नोबेल प्राईझ

A Short Comedy Story Of Girl's Dream

नोबेल प्राईझ

"जेव्हापासून या पुरस्काराची घोषणा झाली आहे ना, जाम वैताग आलाय. लोकांनाही काही काम नसतं का? किती ते फोन करावेत आणि किती ते मॅसेजेस तरी करावेत. कोणा-कोणाला, कसा आणि कितीवेळा रिप्लाय द्यायचा. काही काही जण तर मुद्दाम बातमी खरी आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी दहा वेळा फोन करताय. आता मिळाला मला पुरस्कार.. मी काय करू? मी थोडी म्हटलं होतं की मला द्या. मिळाला आपोआप." वाजणाऱ्या मोबाईलकडे बघत मानसी मनातच चरफडत बोलली.

इतक्या वेळ सायलेंट मोड वर गुर्र गुर्र करणारा फोन शांत झाला होता. मानसीने जणू सुटकेचा निःश्वास टाकला. पण पुन्हा फोनचे गुर्रावणे सुरू झाले होते. मानसी अगदीच केविलवाण्या तोंडाने फोनकडे बघत होती. तेवढ्यात मानसीची आई तिथे आली.

"मनु, अगं , तुझा पुरस्कार घ्यायला आपण कुठे जातोय? " आई.

"स्वीडनला." मानसी.

"ते तर मला पण माहिती गं. पण त्या शहराचं नाव काय?" आई.

"बाई गं.. काय अवघड प्रश्न विचारलास तू? मला लक्षात नाही त्या शहराचं नाव. तू ते त्या विमानाच्या तिकिटावरच वाचून घे ना." मानसी.

"मला एवढे अवघड उच्चार जमले असते तर तुला विचारलं असतं का मी? एक काम कर नाही तर, मला त्या तिकिटाचा फोटो काढून दे, मी सगळ्यांना तो फोटो पाठवते. म्हणजे लोकांचा विश्वास तरी बसेल आपण खरंच जातोय यावर." आई.

"अगं, कितीजणांना फोटो पाठवशील? त्यापेक्षा व्हाट्सअप्प स्टेटस आणि फेसबुक स्टोरी ठेव ना. सगळ्यांनाच दिसेल. ज्याला हवं तो स्क्रिनशॉट काढून ठेवेल त्याचा." मानसी.

"ही आयडिया मस्त दिलीस बघ. आहे हो डोकं माझ्या पोरीला! उगाच नाही पुरस्कार मिळाला. बरं आज रात्रीच सगळी तयारी करून ठेव. उद्या प्रवासात घालायचा ड्रेस सुध्दा आजच घालून झोप. अगं, उद्या पहाटेचीच फ्लाईट आहे ना. मग उगीच उशीर झाला तर, विमान चुकेल ना आपलं." आई.

"आपण एक काम करायचं का? तसं पण दादू येणार आहे आपल्याला विमानतळावर सोडायला. तू, मी, बाबा आणि दादू आपण रात्रीच अलार्म लावून कार मध्ये बसून झोप काढू. अलार्म वाजला की लगेच निघाले विमानतळावर! उशीर व्हायचं कामच नाही." मानसी.

"हो गं. खरंच, असंच करूया. किती हुशार ती माझी पोर! बरं तू तयार हो लवकर, बाहेर ती एक पत्रकार बाई आलीये अन् तिच्यासोबत तो शूटिंगसाठी काळा मोठा दांडीवाला डब्बा घेऊन एक माणूस पण आहे." आई.

"शूटिंगसाठी काळा मोठा दांडीवाला डब्बा! बाप रे! मशीन गन! मला पुरस्कार मिळाला हो.. मी मागितला नाही.." मानसी.

"अगं, मशीन गन नाही. काय म्हणतात बघ त्याला?" आई आठवत होती.

"बॉम्बचा बॉक्स !" मानसी.

"नाही गं. काय पोरगी गं तू, एवढं ही नाही कळत तुला! काय म्हणतात बघ त्याला? " आई.

"छोटीशी तोफ आणली की काय? बहुतेक मला उडवूनच टाकायचा बेत दिसतोय!"मानसी.


"आठवलं.. हां.. व्हिडीओ कॅमेरा." आईच्या तोंडून कॅमेरा शब्द ऐकला आणि मानसीने जणू सुटकेचा निःश्वास टाकला. इच्छा नसतानाही मानसी इंटरव्ह्यू द्यायला समोर हॉलमध्ये गेली. साध्या फॉर्मल प्रश्ननांपासून सुरुवात करत शेवटी पत्रकारने तो प्रश्न विचारला जो मानसीला नको होता.

"मॅडम, काय सांगाल या कादंबरीबद्दल? कादंबरीचं नाव कसं सुचलं? आणि कादंबरी छापायची आयडिया तरी कशी सुचली?" पत्रकार.

"(माहिती नाही कसं सुचलं ते? आता तर भीतीच वाटते आपण उगीच लिहिलं. माझीच कादंबरी मी वाचल्यावर आता वाटतंय खरंच माझा सन्मान करताय की अजून काही.. मानसी मनातल्या मनात पुटपुटली) खरं सांगू का? आपण नंतर बोलायच का? मला उद्या सकाळीच निघायचं आहे आणि माझी बरीच तयारी बाकी आहे. मी माघारी आल्यावर आपण बोलू की निवांत." मानसी चाचपडत बोलली.

"हो, चालेल." म्हणून पत्रकार निघून गेली. ठरल्याप्रमाणे मानसी स्वीडनला जाण्यासाठी निघाली. सोबत आई बाबा ही होतेच. विमानात कॉफी आणि पाणी फुकट होते. मानसीच्या बाबांचं थोड्या थोड्या वेळानी दोन्ही गोष्ट घेणं सुरू होतं आणि सीट ते बाथरूम अशा फेऱ्याही सुरू होत्या. मानसीची आई मात्र खिडकीच्या बाहेर बघून दर पाच-दहा मिनिटांनी हात जोडत होती. मानसीने कारण विचारल्यावर त्यांनी उत्तर दिलं, "अगं, आपलं विमान बघ किती ढगातून जातय. आपण टी. व्ही. सीरिअल मध्ये नाही का बघत, देवदेवता आपल्या आपल्या वाहनांनी असच ढगातून फिरत असतात. बाजूनी एखादे देव त्यांच्या वाहनावर बसून गेले आणि आपल्याला दिसले नाही तर...! असं नको न व्हायला आपण एवढ्या जवळून दर्शन नाही घेतले. म्हणून मी आपली हात जोडून घेतेय." मानसीनेसुद्धा आईच ऐकून दोन-चार वेळा हात जोडून घेतले.

स्वीडन विमानतळावर विमान उतरायची घोषणा झाली आणि मानसीच्या पोटात एकदम गोळाच आला. "तिथल्या लोकांना इंग्लिश कळत असेल तर कसंह मोडकं तोडकं बोलून काम चालुन जाईल. पण सगळे स्वीडिश बोलत असतील तर... बोंबला." मानसी स्वतःशीच बडबडत होती. विमानतळावरच्या औपचारिक गोष्टी पूर्ण करून ती बाहेर आली. बाहेर पुरस्कार आयोजक समितीचा एक माणूस तिच्या नावाचा बोर्ड पकडून उभा दिसला. त्याच्यासोबत मानसी आणि तिचे आई बाबा गेले. समारंभ उत्तमरीत्या पार पडला. सगळे लोक तिच्याच कडे बघत होते. मिळालेला पुरस्कार कोणी परत काढून घेणार नाही ना या भीतीने मानसी पुढच्याच फ्लाईटने मुंबईला परत आली.


लगेज बेल्टवरून सामान घेऊन ती बाहेर आली. बाहेर पत्रकार, टी. व्ही. न्युज चॅनलवाले सगळे गर्दी करून उभे होते. मानसीला हेच नको होतं. पण आता नाईलाजानं सगळ्यांना तोंड देणं गरजेच होतं. मानसीला न आवडणारा खुळचट प्रश्न एका न्यूज चॅनेलवाल्याने विचारलाच, "मॅडम, कादंबरीच्या नावाबद्दल काय सांगाल?"
तो प्रश्न पूर्ण होत नाहीच तोवर अजून एक बाई म्हणाली, "आधी नोबेल आणि आता ज्ञानपीठ... कसं वाटतंय?"

"ज्ञानपीठ कधी मिळाला? अन् मला कसं नाही माहिती? बाबांना माहिती असेल, त्यांनाच विचारते." स्वतःशीच बडबडत मानसी बाबांना शोधत होती. एवढ्या सगळ्या गर्दीत आई बाबा मागेच राहिले होते. बाबा मागून मानसीला मोठमोठ्याने आवाज देत होते, "मनु.., ए मनु... मनु."


बाबांना काय झालं ओरडायला म्हणून मानसी बाबांजवळ जात होती. इतक्यात तिच्या डोक्यावर पाणी पडायला लागलं. "बापरे! पाऊस! आंतरराष्ट्रीय विमानतळाच छप्पर फुटक आहे की काय? पाणी कसं काय पडतंय." असं म्हणत मानसीने डोळे किलकिले करत वर पाहिले.

"मनु, अग उठ तरी. तुझी आई कितीवेळची आवाज देतेय. अग, उठून अभ्यास नसेल करायचा तर कमीत कमी तिला घर कामात मदत तरी करत जा."बाबा पाण्याचा जग घेऊन तिच्या तोंडावर पाणी मारत बोलत होते.

चेहऱ्यावरच पाणी पुसत मानसी स्वयंपाक घरात गेली. आईच्या तोंडाचा पट्टा सुरू होता, "एवढी फायनल इअरला गेली तरी अजून झोपेतून उठवावं लागतंय. अगं दहा वाजता प्रॅक्टिकल आहे म्हणत होतीस ना? साडे आठ वाजलेत. कधी आवरशील सगळं. तुझं लग्न झालं ना की तुझ्या झोपेसाठी माझा उद्धार होणार हे तर नक्कीच."

"ही घे वाटी, शेजारच्या काकुकडून ज्वारीच पीठ आण". आईने बोलता बोलता स्टीलची वाटी तिच्या हातात दिली.

"ज्ञानपीठ" मानसी पुटपुटली.

"ज्ञानपीठ नाही गं माझी माय.. ज्वारीचं पीठ.. कुठून ज्ञानपीठ आणलं काय माहिती. तसंह या घरात राबून आमच्या ज्ञानाचं पीठ व्हायचीच वेळ आलीये. " आईने बोलता बोलता एक जळजळीत कटाक्ष बाबांकडे टाकला.

"आणि हो, काकुकडे जाशील तर बेल वाजव. त्यांचा स्वयंपाक सुरू असेल. आत असतील त्या. दार वाजवलं तर आवाज ऐकू जाणार नाही." आई पुढे बोलतच होती.

"नोबेल" मानसी परत पुटपुटली.

"नोबेल नाही गं.. डोअर बेल.. डो-अ-र बे-ल कळलं का? काही कळत नाही या पोरीचं. काय बडबडत असते काय माहिती" आईच्या तोंडाचा पट्टा सुरूच होता.


डोळे चोळतच मानसी वाटी घेऊन जाऊ लागली. ज्ञानपीठ.. नोबेल.. खर होत की खोटं.. विचार करतच तिचं डोकं हॉलच्या भिंतीवर आपटलं..

आई गं...स्वप्न होत तर!


(विनोदी कथा लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे. तुमचा अभिप्राय नक्की कळवा. तुमचा अभिप्राय हीच लेखणाची ऊर्जा आहे.)

फोटो-गुगलवरून साभार

© डॉ. किमया मुळावकर