपणे ऐकले जायचे.
आमच्या घरात सगळे संगीतप्रेमी. आमच्याकडे ग्रामोफोन होता आणि खूप साऱ्या हिंदी, मराठी, इंग्लिश गाण्यांच्या रेकॉर्ड होत्या. नंतर टेपरेकॉर्डरचा जमाना आला. कितीतरी कॅसेट प्रसाद घेऊन यायचा. बॉनि - एम अल्बमच्या कितीतरी कॅसेट प्रसादने आणल्या होत्या. आमच्या घरात सर्व प्रकारचे संगीत चोखंदळपणे ऐकले जायचे.
माझ्या आईचा वृंदावर आणि वृंदाचा आजीवर फार जीव. आई कुठल्या नातेवाईकांच्या घरी राहायला गेली की वृंदा सुद्धा आजीबरोबर जात असे. दोघींना एकमेकांशिवाय जराही करमत नसे. काही कारणाने जर आई वृंदाला घेऊन गेली नाही तर वृंदा आजीची साडी घेऊन बसायची. रात्रभर आईची साडी घेऊन झोपायची. वृंदाला सगळे \" आजीचं शेपूट \" म्हणून चिडवायचे.
दरम्यान जी आमची ऑफिसची खोली होती ती प्रत्येक कामगारांच्या नावावर होणार होत्या. दादा तसंही नोकरी सोडून गेला असल्याने मी साठेंची खोली नावावर करून न घेता आम्ही राहत होतो ती खोली माझ्या नावावर केली. दादा, प्रसाद आणि आईबाबांनी मला मात्र एकटीला कधीच राहून दिले नाही. दोन भावंडांचं कुटुंब, दादाची दोन मुले, माझे आईवडील, मी आणि वृंदा इतके सगळे एकाच घरात राहत होतो. आजी - आजोबा, मामा - मामी यांच्या चांगल्या संस्कारात वृंदा वाढत होती. माझ्या माणसांनी वृंदाला आपलेपणाने सांभाळले म्हणून मी नोकरी करू शकत होते.
प्रसादला पहिला मुलगा झाला आता इतक्या माणसांना घर तसं बघायला गेलं तर अपुरे पडत होते त्यामुळे प्रसादने आमच्याच परिसरात वेगळे घर घेतले. आता आईबाबा कधी ह्या मुलाकडे तर कधी त्या मुलाकडे असे राहू लागले. वृंदा आजी ज्या मामाकडे राहील त्या मामाकडे आजीबरोबर जायची. स्वाती नोकरी करत असल्याने प्रसादच्या बाळाला सांभाळायला आई जास्त करून प्रसादकडे राहू लागली.
माझ्या जीवनात एक वेगळे वळण येणार होते आणि मी अनभिज्ञ होते.
क्रमशः
सौ. नेहा उजाळे
ठाणे जिल्हा विभाग
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा