अहिंसा परमोधर्म!

About Non Violence


अहिंसा परमोधर्म!


भारतीय संस्कृतीचा पायाच अहिंसेवर आधारलेला आहे. सर्व धर्माच्या प्रेषितांनी मानवी जीवनासाठी जी आचार संहिता घालून दिली. तिचे आचरण करणे म्हणजे खरा धर्म! प्रत्येक धर्मात सत्य, ब्रम्हचर्य, अस्तेय,अपरिग्रह ही जी मूलभूत तत्त्वे सांगितली आहेत , त्यात अहिंसा हे ही एक तत्त्व सांगितले आहे.
छेदोग्य उपनिषदात सर्वप्रथम अहिंसेचा उपदेश आढळतो.

अहिंसा म्हणजे सर्वांप्रती प्रेम !
अहिंसा म्हणजे अ - हिंसा म्हणजेच हिंसा न करणे. आता हिंसा करणे याचा अर्थ फक्त हत्या करणे, ठार करणे एवढाच होतो का ? तर नाही.
काया,वाचा आणि मन या तिन्ही प्रकाराने जर आपल्यामुळे इतरांना त्रास होत असेल,अन्याय व अत्याचार होत असेल ,मन दुखावले जात असेल तर ती असते हिंसा!
आपण स्वतःहून, आपल्या स्वार्थासाठी तिन्ही प्रकारे इतरांना त्रास देत असू तर ती हिंसाच ठरते.
पण जर कोणी आपल्याला त्रास देत असेल ,आपल्या जीविताला धोका पोहचवत असेल तर आपल्या स्वरक्षणासाठी त्याचा प्रतिकार करण्यासाठी लढणे म्हणजे हिंसा नाही. कारण प्रत्येक जीविताला आपले संरक्षण करण्याचा अधिकार आहे.
निसर्गाने प्रत्येक जीवमात्राची अशी शरीररचना केली आहे की, त्याला इतरांपासून त्रास होत असेल तर तो आपले रक्षण करू शकतो.

रस्त्यावर शांत झोपलेल्या कुत्र्याच्या शेपटीवर कोणी पाय दिला तर ती हिंसा ..पण जर तो कुत्रा संरक्षणासाठी त्रास देणाऱ्यावर भुंकला,त्याला चावला तर ती हिंसा का?
आपण पाहत आलो आहे की,
जीवसृष्टीतील मोठ्या घटकाकडून दुर्बल घटकाचे वेगवेगळ्या प्रकारे शोषण होत असते. आपल्या पेक्षा जास्त शक्तीशाली घटकाशी लढण्यासाठी आपल्याला आपली ताकत वाढवावी लागतेच .
जीवसृष्टीतील कोणताही जीव स्वतः हून दुसऱ्या जीवाला त्रास देत नाही. परिसंस्थेचा भाग म्हणून उपजीविका करण्यासाठी ,
अन्नसाखळी पूर्ण करण्यासाठी त्यांना आपल्यापेक्षा छोट्या जीवांवर अवलंबून राहवे लागते. पण ते ही भूक असेल तेव्हाच ते शिकार करतात. अन्यथा नाही.


भारत ही देवादिकांची भूमी आहे. सर्व देव शांतताप्रिय,न्यायप्रिय,प्रेम व भक्तीचे अवतार होते. पण जेव्हा दानवांनी त्यांना त्रास दिला तेव्हा देवांनाही हातात शस्त्र घ्यावीच लागली.
रामाने रावणाचा वध करून धर्माचे रक्षण केले.महाभारतात तर पांडवांना धर्मरक्षणासाठी आपल्या नातलगांवर शस्त्रे उठवावी लागली.जेव्हा जेव्हा अन्याय ,अत्याचार वाढला तेव्हा तेव्हा राक्षसांना मारण्यासाठी देवी पार्वतीला दुर्गा, चंडिका, कालिका व्हावेचं लागले.
देव आणि दानव यांच्यामध्ये \"अ\" हिंसा हाच फरक आहे.
दानवांनी शस्त्रे उचलली ती इतरांना त्रास देण्यासाठी तर देवांनी शस्त्रे उचलली ती अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी!
हिंसा नाशाला कारणीभूत ठरते तर अहिंसा शांती देते,एकमेकांवर प्रेम करण्यास शिकविते.

भारतात अनेक संत,महात्मे, महापुरुष आपल्या कार्याने,विचारांनी महान ठरले.
त्यांनी आपल्या शिकवणुकीतून लोकांना अहिंसेचा मार्ग सांगितला.
हिंसेला हिंसेने उत्तर दिले तर सर्वनाश होऊ शकतो.आपण अहिंसेच्या मार्गाने हिंसा करणाऱ्यांचे मतपरिवर्तन करू शकतो अशी त्यांची विचारसरणी होती.

\"जीवो जीवस्य जीवनम्\" हा प्राण्यांच्या जीवनाचा धर्म सांगितला जातो. तर मानवी जीवनाचा धर्म हा क्षमा,शांती,दया,करूणा,अहिंसा या तत्त्वांमधून व्यक्त होत असतो.

अहिंसा म्हटले की \"अहिंसेचे पूजारी\" गांधीजी यांची आठवण होतेचं !गांधीजी म्हणत, \"सत्यापेक्षा श्रेष्ठ धर्म नाही व अहिंसेपेक्षा मोठे कर्तव्य नाही. अहिंसा हे एक महाव्रत असते. ते तलवारीच्या धारेवर चालण्यापेक्षाही खूप कठीण असते.\"
अहिंसेचे 100% पालन करणे शक्यच नाही. असेही त्यांचे मत होते.

देवादिकांच्या काळापासून ते आतापर्यंतच्या काळापर्यंत पाहिले तर ,
सर्वांत जास्त हिंसा कुठे होते तर ती युद्धात .
युद्ध का होत असतात?
आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी, आपले वर्चस्व वाढविण्यासाठी ..
आपला इतिहास पाहिला तर , भारतात अनेक महासत्ता, राजघराणे,साम्राज्य होऊन गेली. प्रत्येकाने आपले साम्राज्य वाढविण्यासाठी इतर राज्यांवर आक्रमण केले. त्यासाठी त्यांनी साम,दाम,दंड,भेद सर्व प्रकारांचा अवलंब केला.

भारतासारख्या बलाढ्य देशात परकीय सत्ता साम्राज्यविस्तारासाठी आल्या तेव्हा त्यांनीही हिंसेनेच राज्यविस्तार केला.

पण आपल्या स्वतःच्या राज्यासाठी , दुसऱ्या राज्यांशी किंवा आपल्या देशासाठी परकीय सत्तांसाठी जे लढले ते हिंसक होते . असे म्हणता येणार नाही.

महाराणा प्रताप यांना अकबराला मारण्याची अनेकदा संधी मिळत होती. पण कधी तो बेशुद्धावस्थेत होता, कधी नमाज पडत होता, तर कधी निःशस्त्र होता. त्यामुळे महाराणा प्रतापांनी त्याला तेव्हा न मारता आपल्या धर्माचे ,आपल्या संस्कृतीचे पालन केले. पण जेव्हा जेव्हा युद्धात अकबर समोर आला तेव्हा तेव्हा आपली तळपती तलवार चालवून खऱ्या योद्ध्याचे दर्शन दिले.

जेव्हा मूठभर इंग्रज भारतात आले तेव्हा भारतासारख्या मोठ्या देशावर 150 वर्षे राज्य केले. कारण \"गद्दारी\" ,\"फितुरी\" हा भारताला मिळालेला शाप त्यांनी ओळखला होता. त्यामुळे \"फोडा व झोडा \" हे तंत्र वापरून त्यांनी भारतातील लोकांनाच भारताविरुद्ध लढवले.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज,
महाराणा प्रताप,राणी लक्ष्मीबाई, अशा अनेक शूर वीरांना स्मरून भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, मंगल पांडे ,नेताजी सुभाषचंद्र बोस अशी अनेक क्रांतिकारी इंग्रजांविरूद्ध लढले. टिळकांचे, सावरकरांचे लेखणी हेचं इतके प्रभावी शस्त्र होते की , लोक इंग्रजांविरूद्ध लढण्यास तयार होत होते.

जर भारतीयांमध्ये एकजूट असती, सर्वांनी एकत्रितपणे इंग्रजांशी मुकाबला केला असता तर .... कदाचित भारत स्वतंत्र होण्यास एवढी वर्षे लागली नसती.


आज भारत स्वतंत्र होऊन 75 वर्षे पूर्ण झाली. आपण स्वातंत्र्याचा आनंद साजरा करत आहोत , पण ज्यांनी देशासाठी आपले जीवन खर्च केले त्या वीरांचा इतिहास लक्षात ठेवला पाहिजे.

भारत अगोदरपासूनच शांतता, प्रेम ,बंधुता या मार्गावर चालणारा, विश्वशांतीची प्रार्थना करणारा देश आहे. पण जेव्हाही आपल्या देशावर परकियांचे आक्रमक होते ,तेव्हा त्यांना तोंड देण्यास भारत सज्ज असतो. सर्जिकल स्ट्राइक हे त्याचेच एक उदाहरण!

आपला घरी कोणी पाहूणा व मित्र म्हणून आला तर आपण त्याचे स्वागत करतो,पाहूणचार करतो, भेटवस्तू देतो. ही आपली महान भारतीय संस्कृती !

पण जेव्हा कोणी आपल्या घरात येऊन आपल्याला नुकसान करत असेल ,आपल्याला त्रास देत असेल तर आपण अहिंसेचे तत्व सांभाळायचे की त्याला मारून आपले रक्षण करायचे ?

आपण भारतीय कधीही कोणाच्या मार्गात अडथळा आणत नाही पण कोणी आपल्या मार्गात अडथळे आणले तर त्यांना त्यांचा मार्ग दाखवतोच.
आपल्या देशाचे इतर अनेक देशांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यांना आपण वेळोवेळी मदतही करतो. पण आपल्याला त्रास देणाऱ्या देशांना, ज्यांना अनेकदा समजावूनही समजत नाही, अशा देशांना अहिंसेचा कितीही पाठ शिकवला तरी व्यर्थ! म्हणून त्यांना त्यांच्या भाषेतच उत्तर देणे म्हणजे खरे देशप्रेम!

आपल्या मुलांना अहिंसेचा अर्थ समजावून सांगताना, आपण अगोदर अहिंसा म्हणजे काय ? हे समजून घेतले तर ...
आणि आपल्या भावी पिढीला अहिंसेचा खरा अर्थ समजून सांगितला तर भारतात कधीही कोणतीही परकीय सत्ता पुन्हा राज्य करू शकणार नाही आणि त्यांच्या विरुद्ध लढण्यास भारत सक्षम होईल.