नोकरी अंतिम भाग

नोकरीसाठी धडपडणाऱ्या एकाची कथा


नोकरी भाग ४

मागील भागात आपण पाहिले की भारतात नोकरी मिळत नसलेला रोहित परदेशी जातो. इथे त्याचे आईवडील एकटे पडतात. तिथेच तो लग्न ठरवतो. या सगळ्याला त्याचे आईवडील कसे सामोरे जातात बघू या भागात..


" एवढी आनंदाची गोष्ट , तू अशी सुतक लागल्यासारखी का सांगते आहेस?"
" आता रोहित इथे येणारच नाही का?"
" ते मी कसे सांगू? पण आता तो बोलावतो आहे तर जाऊया तिकडे. बघू कसा राहतो आहे? ती मुलगी कशी आहे? आपला मुलगा सुखात असला म्हणजे झाले.."
" आणि आपण??" श्रीधररावांनी ऐकून न ऐकल्यासारखे केले.
शेवटी सुमतीबाईंनी लग्नाची तयारी सुरू केली. लग्न जरी परदेशात असले तरी मुलीसाठी साड्या, रोहितसाठी कपडे, मंगळसूत्र,जोडवी असे छोटेमोठे दागिने त्यांनी घेतलेच. तिथे अगदी साखरपुडा ,हळद असे विधी करून साग्रसंगीत लग्न लागले. लग्नानंतर रोहित आणि मधुने या दोघांना आणि तिच्या आईवडिलांना आजूबाजूची ठिकाणे फिरवून आणली. नाही म्हटले तरी रोहितचे मोठे घर , त्याच्या गाड्या बघून सुमतीबाई खुश झाल्या होत्या. त्याच भरात रोहित एकटा असताना त्यांनी त्याला विचारले.
" रोहित, आता तू भारतात कधी येशील रे?"
" दिवाळीत यायचा प्रयत्न करीन.."
" नक्की? हे सगळे सोडून तुला सोडतील?"
"आई, मी जास्तीत जास्त महिन्याभरासाठी येऊ शकेन. त्यापेक्षा जास्त नाही जमणार."
" म्हणजे आम्ही दोघांनीच रहायचे तिथे?"
" मी तेच सांगणार होतो तुम्हाला. मी इथे सेटल होतोच आहे. बाबा रिटायर्ड झाल्यावर तुम्ही दोघे इथेच या ना रहायला." सुमतीबाई ऐकतच राहिल्या. सुरूवातीचे काही दिवस जरी त्यांचे तिथे छान गेले तरी आता त्यांना तिथे करमत नव्हते. हे दोघे कामाला गेल्यावर त्या आणि श्रीधरराव दोघेच घरात. आजूबाजूला कोणाशी बोलायचे नाही. काही नाही. फक्त शांतता. त्यापेक्षा तिथे रोज येणारी कामवाली होती, आजूबाजूला मैत्रिणी होत्या, नातेवाईक होते. मुलाचा मोह असला तरी इथे जीव करमत नव्हता. शेवटी त्यांनी भारतात परत जायचा निर्णय घेतला. इथे पुन्हा न येण्याचा निश्चय करूनच..
दिवस जात होते. रोहित आणि मधु आईबाबा झाले. ते अधूनमधून भारतात येत जात होते. त्यांनी कितीही आग्रह केला तरी सुमतीबाई तिथे जायला तयार नव्हत्या. श्रीधरराव तर ठेविले अनंते तैसेचि रहावे या मनोवृत्तीचे होते. ते पण रिटायर्ड झाले होते. समवयस्क मित्रांसोबत त्यांचे काही ना काही उपक्रम सुरूच असायचे. नाही म्हणूनसुद्धा रोहित महिन्याला काही रक्कम बँकेत जमा करायचाच. आता पैशाची काहीच कमी नव्हती, कमी होती ती माणसांची. सुमतीबाई कुढत होत्या. काही चुकीच्या निर्णयामुळे त्या एकट्या पडल्या होत्या. नेहमीप्रमाणे जॉगिंगला म्हणून निघालेले श्रीधरराव दरवाजातच छातीत कळ येऊन पडले. आजूबाजूच्या लोकांनी धावपळ करून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले. पण काहीच फायदा झाला नाही. सगळेच संपले होते. रोहितच्या मित्रांनी त्याला कळवले. कितीही प्रयत्न केला तरी त्याला दोन दिवसात तिथे येणे शक्य नव्हते. शेवटी जवळच्या नातेवाईकांनी आणि मित्र परिवाराने मिळून त्यांचे अंत्यसंस्कार केले. या सगळ्याने सुमतीबाई जास्तच दुखावल्या गेल्या. त्यात "एकुलता एक मुलगा असून काय फायदा?" अशी कानावर येणारी कुजबूज. याचा स्फोट रोहित आल्यावर झाला. त्याला बघितल्या बघितल्याच त्यांना राग अनावर झाला.
" हेच होते तुझे तुझ्या वडिलांवर असलेले प्रेम? त्यांनी प्रत्येक वेळेस तुला पाठिशी घातले, हवे नको ते पाहिले आणि तू? जिवंतपणी तर सोड मेल्यानंतर सुद्धा तुला त्यांच्यासाठी वेळ नव्हता? माणसांपेक्षा काम महत्वाचे?" रोहितने शांतपणे सगळे ऐकून घेतले. त्या गप्प बसल्यावर त्याने सुरुवात केली.
" आई, तुला खरेच वाटते, मी दोषी आहे म्हणून? मी इथे नोकरी शोधत होतो तेव्हा तूच मला बोलायचीस ना? मला परदेशीही जायचे नव्हते पण रोज नोकरीवरून ऐकायचा मला कंटाळा आला होता. मी काय करणार होतो दुसरे?"
" तेव्हा मी म्हणाले म्हणून गेलास. आता मी सांगते म्हणून येशील परत?"
" कसे शक्य आहे ते आई? इथे मला त्याच पगाराची नोकरी मिळेल याची काय खात्री? जरी मिळाली तरी मुले तिथे शिकत आहेत , त्यांचे तिथे वेगळे जग झाले आहे ते इथे परत यायला तयार होणार नाहीत. त्यामुळे सध्या तरी तू ती अपेक्षा सोडूनच दे. उलट मी तर म्हणेन इथे एकटी राहण्यापेक्षा तूच चल तिथे. म्हणजे मलाही कसले टेन्शन नाही." रोहित फ्रेश व्हायला आत निघून गेला. सुमतीबाई विचार करत बसल्या , कोणता पर्याय निवडायचा, इथे एकलकोंडे जगायचे की तिथे?



अनेकदा मुले आईवडिलांना सोडून परदेशी जातात, त्यांना विसरतात अशा कथा ऐकू येतात. त्याची दुसरी बाजूही असू शकते. ती मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न होता. कसा वाटला ते सांगायला विसरू नका..


सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all