नितळ प्रेम

A true love is just a dream.

"तरी मी तुम्हाला सांगत होते लवकर निघुयात म्हणजे अंधार होण्याआधी आपण घरी पोहचू सुद्धा पण तरीही उशीर झालाच" समिधा कंटाळलेल्या व काहीप्रमाणात थकलेल्या स्वरात अभयकडे तक्रार करत होती. तक्रार काय ती रोजचीच असायची. समिधा आणि अभयचा प्रेमविवाह. दोघे एकाच कॉलेजमध्ये होते. एकाच वर्गात  असल्यामुळे मैत्री आणि मग प्रेम. दोन्हीही घरचे लोक सुशिक्षित त्यामुळे बिनविरोध लग्न ही लागलं आणि समिधा राजेंद्र देशमुखची समिधा अभय साठये झाली. अभयची बदली नुकतीच कोकणातल्या एका गावात झाली होती. समिधाला दिवस गेले होते त्यामुळे तीने देखील आरामासाठी सध्या काम न करण्याचं ठरवलं होतं. ह्या दिवसात समीधाची होणारी चिडचिड अभयला चांगलीच माहित होती त्यामुळे तो चकार शब्दही न काढता एकदम शांतपणे गाडी चालवत होता.

       अभयच्या कंपनीने त्यांची एका जुन्या पण तश्या भरभक्कम अश्या वाड्यात दोघांची राहण्याची सोय केली होती. एका आणखी तासाभराच्या प्रवासानंतर गाडीने गावात प्रवेश केला. साधारण ८-८:३० ची वेळ. गाव तसं अगदी प्रसन्न वाटलं. कारण कमानीतून आत प्रवेश होताच समोर ग्रामदैवतेचं मंदिर अगदी सुंदर बांधकाम असलेलं. समोरच्या पारावार काही वयस्कर व्यक्ति गप्पा मारत बसलेल्या दिसल्या. अभयने मंदिरासमोर गाडी थांबवली व त्यांच्याशी बोलायला त्यांच्या जवळ गेला, तोपर्यंत समिधा आसपासचा परिसर न्याहाळू लागली. "काका आपटे वाड्याकडे कोणता रस्ता जातो जरा सांगाल का?" आपटे वाड्याचं नाव घेताच त्यातील काहीजण काही न ऐकल्यासारखे पण काहीसे चाचपडत निघून गेले. समोर असणाऱ्यांनी देखील त्या मंदीरातल्या पुजाऱ्यांना विचारा असं म्हणून काढता पाय घेतला. त्यांच्या या वागण्यावर काय बोलावं हा एक वेगळाच प्रश्न अभयसमोर होता. "आलोय तर देवदर्शन करूनच पुढे जाऊयात" अभय. "हो जाऊयात की तेवढंच प्रसन्न वाटेल"समिधा. देवदर्शन झाल्यावर पुजाऱ्यांनी प्रसाद दिला आणि म्हणाले " गावात नवीन वाटतं, कोणाकडे आला म्हणायचं?"." नमस्कार, मी अभय साठये आणि ही माझी पत्नी समिधा, माझी बदली नुकतीच ह्या भागात झालिये. आमच्या कंपनीने या गावातील एक वाडा आम्हाला रहायला दिला आहे. त्यामुळे तिकडेच चाललो होतो"अभय. "हो का, अरे वा! आनंद आहे. पण माझा आग्रह म्हणा किंवा विनंती पण आजची रात्र इथेच घालवावीत अशी माझी इच्छा आहे, सकाळी आवरुन तुम्ही निघलात तरी चालेल. इथे मी एकटाच असतो. स्वयंपाक देखील करून झाला आहे. मी लगेचच पानं वाढतो. जेवा आणि मग आराम करा." आता त्यांच्या ह्या आग्रहावर दोघेही नाही म्हणूच शकले नाहीत व ते ती रात्र तिथे काढण्यासाठी तयार झाले. दोघेही थकले होते त्यामुळे जेवण झालं की लगेच झोपले. सकाळी काकड आरतीने त्यांना जाग आली. आवराआवर करून लगेचच निघायच्या बेतात दोघे होते तेवढ्यात गुरुजी तिथे आले. "बरं वाटलं काल थांबलात. मला स्वतःच मुलबाळ नाही त्यामुळे कोणी लहान दिसलं की त्याची काळजी घेण्याचा, सहवास उपभोगन्याचा मोह सुटत नाही ओ. बरं माझं सुरुचं असतं तुम्ही सांगा कोणता वाडा म्हणालात?"

"अं काका आपटे वाडा." " काय? आआआपटे वाडा. बाळा. अरे नका जाऊ तिथे रहायला. तिथे भुताटकी आहे म्हणे. नका जाऊ तिथे." "अहो काका भुताटकी वगैरे सगळे गैरसमज असतात, आणि दिलेल्या जागेत रहावं तर लागेलच त्यामुळे तुम्ही फक्त वाट सांगा आम्ही जाऊ तिथे.शेवटी स्वानुभवाशिवाय विश्वास ठेवणं निव्वळ मुर्खपणा आहे. पुजाऱ्यांनी बराच प्रयत्न करूनही अभयने तिथे राहण्याचा निर्णय घेतला व तो समिधाला घेऊन तिथुन काही लागलंच तर नक्की सांगेन ह्या आश्वासनावर निघाला.

   आपटे वाडा. तशी बरीच जुनी पण भक्कम वास्तू. अगदी प्रशस्त अंगण. मागे परसदार. दोन खोल्या ओसरी व स्वयंपाकघर अशी अगदी सुंदर वास्तू. पाहताच क्षणी समिधाला आवडली. वाड्याबाहेर एक मोठं वड़ाचं झाड होतं व त्याखाली कट्टा. अगदी हवेशीर जागा. सामान उतरवून घेण्याचं काम झालं होतं त्यामुळे समिधा वाडा जाणून घेण्यात रमली होती.

    समिधाला व अभयला वाड्यात रहायला येऊन आठवडा झाला. हे आठ दिवस घर लावण्यातच गेले त्यामुळे दोघेही रात्री जेऊन लगेचच झोपायचे. शुक्रवार होता तो. तहान लागली म्हणून समिधाला जाग आली पण अभय शेजारी नव्हता. इतक्या रात्री हा कुठे गेला म्हणून जरा घाबरूनच ती उठली. बाहेरच्या खोलीत पाहिलं, आत किचनमध्ये सगळीकडे पाहिलं, आतल्या खोलीत पाहिलं पण अभय कुठेच दिसेना. आता समिधा जरा जास्तच घाबरली. त्याच विचारात असताना तिला खिड़कीतून बाहेर वडाच्या झाडाखाली काहीतरी हालचाल जाणवली. नीट निरखुन पाहिलं आणि समिधा जागीच चक्कर येऊन पडली. दिवस उजाडला. समिधाला उठायला काहीसा उशीरच झाला होता. अर्धवट झोपेमुळे तिचं डोकं जड झालं होतं. तशीच ती उठून केस बांधत बाहेर आली तर अभय किचन मध्ये काहीतरी करत होता. "काय मॅडम. झोप वाढलिये आजकाल तुमची. ही घ्या तुम्हाला आवडते तशी अगदी गरमागरम कॉफी. आज नाश्ता मी बनवतोय. उपमा. तुला आवडतो तसाच अगदी." अभय इतकं बडबडत होता आणि समिधा एकटक खिडकीतून बाहेर त्या झाडाकडे पाहत होती. काल रात्री तिने अभयला एका स्त्रीसोबत गप्पा मारत बसलेलं पाहिलं होतं ते ही मध्यरात्री पण त्याच्या चेहऱ्यावर जराही त्या गोष्टीची जाणीव नव्हती. " हा मुद्दाम मला इथे घेऊन आलाय का? काय सुरु आहे हे आज मीच शहानिशा करेन पुरावे गोळा करेन आणि मग जाब विचारेन." ओय समू. अगं काय? कसल्या विचारात आहेस?" अभय. "काही नाही.तुझं आवरुन झालं असेल तर तू निघ." असं म्हणून समिधा आतल्या खोलीत निघून गेली. समीधाचे मूड बदलतात हे अभयला नवीन नव्हतं त्यामुळे तो देखील विषय न वाढवता नाश्ता करून निघून गेला.संध्याकाळी आला तेव्हा समिधाने कुकर लावून बाकी स्वयंपाक देखील करून ठेवला होता. दोघेही जेवले व समिधा आवराआवर करायला किचन मध्ये गेली. खरंतर ती अभयच्या झोपण्याची वाट पाहत होती. तिने थोडा उशीर लावला. काही वेळाने ती आत गेली तेव्हा अभय गाढ झोपेत होता. "आता आज काय तो सोक्षमोक्ष लागेल" असं म्हणत समिधा रात्रभर जागी राहिली. सकाळी ५:३० च्या आसपास तिचा डोळा लागला ते थेट ८ वाजता जाग आली. "काल रात्री तर अभय कुठेच गेल नाही, पण एकदिवस नक्की जाईल.मला तयारीत रहायला हवं."समिधा. आठवडा असाच गेला पण अभयचं वागणं अगदी पुर्वीसारखं होतं. पुन्हा शुक्रवार आला पण नेमका समीधाचा डोळा लागला. एक तासाभराने सहज तिला जाग आली तर शेजारी अभय नव्हता. म्हणजे पुन्हा तेच असं म्हणत ती खिडकीजवळ आली.अभय समोर दिसत होता. तो कोणाशी तरी गप्पा मारत होता. अगदी आपलेपणाने. पण समोर कोणीच नव्हतं. बर असंही नाही की त्याला झोपेत बोलण्याची वगैरे सवय होती, आणि शुक्रवारच का? आणि मीच का? रात्रभर समिधा याच विचारात होती. तिला अभयची आता जास्त काळजी वाटत होती. अचानक तिला गुरुजींची आठवण झाली.आता तेच मला मदत करू शकतात असं तिला वाटलं. सकाळी उठल्यावर ती अभयला म्हणाली की मला मंदिरात सोड इच्छा झालिये देवदर्शनाची. "चालेल चल की." ते दोघे मंदिरात येऊन पोहोचले देवदर्शन झालं. समिधा म्हणाली "मला जरा थांबायचं आहे जरा बरं वाटतंय इथे, तू गेलास तरी चालेल. मी जाईन घरी एकटी किंवा दुपारी जेवायला येशील तेव्हा सोबतच घरी जाऊ.." मग अभय देखील गडबडीत असल्याने हो म्हणून निघून गेला. समीधाने मुद्दाम अभयला काही सांगितलं नव्हतं ज्यामुळे तिला गुरुजींशी बोलायला मोकळा वेळ मिळावा. समीधाने सगळं काही अगदी सविस्तरपणे गुरुजींना सांगितलं तशी त्यांना या सगळ्याची खात्री होतीच पण नक्की काय हे सांगणं केवळ अशक्य. त्या ठिकाणी काहीतरी आहे अशी फक्त अफवा होती पण कोणीच काहीच अनुभवलं नव्हतं.  "मी खूप लहान असल्यापासून ती वास्तु बंद आहे हे पाहतोय आणि अफवांमुळे कोणी रहायला देखील आलं नाही, पण खूप वर्षापुर्वी तिथे एक कुटुंब रहायचं जे अचानक एकदिवस नाहीसे झाले असं काही कानावर आलंय पोरी. त्या दिवसापासून गावात त्या घराविषयी जरा भीतीच आहे. फक्त एक म्हातारा आहे ज्याला बऱ्याचदा त्या घराकडे लपून लपून पाहताना खूप जनांनी पाहिलंय. तो कोण आहे ते पण माहीत नाही पण तो कुठं असतो मला माहीत आहे आपण लगेच तिकडे जाऊयात.आज काय तो ह्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागूदे."दोघेही निघाले पण अंदाज होता त्यामुळे तो माणूस तिथे नव्हता. आता काय करावं ह्या विचारात दोघे होते तेव्हा अचानक कुत्र भुंकण्याचा आवाज यायला लागला. तो माणूस धावत धावत आला व एका झाडामागे लपला. दोघेही मागच्या बाजूने त्याच्या हालचाली टिपत होते. त्यावरून तो वेडा असावा हे स्पष्ट जाणवत होतं. त्याच्याशी कसं बोलावं ह्या विचारात असताना चुकून त्या माणसांचं समिधाकडे लक्ष गेलं आणि तो अचानक ओरडायला लागला. "निघून जा तिथून निघून जा.. ती त्याला घेऊन जाईल नाहीतर, निघून जा" आणि पुन्हा धावत धावत निघून गेला. झाल्या प्रकाराने समिधा पुरती घाबरली होती. कोण आहे ती आणि का, कश्यासाठी अभयच्या मागे लागलीये. ती का आणि कुठे घेऊन जाईल अभयला. विचारांनी भेदरलेली समिधा तिथेच चक्कर येऊन पडली. साधारण तासाभराने तिला जाग आली तेव्हा अभय तिच्या समोर होता. ती क्षणार्धात त्याला बिलगली. तिला इतकं घाबरलेलं अभयने कधीच पाहिलं नव्हतं. गुरुजींनी झाला सगळा प्रकार अभयला सांगितला होता त्यामुळे त्याला समिधाच्या भीतिमागचं कारण माहीत होतं. ते दोघे अजूनही मंदिरातच होते.तशी वर्दळ अशी नाही पण लोकांची ये जा सुरुच होती. चालता चालता रघुकाकांच्या कानावर अभयचं बोलणं पडलं. रघुकाका म्हणजे एक ७५ वर्षे गाठलेलं गावातील वयस्कर व्यक्तिमत्व. त्यांच्या पिढीतील मोजकीच माणसं गावात होती त्यामुळे रघुकाकांना गावात बराच मान होता. रघुकाका ते बोलणं ऐकून काहीसे घाबरले पण समिधाची अवस्था पाहून त्यांनी मदत करण्याचा निर्णय घेतला. घडला प्रकार ऐकून ते काहीसे घाबरले. रघुकाकांनी खरंतर समिधा अभय गावात आले त्याच दिवशी त्यांना खरी परिस्थिती सांगायला हवी होती कारण त्या दिवशी पारावरून आपटे वाड्याविषयी काही न सांगता निघून जाणाऱ्यांमध्ये रघुकाका देखील होते. त्यांच्या वागणुकीबद्दल प्रथमतः त्यांनी माफी मागितली व मदतीचा हात पुढे केला. रघुकाका सांगू लागले.

     एक ६० वर्षापुर्वीची गोष्ट आहे ही. कांता. सहदेव पाटलांची एकुलती एक लाडकी पोर. जितकी सुंदर आणि सुशील तितकीच हट्टी. एकुलती एक त्यात आईविना पोर म्हणून पाटलांनी तिचे सगळे लाड पुरवले. तिला हवं ते तिने मागण्याआधी तिच्या हातात असायचं. कांताची गावात एकच मैत्रीण होती. सावित्री. सावित्रिचं शिक्षण सगळं मुंबईला झालं होतं. दोन एक वर्षापुर्वी सावित्री आपल्या परिवारासोबत इथे गावाकडे रहायला आली होती. आई वडील व मोठा भाऊ असं चौघांचंच आनंदी कुटुंब. रहायला आल्यावर लगेचच कांताची ओळख झाली आणि काही दिवसांत दोघी जिवलग मैत्रीणी झाल्या. दोघी सतत एकत्र असायच्या. एकाच वयाच्या होत्या त्यामुळे गप्पा, गोष्टी, मजा, मस्करी अगदी सगळं सगळं सोबत असायचं अगदी खाणंपिणं देखील. राघव सावित्रीचा भाऊ. काहीसा शांत. अबोल. माणसांची ओळख करून घेण्यापेक्षा माणसं जाणून घेणारा. मनाचं सौंदर्य जपणारा. मुलींशी चार हात लांब. त्यामुळे तो असूनही त्यांच्यात कमीच असायचा. पण त्यातही एक दोनदा राघवची व  कांताची नजरानजर झाली आणि कांताच्या आयुष्यात आणखी एक स्वप्न घर करू लागलं. सावित्री व्यतिरिक्त राघव हे देखील एक कारण होतं ज्यासाठी कांता सावित्रीकडे येऊ लागली. तशी कांता बोलकी होती त्यामुळे राघव देखील त्यांच्या गप्पांमध्ये सामील होऊ लागला. त्या दोघिंसोबत वेळ घालवू लागला. बघता बघता दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले पण व्यक्त करणं इतकं सोपं नव्हतं. तो दिवस. शुक्रवार. कांताने आज ठेरवलेलं ती आज सगळंकाही राघवला सांगेल व त्याच्याकडून लग्नाचं आश्वासन घेईल ज्यामुळे तिला त्याच्यासोबत जन्मभर राहता येईल. कांताने आपल्या सुंदर अक्षरात एक चिठ्ठी लिहिली व ती सावित्रीच्या घराच्या दिशेने निघाली. ती सावित्रीच्या म्हणजेच राघवच्या घराबाहेरील पाराजवळ पोहोचली पण दरवाजाला कुलुप होतं. कांताला वाटलं घरातील सगळेजण कुठे बाहेर गेले असावेत. येतील काहीवेळात. ती आपल्या प्रेमाच्या माळेत एक एक क्षण गुंफत राहिली. पुर्ण दिवस गेला, रात्र झाली तरीही राघव किंवा घरातील कोणीच तिथे आलं नाही. आश्चर्याची गोष्ट ही कि त्या दिवसापासून पाटील देखील कुठेतरी निघून गेले. पोर एकटीच तिथे बसून होती केवळ तिच्या प्रेमासाठी. बऱ्याच जणांनी तिला घरी जाण्याबद्दल सांगितलं, काहींनी तर जेवणाची देखील सोय केली पण तिने अन्नपाणी घेतलं नाही. अखेर काही दिवसांनी तिने तिथेच जीव सोडला. पाटलांचा काहीच पत्ता नव्हता. गावाची लेक म्हणून गावातील काही माणसांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर सावित्रीचा परिवार आणि पाटील कोणाचाच थांगपत्ता लागला नाही अगदी आजवरही. रघुकाकांच्या डोळ्यांतून नकळत पाणी ओघळलं. यावर आता तो माणूसच काहीतरी सांगू शकेल कारण त्याविषयी माहीत असणारा सध्या एकच व्यक्ति डोळ्यांसमोर होता. पुढे काही जुजबी चर्चा करून समिधा व अभय घरी निघाले. पुढे आठवडाभर तरी काही धोका नव्हता तरीही हे सावट इतक्यात आपला पाठलाग सोडणार नाही हे नक्की होतं. पुढील २-३ दिवस अभयने त्या माणसाला बऱ्याच ठिकाणी शोधलं. तिसऱ्या दिवशी गुरूजींना व अभयला तो गावाबाहेर एका मंदिरामागे दिसला. अभयला गुरुजींनी बोटानेच दाखवलं. तो काहीसा घाबरत पण त्या माणसाजवळ गेला. तो जरा आज वेगळाच भासला म्हणजे गुरुजींनी व समिधाने सांगितल्याप्रमाणे तो वेडा नक्कीच वाटला नाही. "मला माहीत होतं तू माझ्याजवळ येशील,तरी बराच लवकर आलास" हे ऐकून अभय थोडा चकित झाला पण म्हणाला कोण तुम्ही आणि त्या वाड्याबद्दल काय माहीत आहे तुम्हाला?

    त्या वाड्यात जी व्यक्ति तुम्हाला दिसतेय ती दूसरी तिसरी कोणी नसून माझी मुलगी आहे. कांता. इतक्यात रघुकाका पुढे सरसावले. "पाटील तुम्ही, आणि इतके वर्ष कुठे होता तुम्ही?

"मी भटकतोय रानावनांतून, जंगलातून, मला मुक्ती हवी आहे. पण..पण माझी पोर अडकलिये तिथे आणि तिच्या ह्या अवस्थेला केवळ मी जबाबदार आहे" आणि तो व्यक्ति रडू लागला. " पण पाटील तुम्ही काय केलंत? कांता तर त्या आपटयांच्या राघवामुळे." आणि ते शांत झाले.

" हो. पण तो तिथे न येण्याला मीच जबाबदार होतो. मी संपवलं सगळ्यांना. त्या परिवारालाच. माझी कांताला फ़ितवणाऱ्या त्या पोराला मी कसा सहन करू? ह्या भीतीने"

"काय? पण म्हणजे नेमकं काय घडलं त्यादिवशी" अभयने प्रश्न केला. "कांताचं सावित्रीकडे जाणं वाढलं होतं पण पोर खुश आहे ह्या गोष्टीने मी देखील आनंदी होतो पण अचानक एकदिवस माझ्याच एका माणसाने कांताला त्या पोरासोबत पाहिलं. माझी तळपायाची आग मस्तकात गेली आन मी संपवलं त्या परिवाराला. तो दिवस गुरुवारचा होता. त्याच रात्री कांता माझ्याकडं आली आणि मला म्हणाली " बापू मला सावित्रीच्या भावासोबत लग्न करायचंय. मी कांताला कधीच नाही म्हटलो नव्हतो तेव्हा मला मेल्याहून मेल्यासारखं झालं. माझ्या पोरीचं सुख मी स्वतःच हिरावून घेतलं होतं. दुसऱ्या दिवशी कांता एक पत्र घेऊन राघवच्या घराकडे गेली पण घराला कुलुप होतं ती तिथेच बसून राहिली त्याची वाट पाहत. मी झाडाआडून सर्वकाही पाहत होतो. दिवस संपला, रात्र झाली, पोर उपाशी म्हणून मी जेवण पाठवलं पण तिने अन्नपानी टाकलं. मी तिच्या नजरेला नजर मिळवू शकलो नाही फक्त दुरुनच तिला पाहत राहिलो. अजूनही कांता शुक्रवारी तिथे येते राघवाला भेटायला आणि तुमच्यात ती आता राघवाला शोधतेय."

" अरे देवा. म्हणजे आता ती मला घेऊनच जाईल."

"नाही अभय नाही, आपण यावर काहीतरी उपाय काढू."रघुकाका

"पण तुम्ही कोणीही याबद्दल समिधाला काहीही सांगू नका,आणि गुरुजी यावर काही उपाय निघेल का?"अभय

" माझ्या माहितीनुसार कांताच्या शरीराला गावातील लोकांनी अग्नि दिला पण तिच्या शरीरावर अंत्यसंस्कार झाले नसावेत त्यामुळे पाटील तुमच्या हातून हे विधी संपन्न झाले तर तिला नक्कीच सुटका मिळेल"

त्यानंतर विधिवत सर्व विधी संपन्न झाले. पाटील त्या दिवसापासून गावात दिसले नाहीत. पुढच्या शुक्रवारी समिधाला रात्री अचानक जाग आली. पण अभयला शेजारी पाहून तिला खरोखर बरं वाटलं. पाणी प्यायला म्हणून ती बाहेर आली तेव्हा पारावर कांताला पाहून ती एकटक पाहत राहिली. एका प्रेयसीचं आपल्या प्रियकरावर एका बापाचं आपल्या पोरीवर असणारं नितळ, निर्मळ प्रेम ह्या जगात पुन्हा एकदा अमर झालं.