Feb 22, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

नोकरी की गुलामगिरी?

Read Later
नोकरी की गुलामगिरी?

"ए अरे गौरी कशी नाही आली अजून ? वेळेची किती पक्की आहे ती ? पण आज का उशीर केला असेल हिने ?" राहूल काळजीने म्हणाला.


"हो ना,आज सरांचा मुलगा श्रेयस सर आपला नवीन बॉस म्हणून जॉइन होणार आहे ऑफीसमध्ये. त्यात हिने आज पहिल्यांदा उशीर केलाय. सरांनी काल सांगितले होते ना, श्रेयस सर वेळेचे किती पक्के आहे ते. तरीही गौरीने उशीर का केला असेल ?" रियाही राहूलसमोर आपल्या मनातील भावना व्यक्त करत होती.


थोड्या वेळानंतर "श्रेयस सर आले." म्हणत एक एम्प्लॉई आत आला. सगळ्यांना गौरीची काळजी वाटत होती. श्रेयस थेट आपल्या वडिलांच्या केबिनमध्ये गेला. 


"अरे नेहमीप्रमाणेच अगदी वेळेवर आलास. चल तुला आपल्या स्टाफची ओळख करुन देतो. आपला स्टाफही अगदी तुझ्यासारखाच आहे अगदी वेळेचा पक्का. त्यातल्या त्यात गौरी." असे म्हणून सर बाहेर आले. सरांना पाहून सर्वजण उभे राहिले.गौरीची खुर्ची रिकामी होती आणि गौरीही कुठे दिसत नव्हती.


सर रियाजवळ जाऊन म्हणाले, "गौरी कुठेय?"


"सर, ती अजून आली नाही." रिया घाबरून म्हणाली.


"व्हॉट?" म्हणून सर थोडेसे रागाने परत फिरले.


"डॅड गौरी कुठेय?" श्रेयस म्हणाला.


"कोण गौरी?" श्रेयसने गौरीच्या बाबतीत काहीतरी चुकीचा निर्णय घेऊ नये म्हणून सर पटकन म्हणाले.


"तीच जी आपली एम्प्लॉई आहे. जी वेळेची खूप पक्की आहे म्हणून तुम्ही आता कौतुक करत होतात. कुठेय ती ?" श्रेयस पुन्हा म्हणाला.


"ती ना, ती आज आली नाही रे अजून. अशी कधी करत नाही ती. पण काय माहित ? आज तू येणार आहेस हे सांगूनही ती अशी का वागली ते ?" सर श्रेयसला म्हणाले.


"हेच चुकतं डॅड तुमचं, तुम्हाला नाही माहित या जगात सरळ वाटणारी माणसंच जास्त फसवतात." श्रेयस चिडून म्हणाला. 


श्रेयस सध्या अबोलीसोबत ब्रेकअप झाल्यामुळे खूप उदास होता म्हणून त्याला आता त्याचे मन दुखावेल असे बोलायला नको म्हणून सर गप्प बसले. पण मनात म्हणाले, कितीदा त्या अबोलीच्या नादी लागू नकोस असं आम्ही तुला सांगत होतो म्हणजे माणसे ओळखण्यात तू चुकतोस बेटा, आम्ही नाही.'


"त्या गौरीचा नंबर आहे का कोणाकडे ? पटकन फोन करुन बोलवून घ्या तिला नाहीतर नोकरीचे रेजिग्नेशन लेटर तयार आहे म्हणून सांगा." श्रेयस रागाने म्हणाला.


रियाने ताबडतोब गौरीला फोन करून घडलेली सर्व हकीकत सांगितली. गौरी ऑफिसमध्ये पोहोचली ती थेट श्रेयसच्या केबीनमध्ये गेली आणि त्याला म्हणाली, "अहो आहात तुम्ही बॉस म्हणून असं वागायचं का ? समोरच्याला व्यक्त व्हायची संधीही नाही देणार का तुम्ही ? गुलाम आहोत का आम्ही तुमचे." गौरीला रडू कोसळले.


"गौरी शांत हो." सर गौरीजवळ जाऊन म्हणाले.


पटकन श्रेयसने तिच्यासमोर पाण्याचा ग्लास पकडला. "आय ॲम सॉरी! मी चुकलो." म्हणून श्रेयसने कानाला हात लावला. सगळेजण आश्चर्याने पाहत होते. सरांनाही आश्चर्य वाटले हा सगळा प्रकार पाहून. सर म्हणाले,"तू गौरीला ओळखतोस का?" 


"त्या माणूकीचे मुर्तीमंत उदाहरण आहेत. आज ऑफिसमधून येताना मी पाहिले रस्त्यावर खूप भयानक ऍक्सिडेंट झालेला. जो तो बघ्याची भूमिका घेत होता. मी मदतीसाठी तिथे पोहोचल्यावर दिसले की, यांनी ॲम्बुलन्स बोलावून घेतली होती. इतकेच नाही तर या स्वतः त्या जखमी महिला व्यक्तींसोबत हॉस्पिटलमध्ये जात होत्या. तिथे उभारलेल्या लोकांनी यांना झाशीची राणी म्हणून संबोधले. म्हणून यांचा चेहरा माझ्या मनात घर करुन गेला. त्यांनी मला ओळखले नसेल पण मी त्यांना ओळखले." म्हणून श्रेयसने रेजिग्नेशन लेटर फाडून टाकले.


"सॉरी सर, पण मी तुम्हांला नाही माफ करू शकत. आपला समाज कितीही प्रगत झाला ना तरी बॉसचा एम्प्लॉई हा गुलाम असतो ही चौकट कधीच नष्ट होणार नाही का ? आज योगायोगाने तो प्रसंग तुम्ही स्वतःच्या डोळ्याने पाहिला म्हणून हे रेजिग्नेशन लेटर फाडून टाकलेत. पण प्रत्येक एम्प्लॉईच्या वाटेला आलेला प्रसंग आणि त्यामुळे झालेला उशीर तुम्हाला नाही पाहता येणार ना ? म्हणून एक कळकळीची विनंती करते तुम्हाला, एम्प्लॉईला अगदी गुलामाच्या चौकटीत नका बसवू आणि इतका टोकाचा निर्णय नका घेऊ. एम्प्लॉई हा ही माणूस आहे. कधीकधी तो ही चुकतो म्हणून लगेच त्याच्याशी इतके क्रूर नका वागू. तो एम्प्लॉई गरज असते म्हणूनच नोकरी करत असतो. त्याचे कुटुंबीय त्याच्या कमाईवर जगत असतात. तुमच्या अशा अविचारीपणाने घेतलेल्या निर्णयाने त्यांच्या कुटुंबावर काय परिस्थिती ओढावेल ? हे तुम्हाला नाही समजायचे. पण आता मला इथे जॉब नाही करायचा." गौरी परखडपणे म्हणाली.


श्रेयसला चुकीची जाणीव झाली. 'अबोलीमुळे मी सगळ्याच व्यक्तींना एकाच चौकटीत बंदिस्त करतोय.' हा विचार करून श्रेयस आपल्या वडिलांजवळ गेला आणि म्हणाला, " डॅड मी खरंच चुकलो आणि त्यासाठी मी अजूनही माफी मागायला तयार आहे. पण प्लीज, गौरी इथून गेल्यावर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही.तुम्ही काहीतरी करा आणि तिला थांबवा.यापुढे मी सारासार विचार करून निर्णय घेईन." हे सर्व बोलताना श्रेयसच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. त्याला आपल्या चुकीचा पश्चाताप होत होता याची जाणीव सरांना झाली. म्हणून सर गौरीसमोर जाऊन हात जोडून उभे राहिले.


"सर हे काय करताय तुम्ही? तुम्ही खूप चांगले आहात सर. मी तुमचा आदर करते." गौरी म्हणाली.


"आदर करतेस ना माझा ? मग माझ्या लेकाची ही शेवटची चूक म्हणून त्याला माफ कर. माझ्यासाठी." सर म्हणाले.


गौरीने होकारार्थी मान हालवली. खरंच आज बॉससमोर एम्प्लॉई हे गुलाम ही चौकट दूर झाली. चौकटीबाहेर पडल्यानंतर खऱ्या अर्थाने विकास होतो. हे नक्की.


सौ. प्राजक्ता पाटील.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//