नोकरी- यशाचा मार्ग

बाकी शेवटी व्यवसाय जरी समाजसेवेचा मार्ग असला तरी त्या मार्गाला अडथळे-विरहित करण्याचं काम हे नोकरदार वर्गच करत असतो....


विषय - नोकरी- यशाचा मार्ग.

स्पर्धा - राज्यस्तरीय करंडक वादविवाद स्पर्धा.

विभाग - ठाणे जिल्हा संघ.

नमस्कार....

वादविवादचा हा खेळ खरंच खूप छान रंगला. दोन्हीही
संघांनी आपापल्या परीने उत्तम निष्कर्ष मांडले.... त्यामुळे सर्वात आधी दोन्ही संघांच्या सदस्यांचे मनापासून अभिनंदन...
छत्रपती संभाजीनगर संघाने मागच्या लेखात खूप छान मुद्दे मांडले... पण स्पर्धा वादविवादची आहे त्यामुळे आमचा मुद्दा आम्हाला ठामपणे मांडावाच लागेल. मी जास्त काही मुद्दे मांडणार नाही पण मागच्या लेखात संभाजीनगर संघाने जे काही निकष मांडले होते त्यांच्या त्या निकषांवर थोडासा प्रकाश टाकेन....

सुरुवातीला संभाजीनगर संघाने दिलेल्या काही पॉईंट्स बद्दल मी बोलते... चला तर मग सुरवात ही शेवटपासूनच करूयात....

सोडा नोकरीचा नाद,
अन भाऊ उतरा धंद्यात!

आता ह्या दोन ओळी!
खरं तर मला कळलं नाही की त्यांनी या ओळी का लिहिल्या... जर जगात प्रत्येकाने नोकरीचा नाद सोडून "धंद्यात" उतरायचं ठरवलं तर कठीणच होऊन बसेल नाही का??

एक उदाहरण देऊ इच्छिते, मानवी शरीरात सगळ्यात महत्वाची गोष्ट, गोष्ट म्हणण्यापेक्षा मानवी शरीराचा महत्वाचा भाग म्हणजे माणसाचा पाठीचा कणा म्हणजे बॅकबोन.. आता बॅक बोन ची खासियत काय आहे तें आपल्या सगळ्यांनाच माहित आहे हो ना... एखाद्या व्यक्तीचा बॅक बोन जर व्यवस्थित काम करत नसेल तर ती व्यक्ती मुश्किलीने दैनंदिन जीवनातील कामं करण्यास समर्थ असते... तसंच व्यावसायिक जीवनामध्ये देखील आहे. व्यावसाय जरी एका व्यक्तीने त्याच्या बुद्धिमत्तेने सुरु केलं असेल तरीही त्या व्यवसायाचा एक भक्कम कणा म्हणजे नोकरदार वर्ग. नोकरदार वर्गाची साथ ही व्यवसाय सफल बनवण्यासाठी लागतेच.... बुद्धीला नेहमीच श्रमाची जोड ही लागते आणि हे फक्त शालेय अभ्यासातच नाही तर पौराणिक शास्त्रांमध्ये देखील सांगितले गेले आहे.
अजून एक उदाहरण देते, एखादी इमारत बनवायचे आहे तर त्यासाठी काय काय लागेल? पहिली गोष्ट तर इमारतीचा आराखडा, दुसरी गोष्ट पैसा, तिसरी गोष्ट इमारतीसाठी वापरले जाणारे मटेरियल आणि सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कामगारवर्ग किंवा श्रमिक वर्ग. जर कामगार नसतील तर इमारतीचा आराखडा पैसा आणि मटेरियल या तिघांची व्हॅल्यू झिरो आहे.

आता शेवटापासून सुरुवात करायची झालीच आहे तर संभाजीनगर संघाने एक मुद्दा मांडला आहे, आपण व्यवसाय सुरू करून इतरांना नोकऱ्या देऊ शकतो आणि त्यांच्यामध्ये नोकऱ्या देऊन आपण समाज सेवा करू शकतो... आता संभाजीनगर संघाला कोणते कन्फ्युजन आहे ते मला कळत नाहीये कारण एका ठिकाणी ते लिहितात की नोकरी सोडून धंदयात उतरा आणि एका ठिकाणी लिहितात की व्यवसाय करून नोकऱ्या द्या. आता प्रत्येकजण व्यवसाय करायला लागला तर नोकऱ्या कोणाला देणार???
जसा आमच्या संघाने पहिल्या लेखांमध्ये लिहिलं होतं कोणत्याही व्यवसायाचे बस्तान बसायला वेळ हा लागतोच आणि त्या व्यवसायाचा बॅकबोन म्हणजे कामगार वर्ग किंवा श्रमिक वर्ग जर शिस्तबद्ध पद्धतीने कार्यरत नसेल तर प्रत्येक व्यवसायाची घडी ही विस्कटते...

आता तिसरा मुद्दा....
संभाजीनगर संघाने टाटा, बिर्ला, अंबानी आणि मूर्ती अश्या बऱ्याच मोठ्या उद्योजकांची उदाहरणं दिली... त्यांच्या मते हे मोठमोठे उद्योजक देशाच्या अर्थव्यवस्थेत भर घालतात. मान्य आहे इतके मोठे उद्योजक तितका मोठा त्यांचा वाटा असतो अर्थव्यवस्थेत. आता टाटा बिर्ला अंबानी यांनी फॅक्ट्रीज सुरु करून सगळं काम एकट्याने तर केलं नाही ना?? इतका मोथा औद्योगिक पसारा वाढवण्यासाठी त्यांना भक्कम आधार मिळालं तो कामगारांचा. हे सर्व उद्योजक नेहमीच आपल्या भाषणांमध्ये आणि इंटरव्यू मध्ये म्हणतात, ते म्हणजे त्यांच्या व्यवसायाचा प्राईम ॲसेट किंवा बॅकबोन हा त्यांचा कामगार वर्ग आहे...

संभाजीनगर संघाने अजून एक मुद्दा मांडला आहे ते म्हणतात की काही व्यवसाय मूलभूत गरजांशी संलग्न आहे हे पण मान्य आहे आणि प्रत्येक व्यवसाय हा मूलभूत गरजांशीच संलग्न असतो असं माझं मत आहे. पण या व्यवसायांमध्ये देखील मजूर किंवा कामगार हे लागतातच..
उदाहरणार्थ. शेत जमीन जर छोटी असेल किंवा कमीप्रमाणात असेल तर शेतकरी आणि त्याचं कुटुंब एकत्र मिळून काम करू शकतं. पण तेच जर एखाद्या शेतकऱ्याची शेतजमीन मोठी असेल तर त्या शेतीचं काम वेळेत पूर्ण करण्यासाठी म्हणजे पेरणी पासून ते कापणी पर्यंत या कामांसाठी शेतमालक पगारी मजूर ठेवतो. याने दोन काम होतात एकतर शेतीची कामं वेळेवर पर्यायाने लवकर होतात आणि काम करणाऱ्या मजुरांच्या उत्पन्नाची गाडी पिढे सरकत राहते....

सांगण्याचा मुद्दा असा की कोणत्याही व्यवसायाची धुरा ही जितकी मालकाच्या खांद्यावर असते तितकीच किंबहुना त्यापेक्षा जास्त कामगारांच्या खांद्यांवर स्थिरावलेली असते.

संभाजीनगर संघाने एका पूर्वीच्या काळातील म्हणीचा उल्लेख केला आहे. उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी...
आता पूर्वीच्या काळी मोठमोठाले व्यवसाय नव्हते त्यामुळे कामगारांना दुय्यम स्थान दिले जात होते. आत्ताच्या धकाधकीच्या काळात, धकाधकीच्या म्हणण्यापेक्षा स्पर्धेच्या काळात, मी वर म्हणाले तसे मोठ्या किंवा छोट्या कोणत्याही प्रकारच्या व्यवसायाचा बॅकबोन हा कामगार वर्ग असतो. एखाद्या कंपनीच्या कामगार वर्गाने संप पुकारला तर ती कंपनी किंवा तो व्यवसाय पूर्णपणे ठप्प होऊ शकतो. त्यामुळे पूर्वीच्या काळी जरी नोकरीला कनिष्ठ मानलं जात होतं तरीही आत्ताच्या काळात नोकरी आणि नोकरदार हे नेहमीच वरच्या स्थानावर आहे.

अजून एक भारत देशाच्या सुरक्षेची धुरा ज्यांनी सांभाळली ते आपले भुदल, नौदल आणि वायूदलाचे सैनिक बंधू, तसेच अंतर्गत सुरक्षेची धुरा सांभाळणारे आपले पोलीस बंधू, राजकारणातील कार्यरत लोकं म्हणजे राष्ट्रपती पासून ते स्थानिक नगरसेवकांनपर्यंत, सर्वांनीच नोकरी सोडून जर व्यवसाय केलं तर काय होईल याचा विचारदेखील करणं म्हणजे एखाद्या नाईटमेअर सारखं आहे.

संभाजीनगर संघाने मांडलेले प्रत्येक मुद्द्यांना काही अंशी मी मान्य करते. छोटेखानी व्यवसाय हे उपयोगी पडतात. पुढे जाऊन त्यांचा ब्रँड सुद्धा होऊ शकतो. पण त्या ब्रँडला "ब्रँड" बनवण्यासाठी, पुढे नेण्यासाठी मनुष्यबळ हे गरजेचे असतेच.
एक उदाहरण देते काही वर्षांपूर्वी शिवसेना या राजकीय पक्षाने "शिव वडापाव" हा सामान्यांसाठी छोटेखानी व्यवसाय सुरू करण्याची संकल्पना मांडली. संकल्पना राजकीय स्तरावर राबवण्यासाठी त्यांना सगळ्यात महत्त्वाचा ॲसेट जो लागणार होता तो म्हणजे मनुष्यबळ.

विरुद्ध संघाने एका मुद्द्यात म्हटले आहे, एका व्यावसायिकाला तसे पाहता शिक्षणाचे बंधन नाही.
शिक्षण हे फक्त ए.बी.सी किंवा अ. ब. क. हे नसतं. प्रत्येक व्यवसायासाठी जो पाया रचला जातो त्या प्रत्येक गोष्टीला शिक्षणाची गरज असतेच... म्हणजे एखाद्या खाणावळ चालवणाऱ्यांना उत्तम जेवणाचे शिक्षण घ्यावं लागतं, घराला कलर करणाऱ्यांना कलर कोणत्या प्रकारे करतात त्याचं शिक्षण घ्यावं लागतं, झाडू, खराटे आणि चटया हे बनवताना जे काही मेन स्ट्रक्चर असतात त्याचं शिक्षण घ्यावं लागतं,अहो एवढंच काय तर साध्या एका गृहिणीला आदर्श गृहिणी म्हणवून घेण्यासाठी शिवणकाम, विणकाम, जेवण बनवणं, घर काम करणे याचे सुद्धा शिक्षण घ्यावं लागतं. त्यामुळे प्रत्येक व्यवसायाचा पाया हा शिक्षणानेच रचला जातो..

आता विरुद्ध संघाने मांडलेल्या पहिल्या मुद्द्याची उकल मी करू इच्छिते त्यांच्या मते एखादा शिकलेला मुलगा लोन घेऊन त्याचा व्यवसाय सुरू करू शकतो किंवा त्यामध्ये पर्याय उपलब्ध आहेत. अहो पण शिक्षण जरी घेतलं असलं तरी सर्वात पहिले लोन घेताना त्या व्यक्तीचा बॅकग्राऊंड आणि मिनिमम इन्कम पाहिली जाते. जर एखादी व्यक्तीचा दर्जा दारिद्र्यरेषेखालील असेल तर त्याला कोणत्या प्रकारे लोन भेटू शकतो?

त्यांनी पुन्हा एकदा कोरोना काळाचा मुद्दा मांडला, कोरोना काळात जे काही व्यवसाय सुरू झाले आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स, स्वछता उत्पादने, सॅनिटायझर, मास्क बनवणे इत्यादी व्यवसायिकांना प्रॉफिट झाला. पण नीट विचार केलं तर कळेल की या वस्तूंचे मॅन्युफॅक्चरिंग करणारे व्यावसायिक यांना देखील या सगळ्या वस्तूंचा मॅन्युफॅक्चरिंग करताना मॅन पॉवरची गरज भासली होतीच. वस्तू बनवण्यापासून ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यापर्यंत जी काही कामं झाली ते व्यवसायिकांनी नाही, तर ती कामं कामगारांनी केली.

जसं मागच्या लेखामध्ये सांगितल्याप्रमाणे लॉकडाऊन मध्ये जे काही उद्योगधंदे चालू झाले त्यामुळे अर्थव्यवस्थेला तडा गेला त्याचा परिणाम म्हणजे आत्ताची वाढलेली महागाई... ज्या काही होम बेकर्सनी केक्स किंवा इतर बेकरी प्रॉडक्ट्स लॉकडाउनच्या काळात विकले ते टॅक्स पे न करता विकले गेले आहेत....

आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संभाजीनगर संघाने मांडलेला भ्रष्टाचाराचा मुद्दा. त्यांच्या मते नोकरी ही गुणवत्तेने नाही तर वशिला पैसे किंवा आरक्षणाच्या मार्गाने मिळते. तसेच त्यांनी असेही विधान केले आहे की टेबलाखालून पैसा देऊन सरकारी नोकरी मिळते. त्यामुळे तोच पैसा नोकरीसाठी नं देता व्यवसायात ओतून राजा होणे उत्तम...
हे पण मी काही अंशी मान्य करते की काही ठिकाणी वशिला देऊन किंवा घूस देऊन नोकरी मिळवली जाते. पण प्रत्येक ठिकाणी हा प्रकार घडत नाही. आणि सहजासहजी मिळतील अश्या नोकऱ्या या कुठे आहेत आता? अहो स्पर्धा इतकी वाढली आहे की पहिलीतली मुलं सुद्धा पहिल्या नंबर साठी रात्र रात्रभर जागून अभ्यास करून मार्क मिळवतात. कारण आताच्या पिढी मध्ये तितके अंबिशन्स आणि पोटेन्शिअल आहेत.
आता राहिली गोष्ट लाच देऊन किंवा वशिला लावून नोकऱ्या मिळवणे तर एखाद्या मोठ्या हॉस्पिटल्स मध्ये जें काही डॉक्टर्स काम करतात ते त्यांना त्यांच्या पोटेन्शीयल, हुशारी आणि हार्ड वर्क पाहून काम दिलं जात. तसेच शाळांमध्ये, मग ती शाळा छोटी असो वा मोठी त्या प्रत्येक शाळेचे शिक्षक आणि शिक्षिका हे त्यांच्या हुशारी, चिकाटी आणि उत्तम शिक्षण यामुळे काम दिलं जातं... पोलीस भरती आणि सैन्य भरती साठी त्या व्यक्तीची ताकत, एलीजीबिलीटी, पर्सनॅलिटी, आत्मविश्वास आणि महत्वाचं म्हणजे योग्य शिक्षण या आधारावर नोकरी दिली जाते. आता तुम्ही या सगळ्या नोकऱ्यांना भ्रष्टाचारशी जोडल्या तर कल्याण आहे.....

बाकी भ्रष्टाचार विषयी बोलायचं झालं तर सगळ्यात जास्त भ्रष्टाचारच्या चिखलात कोणाचे पाय घट्ट रोवले गेले असतील तर ते म्हणजे व्यवसायिकांचे... कोणत्याही व्यवसायाचा पाया रचताना दहा विटांमधील एक वीट ही भ्रष्टाचारची असते...
मी असं नाही म्हणतं की प्रत्येक बिजनेस हा भ्रष्टाचारानेचं वर जातो, पण शंभर टक्क्यामध्ये दहा टक्के भ्रष्टाचार हा वेगवेगळ्या स्टेज वर होतोचं...

उदाहरणार्थ कॅन्स्ट्रक्शन फिल्ड मध्ये बिल्डर बिल्डिंग बांधण्यासाठी डॉक्युमेंट्स ची फेरफार, मटेरियल मध्ये भेसळ किंवा बिल्डिंग च्या मजल्याची परमिशन साठी केलेली हेराफेरी हा प्रकार सर्रास चालतो...

भ्रष्टाचार प्रत्येक ठिकाणी आहे. मंदिराच्या लाईन पासून ते राष्ट्रपतीच्या गादीपर्यंत...
बाकी सांगण्याचा मुद्दा रादर स्पष्ट करण्याचा मुद्दा हा की नोकरी पेक्षा बिजनेस वर्ल्ड मध्ये भ्रष्टाचारची पाळंमुळं घट्ट रोवली आहेत...

बाकी शेवटी व्यवसाय जरी समाजसेवेचा मार्ग असला तरी त्या मार्गाला अडथळे-विरहित करण्याचं काम हे नोकरदार वर्गच करत असतो....

धन्यवाद ???....


विषय - नोकरी- यशाचा मार्ग.

स्पर्धा - राज्यस्तरीय करंडक वादविवाद स्पर्धा.

विभाग - ठाणे जिल्हा संघ.