नियती - एक भयकथा - भाग 34

भयकथा

#नियति 
#भाग 34
#पूनम पिंगळे
संभाजी  निघाला आणि त्याच्या पाठोंपाठ मंदाकिनी सुद्धा निघाली...झालेलं सगळं बोलण मंदाकिनीने ऐकलं होतं.. मंदाकिनी ला हे समजत नव्हतं की ब्राह्मणाला बोलवून हे लोक काय करणार आहे? आणि आणि ही मुक्ती इतकी हुशार कशी झाली बरं? ही कधी संभा झाली, मला समजलं नाही? आता माझी आई तिकडे आहे तिला हे कसे बोलवणार बरं? आमच्या मर्जीशिवाय आम्हाला कोणीही कुठेही बोलू शकत नाही.. बघतेच आता हे लोकं काय करतायेत.. संभा गाडीमध्ये बसला त्यांनी गाडी चालू केली.. त्याच्या बाजूला कोणीतरी आहे असा भास त्याला होऊ लागला.. संभा मनातल्यामनात पुरता घाबरला होता तो सतत मनामध्ये राम राम राम राम असा धावा करत होता.
थोड्याच वेळात संभा दादाकडे पोचला झालेली सर्व घटना त्यांना सांगितले आता रात्रीची वेळ आहे आणि मी माझ्या ऊर्मीला घरात अस एकटीला सोडून येऊ शकत नाही..
संभा : अहो दादा तिला बी घेऊन चला की ..समदी आपलीच हायत तिथं काय बी अडचण न्हाय..
दादा:अरे पण तिला झोपायचं असेल आता . ती जागी नाही राहणार.. आणि हे काम काही लगेच नाही होणार ..कदाचीत पूर्ण रात्र जाईल यात..आणि मला माझ्या मुलीच्या जीवाला धोका नाही करायचाय.. त्या सगळ्यात त्या भुतांनी माझ्या मुलीला धरलं तर? नाही नाही संभा मला माफ कर मी नाही येऊ शकत. तू दुसरा ब्राह्मण बघ ..
संभा : ओ दादा..तुमच्या इतका इस्वास कुणाव बी न्हाई.. आव्ह त्यो बी तुमचा दोस्तच नव्ह का? त्याचा बी इचार करा की ..आणि आपल्या ऊर्मी ताई ला काय बी व्हणार न्हाय.. तुम्हि लई चांगलं काम करणार हाय ..मंग त्यो देव तिला कस काय होवून दिल? चला दादा तिला बी घेऊन चला ..आता जास्ती येळ नगा व घालवू..इतक्यात तिथे ऊर्मी आली...ती एकटक संभाला बघू लागली..तिचे डोळे लाल लाल दिसत होते..काहीतरी भयानक वाटत होते ..संभा तिला बघून थोडा घाबरला ..
ऊर्मी:दादा कुठे जायचय आपल्याला?
दादा : आग कुठे नाही बाळा . झोप तू
ऊर्मी: मी ऐकलय अत्ता संभा काका बोलला ना तिथे जायचय ..काहीतरी..
दादा : हो पण मी नाही जाणार बाळा 
ऊर्मी: गालातल्या गालात हसत संभा जवळ गेली ..आता तिची पाठ दादा कडे आणि नजर संभाकडे होती ...काय संभा काका ..आता काय करणार तुम्ही? कस नेणार आम्हाला तुमच्या सोबत ...तिचे डोळे नुसती आग ओतत होते  . संभा ला काही समजतच नव्हतं हिला झालय तरी काय? ही छोटी मुलगी पण मला हिची भीती का वाटू राहिलीय..
संभा: ताई आपलं दादा लई मोट्या मनाचं हायत त्ये येणारच..त्यांच्या दोस्ता साठी ..व्हय ना दादा ? लई आशन आलोय चला व..तिकडं समदी तुमची वाट बघत्यात..
ऊर्मी: दादा नको ना जायला आपण? मी झोपते आत जाऊन मला खूप झोप आलीये..
दादा: हो बाळ जा झोप तू..
संभा: दादा आव्ह चला..ऊर्मी ताईला राहुद्या घरीच..समदी आपलीच लोक हायत की इथं ...काय बी काळजी नग त्यांची ..
दादा: आता खूप विचारात पडले होते..एकीकडे मित्रप्रेम आणि कर्तव्य ..तर दुसरीकडे मुलीची काळजी..खूप विचार करून   ,"चल येतो मी, पण सोबत घेतो उर्मीला, तिला अस एकटीला नाही ठेऊ शकत मी...थांब तू मी बॅग घेऊन येतो माझी ..बरच समान लागेल याला ...नशिबाने सगळं आहे घरात"
ऊर्मी: नाही दादा मला नाही यायचंय..
दादा: आग बाळ हेमंत ला मदत हविये माझी ..मला जायला हवं ...
ऊर्मी: उद्या जाऊन करा ना सकाळी..अत्ता आपण झोपुया..मला खूप झोप आली आहे..
दादा: तू झोप ग ..तुला कुठे काय करायचंय?..काम तर मी करेन ना..चल आता हट्ट नको करुस चल माझ्या सोबत..
उर्मीचे डोळे लाल लाल झाले आणि अचानक ती ओरडली: ए शहाण्या तुला समजत नाही काय? इतका वेळ झाला तुला सांगतीये नाही जायचं ..आणि तुला कसला रे जोर आलाय? बस की गप घरात..
दादा तर वेडावला होता.. घाबरला होता : आग ए ऊर्मी ...आग तू अशी काय बोलतीयेस? आरे संभा..आत ये बघ ..ही ऊर्मी बघ . अरे कशी बोलतीये ही? आग ऊर्मी ..काय झालं तुला? 
ऊर्मी: ए हुशार . मी ऊर्मी नाहि.. आणि ती गडगडाटी हसू लागली ..अरे कसला रे तू पुजारी ? तुला तर तुझ्या मुलींमध्ये मी कधी आले ते पण समजलं नाही.. तू काय वाकड करणार रे माझं आणि माझ्या मुलीचं?हे चालू असताना दादाचा आवाज ऐकून संभा पण आत आला..
संभा : मंजी तुमी त्या मंदाकिनीची आय व्हय?
ऊर्मी: अरे वा संभा !खूप हुशार रे तू....कस बरोबर ओळखलास मला..हो मी तिची आई मिरा आहे ..आम्ही दोघी जेव्हा परत आलो तेव्हा आमचं काम तडीला नेण्यासाठी मला एक शरीर हवं होतं..आणि ऊर्मी वयाने लहान आहे त्यामुळे माझं काही चुकलं तरी कोणी जास्त मनावर घेणार नाही हे मला माहित होतं .....आता कोणाच्या शरीरात जावं हा विचार करत असतानाच ऊर्मी आणि तिच्या मैत्रिणी शाळेतून घरी जाताना मला दिसल्या ...सगळ्यांच्या घरी खूप माणस होती ...आणि खासकरून त्या सर्वांना आई होती ...मला माहित होतं जेव्हा मी कोणाच्या शरीरात प्रवेश करेन तर त्या व्यक्तीमध्ये खूप बदल घडेल ..ज्या घरात खूप लोक असणार त्यांना लगेच लक्षात येणार आणि मग माझं काम मी योग्य प्रकारे करू शकणार नाही ..
तुझी ही ऊर्मी तिच्या मैत्रिणीकडे आईची आठवण काढून रडत होती ...मला समजलं हिला आई नाही आणि घरी फक्त बाप आहे ...मला माहित नव्हतं ही तुझी ..एका पुजाऱ्याची मुलगी आहे ..मी तिच्या शरीरात प्रवेश करायचं ठरवलं ...म्हणजे मी ऊर्मी व्हायचं ठरवलं..आणि तिच्या शरीरात प्रवेश केला ..मी माझ्या पद्धतीने वागू लागले..लोकांच्या लक्षात आलं ..पण ...(जोरात हसत बोलली )..अरे तू बाप असून तुला ते लक्षात आलं नाही ...हाच तर मोठा फरक आहे आई आणि बापा मध्ये .. उगाच नाही आईला इतका मान आहे ...
मी तिच्या शरीरात प्रवेश केला आणि तुझी पोरगी चक्कर येऊन पडली...मला तिच्या शरीरात हवा तसा आराम वाटत नव्हता ...पण इतके वर्ष मी जी तपस्या केली आहे त्यामध्ये मला एकाच शरीरातच प्रवेश करता येणार होता..म्हणजे मी आता 6 महिने दुसऱ्या शरीरात प्रवेश करू शकत नव्हते ...त्यामुळे मला उर्मीच बनाव लागलं ...आणि मी तुझ्या घरी आले..तुझ्या घरात सगळं देवाचं सामान होत...मला खूप त्रास व्ह्यायला लागला ...मग मी त्यादिवशी वेड्याच नाटक केलं ..आणि ते सगळं सामान तुला  घराबाहेर ठेवायला भाग पाडलं...तुझा पण नाईलाज होता ...तु पण ते सगळं मुकाट्याने तुझ्या खोलीत नेऊन ठेवलस ...आणि मी ऊर्मी झाले ..अगदी बिनधास्त पणे ..तुझ्या घरात वावरत होते ..
तुला नाही पण आजूबाजूला राहणाऱ्यांना माझ्यातला बदल जाणवत होता ..मग मी घराबाहेर जायचं बंद केलं ...आणि थोड्याच दिवसात तुझ्यातला चांगला माणूस मला दिसला ..आणि मला खूप सुरक्षित वाटू लागलं होतं ऊर्मी होऊन..हळू हळू तर मला तू पण आवडायला लागलास..तुला माहीत आहे ना गेले 15 दिवस मीच तर जेवण बनवून देतीये तुला ..तुला फरक जाणवला पण नाही ..म्हणजे बघ तू किती लक्ष आहे तुझं घरात ..जेवणात झालेला फरक पण समजला नाही तुला..आजकाल आपली मुलगी सारखी आपल्या जवळ बसते ..गप्पा मारते.. हे ही तुझ्या लक्षात आलं नाही की खूपदा गालावर पप्पी घेते ..गळ्यात पडते ..जे तिने आजपर्यंत कधीच केलं होतं..
मला तु खूप आवडतोस.. ऐक माझं त्या हेमंतच्या नको नादी लागूस..तो संपतराव मेला ना कि माझ्या मुलीला मुक्ती मिळेल आणि मग मी पण मुक्त होईल ..,तोपर्यंत मला तुझ्या जवळ राहूदे ना ...आणि तिने दादाला मिठी मारली आणि वेड्यासारखे त्याचे पापे घेत सुटली...दादाला काहीच समजत होत..यावर आपण काय बोलावं.. पण मला माझ्या मित्राची मदत करायलाच हवी..
उर्मी एकदम चिडत :- अरे आत्ता इतकं समजावलं ना रे तुला ..तरी तुझं आपलं तेच? मला आवडतोस रे तू ..तुझ्याबरोबर वाईट वागायला नको लाऊस मला ..ऐक माझं ..त्या हेमंत आणि वर्षा पासून दूर रहा रे ..ए संभा पळ इथुन ..नाही येणार दादा तुझ्या सोबत.. 
संभा : थोडा घाबरतच - ए तू गप ग ..आमचे दादा आहेत ते ..आणि येणारच आमच्या बरोबर.. ते दोघे बोलत असताना दादा मागच्या मागे त्यांच्या सामानाच्या खोलीत गेले..तिथून गंगा जल आणि एक माळ घेऊन आले..ते पाणी पाठमोऱ्या उर्मीच्या म्हणजे मंदाकिनीच्या आईच्या अंगावर टाकलं ..ती एकदम ओरडली...एतू काय मूर्ख आहेस ?अस पाणी काय टाकतोस अंगावर माझ्या? तिला न जुमानता दादा पटकन तिच्या जवळ गेले आणि क्षणार्धात ती माळ उर्मीच्या गळयात घातली... ऊर्मी अचानक जोरजोरात ओरडू लागली..
संभा स्तब्धपणे सगळं पहात होता..त्याची बुद्धी त्याला साथ देत नव्हती ..इतक्यात दादांनी एक माळ तिच्या गळ्यात घातली ...आणि ऊर्मी अंगाला आग लागल्यासारखी ओरडू लागली...
काय होणार पुढे? ऊर्मी यातून वाचणार का..मुक्ती मुक्त होणार का? काय होणार?
क्रमशः