Jan 19, 2022
नारीवादी

नोकरी करणाऱ्या स्त्रीची व्यथा

Read Later
नोकरी करणाऱ्या स्त्रीची व्यथा

   गौरी कोमलची वाट बघत कॅफे मध्ये बसलेली होती. गौरी व कोमल दोघी शाळेतील मैत्रिणी, आज खुप दिवसांनी त्या भेटणार होत्या.अर्ध्या तासाने कोमल कॅफेमध्ये पोहोचली.

कोमल--- सॉरी गौरी मला यायला जरा उशीरच झाला.

गौरी--- कोमल जरा! अगं अर्धा तास उशीर झाला आहे, मी बसने आले तरी वेळेत पोहोचले आणि तु स्वतःच्या बाईकने आली तरी उशिरा आली.

कोमल--- अगं काय करू, नेमकी आजच कामवाल्या बाईने सुट्टी घेतली, घरातील कामे आवरता आवरता उशीर झाला. ते सोड आता, तु कशी आहेस? आपण किती वर्षांनी भेटतोय.

गौरी--- तब्बल पाच वर्षांनी भेटतोय, तुम्हाला कधी तुमच्या कामातून वेळ भेटतो का? कधीही भेटायचे ठरवले तर नेहमी तुझं एकच रडगाणं चालू असायच, मला सुट्टी नाहीये. 

कोमल--- गौरी किती टोमणे मारणार आहेस, अगं मला खरच वेळ नसायचा, आजपण मी कसा वेळ काढलाय हे मलाच माहीत.

गौरी--- आजतर सुट्टी आहे ना.

कोमल--- सुट्टी फक्त बँकेला आहे घरातील कामांना नाही. तुझं काय चाललंय?

गौरी--- माझं काय चालणार घर आणि घरातील कामे, लग्न झाल्यापासून हेच चालू आहे, स्वयंपाक करा, भांडी घासा, कपडे धुवा. तुझ्या सारख्या नोकरी करणाऱ्या स्त्रियांची मज्जा असते. नोकरीच्या निमित्ताने तुम्हाला घराबाहेर पडता येत,नोकरीच्या ठिकाणी छान छान कपडे घालून मिरवता येत, घरातील कामांना बाई लावता येते.

कोमल--- नोकरी करणारी स्त्री म्हणजे तुम्हाला एवढंच दिसतं का? नोकरी करताना त्या स्त्रीची किती ओढाताण होते ते समजतं का? घरात सर्वच कामांना बाई लावता येते का? हा विचार कधी तुम्ही लोक करतात का?

गौरी--- एवढीच ओढाताण होत असेल तर कशाला नोकरी करायची? तुझ्या नवऱ्याला बक्कळ पगाराची नोकरी आहेच ना मग तुला नोकरी करण्याची गरजच काय?

कोमल--- किती साधं सरळ टिपिकल उत्तर दिलंस. गौरी मी नोकरी फक्त पैसे मिळावे म्हणून नाही करत, नवरा कमावतो म्हटल्यावर बायकोने नोकरी करूच नये असं काही आहे का? मी नोकरी केली नाहीतर मी घेतलेल्या शिक्षणाचा काय उपयोग होईल? 

गौरी--- कोमल राग येऊ देऊ नको, तु ओढाताण होते अस बोलली म्हणून मी त्यावर माझी प्रतिक्रिया दिली बाकी काही नाही.

कोमल--- माझ्या सासूबाईही असच बोलल्या होत्या म्हणून माझी चिडचिड झाली, तुझ्या बोलण्याचा राग नाही आला.

गौरी--- अस त्या का बोलल्या? 

कोमल--- तुला तर माहीतच आहे की मी लग्नाच्या आधीपासूनच बँकेत नोकरी करते, लग्न झाल्यावर उमेशने सांगितले की तुला नोकरी करण्याची इच्छा असेल तर तु नोकरी करू शकते माझा पूर्ण पाठिंबा आहे. मी माझी नोकरी सुरू ठेवली, सुरवातीला मला घरातील कामे नोकरी करून जमत होती त्यावेळी मी घरातील कामांना बाई लावली नाही पण कालांतराने माझे प्रमोशन झाले, माझ्यावरील कामांचा ताण वाढला म्हणून मी घरातील कामाला बाई लावली, माझ्या सासूबाईंना ते काही पटलं नव्हतं, त्यावरुन नेहमी त्या टोमणे मारायच्या. मी सासूबाईंच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचे. लग्नानंतर दीड वर्षांनी मला दिवस गेले त्यावेळीही सासूबाईंचा नोकरी सोडण्याचा आग्रह होता, मी त्यांच्या आग्रहाला बळी पडले नाही. डिलिव्हरी नंतर मी तीन महिने सुट्ट्या घेतल्या होत्या, त्यानंतर वीरला कोणी सांभाळायचे हा प्रश्न समोर उपस्थित झाला, सासूबाईंनी वीरला सांभाळण्यासाठी यायला नकार दिला, उमेशने खूप समजावलं पण त्या काही आल्या नाही शेवटी माझी आई माझ्यापासून तासाभराच्या अंतरावर राहते तिच्याकडे विरला ठेवण्याचा निर्णय घेतला. मी रोज सकाळी उठून माझं, वीरच आवरून, उमेशचा चहा नाश्ता करून, दोघांचा डबा करून वीरला आईकडे सोडवायला जायची आणि तिथून बँकेत जायची, उमेशला बाईच्या हातचा स्वयंपाक आवडत नसल्याने मला स्वयंपाकाला बाई लावता आली नाही. बँकेतून निघाल्यावर आईकडे जायचं तेथून वीरला घ्यायच आणि मग आपल्या घरी यायच, माझे दिवसातले तीन ते चार तास प्रवासातच जायचे. स्वतःची गाडी असली तरी ती ट्रॅफिक, ते प्रदूषण सगळं नको नको होऊन जातं,असा प्रवास जवळजवळ तीन वर्षे चालू होता. या दरम्यान मला खूप जणांनी नोकरी सोडण्याचा सल्ला दिला. वीर तीन वर्षांचा झाल्यावर तो शाळेत जाऊ लागला मग त्याला मी पाळणाघरात ठेवायला सुरुवात केली. आताही सकाळी माझी बँकेत जाण्याची घाई वेगळी असते तर दुसरीकडे वीरला खाऊ पिऊ घालून, त्याचा डबा करून त्याला शाळेत पाठवण्याची तयारी करावी लागते. सकाळी कितीही लवकर उठलं तरी घाई गडबड व्हायची ती होतेच. या सगळ्यात आमची आजारपणे मलाच काढावी लागतात. घरातील प्रत्येक कामाला बाई लावता येत नाही, घरात अशी अनेक कामे असतात ती स्वतःलाच करावी लागतात, हे सगळं करत असताना मला स्वतःला देण्यासाठी वेळच उरत नाही, माझ्यासारखी अनेक नोकरी करणाऱ्या स्त्रियांची हीच स्थिती आहे, मला एवढी कामे करावी लागतात किंवा काम करताना माझी तारांबळ उडते याबद्दल माझी काहीच तक्रार नाहीये उलट मला हे सगळं करायला आवडतं. तुमच्या सारख्या लोकांना नोकरी करणाऱ्या स्त्रीची मज्जा दिसते पण तिची व्यथा मात्र कोणालाच दिसत नाही.

©®Dr Supriya Dighe

 

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now