नूतन एक संघर्ष ( भाग २ )

नूतन नावाच्या स्त्रीच्या आयुष्यातील संघर्षाची कथा


नूतन एक संघर्ष ( भाग २ )
विषय - कौटुंबिक कथामालिका

माझा धाकटा भाऊ प्रसाद हा दादा प्रशांत आणि माझ्यापेक्षा लहानच होता. म्हणजे दादापेक्षा दहा वर्षांनी तर माझ्यापेक्षा आठ वर्षांनी. माझा दादा लहानपणापासून शांत तर धाकटा भाऊ थोडा मस्तीखोर आणि अवखळ. आम्ही तिन्ही भावंड एकदम समाधानी. कधीही कुठलाही आईवडिलांकडे हट्ट धरला नाही.

माझा धाकटा भाऊ माझ्यापेक्षा लहान जरी असला तरी आम्ही दोघे खूप मस्ती करत असू, खूप भांडत असू आम्ही एकमेकांबरोबर. आमची भांडणे सोडवताना आईला अगदी नाकीनऊ यायचे. आई मला खूप ओरडायची की, " तो लहान आहे, तू मोठी आहेस ना त्याच्यापेक्षा ?" दादा आमच्या दोघांच्या भानगडीत पडत नसे. दादाबरोबर मी भोवरा, गोट्या असे मुलांचे खेळ देखील खेळायचे. दादा आणि प्रसाद दोघे पतंग छान उडवत असत. आमचं लहानपण जरी गरीबीत गेलं तरी खाऊनपिऊन सुखी होतो आम्ही. आमच्या छोट्याश्या घरात देखील नातेवाईकांचा गोतावळा असायचा याचं कारण म्हणजे माझी आई. आईने तिच्या प्रेमळ स्वभावाने सासर - माहेरचे नातेवाईक जोडून ठेवलेले. आई सणवार, व्रतवैकल्ये, उपवास - तापास, ग्रंथपारायाणे अगदी हौशीने करत असे. सणाच्या दिवशी तर आमचे घर अगदी गजबजून जात असे.

मी आणि दादा ज्या कंपनीत काम करत होतो त्या कंपनीतर्फे कामगारांना राहण्यासाठी क्वार्टर मिळणार होते ते देखील खुद्द मुंबईत. आम्हाला अतिशय आनंद झालेला की पुन्हा आम्ही मुंबईत राहायला येणार होतो. आता ऑफिसपासून घरी जाण्यास दूरवर जावे लागणार नव्हते. आता ह्या घरापासून ऑफिस अगदी चार - पाच स्टेशन अंतरावर होते.

पाच माळ्याच्या बिल्डिंगमध्ये कंपनीतर्फे देण्यात आलेल्या खोल्या होत्या. खोल्या लहान होत्या पण मुंबईत येण्याचा आनंद खूप मोठा होता. बिल्डिंगला प्रत्येक माळ्याला कॉमन गॅलरी होती. पूर्ण बिल्डींगमधले रहिवाशी एकाच कंपनीत असल्याने सगळे एकमेकांना चांगले ओळखत होते. आपापला शेजारधर्म जपत होते. आम्ही ह्या घरी आल्यावर दादा गणेशोत्सवच्या दिवशी गणपतीची मूर्ती स्थापना करू लागला. गणपतीच्या आगमनाने पाच - सहा दिवस अगदी प्रसन्न वाटायचे. आमचे काका - काकी, चुलत भावंडे सगळेजण आमच्याकडे राहायला येत असत.

माझे केस खूप मोठे आणि जाड असल्याने माझ्या वेणीचा शेपटा कंबरेच्या खालीपर्यंत जायचा. मी चालताना माझ्या जाड वेणीचा शेपटा माझ्या चालण्याच्या लयीत हिंदकळायचा. मला फुलांची भयंकर आवड असल्याने रोज एकतरी फूल नाहीतर गजरा मी केसात माळायचे. रोज रस्त्यातून येणाऱ्या - जाणाऱ्या लोकांची नजर माझ्या केसांकडे नाही गेली असे कधीच व्हायचे नाही.

माझ्या कंपनीत श्याम साठे नावाचा मुलगा होता. मुलगा म्हणजे तिशीतला. आम्हाला जी खोली मिळाली होती अगदी आमच्या बाजूला त्यांची खोली होती. मी नुकतेच अठराव्या वर्षात पदार्पण केलेले. एकाच कंपनीत आणि राहायलाही अगदी शेजारी त्यामुळे साठेंविषयी मनात प्रेम फुलू लागलेले. त्यांनाही मी आवडू लागले होते असे त्यांच्या वागण्याबोलण्यात समजत होते. साठे त्यांच्या वृद्ध आईसोबत राहत होते. त्यांच्या आईचे कडक सोवळेओवळे असायचे. त्यांची आईसुद्धा लख्ख गोरी, घाऱ्या डोळ्यांची, दिसायला देखणी होती. आम्ही जरी ब्राम्हण नसलो तरी ब्राह्मणांसारख्या चालीरीती आमच्याकडे होत्या. लग्न - मुंज अगदी सगळ्या ब्राम्हणांसारख्या रितिभाती. फक्त इतकंच की आम्ही मांसाहार करत असू. माझे बाळबोध वळण आणि सोज्वळ राहणीमान यामुळे साठेंच्या आईंना मी आवडायचे. मी माझ्या आईला घरकामात मदत करायचे हे साठेंची आई बघत असल्याने साठेंची आई माझ्या आईकडे बोलायची, " तुमची लेक अगदी नक्षत्रासारखी आहे हो ! ज्याच्या घरी जाईल तिथे गोकुळ नांदेल."

साठेंनी मला माझ्याशी लग्न करणार का असे विचारले असता मी त्यांना माझा होकार दिला. साठे गोरे - गोरे, घाऱ्या डोळ्यांचे, दिसायला देखणे होते. ते खूप छान कविता करत. त्यांनी माझ्या लांबसडक केशसंभारावर आणि माझ्या बोलक्या डोळ्यांवर कविता केलेल्या. साठेंच्या प्रेमात जरी मी पडले होते तरी प्रेमात पडल्यावर काय बोलायचे असते हे देखील मला माहित नव्हते. ऑफिसमध्ये आणि शेजारी साठे दिसायचे म्हणजे ह्यालाच प्रेम म्हणतात असेच मला वाटायचे. साठेंनी त्यांच्या आईला आमच्या प्रेमाविषयी सांगितले असता त्यांच्या आईंनी आमच्या लग्नाला कडकडून विरोध केला. त्यांना ब्राम्हण मुलगीच सून म्हणून हवी होती. साठेंना माझ्याशीच लग्न करायचे असल्याने त्यांनी माझ्या घरी सगळ्यांशी बोलून आमच्या लग्नासाठी संमती घेतली. माझ्या आईने थोडे थोडे पैसे साठवून माझ्यासाठी थोडे सोने जमा केले होते आणि मी देखील नोकरी लागल्यावर पैसे जमा करून एक - दोन दागिने केलेले. साठेंनी माझ्यासाठी मंगळसूत्र केले. आम्ही रजिस्टर पद्धतीने लग्न केले आणि साठे मला त्यांच्या आईसमोर घेऊन गेले. आई आणि त्यांच्या सख्ख्या तीन बहिणींना हे लग्न मान्यच नसल्याने खूप आकांडतांडव त्यांनी केला पण आता त्यांच्या मुलाने लग्नचं केल्याने त्यांचा एका अर्थाने नाईलाज झाला होता. साठेंच्या आईंना मी आवडत होते पण स्वतःची सून म्हणून नाही. ज्या माझ्या आईकडे माझं कौतुक करायच्या ती सून म्हणून त्यांच्याचं घरी येईल असे त्यांना वाटलेच नसेल.

साठेंच्या घरात नवीन सून म्हणून मी गेले असले तरी त्यांच्या आईने मला सुनेसारखी वागणूक मरेपर्यंत दिली नाही. त्यांनी मला स्वयंपाक घरात प्रवेश दिला नाही. सगळं सोवळ्या - ओवळ्यात त्या स्वयंपाक करायच्या. माझ्यासाठी वेगळं भांड, माझे वेगळे ताट - वाटी असायची आणि माझी भांडी त्यांच्या नेहमीच्या वापरातील भांड्यांपासून वेगळी ठेवलेली असायची. एखादया कैद्याला जसं जेवण सरकवतात तसे त्या माझे ताट सरकवत. मी तर अगदी अस्पृश्य आहे असे मला वाटायचे. मी माझी भांडी घासून ठेवली तर त्या भांड्यांवर गोमूत्र शिंपडून घ्यायच्या. पूर्ण घरात देखील गोमूत्र शिंपडायच्या. साठे केवळ उघड्या डोळ्यांनी पाहत पण त्यांच्या आईला त्यांनी याबाबत कुठलीच विचारणा केली नाही. मी वयाने लहान असल्याने मी देखील कोणालाच कुठलेच जाब कधीच विचारले नाही.

साठे त्यांच्या तिन्ही बहिणींसाठी खूप खर्च करायचे. तिन्ही बहिणी त्यांच्या संसारात होत्या तरीही भावाकडून पैसे घ्यायला त्यांना काही वाटत नसे. भावाच्या बायकोला डोळ्यासमोर धरायच्या नाहीत पण भावाशी संबंध त्यांनी याकरिता तोडले नव्हते. साठे स्वतःजवळ काहीही पैसे ठेवत नसत. पुढच्या भविष्यासाठी त्यांनी बचत करून ठेवली नव्हती. साठेंना आपले लग्न झाले आहे, आपल्या बायकोविषयी आपली काही कर्तव्ये आहेत याची काडीचीही चिंता नव्हती.

क्रमशः

सौ. नेहा उजाळे
ठाणे विभाग

🎭 Series Post

View all