निवडुंग मी

.
संध्याकाळचे सहा वाजले होते. पीयूष आपल्या सवयीप्रमाणे गच्चीवर आला. मस्तपैकी वारा सुटला होता. सूर्य लवकरच मावळणार होता. चहूकडे तो आपली केशरी किरणे उधळत होता. पक्ष्यांचे थवे आपल्या घरट्यात परतण्यासाठी मार्गक्रमण करत होते. पीयूषने युट्युब उघडले. आवडीच्या प्लेलिस्टमधील गाणे लावून मोबाईलमध्ये इअरफोन घुसवले. " पेडोमीटर " अँप चालू करून आपली आवडती प्लेलिस्ट ऐकत पीयूष चालू लागला. आजूबाजूच्या गच्चीकडे त्याची नजर गेली. बाजूच्याच " मनुप्रभा " बिल्डिंगच्या गच्चीवर एक किशोरवयीन जोडपे आले होते. मुलाला मिसुरडेही फुटले नव्हते. तरीही तो खूप प्रेमाने त्याच्याच समवयस्क मुलीला घट्ट मिठी मारत होता. मुलगीही प्रेमाने तिचे हात त्याच्या गालावर फिरवत होती. दोघांच्या प्रेमाला उधाण आले होते. दोघांचा प्रणय चोरून बघणे पीयूषला अनैतिक वाटले. पण तरीही खूपदा लक्ष न देऊनही नजर गेलीच. आपल्या आयुष्यात कधीच का नाही आली अशी घट्ट मिठी आणि हा प्रेमळ स्पर्श ? सहजच पीयूषच्या मनात प्रश्न उभा राहिला. छळू लागला. हृदय घायाळ करू लागला. आसवे गाळू लागला. मग भूतकाळात मन भरकटले. आईवडिलांच्या अकस्मात निधनानंतर घराची जबाबदारी पीयूषच्या खांद्यावर पडली. लहान बहीण-भावांचे शिक्षण , नोकरी , लग्ने लावून दिली. या धामधुमीत स्वतःकडे लक्ष द्यायची फुरसतच भेटली नाही. जबाबदारी पूर्ण करता करता वयही उलटून केले. प्रत्येकजण ज्याच्यात्याच्या संसारात व्यस्त झाला. पीयूष मात्र एकटा पडला. हा एकटेपणा सर्वात भयंकर रोग असतो. माणसाला आतून पोखरतो. रडवतो. नैराश्याच्या खोल खाईत ढकलतो. सुदैवाने पीयूषला लेखनाचे वरदान होते. जेव्हा जेव्हा एकटे वाटत तेव्हा तेव्हा तो कथा लिहून पात्रांच्या गर्दीत हरवायचा. असो. पीयूष या विचारचक्रात असताना एक लहानशी चार वर्षांची गोड मुलगी गच्चीवर आली. गोरीपान , पांढरा फ्रॉक घातलेली आणि कपाळावर काळा गंध लावलेली ती परी विलक्षण गोंडस होती. आज आपले लग्न झाले असते तर आपलीही मुले एवढीच असती ना ? पीयूषने स्वतःलाच विचारले. पीयूषने हात हलवून " हाय " केले आणि त्या परीनेही हसत " हाय " केले. पीयूष हसला आणि तीही हसली. किती निर्मळ मनाची असतात ना लहान मुले. कसलेच कपट नसते त्यांच्या मनात. कितीतरी दिवसांनी पीयूष सुखावला होता. रूक्ष वाळवंटात पावसाची सरी पडून जावी असे पीयूषला झाले. त्याला लहान मुले प्रचंड आवडत. पीयूषने त्या लहान मुलीला काखेत घेतले. लाड केले. ती परी चारच वर्षाची असली तरी प्रेमाची भाषा तिला कळत होती. तिच्यासोबत तिची आई आणि अजून एक स्त्री होती. बहुधा तिच्या आईची मैत्रीण असावी. पीयूष त्या गोंडस परीसोबत सेल्फी काढू लागला.

" हे कोण ?" मैत्रिणीने विचारले.

" दुसऱ्या बिल्डिंगमध्ये राहतात. एकटेच आहेत. " त्या लहान मुलीची आई म्हणाली.

" अग , तुझी मुलगी विलक्षण गोड. कुणालाही नको हात लावू देत जाऊ. आजकाल किती घाणेरडे प्रकार वाढलेत. हा माणूस तर एकटा. न बायको न लेकरे. अशी माणसे स्वतःची वासना पूर्ण करण्यासाठी लहान मुलांना पकडतात. " मैत्रीण कुजबूजली.

पीयूषच्या कानावर हे बोलणे गेले. त्याच्या निष्पाप हृदयाला अतीव वेदना झाल्या. कानात शिसे ओतावे असे झाले.

" आम्हाला खाली जायचे आहे. " त्या लहान मुलीची आई म्हणाली.

पीयूषने त्या गोड परीला निरोप दिला. तो लगेच खाली आला. भकास घर त्याची वाटच बघत होते. उशीवर डोके टेकवून पीयूष रडला. किती घाण आरोप लावला त्यांनी. कुत्र्याला कुणीतरी हाडे दाखवावी आणि तो उडी मारत सुटावा. क्षणार्धात ते हाड दूर फेकले जावे आणि तो कुत्रा निराश व्हावा असेच खेळ नियती खेळत आहे. थोडेसे सुख दाखवते आणि भरपूर दुःख देऊन जाते असे पीयूषला वाटले. एकदा सोसायटीत लहान मुलांची आणि पालकांची भांडणे लागली. तेव्हा पीयूष मधे पडला तेव्हा कुणीतरी , " तुला काय कळतंय रे? एकलकोंडा. ना बायको ना लेकरे. " असा टोमणा मारला. दुसऱ्या दिवशी पीयूषचा वाढदिवस होता. मुद्दामच आराम करावा म्हणून सुट्टी घेतली. दिवसभर भावाच्या फोनची वाट पाहिली. नाही आला. कदाचित बिझी असेल. एकदोन फोन आले. पीयूषने आशेने उचलले. ऑफिसचेच होते. कामानिमित्त केले होते. आयुष्याकडून पीयूषच्या अपेक्षा कमी झाल्या होत्या. कुणी सप्राईज द्यावे किंवा फोटोंचा व्हिडीओ बनवून स्टेट्स ठेवावे आणि कौतुक करावे इतकी अपेक्षा नव्हती. पण ज्या भावा-बहिणींसाठी आयुष्य खर्ची पाडले त्यांना साधी दोन मिनिटांचीही उसंत नसावी कॉल करण्यासाठी ? पीयूषने मुद्दामच भावाला मेसेज केला. " विसरला ना वाढदिवस ?" तेव्हा भावाने " अरेरे सॉरी. हॅपी बड्डे. " रिप्लाय दिला. पीयूषने कॉल करायला सांगितला तेव्हा त्याने बाहेर असल्याचे सांगितले. बहिणीचे वागणेही वेगळे नव्हते. वर्षातले एक दिवस तरी आप्तांशी संवाद व्हावा ही पीयूषची इच्छादेखील पूर्ण झाली नाही. आता परत भावाच्या वाढदिवसाची वाट पाहावी लागेल. त्याचा आवाज ऐकण्यासाठी. पीयूषने दिवसभर टीव्हीच बघितली. घरात टीव्हीचा मोठा आवाज असेल तर एकटेपणा जाणवत नाही. एक अनामिक भीती पीयूषला खूप छळायची. " गलगले निघाले " चित्रपटातील नायकाप्रमाणे आपणही स्वतःशीच नाही ना बोलत बसणार. लोकांना आपण कंटाळवाणे वाटतो हे पीयूषने जाणले होते. हळवा होता. कवी होता. त्या दिवशी स्वतःच आरश्यासमोर बसला आणि स्वतःलाच विश केले. भावा-बहिणीला मेसेज केला. फ्री असाल तर कॉल करा. विरंगुळा म्हणून इरा ब्लॉगवर कथा लिहायचे सुचले. पण ज्याचे स्वतःचे आयुष्य रूक्ष वाळवंटासम आहे त्याच्या कथेतला राजमहालही मृगजळ आणि निव्वळ कल्पनाविलास. एक चारोळी सुचली.

निवडुंग मी काटेच ओंजळीत
सुखाने मला टाकले वाळीत
मुखावरी हास्यही न आणीत
जगतोय एकटा जीवन ढकलित !

नंतर पीयूषने मोबाईलवर आपला आवडता गायक जॅस मानकचे गाणे लावले. खूप सुंदर आवाज आहे त्याचा. संगीतला भाषा नसते ना तेच खरे. पंजाबी गाणी सहजपणे हृदयात भिडत होती. आवाज तर अमृतासमान वाटत होता. तेच ऐकत ऐकत त्याला झोप लागली. रात्रीचे नऊ वाजले. कुणीतरी बेल वाजवली. कोण असेल ? पीयूषने दार उघडले. एका लहान मुलीने मिठी मारली.

" काका.." ती गोंडस मुलगी म्हणाली.

" पुहू.." पीयूषने तिला कडेवर घेतले आणि लाड केले.

" भाऊजी , रस्त्यात टायर पंक्चर झाल्यामुळे उशीरच झाला. " प्रेरणा म्हणाली.

" भाई , हॅपी बड्डे. " इशांतने पीयूषला मिठी मारली.

" भाई , फक्त माझ्या वाढदिवसासाठी मुंबईहून पुण्यात आलास ?" पीयूष म्हणाला.

पीयूष आणि इशांत शाळेतले जवळचे मित्र होते. इशांत तर पीयूषचा जीव की प्राण होता. पुढे इशांतने एमबीए केले आणि मोठ्या पदावर कार्यरत झाला. घरच्या जबाबदारीमुळे पीयूषला शिक्षण घेणे जमले नाही. श्रीमंत होऊनही इशांत आपल्या मित्राला विसरला नव्हता.

" दरवेळी सुदामाच कृष्णाच्या दारी यावा हे गरजेचे आहे का ? कधी कधी कृष्णा स्वतःहूनही येऊ शकतो ना. " इशांत म्हणाला.

पीयूषचे डोळे पाणावले. इशांतने केक आणला होता. भावा-बहिणीच्या मुलांसाठी जमा केलेले ( कधीतरी ते भेटायला येतील या आशेने ) चॉकलेट , खेळण्या सर्व पुहुला दिल्या. तिचे भरपूर लाड केले. सुदैवाने रोखणारे आणि संशय घेणारे यावेळी कुणी नव्हते. पीयूषला आसमंत ठेंगणे झाले. इशांतने हॉटेलमधून पार्सलही आणले होते. पीयूषने केक कापला. पोटभर चविष्ट जेवण केले. रात्रभर गप्पा मारल्या. सकाळी इशांत निघून गेला. रक्ताचे नाते असलेले जिथे परके झाले तिथे मित्राने मन राखले होते. पीयूषने दार लावले. त्याने काल जी चारोळी लिहिली होती त्याखाली इशांतने काहीतरी लिहिले होते.

" तू निवडुंग नाहीस गुलाब आहेस. फक्त तुला निवडुंग समजणारे रूक्ष हृदयाचे आणि काटेरी डोळ्यांचे आहेत. "

समाप्त