विभक्त कुटूंब पद्धत भाग - ३

छोटे कुटूंब, सुखी जीवनाची किल्ली. जिथे सर्वांचीच स्वप्न विचारात घेऊन त्या दिशेने पावले उचलून प्रोत्साहन दिले जाते.

विभक्त कुटूंबपद्धती गरजेची भाग - ३
विषय : ( दुसरा संघ )विभक्त कुटूंब - ३
उपविषय : राज्यस्तरीय करंडक वादविवाद.
टिम : नाशिक.

         

छोटे कुटूंब, सुखी कुटूंब.
आपल्या कुटूंबातल्या प्रत्येक व्यक्तीची आवड विचारात घेतली जावून ताबडतोब त्याची कृती करण्यात येते. मुलांना ज्या छंदाची आवड आहे, त्याची शिकवणी लावून मुलांना प्रोत्साहन देण्याचे काम विभक्त कुटूंबात सहज केले जाते.

१) घटस्फोटाचे प्रमाण :
एकत्र कुटूंब म्हटले की, सर्वांच्या मना प्रमाणे आपण वागत आहोत की, नाही हे पाहावे लागते. कधी कधी तर अंगावर येईल ते काम करणा-या गृहिणीचा एक प्रकारे मानसिक दबाव आणला जातो. प्रत्येक काम तिच करत राहते. आणि काम न करणा-या इतर गृहिणी मात्र सजण्या-मुरडण्याकडे कल घेत असतात.
एक गृहिणी तरी किती सहन करणार. कधी ना कधी तिच्या भावनांचा देखील उद्रेक हा होणारच ना?? सांगव तर कुणाशी बोलाव. या एकत्र कुटूंबात तर सगळ्या एकमेकींना आधीच ओळखत असल्याने, एकमेकींची बाजू घेणार हे ठरलेलं. मी तुमच्यातलीच, असे म्हणत एकमेकींना सामील असतात. " जसे काही उंदारला मांजराची साक्ष. यातला काय तो प्रकार म्हणावा लागेल. घरात लग्न करुन नवख्या येणाऱ्या गृहिणीला नेहमीच परीक्षा द्याव्या लागतात.
जसे , शिक्षणा किंवा नोकरी मुळे तिने कधी घरातल्या कामाला हात लावण्याची सवय नसते. सासरी आल्यावर ते काम ती आनंदाने करायला जाते देखील. परंतु, काय ग...?? यात हे घालतात, ते नाही. अस बोललं जाते. तर..., झाडून काढत असताना, इथेच कचरा राहिला?? तिथे पण आहे. असे बोलून खिल्ली उडवली जाते. ती गृहिणी सवय नसताना देखील एवढे काम करते जेवढे की तिने तिच्या माहेरी पण केले नसेल. हि गोष्ट एकत्र कुटूंबात समजून घेतली जात नाही.
अनेक दिवस अश्या भावना साठत जातात. एक दिवस टोकापर्यंत निर्णय घेतला जातो. ती गृहिणी आई-वडिलांपासून लपवून जरी ठेवत असली तरी, कधी ना कधी हि गोष्ट कोणत्या ना कोणत्या मार्ग पोहचत असते. ज्या मुलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले आज तिच्यावर अशी वेळ यावी. काय वाटत असणार??? आई-वडिलांच्या काळजाला तुम्हीच सांगा.
या उलट विभक्त कुटूंबात पुरुष आणि गृहिणी एकमेकांना बरोबरीचे समजत असतात. शिक्षण किंवा नोकरी केली असल्याने घरकाम लगेच नाही, पण हळूहळू जमेल अशी धारणा मनी बाळगली जाते. आपणहून घरकामात हातभार लावावा असे विभक्त कुटूंबातील पुरुष म्हणत असतात. एकमेकांना समजून घेवून, विश्वासाच्या पायावर एक ना दिवस गोष्टी सगळ्या जमवून येतील, यामुळे विभक्त कुटूंबात वाद जरी झाले तरी ते किरकोळ होतात. अश्याने गोष्टी टोकापर्यंत जात नाही.


२) नात्यातला स्पेस :
एकत्र कुटूंब पद्धतीत सर्वजण एकमेकांच्या अवतिभवति पाहायला मिळतात. एखाद्या व्यक्तीशी महत्वाच्या विषयावर बोलायचे झाल्यास , सुरवात करताच इतर व्यक्तीही अचानक तिथे येवून हजेरी लावतात. आपण जर बोलणे बंद केले तर..., आमच्याच विषयी बोलले जाते. असा चुकीचा गैरसमज केला जावून वादाचा मुद्दा उपस्थित केला जातो. आता मला सांग नोकरी बद्दल काही महत्वाच ज्या व्यक्तीला त्यातले कळते त्यांच्याशीच बोलणार ना??? मग हा विषय सर्वांसमोर बोलून कसे चालेल.
तसेच, एकत्र कुटूंब पद्धतीत लहान मुलांचा, मोठ्या बोलणा-या गृहिणींचा आवाज मिसळला जातो. आपण काय बोलतो आहोत हे समजण्यातच वेळ निघून जातो. हे ना असे अनेक विषय असतात. जे एकत्र कुटूंबात बोलता येत नाही.
विभक्त कुटूंबात ज्यांच्याशी आपल्याला चर्चा करायची.त्यांच्याशी हव तेवढे बोलता येते.वेळेची अथवा कोणी येणार तर नाही ना??? अशी भिती राहत नाही. निर्धास्तपणाने आपली बाजू मोकळेपणाने मांडू शकतो. समोरच्या व्यक्तिकडून योग्य तो सल्ला घेतला जावून आपली समस्या त्वरीत सोडवली जाते. शांतता पूर्वक वातावरणात गोष्टी लवकर समजल्या जातात.


३) आजी-आजोबा मुले सांभाळण्यास असमर्थ :
एकत्र कुटूंब म्हटले की, आम्ही दोघे आज देवळात भजनाला चाललो उशीर होईल. तोपर्यंत त्याचे दुसरे आजी-आजोबा सांभाळतील. असे एकमेकांवर अवलंबून राहून, शेवटी नातवंडाना पाहायला घरी कोणीच थांबत नाही.
हिच बाब एकत्र विभक्त कुटूंबात मात्र उलट पाहायला मिळते. आपल्या नातवंडाला फुलाप्रमाणे जपतात. आजीला काही काम असेल तर आजोबा नातवंडाकडे लक्ष देतात. आजी काम करुन घरी आली की, आजोबा त्यांचे काम करतात. दोघे नातवंडाच्या वेळेनुसार आपल्या कामाचे स्वरुप आखत असतात.


४ ) स्वावलंबन :
एकत्र कुटूंबात व्यक्ति एकमेकांवर विसंबून असतात. तो करेल, तेव्हा बघू अशी वृत्ती आपोआपच निर्माण होवू लागते. तू हे कर ,मग मी ते करते. कोण्या एकावर संपूर्ण जबाबदारीचा पगडा नसल्या कारणाने कधी जर एकट्याला सर्व काम पार करण्याची वेळ आली तर.., त्यावेळी मात्र असमर्थ ठरले जाते.
विभक्त कुटूंबात प्रत्येक व्यक्तिस सर्व काम करण्याची माहिती आत्मसात असते. वेळेला ते सर्व गोष्टी हाताळू शकतात. त्यावेळी मनात कोणत्याच प्रकारचा संभ्रम निर्माण न होता त्या गोष्टींना योग्य तो न्याय दिला जावून समर्थ ठरले जातात.


५) आर्थिक नियोजन :
एकत्र कुटूंबात आर्थिक नियोजनाचा विचार करता, कोणाला ना कोणाला आपल्या इच्छांचा त्याग हा करावा लागतो. किंवा येणाऱ्या संधी, सुखा पासून मुकावे लागते. शेतात औषधे फवारायची म्हणून शेतकरी औषध दुकानातून आणतो. त्याचवेळी मुलीला शाळेच्या सहलीला मित्र-मैत्रिणीं बरोबर जायचे असते. तर मुलाला मोटार सायकली करता थोडे पैसे हवे असतात. जर अश्या गोष्टी एकदम विचारात घेतल्या तर..., मुलाला काही महिने थांबायला सांगावे लागते. मुलीला या वर्षी नको, पुढच्या वर्गात गेली की सहलीला जा अस सांगण्यात येते. एकत्र कुटूंबात सर्वांचा ताळमेळ बसवणे जिकीरीचे होऊन जाते. सर्वांचे मन जपावे लागते. कोण्या एकाचा विचार करुन चालत नाही. कधी तर पुतण्या-पुतणीचा विचार करुन आपल्या मुलांच्या मागणींचा बळी द्यावा लागतो. तर जवळ पैसे नसल्याने वेळेत फि न भरल्यास मुलांना शिक्षणा पासून वंचित राहावे लागत आहे. हुशार असून, शिक्षणाची आवड असली तरी.., केवळ एकत्र कुटूंबाचा विचार करता शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येत आहे.
विभक्त कुटूंबात मात्र आर्थिक नियोजन चोख असते. तातडीच्या सेवेकरता बचत पैशांची सोय करुन ठेवलेली असते. त्यामुळे एकाच वेळी जरी अडचणी आल्या तरी त्या करता आखलेले नियोजन फायदेशीर ठरते. आपल्या मुलांच्या मागण्या वेळेत पूर्ण करता येतात. त्यांचे शिक्षण हव्या त्या क्षेत्रात पूर्ण करुन देण्यात येते.


६) समजून घेण्यातला वेळ :
एकत्र कुटूंबातील सदस्य गृहितच धरतात. या शिकलेल्या मुली काही काम करणार नाही घरातले. त्यांना काय येणार. आपल्यालाच कराव लागणार. पहिल्या पासून शिकवाव लागणार. अस समजून कुटूंबात आलेल्या नववधूला मात्र पडेल ते काम कराव लागते. सुरवातीला अंगण झाडणे, भांडी-कपडे हि कामे सांगितली जातात. तिने कधी जेवण बनवण्याचा अट्टाहास धरला तर..., तुला नाही जमणार अस म्हणून तिला जेवण बनवायला देण्याचे टाळले जाते. किंवा तिची परीक्षाच घेवूया असे म्हणून घरातले सर्वजण इतर कामांत व्यस्त आहेत, कोणी बाहेर निघून जात. जेवण बनवण्याची पूर्ण जबाबदारी तिच्यावरच टाकण्यात येते. मग तिने घाबरुन नको. मी हे काम नाही करणार. असे बोलण्याची वेळ येते. आता एवढ्या लोकांच्या जेवणात तिखट-मीठाचे प्रमाण पहिल्याच वेळी कस लक्षात येणार. एकदा तिला समजून सांगावे. नंतर करेल ती पूर्ण अशी धारणा का नाही येत मनात त्यावेळी. तुला पण जमेल ह्या गोष्टी असा आत्मविश्वास का निर्माण नाही करुन देत कोणी?? उलट हे किती अवघड असते, तुला नाही जमणार आमच्या शिवाय अशी दहशत का निर्माण करण्यात येते. मान्य आहे नविन आलेली नववधू आत्ता नविन जरी वाटत असली तरी ती तुमच्याच कुटूंबाचा भाग आहे. हे का नाही समजून घेतले जात. आधी अशी वागणूक देवून पुढे वृद्ध काळात मात्र तिन आपली काळजी घेतली पाहिजे असा विचार कसा काय केला जातो. फक्त आपल्या स्वार्था करता का??? म्हणजे आपली वेळ आहे तर वागवा कसे पण. त्यांच्या वेळी मात्र आपण बोललो तसेच केले पाहिजे. आपल्यालाच समजून घेतले पाहिजे.
विभक्त कुटूंबात एकमेकांना समजून घेण्यानेच संसारचा पाया आखला जातो. तुला काय आवडते. कोणते छंद, फिरण्याची ठिकाणे या बद्दल विचारले जावून एकमेकांसोबत कधी तुझ्या आवडीचे तर कधी माझ्या आवडीचे अशी रचना मांडली जावून एकमेकांविषयी आदर निर्माण होतो. समोरची व्यक्ति आपल्या आनंदासाठी किती झटते आहे याचा आनंद पाहायला मिळतो. आपणही त्याच्या आवडीचा विचार करुन तसे राहायला हवे हि जाणीव अजाणतेपणी आपोआप होते. कोणती गोष्ट मागण्याआधीच समोर असते. कारण भावना डोळ्यांमार्फत हदयाला जावून भिडल्या जातात. इतकी घट्ट गाठ विभक्त कुटूंबात एकमेकांशी बांधली जाते.


७) जुन्या चालरितींना झुगारुन आधुनिकतेकडे वाटचाल :
संस्कृति जपण हे आपल सर्वांच कर्तव्य आहे. एकत्र कुटूंबात सण- उत्सव असले की सर्वांनी लवकर उठायचे. काम करायचे. आपले काम आवरले की दुस-याला ते काम वेळेत पूर्ण व्हावे म्हणून हातभार लावावा लागतो. म्हणजे आपले काम करा तर करा. उलट जे हळूवार, काम नको म्हणून टाईमपास करतात त्यांना आपण मदत करायची. अश्याने दिवसभर काम केल्याने अशक्तपणा जाणवत राहतो. तर कधी आजारी पडण्याची समस्या उद्भवली जाते. पारंपारिक रांगोळ्या, दिवे लावणे असे सर्व झाले तरच मना सारखे झाले असे बोलण्यात येते.
या उलट विभक्त कुटूंबात आधुनिक पद्धतिने सण साजरे केले जातात. आवश्यक तिथे दिवे बाकी ठिकाणी लायटिंग करण्यात येते. रांगोळीचे , मेहंदिचे छाप, टॅटू लावण्यात येतात. वेळेच भान राखले जावे याकरता सोप्या पद्धतीच्या युक्ती वापरली जाते.


८) आधुनिक प्रयोग करता येत नाही :
एकत्र कुटूंबात जे आहे तेच स्विकारण्याची सवय जडल्याने. पाट्यावरचीच चव जिभेला आवडते. अस म्हणत, किंवा पुरण हे पुरण चाळणीनेच बारिक छान होते. व मऊ लुसलुशीत पोळ्या बनतात. वडी उकडताना कुकरला शिट्टी न घेता चाळणीतच वाफवावी. नाही तर चवीत फरक पडतो. मनाशी हे विचार पक्के केल्याने आधुनिक यंत्रे घरात आणायला बंधी घातली जाते. कपडे मशिनला न लावता हातानेच स्वच्छ निघतात. मोदक बनवायचे असेल तर हातानेच कळी पाडली गेली पाहिजे. कशाला हवे मोदक पात्र??? ब्रेड सॅण्डविच बनवताना टोस्टर नको तव्यावर करू. त्याचप्रमाणे केक बनवायला कशाला मायक्रोव्हेव हवा. कुकरमध्ये बनवायचा. फ्रिज तरी कशाला??? शिळपाके खाण्यापेक्षा रोज भाज्या घेऊन येत जायच्या. शिळ अन्न खाव लागणार नाही. आपल्या मनाप्रमाणे गोष्टी घडण्याकरता सोयीस्कर अर्थ लावण्यात येतो. आधुनिक तंत्र कसे चुकीचे आहे हे पटवून देण्याचा सार्थ प्रयत्न केला जातो.
विभक्त कुटूंबात वेळेशी सांगड घालत. नोकरी, घरातले काम आवरुन कोणत्याही प्रकारचा तणाव तर येणार नाही ना??? याचा सारासार विचार केला जावून आधुनिक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले जाते. तसे पाहिले तर..., विभक्त कुटूंबात काम करणारी एकट्या गृहिणीला सर्व काम पार पाडत असताना आधुनिक तंत्रच उपयोगात येतात. शिवाय गृहिणींना देखील आपली स्वप्न सत्यात उतरवायला हवीत. आजच्या पुरुष-स्त्री समानतेची बाब विचारात घेता आपल शिक्षण पूर्ण करुन नोकरीला लागून गृहिणी देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात.


विभक्त कुटूंब या करता महत्वपूर्ण आहे. जिथे आपल्या इच्छा-आकांक्षा आपल्याला हव्या असणा-या कालावधीत पूर्ण करता येतात. मनुष्य जीवन परमेश्वराची देणगी आहे. ते अनुभवण्याची संधी आपल्याला एकदाच मिळत असते.
संधी भरभरुन आनंदाने जगायला हवी.
विभक्त कुटूंबात एकमेकांची आवड जपली जाते. प्रत्येकाच्या आवडीने पदार्थ बनवता येतात. एकट्या करता बनवायचे झाल्यास विचार न करता पटकन बनवता येते.
बाहेर फिरायला जाताना दोघांचे एकमत झाले की लगेच आवरुन निघता येते. कधी जेवण बनवण्याचा कंटाळा आला तर मसालेभात, पाणी-पुरी, भेळपुरी खायला बाहेर जाण्याचा बेत आखला जातो.
खरेदी करता आपल्याला आवडणारी कपडे, मुलांकरता खेळणी, घर उपयोगी वस्तू आणता येतात. प्रेझेंटेबल दिसण्याकरता पार्लरला जावून आपल्याला मेंनटेन ठेवता येते.

एकत्र कुटूंबात मन मारत, इच्छांचा बळी देत का सहन करावे. जिवंत असताना का?? समोर आले तर खायचे नाहीतर घरातल्या सर्वांना मिळाल्यावर उरले तर आपण खायचे नाहीतर पाणी पिऊन झोपायचे. किंवा घरी पाहुणे आले तरी सांगत नाहीत घरातील मंडळी. योग्य अंदाज लावून जेवण बनवले देखील जाते. अश्यावेळी पुरुष मंडळींना आधी वाढले जाते. नंतर गृहिणींना जेवण घेतल्यास भाजी संपून ही जाते. मग चटणी किंवा पिठल्याचा आधार घेतला जातो. घरातल्या गृहिणी दिवसभर स्वयंपाक घरात काम करुन थकतात. त्यांना खरतर खाण्याची खरी गरज असते. पण..., या उलट एकत्र कुटूंबात गृहिणींना आहे त्या गोष्टी स्विकाराव्या लागतात असे का???
काही आवडीचे पदार्थ बनवता येत नाही. करायचे झाले तर सगळ्यांना बनवा. यापेक्षा आपल्यालाच नको असे बोलायची वेळ येते.
कुठे बाहेर जायचेच झाले तर, प्रत्येकाला हो... नाही बोलण्यातच दिवस निघून जातात. मूड जावून मग बाहेर जाणे रद्द कराव लागते.
कितीही कंटाळा आला जेवण बनवण्याचा तरी जेवण बनवण्या पासून सुटका नाही. बाहेरचे खाण म्हटले की एवढ्यांचा विचार करता लागणारे पैसे याचा विचार केला जातो.
खरेदी करताना ती वर्षातून एकदा सणासाठी केली जाते. आधेमधे खरेदी करुन वायफळ खर्च नको. असे बोलले जाते. घर उपयोगी काही सामान आणले तर...हे आहे ना आपल्याकडे कशाला हवे घरात नुसती वस्तूंची भरणा करता असे बोलण्यात येते.


अशी अनेक कारणे आहेत की ज्यामुळे विभक्त कुटूंब सर्व बाजूंनी योग्य ठरत आहे. तरी वरील आलेल्या वाचनातून कोणती पद्धत तुम्हांला योग्य वाटते ते मला कमेंट करुन नक्की सांगा.
तुमच्या कमेंटची मी वाट पाहत आहे. तुमचा प्रतिसाद मौल्यवान आहे.