Feb 26, 2024
वैचारिक

निथळणं..

Read Later
निथळणं..
#कथा
#निथळणं
©स्वप्ना..
       ती आज जरा रागातच सगळी कामं करत होती,.. तिच्या देहाच्या हालचालीत ते जाणवत होतं,..तशी एकदम उलटून बोलत नाहीच ती पण एकदम गप्प मात्र होऊन जाते,..काम करताना गुणगुणणारं गाणं एकदम थांबवून टाकते,..कर्तव्याला चुकत नाहीच ती पण रोजची प्रेमाची ओल मात्र तिच्यातून हरवून जाते,..आताही तसंच तर करत होती त्याच रागाच्या वेगात तिने चहाची कपबशी जरा आदळली,..आणि स्वतः चहा घेताना खिडकीतून बाहेर बघू लागली,..डोळे अगदी पाणावलेले होते,..नेमकं काय बिघडलं हे काही सुमतीआजीच्या लक्षात येत नव्हतं,..कारण काल रात्रीचे जेवणं आठवली तर छान हसत खेळतच रात्र झाली होती,..अगदी झोपताना ती आपल्या खोलीत येऊन नेहमीप्रमाणे प्रवचन वाचून,..आपल्या कपाळाचा पापा घेत खोलीत गेली,.. मग सकाळपासून काही बिघडलं की रात्री नवरा बायकोत काही बिघडलं म्हणावं तर काय माहित,..?पण ह्या फुलपाखराचं असं गच्च बसणं खरंच आपल्या घराला आणि मुख्य म्हणजे आपल्याला नाही पेलवत आहे हा विचार करत होत्या ,..ही सुमतीबाईंची नातसुन होती,..पण सुमतीबाई तिला सूनबाईच म्हणायच्या,..तिचे सासुसासरे गावी शेती बघत आणि इथे हे त्रिकोणी कुटुंब राहात होतं,.. खरंतर सुमतीबाईंनी जरा विरोध केला होता मुलाला आणि सुनेला इथे येताना,"अरे त्या दोघांचा नवीन संसार त्यात माझ्या मेल्या म्हातारीची लुडबुड कशाला करायची,..?मी इथेच राहते ना गावी.."
      यावर सुनबाई म्हणाल्या होत्या,"आई ,अहो नवीनच आपल्या घरात रुजणारं हे रोपटं,ह्याला मोकळी हवा नक्कीच आवडणार,...पण मी जशी या घरात आले तर इथल्या चालीरीतीत रुजायला तुम्ही मला मदत केली,..म्हणून आज मी रमले ह्या संसारी,मला हे घर आपलं वाटतं,.. हे आपलं वाटण ह्यासाठी काही गोष्टी रुजवाव्या लागतात,..पण त्यासाठी कोणीतरी वटवृक्ष असावं लागतं ना,..नव्या रोपट्याला रुजणं शिकवायला,.."
    सूनबाईच्या वाक्यावर सुमतीबाई म्हणाल्या होत्या,"अग सुनबाई काळ खुप बदलला आहे,..माझ्या म्हातारीचा तिला राग आला तर कस ग,.."
    त्यावर हसत सुनबाई म्हणाली,"आई अहो,हळुवारपणे आयुष्यात कुटुंबाच्या चालीरीती सांभाळत आंनदी आयुष्य कसं जगायचं हे तुम्हीच खुप छान सांगू शकता,.. काही दिवस तर राहा मग ठरवू पुढे काय,.."
     दोघींचा संवाद ऐकणार मुलगा म्हणाला,"आई,किचकट प्रथा,परंपरा ह्या सोप्या करून आंनद घ्यायला तूच शिकवलं आहेस,..आमच्या पेक्षा ही पिढी आणखी धावपळीच आयुष्य जगणारी आहे,..तू थोडं त्यांच्यात रुजवलं तर कदाचित आंनदी जगण्याला मदत होईल,..नाहीच आवडलं त्यांना तर बघू समजावून सांगू,.."
      ह्या सगळ्या चर्चेतून सुमतीबाई नातवाच्या लग्नानंतर सहा महिन्यांनी ह्या घरात आल्या होत्या,..चवदार स्वयंपाक, घवघवीत देवघर,स्वच्छ रेखीव अंगण,..संध्याकाळी तेवणारी शांत समई,..सगळ्याचं महत्व सांगितल्यावर वेळात वेळ काढून नातसुन सगळं आनंदाने करत होती,..पण तिची एक सवयच जरा घातक होती तिच्यासाठी आणि घरासाठीही हे असं एकदम गच्च होऊन जाणं,.... ती कडकड भांडून वाद घालत नव्हती हे चांगलं असलं तरी ती अशी गच्च झाली की आजीचा नातू देखील अस्वस्थ होत असे,.."
      तिला कसं बोलत करावं ह्या विचारात सुमतीबाई असताना ती एकदम म्हणाली,"आज मी रजा घेतली आहे तुम्हाला त्या पलीकडच्या कॉलनीतल्या विठ्ठल मंदिरात जायचं आहे ना मग तयार राहा मी आलेच म्हणत खोलीत गेली,.."
                          दोघी मंदिरात बाकड्यावर बसल्या,.. ती गच्चच होती,..बाकड्याच्या भोवती असलेल्या अबोलीच्या रोपट्यांवर नेमकं माळी पाणी मारून गेला होता,..त्या रोपट्यांकडे दोघी बघत होत्या,..एक दिर्घ उसासा टाकत सुमतीबाईच बोलल्या,.."हे बघ ह्या रोपट्यावर त्या माळ्याने पाणी मारल्याने रोपटं कसं चकाकत आहे ना,..ती फक्त 'हम्म' एवढंच म्हणाली..त्या पुन्हा म्हणाल्या,"ते पाणी जर त्याच्या पानांवर फक्त साचलं पानांवरून निथळलं नाही तर काय होईल ग,.."
    आजीच्या प्रश्नावर आजीकडे ती बघत म्हणाली,"त्या पांनाना ओझं होईल,..."
    आजी हसत म्हणाली,"ओझं तर होईलच पण पान ते पाणी सतत पकडून सडून देखील जातील,..ती सुंदर दिसणार नाही,..आता हे जे चकाकणं आहे ना ते त्याच्यावरच्या पाण्याच्या निथळण्यामुळे आहे हे लक्षात येतंय का तुझ्या,..?"
      सूनबाईच्या लक्षात आलं नेहमीच्या पद्धतीने आजी काही सांगू पाहात आहे तिला,..ती जरा हसली आणि आजीकडे पहात म्हणाली,"हो लक्षात येतंय ना,.."
     आजी तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली,"दोन वेगवेगळी माणसं एकत्र येऊन राहणार म्हंटल की मतभेद आलेच,..समाजातही वावरताना वेगवेगळी माणसं भेटतात त्यांच्याशी वाद होणारच पण त्यामुळे असं गच्च होणं हा त्यावरचा उपाय नाही ग,..तुझं काय होतं, तू ह्या पानांसारखी निथळत नाहीस,..बघ वाद काही असो पण,ते बोलून दाखवून मोकळं व्हायला शिक म्हणजे ह्या पानांनी जसं ते पाणी धरून नाही ठेवलं म्हणून ते चकाकत आहेत,तसं कोणत्याही गोष्टी मनात धरून कुढत बसलं की आपलं होतं तेच ह्या पानांसारखं निथळता आलं की मन चकाकत आणि मन चकाकलं की चेहरा चकाकतो हे नेहमी लक्षात ठेव,..त्या पानांकडून आपण निथळणं शिकायचं घडल्या घटना मनातून सोडून द्यायच्या ,बोलून मोकळ्या करायच्या असं गच्च बसलं की तू म्हणतेस तसं त्या पानांना जसं निथळलं नाही तर ओझं होईल तसच ओझं आपल्यालाही होतं म्हणून निथळायला शिक.."
     आजीचं बोलून ऐकून सूनबाईला अगदी हलकं वाटलं तिने चटकन रात्री एका मैत्रिणीशी फोनवर झालेला वाद आजीला सांगितला,.. नुसतं त्या सांगण्याने देखील तिला एकदम हलकं वाटू लागलं,.. मघापासून आपण जो फुगलेला चेहरा घेऊन फिरत होतो तो खोलवर ताण निर्माण करत होता आणि आपण खरंच खुप ओझं घेउन फिरतोय असं वाटत होतं,..पण तिला आता पटलं होतं निथळणं गरजेच आहे,..तिने बसल्या बसल्या रोपट्याला हात लावला त्याचा निथळणार थेंब बोटावर घेतला,.. तेंव्हा आजी म्हणाली,"बघ एखाद्याला निथळू द्यावं आणि तो असा निथळला म्हणजे आपण दवबिंदू व्हावं,.."
     दोघींनी पांडुरंगाला परत नमस्कार केला,.. आणि आजीने परत तिला सल्ला दिला,..माणसाला निथळण्यासाठी हे सगळ्यात विश्वासू ठिकाण आहे बरका,..ह्याच्या जवळ आपण निथळलो तर आपणच दवबिंदू होऊन चमकू लागतो,.."
      वाचकहो कथा कशी वाटली नक्की कळवा,..अश्याच कथांचे पुस्तक हवे असल्यास 9822875780 ह्या no वर msg करा..धन्यवाद
©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//