मला कसतरीच होतय...

She Feels Bad When Someone Get Good Things
मला कसतरी होतंय..

डॉक्टर साहेब एका रुग्णाला तपासत होते.


रुग्ण -"माझ्या पोटात दुखतय."

डॉक्टर -"कुठे दुखतय? केव्हापासून दुखतंय?

रुग्ण -"मध्ये, पोटाच्या मध्ये दुखतंय! पंधरा दिवसांपासून दुखतंय. आधी शेकून, ओवा खाऊन बरं वाटायचं, पण आता वेदना सहन होत नाही."


डॉक्टर -"बरं बरं, आ करा"

तेवढ्यात ती तिथे आली.


ती -"डॉक्टर मे आय कम इन?"

डॉक्टर -"मॅडम तुम्ही बाहेर बसा. मी पेशंट तपासतो आहे. यांचं झालं की मग या."

ती (लडिवाळपणे) -"डॉक्टर प्लीज मला ह्यांच्यापेक्षा जास्त त्रास आहे. मला आधी आधी तपासा. प्लिज."

रुग्ण -"डॉक्टर साहेब मी बाहेर बसतो. हयांना आधी तपासा."

डॉक्टर -"बोला तुम्हाला काय त्रास आहे?"

ती -"डॉक्टर साहेब काही दिवस झाले मला ना कसतरीच होतं."


डॉक्टर -"म्हणजे नेमक काय होतं?"

ती -"हे बघा काल रात्री 'हे' लवकर घरी आले. रात्री अकरा वाजता. आधी रात्री दीड दोन वाजता परत यायचे आता लवकर येतात. क्लब मध्ये जातात ना! मित्रांबरोबर वेळ घालवतात. मान्य आहे दिवसभर मरमर काम करून माणूस थकतो, फक्त रात्री थोडा विरंगुळा म्हणून काही वेळ मित्रमंडळींसह घालवायला हवा. पण रात्री एक दीड म्हणजे फारच उशीर! मग मी त्यांना रागवल म्हटलं 'एवढ्या रात्री घरी आलेलं मला चालणार नाही'. तेव्हापासून हे रात्री साडेदहा अकरा पर्यंत येतात. देशमुख बाईंनी त्यांच्या नवऱ्याला रागवलं तर ते आजकाल नऊ वाजताच घरी येतात. हो कालच देशमुख बाई मला हे सांगत होत्या, तेव्हा ना मला पोटात कसंतरीत झाल."


डॉक्टर -"तुमचे मिस्टर घरी लवकर येत नाही म्हणून तुम्हाला कसतरी होतं का?"

ती (हसून) -"तुमचा आपलं काही तरीच! तर झालं असं की, अहो रात्री घरी आले. जेवायला बसले. मी त्यानां आवडतो म्हणून आंबा चीरला. त्यांनी आग्रह केला म्हणून मग मी पण आंब्याची एक फोड खाल्ली."

डॉक्टर -"अच्छा अच्छा म्हणूनच तुम्हाला कसतरी होतंय का?"

ती -"अजिबात नाही. तर झालं असं की, जोशींची मागच्या वर्षी रत्नागिरीला बदली झाली. तीन वर्ष आमचा आणि त्यांचा छान घरोबा होता. म्हणून मागल्या वर्षीपासून ते न चुकता आम्हाला रत्नागिरीचे हापूस आंबे पाठवतात. त्यांनी यावर्षी पण तीन डझन आंबे पाठवले. त्यातल्या एक डझन आंब्याचा मी रस केला. अहोंना चिरुन खायला आवडतात म्हणून एक डझन आंबे तसेच ठेवले. पण आमच्या ह्यांची कमालच केली! एक डझन आंबे त्यांनी चक्क मला शेजाऱ्यांना वाटायला सांगितले. आता तुम्ही सांगा डॉक्टर साहेब रत्नागिरीचे हापूस आंबे तेही डझनभर शेजाऱ्यांना वाटावे लागल्यावर मला कसतरीच नाही होणार का?"


डॉक्टर -"अच्छा अच्छा बरं अजून काय होतंय तुम्हाला?"

ती -"हां तर रात्री मी आंबा चिरला. मुल झोपली होती. मी तर माझ्या मुलांना रात्री लवकर झोपवायचा प्रयत्न करते. रात्रीची झोप मुलांसाठी फार महत्त्वाची असते. हो ना डॉक्टर?"


साहेब डॉक्टर -"हो हो अगदी."


ती -"माझी मुलं तर लवकर झोपतात रात्री अकराला! पण ती जाधवांची वानर सेवा विचारूच नका! मध्यरात्रीपर्यंत रस्त्यावर धडगुस घालतात. पण माहित नाही काय झालं माझी मुलं पण आजकाल रात्री लवकर झोपत नाही. पण जाधवांची मुलं लवकर झोपायला लागली. म्हणून मला पोटात कसतरीच व्हायला लागलं.

डॉक्टर -"अच्छा अच्छा,म्हणजे जाधवांची मुलं लवकर झोपली म्हणून तुम्हाला कसंतरीच होतंय."

ती -"नाही हो! तर रात्री मी आंबा खाल्ला."

डॉक्टर -"एक फोड ना?"

ती -"नाही एक आंबा पूर्ण."

डॉक्टर -"बरं मग?"

ती -"आम्ही झोपलो. सकाळी मी लवकर उठली, सकाळी सहाला. मी रोज सकाळी लवकर उठते."

डॉक्टर -"अरे वा छान!"

ती -"त्यात छान काय? इच्छा नसताना लवकर उठून अहोंना चहा (बेड टी) दावा लागतो. माझ्याकडे कामाला बाई आहे, पण आजकाल चांगल्या कामवाल्या मिळतात कुठे हो? त्या कुलकर्णी बाई सांगत होत्या, त्यांची कामवाली बाई आठवड्यातून दोन सुट्ट्या घेते. मी माझ्या कामवालीला आधीच सांगितलं होतं, महिन्याला तीनच्यावर खाडे केले तर तुझा अर्धा पगार कापेन. पण ती दामल्यांची कामवाली बाई फार चांगली आहे हो! महिन्याच्या सुट्ट्या नाही, वेळेवर येते. कामही पटापटा करते. भांडी घासताना भांडी आपटत नाही. कपडे धुताना कपडे फाडत नाही, आणि फरशी पुसताना तोंडही वाजवत नाही, आणि म्हणूनच मला कसतरी होतं!"


डॉक्टर -"अजून काही त्रास?"

ती -"एखादी चांगली बाई आहे का हो तुमच्याकडे घर कामाला?"


डॉक्टर -"काय?"

ती -"हां तर काय झालं! हे ऑफिसला गेले. मुल शाळेत. मी नेहमीप्रमाणे ऑनलाइन शॉपिंग ॲप वर शॉपींग करत होते. तर जी साडी मी ऑनलाइन सात हजार रुपयांना घेतली, ती कुलकर्णी बाईने बाजारातून हजार रुपयाला आणली. तेव्हा मला कसतरी झालं."


डॉक्टर -"बरं बरं."

ती -"तर पार्सल वाला पार्सल घेऊन आला,
आणि मी अलमारीतून पैसे काढले, तर मुलाचं प्रगती पुस्तक दिसल. माझ्या मुलाला 55 टक्के गुण होते आणि देशमुखांच्या मुलीला 85 टक्के! तेव्हा मला कसंतरीतच झालं."


डॉक्टर -"अजून काही?"


ती -"दुपारी जेवण झाल्यावर मी सगळ्यांची स्टेटस, शॉर्ट स्टोरीज बघत होते. मी आणि कुलकर्णी बाईंनी काल एकत्रच सेल्फी आणि फोटोसेशन केलं. पण कुलकर्णी बाईंना तब्बल पाचशे लाईक आणि चारशे कमेंट्स होत्या आणि मला मात्र फक्त चारशे एन्शी लाईक्स आणि तीनशे नव्वद कमेंट्स तेव्हा मला कसतरी झालं."


डॉक्टर -"आणखी काही लक्षण आहेत का? म्हणजे अंगदुखी, पाठदुखी?"

ती -"रात्रभर गाढ झोपल्यावर मला दुपारी झोप येत नाही. जेवण झाल्यावर भूक लागत नाही. पाणी पिल्यावर तहान लागत नाही. थंडीच्या दिवसात घरात थंडी वाजते आणि उन्हात मोबाईलची स्क्रीन चमकते."

डॉक्टर -"आणखी काही?"

ती -"उन्हाळ्यात जीवाची काहीली होते, दिवाळीत फिरायला जायला मिळालं नाही म्हणून आम्ही नाताळच्या सुट्टीत फिरायला गेलो. पण दामले दाम्पत्य उन्हाळा, दिवाळी, नाताळ प्रत्येक वेळी बाहेरगावी फिरायला गेले, तेव्हा मला कसतरी झाले."

डॉक्टर -"हे बघा तुम्ही एक काम करा, हा आजार ना मला फार भयंकर वाटतो आहे. याची लक्षणे ही फारच विचित्र आहे त्यामुळे, तुम्ही असं करा, इतरांचे स्टेटस, त्यांचे व्हाट्सअप नंबर ब्लॉक करा. कामवालीशी प्रेमाने बोला म्हणजे ती जेव्हा काचेची भांडी, चिनी मातीची भांडी, क्रोकरी सेट घासत असेल तेव्हा तिच्या मुलांबद्दल, तिच्या आई बद्दल, तिच्या बाळंतपणाविषयी बोला; आणि जेव्हा ती जळलेल्या कढाया, करपलेले दुधाचे गंज घासत असेल ना! तेव्हा तिच्या सासू, नंणदा, भावजया यांचे विषयी बोला. तुमच्या मोबाइल मधले सगळे ऑनलाइन शॉपिंग ॲप्स डिलीट करा. याशिवाय नवऱ्याशी तुम्ही प्रेमाने वागा आणि मनसोक्त खा,प्या. पिकनिकला जा. वनभोजन करा."

"ही एक गोळी झोपल्यावर आणि ह्या दोन गोळ्या झोपेतून उठायच्या आधी. एका कॅप्सूल नवऱ्याला तो क्लब मध्ये गेल्यावर द्या आणि हे बुद्धीचा टॉनिक मुलांना ते झोपल्यावर प्यायला द्या. मुल खेळायला गेल्यावर त्यांना अभ्यासाकरता बोलवू नका आणि नवऱ्याचे कान खाऊ नका. तुम्ही आता या! धन्यवाद!"

ती -"थँक यु डॉक्टर! आत्तापर्यंत 17 डॉक्टरांना माझं दुखणं सांगून झालं, पण कोणीच मला औषध देऊ शकले नाही. बघूया आता तुमच्या या औषधांचा काय परिणाम होतो ते."

*********************************************

तुमच्या आजूबाजूला आहे का कोणी अशी की, जिला 'मला कसतरीच होतंय' हा आजार झालेला आहे.

धन्यवाद.

©® राखी भावसार भांडेकर.

जय हिंद.