हौसेला वयाचं बंधन नसतं

Every woman should think about herself ,it's their right

हौसेला वयाचं बंधन नसतं

आज सिताच्या घरी हळदीकुंकू होतं, सीता म्हणजे माझी बिल्डिंगमधील मैत्रिण, साधारण 42 वर्षांची असेल. तसं दरवर्षी ती हळदीकुंकू करते, नेहमीप्रमाणे मीही ऑफिसमधून आल्यावर, कपाटातून एक छानशी साडी काढली, ती घातली, त्यावर मॅचिंग ज्वेलरी घातली ,परत एकदा आरशात बघत, सगळं व्यवस्थित झालं की नाही ते चेक केलं. कोणताही कार्यक्रम असला, की त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नवीन साडी घेणं व्हायचं, एकदा घातली ,की परत लवकर  साडी घालणं व्हायचं नाही, कपाटामध्ये साड्या नुसता पडून असायच्या. हळदीकुंकवाच्या निमित्ताने का होईना, रोज वेगवेगळ्या साड्या घातल्या जात होत्या, साड्यांना थोडीशी तरी हवा मिळते, म्हणून जरा बरं वाटतं ,इतर वेळी नेहमीच ड्रेस घालतो .घड्याळात बघितलं ,तर संध्याकाळी सहा वाजले होते ,तसा तिने साडेपाचचा टाईम सांगितला होता, पण आपल्याकडे इंडियन टाइमिंगनुसार, अर्धा तास उशिरा म्हणजे जास्त काही नाही .मी तिच्या घरी गेले ,हसत मुखाने तिने माझं स्वागत केलं आणि मला म्हणाली, नेहमीप्रमाणे तूच वेळेत आलीस बघ ना ,अजून कोणीही नाही आलं ,छान दिसतेस ,साडी पण छान दिसते .

मी  सोफ्यावर बसले ,इतक्यात माझे तिच्याकडे लक्ष गेलं, तिने छान ब्लॅक कलरची साडी घातली होती, त्यावर सगळे हलव्याचे दागिने घातले होते  मेकअप लाईट केला होता .खूपच सुंदर दिसत होती, मग मीही तिला म्हटलं, छान दिसतेस ,अगं पण आमच्याकडे ,तर हलव्याचे दागिने ,लग्नानंतरच्या पहिल्या संक्रातीला घालतात आणि तू आत्ता घातलेस. 

सीता म्हणाली ,अगं लग्न झालं, त्याला किती वर्ष झाली आणि आमच्याकडे अशा काही प्रथा नव्हत्या,  त्यामुळे असं काही झालंच नाही ,आता किती  या नवीन मुलींची   हौस होते, जशी जशी संक्रांत जवळ यायला लागली ना , तसतसं त्या वेगवेगळ्या हलव्याच्या दागिन्यांची मला ओढ लागली. खरं सांगू का तुला,  हौस करायला वयाच बंधन नसतं ,मला मनातून खूप असं वाटत होतं, की  माझं लग्न झालं होतं, तेव्हा का नाही कुणी हौस केली. यांना समजत होतं ,माझं नक्की काहीतरी खटकलं आहे , असंच एक दिवस चहा पिताना, शेवटी यांनी विषय काढलाच, मला विचारलं, तुझंं काही बिनसलं आहे का. मी नाही म्हटलं ,तर हेे म्हणाले, नाही नक्की काहीतरी झालंय, सांग बघू मला, मग मी त्यांना ,माझ्या मनातले खंत बोलून दाखवली. त्यावर हे म्हणाले ,प्रॉब्लेम काही एवढा मोठा नाही, अजूनही माझ्याकडे याच्यावर उपाय आहे .माझा चेहरा एकदम खुलला आणि विचारले, काय उपाय आहे .तर त्यावर हे म्हणाले ,एक काम कर ,तुला जेे दागिने आवडतात ,ते तू ऑर्डर कर ,नाहीतरी असेही तूू हळदी कुंकू करते, त्यादिवशी मोत्याच्या किंवा सोन्याच्या दागिन्यांच्याऐवजी, हलव्याचे दागिने घाल, छान फोटोसेशन कर ,म्हणजे तुझी इच्छा पूर्ण होईल आणि विनाकारण नटल्यासारखे वाटणार नाही. मग काय ,मी ही माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी, पुढे सरसावले आणि मागवून घेतले दागिने, असंही आपला समाज असा आहे,  की आपण कसेही वागलो,तरी ज्यांना नावे ठेवायची असतात, ते ठेवतातच, मग आपण का एवढा विचार करायचा, आपण का आपल्या इच्छा मारायच्या आणि जर माझ्या नवऱ्याला काही प्रॉब्लेम नाही ,तर इतरांचा मला काहीही फरक पडत नाही.

 मी तिला म्हणाली, खरंच ,मला तुझं खूप कौतुक वाटतं आणि तू माझी मैत्रीण असल्याचा अभिमान आहे ,खरंच तू खूप छान दिसत आहे आणि आलेल्या बायकांकडे जास्त्त लक्ष देऊ नको ,तू खऱ्या अर्थाने ,तुझं हळदीकुंकू एन्जॉय कर आणि तू म्हटल्याप्रमाणे ,खरंच हौसेला वयाचं बंधन नसतं .माझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगावसं वाटतं, जर काही  हौस करायची असेल, तर बिनधास्त करा , जास्त जगाचा आणि वयाचा विचार करू नका ,चाळीशी नंतरही सीता सारखं मनमुराद जगायला शिका.

मकरसंक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा.

 लेख जर आवडला असेल ,तर नावासहित शेअर करू शकता आणि अभिप्राय मात्र अवश्य द्या.

रूपाली थोरात