Feb 27, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

नूतन एक संघर्ष ( भाग ३ )

Read Later
नूतन एक संघर्ष ( भाग ३ )


विषय - कौटुंबिक कथामालिका

नूतन एक संघर्ष ( भाग ३ )

साठेंबरोबर लग्न झाले पण संसार काही चालू झाला नव्हता. घरात सगळं साठेंच्या आईचं वर्चस्व. स्वतःच्या हाताने चहा सुद्धा करून घेऊ शकत नव्हते मी. शेजारच्याच घरात आई असल्यामुळे आईला माझ्याबद्दल वाईट देखील वाटायचे पण ती तरी बिचारी काय करू शकत होती ? साठेंशी लग्न झाल्यावर मांसाहार सोडलेला तरीही मला घरात पाहिजे ते स्थान मिळाले नव्हते.

प्रसाद शाळेत जात होता. ही त्याची तिसरी शाळा. प्रसादाच्या बोलक्या स्वभावामुळे त्याचा मित्रपरिवार जमा झाला. जीवाला जीव देणारे मित्र त्याला लाभले.

साठेंच्या आईंची वृद्धापकाळाने देवाज्ञा झाली. आता स्वयंपाक घरात मला प्रवेश मिळालेला. साठेंच्या बहिणी माझ्याकडे बघत देखील नसत त्यामुळे त्या घरी सुद्धा येत नसत. साठे त्यांना दरमहिन्याला पैसे पुरवतचं होते.

आता दादाच्या लग्नाचे आई बघत होती. नात्यातल्या सगळ्या लोकांना दादासाठी मुलगी बघायला सांगून ठेवलेले. माझ्या मामाने एक मुलगी सुचवली. कोकणातली मुलगी होती. मुलगी सधन कुटुंबातील होती. होणाऱ्या वहिनीच्या बाबांनी सगळीकडे दादाची कसून चौकशी केली असता \" मुलगा चांगलाच आहे, अगदी डोळे झाकून मुलगी द्या \" असेच समजले. वहिनीच्या बाबांनी वहिनीला आमचे घर दाखवण्यास आणले. मुंबईत त्यांचे देखील खूप नातेवाईक होते. वहिनी दिसायला सुंदर, गोरीपान होती. दादासुद्धा सुंदर आणि गोरापान असल्याने दोघांनी एकमेकांना लगेच पसंत केले. लगेच साखरपुड्याची तारीख काढली आणि दादाचा साखरपुडा झाला सुद्धा. साठेंनी माझ्या होणाऱ्या वहिनीवर तिथल्या तिथे कविता करून उपस्थितांचे मन जिंकलेले. दादाचे लग्न लगेच पुढच्या चार महिन्यात होणार होते.

दरम्यान साठे आजारी पडले त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. ऑफिस, घर सांभाळून मी त्यांची शुश्रूषा करत होते. त्यांच्या तीन बहिणी जराही मदतीला आल्या नव्हत्या का त्यांनी कुठली साधी विचारपूस केली नाही. औषोधोपचाराने साठे बरे होऊन घरी आले.

मला नुकतेच दिवस गेलेले. साठे खूप खुश होते. त्यांना पहिली मुलगी पाहिजे होती. ते आता माझी काळजी घेऊ लागले. आता होणाऱ्या बाळाची आम्ही स्वप्ने रंगवू लागलो होतो. साठे आता नोकरीबरोबर अजून अर्थाजनासाठी लहान मुलांच्या शिकवण्या घेऊ लागले. त्यासाठी संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर त्यांना एक स्टेशन पुढे जावे लागे. रात्री नऊच्या आसपास ते घरी येत.

असेच एकदा ऑफिस सुटल्यावर साठेंनी मला सांगितले की, " आज फक्त मुगडाळीची खिचडी आणि ताक करून ठेव. मी थोडं लौकर येईन आज." रोज आम्ही एकाच ट्रेनमधे चढायचो.मी माझ्या स्टेशनला उतरायचे आणि साठे पुढच्या स्टेशनला उतरायचे. मी घरी येऊन फ्रेश झाले. साठेंनी सांगितल्याप्रमाणे पटपट मुगडाळीची खिचडी आणि ताक करून ठेवले आणि त्यांची वाट पहात बसले. साडेआठच्या सुमारास मजल्यावर थोडा गोंधळ वाटला. मी लक्ष नाही दिले त्याकडे असे वाटले की, मुले खेळत असतील. मी एक कादंबरी वाचत बसलेले.

प्रसादच्या मित्रांनी प्रसादला येऊन गुपचूप काहीतरी सांगितले. प्रसाद कोणालाही काहीही न सांगता धावतच शिड्या उतरून बिल्डींगखाली गेला. तिथे काही पोलीस उभे होते त्यांनी प्रसादला \" श्याम साठे तुझे कोण लागतात \" असे विचारले असता प्रसादने उत्तर दिले की, ते माझे भाऊजी आहेत. पोलिसांनी प्रसादला सांगितले की, " तुझ्या भाऊजींचा अपघात झाला आहे. घरी कोणी मोठे सदस्य असेल त्यांना आमच्याबरोबर पाठव." प्रसाद तसा लहानच असल्याने त्याने धावत घरी येऊन दादाला ही गोष्ट सांगितली. दादासुद्धा घरात काही कळू न देता लागलीच पोलिसांबरोबर जाण्यास निघाला. आई दोन्ही मुलांची गुपचूप चाललेली धावाधाव पाहत होती. तिने त्या दोघांना काय झाले म्हणून विचारले असता दोघांनीही तिला काहीच उत्तर दिले नाही पण आईच्या मनात वाटलेले की, काहीतरी अशुभ घडलेले आहे. मला तर ह्यातले काहीसुद्धा माहीत नव्हते.

दादाने पोलिसांबरोबर जाऊन ओळख पटवली की, अपघात झालेली व्यक्ती दुसरेतिसरे कोणी नसून साठे होते. साठेंना खूप घाणेरडी सवय होती ती म्हणजे ते ट्रेनच्या दारात लोंबकळत उभे राहत. मी कितीवेळा त्यांना ह्याबद्दल बोलले होते पण त्यांनी माझं कधीच ऐकले नव्हते. रेल्वेच्या खांबाला धक्का लागून ते चालत्या ट्रेनबाहेर फेकले गेले आणि जागच्या जागीच त्यांचा मृत्यू झालेला. दादा सुन्न मनाने घरी आला त्याने सगळ्यांना ही दुःखद वार्ता दिली. आता मला कोण सांगणार ? कोणाचीच हिंमत होत नव्हती. प्रसाद तर रडूनरडून बेहाल झालेला. आई तर एकदम मटकन खालीच बसली. बाबांना पण अतिशय दुःख झाले. तरी बाबांनी धीर एकवटून मला ही बातमी सांगितली. माझ्या डोळ्यांपुढे अंधेरी आली आणि मी चक्कर येऊन खालीच कोसळले.

अंत्यविधीची तयारी चालू केली. माझ्या अंगावरील सवाष्णाचे लेणे कोणीतरी अगदी ओरबाडून काढले. मी पूर्ण सुन्न झालेले. साठेंबरोबर अवघ्या दीड वर्षांच्या संसारात संसारसुख असे लाभलेच नाही आणि आता येणाऱ्या बाळामुळे थोडे तरी सुख वाट्याला येणार होते ते देखील नियतीने हिरावून घेतले. त्यावेळी तीन महिन्यांची गरोदर होते मी. साठेंच्या तीन बहिणी आणि तिघींचे यजमान आलेले पण कोणीही माझ्याशी बोलले नाही. माझ्यावर इतक्या लहान वयात इतका वाईट प्रसंग आला ह्याचे त्या लोकांना कुठलेच सोयरसुतक नव्हते. उलट माझ्याविषयी वाईटसाईट बोलण्याचे, मला अपशकुनी ठरवण्याचे तोंडसुख मात्र त्यांनी घेतले.

साठेंना अग्नी कोणी दिला, त्यांचे मरणोत्तर कार्य कोणी केले वगैरे मला काहीचं माहीत नाही. कारण माझ्या माहेरची लोकं त्यांचे कार्य करू शकत नव्हते. कुळ, गोत्र यामध्ये तफावत होती म्हणून. साठेंच्या तीन बहिणी त्या दिवशी येऊन गेल्या आणि नंतर त्यांनी माझ्याशी पूर्णपणे संबंध तोडले. त्यांचे संबंध माझ्याशी नव्हतेच मुळात पण साठेंशी तर होते. साठेंचे एक सख्खे मामा - मामी मात्र माझ्याशी बोलले, त्यांनी मला धीर दिला. त्यांना माझं दुःख बघवलं नव्हतं. सासरची प्रेमाची माणसं तीच दोघे होती. त्यांनी आमच्या लग्नाला विरोध दर्शवला नव्हता उलट त्या मामांनी त्यांच्या बहिणीला म्हणजेच साठेंच्या आईला आमच्या लग्नाला संमती देण्याविषयी समजावलेले. त्यांना माझ्याविषयी त्यांच्या पोटच्या मुलीसारखे प्रेम वाटलेले. आमच्या लग्नानंतर साठेंच्या आईला राग येऊ नये म्हणून त्यांनी आमच्या घरी येण्याचे कमी केलेले.

साठेंचे अंत्यविधीचे सोपस्कार आवरून दादा, बाबा, प्रसाद घरी आले. दादाने साठेंच्या घराला कुलूप लावले आणि मला त्याच्या शेजारच्या घरी घेऊन आला.

क्रमशः

सौ. नेहा उजाळे

ठाणे जिल्हा विभाग
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Neha Ujale

पूर्णवेळ गृहिणी

मी इरा वर नवीनच लेखिका म्हणून आले आहे. मला वाचन आणि लिखाणाची प्रचंड आवड आहे.

//