नूतन एक संघर्ष ( भाग १ )

नूतन नावाच्या स्त्रीच्या जीवनातील संघर्ष


कथामालिका

विषय - कौटुंबिक

\" नूतन एक संघर्ष \" भाग १

आजच साठेंना जाऊन बरोबर चोपन्न वर्षे झाली. त्यांच्याबरोबर अवघ्या दीड वर्षांचा संसार झाला. संसार तरी काय म्हणायचा तो ? उगीच अजाणत्या वयात प्रेम जमलं, लग्न झालं आणि अगदी कोवळ्या वयात नवऱ्याचा अपघाती मृत्यू झाला. खरंतर साठेंची आठवण येत नाही इतकी पण मनाच्या कोपऱ्यात राहतात ना काही व्यक्ती. आजची तारीख पाहिली कॅलेंडरवर आणि आठवला हा दिवस. तसंही लहानपणापासून कुठलं नशीब घेऊन आलो आहोत आपण ? लहानपणापासून कष्ट, जबाबदाऱ्या, दुःख हेच नशिबी आलेले. आईला तर मी नेहमी विचारायचे, \" कुठल्या मुहूर्तावर जन्म दिलास ग तू मला ?\" नूतन भावनाविवश होऊन भूतकाळात शिरली.

मी म्हणजेच नूतन दोन भावांच्या मधली. खरं बघायला गेलं तर मी एकुलती एक मुलगी पण तो काळचं असा होता की, मुलगी म्हणजे एक प्रकारचं ओझचं वाटायचं आईवडिलांना. तसंही माझ्या आईला मुलीपेक्षा मुलांचाच ओढा जास्त. घरची गरीब परिस्थिती. बाबा चांगली नोकरी सोडून घरी बसलेले. अगदी ब्रिटिशांच्या काळातली नोकरी सोडणं म्हणजे निव्वळ वेडेपणा होता त्यांचा. आईबाबा दिसायला देखणे. वडील तर अगदी एखाद्या ब्रिटिशांसारखे दिसायचे. त्या काळात आपल्या आईवर पण खरा किती अन्याय झालेला. एवढी सुंदर आपली आई पण तिच्या वडिलांनी केवळ मुलाचं सौन्दर्य पाहून आईला बीजवराला दिली. नशीब बाबांना पहिल्या पत्नीपासून काही मुलंबाळं नव्हती. बाबांचं पहिलं लग्न झालं आणि एका साथीच्या रोगात त्यांच्या पहिल्या पत्नीला देवाज्ञा झाली. आईच्या काळात तर मुलींची पसंती सुद्धा विचारत नसत. बाबा एका जागी व्यवस्थित नोकरी करत नसत. कित्येक चांगल्या चांगल्या नोकऱ्या संसाराचा विचार न करताच सोडलेल्या. आई कुठे शिवणकाम, भरतकाम करून चार पैसे गाठीशी ठेवत असे. आई तर कायम म्हणायची, " अशा बेजबाबदार माणसांनी लग्न करूच नये." बाबा वास्तविक आईच्या मोठया बहिणीला बघायला गेलेले. आईची मोठी बहीण दिसायला अगदीच यथातथाच होती. बाबांनी आईला ओझरते पाहिले आणि मला तुमच्या ह्या दोन नंबरच्या मुलीशीच मला लग्न करायचे म्हणून हेका धरलेला. आईच्या वडिलांनी त्यांची मागणी मान्य केली आणि मावशीला देखील सहा मुले असलेल्या बीजवरलाच दिली. मोठया मावशीचे लग्न लावल्यावर मग आईचे लग्न लावून दिले. आई नेहमी हेच बोलायची, " कुठून मेलं मला ह्या माणसाने पाहिलं आणि माझ्या आयुष्याचं वाटोळं झालं."

आईच्या माहेरी म्हणजे आमच्या आजोळी महाडला गेलं की, खूप मज्जा यायची तिकडे. आई आणि तिच्या इतर बहिणी, प्रत्येकीची मुलंबाळं केवढा माणसांचा गोतावळा असायचा तिकडे. आजी - आजोबा, मामा - मामी अगदी प्रेमाने माहेरपण करत त्यांच्या लेकींबाळींचं. आईच्या माहेरी काही श्रीमंती नव्हती पण त्यावेळची माणसेच वेगळी. मनाची श्रीमंती होती त्यावेळी माणसांकडे. आम्ही तिघे, मावश्यांची मुले, सगळ्यात धाकटा मामा जो आमच्या वयाचा होता असा आम्हा सगळ्या मुलांचा नुसता धुडगूस चालत असे. सकाळी उठल्यावर मामी आम्हा मुलांना गुरगुट्या खिमट खायला घालत असे. एका मोठ्या पितळेच्या पातेल्यात चुलीवर रटरटत खिमट शिजत असे. आतासारखे ब्रेड - बटर, बिस्कीट तेव्हा काही मिळत नसे. मस्त गरमागरम खिमट, त्यावर घरगुती लोणकढी तुपाची धार आणि मेतकूट, घरगुती कैरीचे लोणचे यांचा फडशा आम्ही मुलं पाडत असू. उन्हाळ्याच्या सुट्टीत जात असल्याने आंब्याच्या राशी पडलेल्या असंत कोठाऱ्यात. खेळता खेळता भूक लागल्यावर मस्त कोठाऱ्यात जाऊन आंबा घ्यायचा आणि खात बसायचे. जवळचं नदी असल्याने नदीवर जाऊन उंडगत बसू आम्ही बच्चेकंपनी. उन्हाळ्याचे दिवस म्हणून आजी आणि मामी कुरडया, पापड्या, पापड, लोणची, सांडगे, तळणाच्या मिरच्या करण्याचा घाट घालत. वर्षभरासाठी करून माहेरवाशिणींना सोबत द्यायला देखील हे पदार्थ केले जात. आम्हा मुलांना आळीपाळीने राखण करायला सांगायचे. आम्ही मुलं पापड्या जरा सुकत आल्या की गट्टम सुद्धा करत असू. एक - दोन महिने आजोळी राहिले की, पुन्हा घरी यायला कोणाचाच पाय निघवत नसे. घरी निघण्याच्या दिवशी आवर्जून आजी आणि मामी माहेरवाशिणींना पुरणा - वरणाचा स्वयंपाक करीत. आम्ही निघताना आजी - आजोबा, मामा - मामी अगदी आम्हा सर्वांना प्रेमाने सांगत, " पुन्हा लवकर या हो सगळे." मामाचे घर दिसेनासे होईपर्यंत आम्ही रस्त्यातून चालताना मागे वळून वळून बघत असू. सगळ्यांच्या प्रेमाची शिदोरी घेऊन आम्ही सगळे आपापल्या घरी परतू.

आईबाबा, दोन भावांबरोबर गरीबीत दिवस काढले. आईची शिकवण आम्हा तीन भावंडांना चांगली होती. आईनेच आम्हा तिघांवर चांगले संस्कार केले. वडिलांच्या बेजबाबदार वृत्तीने आईने एकटीने संसाराचा गाडा खेचलेला. अगदी कोंड्याचा मांडा करून संसार करत होती ती बिचारी. मुंबईत एक छोटी खोली होती वडिलांची ती त्यांच्या धाकट्या भावाचं लग्न झाल्यावर काकांना राहायला दिली आणि स्वतः \" विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर \" अशा रीतीने आम्हाला घेऊन वणवण फिरवत राहिले. मुंबईतली खोली सोडली आणि नेलं आम्हाला विरारला. विरारला एका चाळीतल्या घरात आम्ही राहू लागलो. तेव्हा आतासारख्या सुखसोयी देखील नव्हत्या तिथे. अगदीच गावासारखं वातावरण होते तिथे. शेतातून चालत जावे लागे. शौचास जाण्यासाठी झाडाझुडुपांमध्ये जावे लागे. लाईटची सोय नव्हती. मी तेव्हा वयात येऊ लागले होते. आईला माझी चिंताच वाटायची. बाबांना कोणाची चिंता कधी भासलीच नव्हती. आईला वाटायचे आपली लेक मोठी होतेय, तिला आडबाजूला शौचास जावे लागते. मोठा भाऊ जेमतेम दहावी होऊन घरच्या परिस्थितीमुळे एका प्रायव्हेट कंपनीत कामाला लागलेला. कामासाठी त्याला मुंबईत यावे लागायचे. मुंबई तर किती दूर आपल्यापासून ? दादाला नोकरी करायला त्रास तर होतंच होता. आईने उचल खाल्ली आणि तिने तिचा संसार हलवला गोरेगावला. मुंबई थोडीतरी जवळ आली. गोरेगावला तसं बघायला गेलं तर कष्टाचं जीवन होतं. तिथेही लाईटची व्यवस्था नव्हती, पाण्याची व्यवस्था नव्हती. हंडे - कळश्या, बादल्यानी पाणी भरावे लागे. आईला पाणी भरायला पहाटे उठून मी आणि दादा मदत करत असू.

मी सोळा वर्षांची झाले आणि दादाच्या कंपनीत मीही नोकरी करू लागले. आमचं गोरेगावचे घर जरा चढणावर होते. रोज स्टेशनला चालत जावे लागत असे. ऑफिसला जाताना इतकं काही वाटायचे नाही पण घरी येताना चढणावर चढत घर गाठायला पुरती दमछाक होत असे पण घरी आल्यावर आईने केलेल्या सुग्रास स्वयंपाकाने दिवसभराचे सारे कष्ट विसरायला होत असे. माझी आई अतिशय सुगरण होती. तिच्या हाताला इतकी चव होती की, साधं पिठलं - भाकरी तिने रांधले तरी त्याची चव अमृततुल्य होती. तिच्या कामाचा असा काही वेग असायचा की, ती घरातली कामे, दळणवळणाची कामे, निवडणं - टिपणं, घरातली स्वच्छता, घरगुती बेगमीचे पदार्थ इतकं सारं करून पुन्हा शिवणकामाला बसायची. लहान मुलांची सुंदर सुंदर झबली - टोपडी - दुपटी, गोधड्या लोकांना शिवून द्यायची. त्यातल्या त्यात भरतकाम - विणकाम देखील ती करत असे. मी आणि दादा तिला संसारासाठी हातभार लावायला नोकरी तर करतंच होतो.

क्रमशः

सौ. नेहा उजाळे
ठाणे विभाग

🎭 Series Post

View all