नको आई तुझी रीत

Nko Tujhi Rit
फराळाचे ताट

त्यात करंजी टाक, शंकरपाळे टाक, थोडी शेव टाक ,लाडू ठेव, बर्फी ठेव...चकली ठेव..चिवडा आणि गोड चिवडा ही ठेव बघ काही विसरले तर नाही ना ठेवायचे...आई

आई अग सगळेच तर ठेवले आहे मी त्यात आणि आता ताट इतके भरले आहे की जागाच शिल्लक राहिली नाही तरी तू म्हणतेस आणखीन काही राहिले तर नाही ते बघ..अजून असते तरी ह्यात मावले नसते ,आणि तू जरी ठेवच म्हणाली असती तरी मी ठेवले नसते मुळात...किती द्यायचे.....का इतके भरभरून सगळेच द्यायचे ,ही कसली रीत तुझी ?? श्रीशा आगाऊपणे म्हणाली

तू भर म्हंटले की भरत जा बयो...ते संस्कार असतात त्यात काही शास्त्र नसते पण जे जे आपण केले आहे ते ते ठेवायची आपली रीत आहे...हातचे का ठेवून वागायचे बरं बयो.. परिपूर्ण दिसले पाहिजे ताट इतरांना देतांना... आपल्या हात देतांना नेहमी वर असावा..म्हणजे लोक ते काय म्हणतेस ते जज का काय ते करत नाहीत..आईने समजून सांगितले लेकीला

तू आई कमाल भाषण करतेस मला मुळात ही देवघेवान ही रितीच नाही पटत, पण माझ्या घरी मी हे असले प्रकार करणारच नाही...तुम्ही तुमचे आम्ही आमचे ही माझी रीत असणार आहे बघ तू...तिथे मला कोणी ही सांगणारे नसेल...मी आणि रुद्र आम्ही आमचेच असू...कोणाला जोडण्याचा भानगडीत पडणार नाही...त्याला ही हे आवडत नाही....श्रीशा वरच्या आवाजात बोलली

आईला तिच्या बोलण्याचे हसू आले आणि तिला पुन्हा समजून सांगणार इतक्यात ती सरळ ताट घेऊन बाजूच्या काकुकडे गेली, काकूने दार उघडले तर त्यांचा चेहरा बघून श्रीशाला काही तरी वेगळे जाणवले...

श्रीशा लगेच म्हणाली काकू काही झाले का तुम्हाला ?? तुम्ही अश्या उदास का आहात ?? आणि घरात अशी शांतता का ?? काका कुठे आहेत..?

काकू म्हणाल्या बाळ तुला नाही कळायचे ,तू अजून लहान आहेस तुला कसे सांगू काय झाले ते...तू जा तू नको टेन्शन घेऊ मी तुझे ताट नंतर घेऊन येईल म्हणत त्या रडता रडता शांत झाल्या आणि श्रीशाला परत पाठवले..

श्रीशाला अजूनच टेन्शन आले ,काकू काल तर चांगल्या होत्या आज काय झाले असेल त्यांना ,का रडत असतील त्या...माहीत करून घ्यायला हवेत ,त्यांना कोणाचा तरी आधार हवा असेल ,मदत हवी असेल तर आपण त्यांना मदत करायला हवीच..त्यांचे इथे कोणी नाही मग ऐन वेळी कोण येईल ,निदान आपण शेजारी आहोत आपण मदत करावी ,उद्या मी लग्न करून गेल्यावर आई बाबा एकटे असतील त्यांच्यावर असा प्रसंग आला तर त्यांना कोण मदत करेन...नाही नाही मी काकूंना मदत करेन...

जी म्हणत होती मी माझी माझी रीत पाळणार कोणाला ही जोडून नाही राहणार ती शेजारच्या काकुवर संकट आल्यावर मदतीला धावून गेली...

श्रीशा घरी आली आणि आईला हकीकत सांगितली ,बाबांना फोन केला आणि जरा त्या काकू च्या घरी भेटून यायला सांगितले ...

आई बाबा श्रीशाच्या संगण्यावरून त्यांच्या घरी गेले ,आणि त्यांनी शर्मा काकुला हकीकत विचारली तर कळले काका दोन दिवसांपासून घरी आलेच नाहीत..फोन लागत नाही..

आईने त्यांना सावरायला सांगितले आणि श्रीशाच्या पोलीस मित्रांना त्यांचा शोध घेण्यास सांगितले...

श्रीशाने आणि तिच्या मित्रांनी दोन दिवस अहोरात्र काकांचा शोध घेतला ,सगळीकडे चौकशी केली, स्वतः श्रीशा हॉस्पिटलमध्ये तपास करून आली आणि मग कुठे काका सापडले..

सगळे खुश होते ,त्यांच्या प्रयत्नांना यश आले ,त्यात श्रीशा खूपच खुश होती ,एक समाधान होते तिच्या चेहऱ्यावर की आपण काकाच्या कामी आलो आणि काकुला मदत केली...

आई श्रीशाच्या चेहऱ्यावरील हे समाधान पाहून म्हणाली ही जगण्याची रीत कशी वाटली ,किती सुखकारक वाटली बघ आणि तू काय म्हणत होतीस आम्ही आमचे बाकी कोणी नाही...तुमच्यासारखे कोणाला मदतीस तत्पर नक्कीच नसणार..कोणाला जोडण्याचा भानगडीत पडणार नाही..मग आता का ??

आई अग मला नाही रहावले ग।,आणि शेवटी तुझे गुण आहेत माझ्यात ते कुठे स्वस्थ बसू देतात मला ..आणि मी लगेच धावत सुटले त्यांच्या मदतीला...उद्या मला ही तुमची चिंता आहेच ना...मग जर आपण जोडलेले नसू कोणाच्या दुःखाला तर कोण येईल आपल्याला ही मदतीला, म्हणून तू म्हणतेस ती रीत मी ही पाळणार ..

©®अनुराधा आंधळे पालवे