निस्वार्थ प्रेम भाग ७#मराठी कादंबरी

Avinash got a important lession for lifetime

मागील भागाचा सारांश: सरस्वती अविनाश सोबत कॉलेजमध्ये न बोलल्याने त्याच्या मनात राहून राहून एकच येत होतं की ही आपल्या सोबत का बोलली नसेल? या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी सरस्वतीला भेटणे गरजेचे होते. दिगंबरने अविनाशला सांगितले होते की इच्छा असेल तर मार्ग सापडतोच त्याच प्रमाणे अविनाश कंपनीत काम करत असताना सरस्वतीच्या वडिलांनी काही सामान घरी पोहचवण्यासाठी अविनाशला घरी जाण्यास सांगितले. सरस्वतीला भेटण्याची आयतीच संधी अविनाशकडे स्वतःहून चालून आली होती. 

आता बघूया पुढे....

मी एकसाथ सरुला बरेच प्रश्न विचारल्याने ती बिचारी पुरती गोंधळून गेली होती.थोडा वेळ पॉज घेऊन ती म्हणाली," मला माहीत आहे की मी असे वागल्याने तुझ्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले असतील, तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी देईल, त्याआधी मला एक सांग की आपली मैत्री इतकी कच्ची आहे का? ती इतक्यात संपेल किंवा मी तोडून टाकेल."

"आपली मैत्री माझ्या बाजूने तरी खूप पक्की आहे, तु माझ्या आयुष्यातील माझी पहिली मैत्रीण आहेस, आपली मैत्री मी सहजासहजी तुटू देणार नाही.पण माझ्या मनात शंका आली म्हणून मी विचारले." मी उत्तर दिले

सरु म्हणाली," मी पण आपली मैत्री तुटू देणार नाही. झालं असं की काल मी तुझी ओळख माझ्या मित्र मैत्रिणींसोबत करून दिली, तु तेथून निघून गेल्यावर त्या तुझी खिल्ली उडवत होत्या म्हणजे तुझ्या बोलण्यात, राहण्यात कसा गावठीपणा आहे? असं काहीतरी बोलत होत्या. मला ते आवडले नाही.मी तुला आधीपासून ओळखत असल्याने तु खरा कसा आहेस? किती हुशार आहेस? हे फक्त मला माहीत आहे, माझ्या मैत्रिणींना या सर्वाची कल्पना नाहीये म्हणून त्या तुझ्या बाबतीत अस काही बोलत असतील, पण त्यांना कुठे माहीत आहे की जेव्हा कॉलेजमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा सुरू होतील आणि तेव्हा तु त्या स्पर्धेत भाग घेऊन जिंकशील आणि पूर्ण कॉलेज तुझे कौतुक करेल. काही लोक असे असतातच ना की ज्यांना बोलून आपले महत्त्व समजत नाही तर काहीतरी करून दाखवून द्यावे लागते. माझ्या मैत्रिणीही अश्यातल्याच आहे. आता तर तु आमच्या कंपनीत कामही करतोस, हे जर माझ्या मैत्रिणींना कळलं तर त्या उगाच काहीतरी गॉसिप करत बसतील. आपण जर दोघे कॉलेजमध्ये बोललोच नाहीतर तुझा आणि त्यांचा संबंधच येणार नाही म्हणून मला अस वाटतंय की आपण कॉलेजमध्ये बोलायला नकोय. तुला काय वाटतंय?"

यावर मी म्हणालो,"मला माझी हुशारी तुझ्या मैत्रिणींना दाखवण्यात काडीचाही रस नाहीये. तुला वाटतं असेल की जर तु माझ्यासोबत कॉलेजमध्ये बोललीस तर तुझ्या मैत्रिणींना चघळायला विषय भेटेल तर माझ्याशी नको बोलूस, तुला तुझं वागणं पटत असेल तर तसच कर. ह्या कारणासाठी मी काही तुझ्याशी मैत्री तोडणार नाही. कॉलेजमध्ये आपली भेट किंवा बोलणं नाही झालं तरी दर रविवारी आपली भेट घरी होऊ शकेल."

सरु म्हणाली," दर रविवारी आपली भेट घरी होईल, ती कशी काय?"

मी म्हणालो," मी राजनची रविवारी गणिताची ट्यूशन घेणार आहे, त्यानेच स्वतःहून मला ट्यूशन साठी विचारलं."

सरु म्हणाली," ते सगळं ठीक आहे पण तु आराम कधी करशील? इतर दिवस सकाळी कॉलेज, त्यानंतर कंपनीत जातोस, आठवड्यातून एक दिवस तरी सुट्टी हवी ना?"

मी म्हणालो," सुट्टी हवी पण ठीक आहे, रविवारी दोन तीन तासांचा तर प्रश्न आहे."

सरु म्हणाली,"ठीक आहे, जशी तुझी इच्छा"

मी म्हणालो,"काल तुझा सकाळी मूड खराब का होता."

सरु म्हणाली," काही नाही रे असंच"

मी म्हणालो," तुला मला सांगायचं नसेल तर नको सांगूस मी अगदी सहजच विचारलं"

सरु म्हणाली," अगदीच सांगायचं असं काही नाहीये, फक्त मी हे सांगितल्यावर तुझी प्रतिक्रिया चांगली असू देत."

मी म्हणालो," चांगली प्रतिक्रिया म्हणजे? तु सांग मग बघू."

सरु म्हणाली," येत्या रविवारी माझे फ्रेंड्स ट्रेकिंगला जाणार आहेत, काल मी बाबांकडे ट्रेकिंगला जाण्याची परवानगी मागितली तर बाबा माझ्यावर खूप चिडले आणि मला ट्रेकिंगला जाण्यासाठी परवानगी नाकारली. आई म्हणाली की बाबा वेगळयाच टेन्शन मध्ये होते म्हणून ते माझ्यावर चिडले.बाबांचे म्हणणे आहे की मित्र मैत्रिणींसोबत असं फिरून टाईमपास करण्यापेक्षा कंपनीत येऊन काम शिक म्हणून. मी कुठेही जायच म्हटलं की बाबा तोच विषय पुढे करतात.मी त्या विषयाला वैतागली आहे."

मी म्हणालो," मी यावर चांगली प्रतिक्रिया देणार नाही असं का तुला वाटलं?"

सरु म्हणाली," actually मी जेव्हा अश्या काही विषयावर माझ्या मैत्रिणींसोबत बोलते तेव्हा त्या म्हणतात की तुझे बाबा खूप कडक शिस्तीचे आहेत, तु त्यांच्याकडे परवानगी कशाला मागतेस? तुझे हे वय कंपनीत काम करण्याचे आहे का? तुमच्याकडे एवढे पैसे असताना सुद्धा तुला पॉकेटमनी किती कमी मिळतो? मला आई बाबांविरुद्ध भडकवून देतात मग पुढचे काही दिवस माझे खूप वाईट जातात.सुरवातीला मला त्यांचं बोलणं खरं वाटायचं, मी आई बाबांचा रागराग करायचे, पण नंतर हळूहळू कळलं की ह्या आपल्या डोक्यात काहीतरी घालून देतात आणि आपण त्याप्रमाणे वागतो."

मी म्हणालो," माझं ह्यावर मत विचारशील तर तुझे बाबा जे बोलत आहेत ते चुकीचे नाही, तुला जर पुढे जाऊन कंपनी चालवायची असेल तर तुला कंपनीतील सगळी छोटी मोठी कामे यायला हवी आणि ही कामे तु एका दिवसात शिकू शकणार नाहीस, त्याला खूप वेळ लागेल. आत्तापासून तु हळूहळू काम शिकलं तर पुढे जाऊन तुला अडचण येणार नाही. कंपनीतील विजय दादा मला सांगत होते की तुझ्या बाबांनी खूप कष्टातून ही कंपनी उभारली आहे. तुला भाऊ नाहीये म्हणून तुझ्या बाबांच्या तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि मला वाटत की ते काही चुकीचे नाहीये. तुला लग्न करून चूल व मूल सांभाळायचे असेल तर तस बाबांना स्पष्ट सांग. जर समजा कंपनी सांभाळायची असेल तर तुझ्या बाबांचं ऐक. तु खूप नशीबवान आहेस की तु अश्या घरात जन्माला आली आहेस.तुझे बाबा तुला मुलाप्रमाणे वाढवत आहे नाहीतर बाहेर जगात फिरून बघ बऱ्याच मुलींचे वयाच्या अवघ्या पंधराव्या सोळाव्या वर्षी लग्न लावून देत आहेत. तुझ्या मैत्रिणी एका वेगळ्या वातावरणात वाढल्या आहेत म्हणून त्यांचे विचार वेगळे आहेत. तुझे बाबा गरीबीतून मोठे झाले आहेत म्हणून त्यांना पैश्यांची किंमत आहे आणि हीच किंमत तुला असावी म्हणून ते तुला जास्त पॉकेटमनी देत नसतील."

सरु म्हणाली," अविनाश तु किती भारी बोलतो आहेस, तु जरा जास्तच समंजस आहेस, इथून पुढे मी माझ्या आयुष्यातील प्रॉब्लेम्स तुझ्या सोबतच शेअर करेल. मला पटेल असंच तु बोलतोस."

मी म्हणालो," तुला राग येणार नसेल तर एक सांगतो, तु ज्यांना तुझ्या मैत्रिणी मानतेस त्या तुझ्या योग्य नाहीयेत अस मला वाटतंय. मित्र मैत्रिणी सुख दुःख वाटण्यासाठी असतात, आई बाबांसोबत संबंध बिघडवण्यासाठी नाही."

सरु म्हणाली," मलाही माझ्या मैत्रिणी कधी कधी पटत नाहीत पण त्या माझ्या शाळेपासूनच्या मैत्रिणी आहेत, त्यांच्या सोबत माझा एक असा कम्फर्ट झोन तयार झाला आहे. आता परत कोण नवीन मैत्रिणी शोधू? त्यापेक्षा बऱ्या आहेत."

मी म्हणालो," तु त्यांच्या सोबत मैत्री तोडू नकोस पण जरा त्यांच्या पासून दोन हात दूर रहा. आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव, 'ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे'

मी सरु सोबत बोलत असतानाच सरुच्या आईने जेवण करण्यासाठी मला खाली बोलावले. होस्टेलवर पोहचायला उशीर नको व्हायला म्हणून मीही पटकन खाली गेलो व जेवण करायला सुरुवात केली.दोन दिवसांनी घरचं जेवण खायला भेटलं म्हणून खूप बरं वाटलं होतं. जेवण झाल्यानंतर मी होस्टेलला जायला निघालो तेव्हा आत्त्यांनी मला विचारले, "तु आता होस्टेलला कसा जाशील? पायी जायला होस्टेल इथून बरेच दूर आहे, मी ड्रायव्हरला सांगते तो तुला सोडून देईल."

मी नाही म्हणत असताना सुद्धा आत्त्यांनी बळजबरी मला होस्टेलला सोडवण्यासाठी ड्रायव्हरला पाठवले. मी होस्टेलवर परतल्यावर दिगंबरला सरु सोबत झालेले संपूर्ण बोलणे सांगितले.यावर दिगंबर म्हणाला, "ही सरस्वती मला जरा वेगळीच वाटत आहे, तिची एकदा तरी भेट घ्यावी लागतेय. तुझ्या म्हणण्यावरून तरी ती चांगली मुलगी वाटत आहे."

मी म्हणालो," मी सरुला विचारतो मग आपण तुझी व तिची भेट घडवून आणू."

अशाच रीतीने एक आठवडा निघून गेला. कॉलेजमध्येही आता मन रमायला लागले होते, लेक्चर नसल्यावर मी लायब्ररीत जाऊन पुस्तके वाचू लागलो.सरु कॉलेजमध्ये दिसली असता मीही तिच्याकडे बघत नव्हतो.दिगंबर मोकळा वेळ कॉलेजमध्ये इतरत्र मैदानावर किंवा कुठेही घालायचा आणि मी मात्र सतत लायब्ररीत जायचो.मला लायब्ररीत बसून पुस्तके वाचायला खूप आवडायची, वेळ कसा निघून जायचा हेही कळत नव्हते. कॉलेज मधून आल्यावर जेवण करून कंपनीत जायचे, कंपनीतून आल्यावर जेवण करायचे आणि थोडाफार अभ्यास करायचा असे माझे दिवसाचे चक्र सुरू झाले होते.

रविवारी सरुच्या घरी राजनची ट्युशन घ्यायला जायचे असल्याने रोज प्रमाणेच सकाळी लवकर उठायला लागले होते.सरु म्हणत होती ते खरे होते कारण आपल्या शरीराला एक दिवस तरी आरामाची गरज असते. आता तर मी राजनला ट्युशन घ्यायला होकार दिला होता,आता नाही म्हणता येणार नव्हते. रविवारी आवरून झाल्यावर मेसमध्ये जाऊन ब्रेकफास्ट केला व सरुच्या घरी जायला निघालो, घर थोडे जरा लांबच होते तरी मी पैसे वाचतील म्हणून पायीच निघालो. आता पायी चालण्याची सवय होऊन गेली होती. सरुच्या घरी त्या दिवशी नेमके कोणीतरी पाहुणे आलेले होते. राजन मला त्याच्या खोलीत घेऊन गेला, त्याचा गणिताचा थोडा अभ्यास घेतल्यावर माझ्या असं लक्षात आले की याचा गणिताचा पायाच कच्चा आहे, राजनला पाठांतर करण्याची सवय होती, तो समजून घेऊन लक्षात ठेवत नव्हता. राजनला गणित शिकवण्यासाठी मला बरीच मेहनत घ्यावी लागणार असे दिसत होते. 

साधारणपणे दोन तास मी राजनला गणितं शिकवली, उजळणी घेतली आणि आठवडाभर काही सूत्रे पाठ करण्यास सांगितली. राजनला शिकवून झाल्यावर पोटात कावळे कोकायला लागले होते, जोराची भूक लागली होती. राजनने मला सांगितले, "काकूने तुला जेवण करून जायला सांगितले आहे, चल आपण खाली किचनमध्ये जाऊन जेवण करू, मलाही खूप भूक लागली आहे."

आज पाहुणे आलेले असल्याने काहीतरी स्पेशल खायला मिळणार म्हणून मी मनातून प्रचंड खुश झालो होतो. घरात पाहुणे असल्यामुळे सरु सोबत आज काही गप्पा होणे शक्य नाही असेच दिसत होते. राजन मला घेऊन किचनमध्ये आल्या तेव्हा किचनमध्ये फक्त स्वयंपाक करणाऱ्या मावशी होत्या, त्यांनी मला सांगितले की आज चिकन बनवले आहे. पण मी तर नॉनव्हेज खात नव्हतो. आमच्या घरी कोणीच नॉनव्हेज खात नसल्याने नॉनव्हेज कसं दिसतं हेही मला माहीत नव्हतं. मी नॉनव्हेज खायला नकार दिला. मावशी म्हणाल्या की आता घरात नॉनव्हेज सोडून काहीच खायला नाहीये.

यावर मी सांगितले की असुद्यात मी मेसमध्ये जाऊन जेवण करेल. मी राजनला सांगून घराबाहेर पडलो, घड्याळात बघितले तर होस्टेलला पोहोचेपर्यंत मेसची जेवणाची वेळ टळून जाणार होती. भूक तर खूप लागली होती आणि शिवाय पायी चालत असल्याने पोटात खड्डा पडतच होता. रस्त्याने चालता चालता एक हॉटेल दिसले तिथे वडापाव, पुरीभाजी, मिसळपाव असे विविध पदार्थ होते, त्या सर्वांकडे बघून तोंडाला पाणी सुटले होते. मनात विचार आला की आपण पुरीभाजी खावी म्हणून मी पुरीभाजीची किंमत विचारली तर असे कळले की पुरीभाजीची किंमत जास्त आहे, वडापावची किंमत कमी असल्याने तो खाणे मी पसंत केले. वडापावने आपल्या पोटाची भूक भागणार नाही हे माहीत असून सुद्धा पैसे वाचावेत म्हणून मी वडापावच विकत घेतला, वडापाव खाल्ल्यावर मी दोन जग पाणी प्यायलो जेणेकरून भूक लागणार नाही. त्या दिवसापासून मी एक धडा घेतला की कुठेही जायचे असेल तर पहिले आपले आपण जेवण करून जावे, जेवणासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहु नये. 

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all