नोकरी भाग २

नोकरीसाठी धडपडणाऱ्या एकाची कथा


नोकरी भाग २


मागील भागात आपण पाहिले की रोहीतला मनाजोगती नोकरी मिळत नाही म्हणून त्याची आई त्याच्यावर वैतागलेली असते. आता पाहू पुढे काय होते ते..


" बघितलं कसा वागतो ते? आत्ताच आला ना बाहेरून? मग लगेच बाहेर पडायची काय गरज होती? सुमतीबाई म्हणाल्या.
" काय करणार तो बिचारा तरी? अग जरातरी दया कर त्याच्यावर. तो करतोच आहे ना मेहनत? मग का त्याला असं लागट बोलतेस? दुरावेल ग अशाने तो."
" काय करू मग? मला नाही वाईट वाटत? त्याच्या बरोबरीच्या सगळ्यांना नोकऱ्या लागल्या. काहीजणांची लग्न झाली, मुलेही होतील आता त्यांना. आणि आम्ही अजून नोकरीच शोधतो आहे. कोणत्याही कार्यक्रमाला गेले, अगदी किटी पार्टीला जरी गेले तरी तिथेही एकच प्रश्न ,रोहीत काय करतो? तुम्हाला काय माहित, नातेवाईक असो की मित्रपरिवार. प्रत्येकालाच आपली मुले कशी चांगली कामाला आहेत, त्यांचे कसे छान सुरू आहे, हे मलाच सांगायची चढाओढ लागलेली असते. जीव नको नको होतो."
" म्हणून तू आमचा जीव नकोनको करतेस? अग थोडावेळ दे त्याला. बघेल काहीतरी तो.. आणि अगदीच काही नाही झाले तर मी करीन त्याच्यासाठी काहीतरी खटपट. पण तू येताजाता त्याला काही बोलू नकोस."
" बरं.. तो दिसला ना की तोंड मिटून घेते. मग तर झाले."

वैतागलेला रोहित टेरेसवर जाऊन बसला. समोर समुद्राकडे बघून डोकं शांत करायचा प्रयत्न करत होता. त्यालाही कामाची गरज होतीच. रोजच्या खर्चासाठी आईबाबांकडे पैसे मागणे त्याच्या जीवावर येत होते. ना नोकरी ना छोकरी. आयुष्य म्हणजे सकाळी उठा, नोकरीच्या जाहिराती बघा, धावपळ करत इंटरव्ह्यू द्या आणि परत या.. कधी पगार अगदीच कमी तर कधी वशिल्याची कामे. त्याचाच जीव कातावून गेला होता. आजकाल तर समोरच्या समुद्रात जाऊन त्यात सामावले जावेसे वाटायला लागले होते त्याला. पण बाबांचा चेहरा समोर आले की तो स्वतःला आवरायचा. आईचा त्रागाही त्याला समजत होता. तरिही हे सगळेच नकोसे वाटत होते त्याला. किती वेळ तरी तो असाच बसून होता..
" ए रोहित, काय करतो आहेस इथे बसून?" सम्यकने विचारले.
" काय करणार? उद्याची चिंता.." खोटे हसत रोहित म्हणाला.
" नाही झाले अजून तुझ्या कामाचे काही?"
" झाले असते तर माझ्या आईने सगळीकडे पेढे वाटले असते."
" राग येणार नसेल तर एक सुचवू?"
" बोल रे.. गरजवंताला लाज, राग, लोभ काहीच नसते."
" तुझे जे फिल्ड आहे ना, त्याला सध्यातरी आपल्याकडे डिमांड नाही. तेच जर तू परदेशी गेलास तर सॉलिड स्कोप आहे. तू तिथे का नाही प्रयत्न करत?"
" मी परदेशात जायचा कधी विचारच केला नाही रे. आईबाबांना सोडून कधी बाहेरगावी राहिलो नाही. तर परदेश सोडूनच दे."
" बघ. विचार कर. माझ्या कंपनीची एक ब्रांच परदेशात आहे. तुला हवे असेल तर मी तुझ्यासाठी प्रयत्न करू शकतो. मला वाटते तुला मिळू शकतो तो जॉब. पॅकेज पण मजबूत आहे. सांग मला. मी निघतो आता. खालून येतानाच तू दिसलास म्हणून बोलायला आलो. कळव मला. बाय.."
" सम्यक, तू दे मला डिटेल्स. करतो मी तिथे पण प्रयत्न. झाले तर झाले काम." रोहित समुद्राकडे बघत बोलला.
सम्यक तिथून गेल्यावर रोहितही उठला. सम्यकच्या कंपनीचे नाव त्याला माहीत होते. त्याने सर्च करायला सुरूवात केली. काम खरंच त्याच्या फिल्डमधले होते. त्यालाही ते करायला आवडले असते. काही दिवसातच सम्यकने त्याला सगळ्या डिटेल्स दिल्या. यावेळेस रोहित मुद्दाम घरी न सांगताच मुलाखतीला गेला. आणि चक्क त्याची निवड झाली. रोहितचा आनंद गगनात मावत नव्हता. मिठाई घेऊन तो घरी आला..
" आई, बाबा.. शेवटी मला नोकरी मिळाली.."


श्रीधरराव आणि सुमतीबाई देतील रोहितला परदेशी जाण्याची परवानगी ? बघू पुढील भागात.. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा..

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all