निस्वार्थ प्रेम भाग ५ #मराठी कादंबरी

Digambar is talking with avinash about his past

मागील भागाचा सारांश:अविनाशने कॉलेजचा पहिला दिवस कसा गेला याबद्दल सांगितलं. कॉलेजच्या पहिल्या दिवशीच दिगंबर व अविनाशची भेट होते, ते दोघे एकाच होस्टेलला रहायला असतात. अविनाश अभ्यासाच्या बाबतीत अति सिंसिअर असतो तर दिगंबर जेमतेम असतो तरीही अविनाशच दिगंबर सोबत सूत जुळू शकेल अस त्याला वाटतं. कॉलेज सुटल्यानंतर अविनाश कंपनीत कामासाठी जातो, दोन ते तीन किलोमीटर अंतर तो पायी जातो. सरुचे बाबा अविनाशची ओळख तेथील विजय दादांसोबत करून देतात. अविनाशला कंपनीही आवडते आणि कॉलेजही आवडते.

आता बघूया पुढे.....

रात्री झोपताना मला गजर लावायची सवय होती, घरून निघताना मी गजरचे घड्याळ घ्यायला विसरलो नाही, त्या घड्याळाने माझी शाळेपासून तर आत्तापर्यंत पुरेपूर साथ दिली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी गजर वाजला, अस कधीच झालं नव्हतं की गजर वाजला आणि मी उठलो नाही पण आदल्या दिवशी कंपनीत काम करून इतका दमलो होतो की दुसऱ्या दिवशी गजर वाजला तरी उठायची इच्छा होत नव्हती,अंग प्रचंड दुखत होते, त्यावेळेसच मी स्वतःला उद्देशून मनातल्या मनात म्हणालो,' अविनाशराव घरून निघताना आपण खूप मोठ्या दिमाखात आई बाबांना म्हणून निघाला होता की मी नोकरी करता करता शिक्षण घेईल, तुम्ही माझी काळजी करू नका, पण हे एवढे सोपे नाही, खूप कठीण आहे पण काय करणार? कष्टांना दुसरा पर्याय नाही.आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर कष्ट करावेच लागतील, असे शस्त्र टाकून देऊन चालणार नाही. उठा आणि आपल्या कामाला लागा. मनाची पूर्ण तयारी असेल तर शरीरही साथ देईल.'

हे सर्व स्वतःला सांगून झोपेतून उठलो आणि अंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेलो तर गरम पाणी नव्हते, थंड पाण्यानेच अंघोळ करावी लागली. थंड पाण्याने अंघोळ केल्याने अंगात चांगलीच हुडहुडी भरली होती. पुढे जाऊन थंड पाण्याने अंघोळ करायची सवय होऊन गेली होती मग काही थंडी भरली नाही. अंघोळ करुन रुममध्ये येऊन बघतो तर दिगंबर डाराडूर झोपलेला होता. मी त्याला दोन तीनदा आवाज दिला पण महाशय उठायला तयार नाही, शेवटी जवळ जाऊन गदागदा हलवले तेव्हा कुठे जाऊन तो म्हणाला," अव्या झोपू दे रे, एवढ्या सकाळी उठून कुठे झेंडा गाडायला जायचं आहे?"

यावर मी म्हणालो," अरे बाबा, लवकर उठला नाहीस तर कॉलेजला जायला उशीर होईल, अंघोळीला नंबर लागणार नाही."

दिगंबर थोडा चिडून म्हणाला," कॉलेजला जायला पंधरा मिनिटे राहिली की उठव, कॉलेजवरून आल्यावर मी अंघोळ करेल, अंघोळ केल्याशिवाय कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही असं कुठंही लिहिलेलं नाही."

आता यावर मी काय बोलणार होतो आणि काही बोललो जरी असतो तरी काही उपयोग झाला नसता हे माहीत असल्याने मी शांतच बसलो. दिगंबर म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी होते, त्याला जे हवं तो तेच करायचा.

दिगंबरकडे बघून मला प्रश्न पडला की ह्या मुलाने इतक्या चांगल्या कॉलेजला ऍडमिशन का घेतले असेल? पुण्यात येण्यामागे याचा हेतू काय असेल?जर टाईमपास डिग्रीच हवी होती तर ती कुठल्याही कॉलेजला घेऊ शकला असता ना. Actually मी माझ्या शिक्षणाच्या बाबतीत आणि पुढील आयुष्याच्या बाबतीत जरा जास्तच सिरिअस होतो, म्हणून का माहीत नाही पण त्यावेळी मला दिगंबरचे casual attitude पटले नाही.कॉलेजला जायला पंधरा मिनिटे अवकाश होता त्यावेळेस मी त्याला उठवले तेव्हा कुठे तो उठला. पंधरा मिनिटांत त्याने कस आवरलं असेल हे त्यालाच माहीत,पण त्याच्याकडे बघून कोणीही म्हणणार नाही की ह्याने अंघोळ केली नसेल म्हणून.

कॉलेजला जाता जाता मी दिगंबरला म्हणालो, "दिगंबर मी तुला राग येणार नसेल तर एक प्रश्न विचारू का?"

दिगंबर माझ्याकडे बघून म्हणाला," अव्या ज्याला आपण मनापासून मित्र मानतो ना तो काही बोलला तरी आपल्याला राग येत नसतो, तु जे बोलायचं ते बिनधास्त बोल भावा."

"माझा कदाचित तुझ्या बाबतीत गैरसमजही होऊ शकतो पण मी कालपासून बघतोय, तु कॉलेजच्या बाबतीत किंवा तुझ्या भविष्याच्या बाबतीत जास्त सिरिअस दिसत नाहीयेस. तु या कॉलेजमध्ये ऍडमिशन का घेतलेस? पुण्यात येऊन शिक्षण घेण्यामागचा तुझा उद्देश तरी काय आहे?" मी जरा चाचरतच विचारले.

मला वाटलं होतं की दिगंबरला माझ्या बोलण्याचा राग येईल पण अस झालं नाही उलट त्याने हसून उत्तर दिले, " माझं attitude बघून कुणालाही वाटूच शकतं की मी माझ्या भविष्याच्या बाबतीत सिरिअस नसेल, माझ्या आयुष्याची वास्तविक कथाच खूप वेगळी आहे.मी माझ्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल फारसं कुणाला काही सांगत नाही, माहीत नाही का? पण तुला सगळं खरं सांगावं अस वाटतंय. माझे बालपण आई वडिलांची भांडणं बघण्यातच गेली, वडील रोज दारू पिऊन घरी यायचे व आईला मारहाण करायचे. आई बिचारी रोज सकाळी उठून घरातील कामे आवरून कामाला जायची कारण जर एकही दिवस काम केले नाही तर रात्रीच्या भाकरीची पंचाईत व्हायची आणि रात्रीचा तिला मार खायला लागायचा. मी ज्यावेळी हे सगळं बघायचो तेव्हा वाईट वाटायचं वडिलांना आईला मारण्यापासून रोखावे पण मी लहान असल्याने काहीच करू शकत नव्हतो. आई परिस्थिती पुढे हतबल होती.मला शाळेत जायची आवड होती, अभ्यास करायचा होता. मी दुसरीत असेल तेव्हा आईने रोजच्या कामातून पैसे बाजूला ठेऊन मला दप्तर आणले होते.पुस्तकं तर शाळेतून मोफत मिळायची. माझ्याकडे नवीन दप्तर बघून माझ्या वडिलांची तळपायाची आग मस्तकात गेली कारण त्याच दिवशी सकाळी वडिलांनी आईकडे दारू पिण्यासाठी पैश्यांची मागणी केली होती, आईने स्वतःजवळ पैसे नसल्याचं सांगितलं. रागाच्या भरात माझे दप्तर व त्यासोबत माझी पुस्तके वडिलांनी जळत्या चुलीत टाकून दिली. मी खूप रडलो होतो, वडिलांच्या हाता पाया पडलो पण त्यांना माझी दया आली नाही.

माझ्या वडिलांचं म्हणणं होतं की शाळा शिकून कोणाचं भलं झालं आहे. आईची मात्र मला शिकवण्याची खूप इच्छा होती.वडिलांनी त्या दिवशी केलेल्या कृत्याने आईला वाटले की मी जर घरी राहिलो तर माझे शिक्षण काही होऊ शकणार नाही,म्हणून आईने मला आमच्या गावापासून 50 किमी दूर अंतरावर असलेल्या आश्रम शाळेत ऍडमिशन घेऊन दिले, जेणेकरून माझे वडील माझ्या पर्यंत सहजासहजी पोहचू शकणार नाही व माझे शिक्षण होईल. इतक्या लहान वयात आईला, आपल्या घराला सोडून आश्रम शाळेत राहणे सोपे नव्हते पण दुसरा पर्याय नव्हता. दिवाळीच्या व उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी जात असायचो.प्रत्येक सुट्टीत जायचो तेव्हा आईचे शरीर थकत चालले आहे हे जाणवायचे, मला आईला ह्या नरकातून बाहेर काढायचे होते.

आईने वडिलांचे दारूचे व्यसन सुटावे म्हणून बरेच प्रयत्न केले पण सर्व व्यर्थ होत. 

मी सहावीत असतानाची गोष्ट आहे, सकाळी अकराची वेळ असेल,माझा मामा मला घेऊन जाण्यासाठी आला होता,असा अचानक मामा का आला ह्याचे उत्तरही तो देत नव्हता. मला घरी गेल्यावर समजले की माझ्या वडिलांनी रात्री दारूच्या नशेत माझ्या आईच्या डोक्यात दगड घातला व आई त्या मारामुळे मृत पावली. आईला मृत अवस्थेत बघून मला खूप मोठा धक्का बसला होता. आईला अग्निडाग देताना डोळयात खूप पाणी येत होते, माझ्या सर्वांत जवळची एकुलती एक व्यक्ती त्या दिवशी मी गमावली होती. वडिलांकडे तर मी बघितले सुद्धा नाही, तसही त्यांच्याकडे बघावं अस त्यांनी काही केलंच नव्हतं. आई गेल्यावर सर्व संपल्या सारखं वाटतं होतं. वडिलांना पोलिसांनी पकडून नेले होते. मामा मावशी तेरा दिवस सोबत राहिले, आईचे सर्व विधी उरकून जे ते ज्याच्या त्याच्या घरी निघून गेले. मामाने मला शाळेत आणून सोडले.

माहीत नाही का पण त्या दिवसापासून अभ्यास करण्याची इच्छाच उडून गेली होती. अभ्यास तरी करायचा तो कोणासाठी, आई होती तर असे वाटायचे की शिकून मोठे व्हायचे, तिची इच्छा पूर्ण करायची. पण आता कोणाची इच्छा पूर्ण करायची.मी शिकलो, मोठा झालो तरी ते बघायला आई असणार नाही. त्यानंतर जी सुट्टी त्या सुट्टीत मामा येऊन मला घरी घेऊन गेला पण मामीने खूप बडबड केली, मी त्यांच्या घरी जाऊन राहिलेलं मामीला आवडलं नाही. सुट्टी संपल्यावर मामाच्या घरून जेव्हा निघालो तेव्हाच ठरवून टाकलं की परत मामाच्या घरी यायचं नाही.

मामाच्या घरून परतल्यापासून आईची जास्त आठवण यायला लागली. आता आपलं या जगात कोणीच नाही हा विचार सारखा मनात येऊ लागला.एक दिवस सर्व मुले मैदानात खेळत होती, मी मात्र एका पायरीवर एकटाच बसून होतो. मला असं एकट्याला बसलेलं बघून आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका बाई माझ्याजवळ येऊन बसल्या व त्या म्हणाल्या, "दिगंबर तु असा एकटाच इथे का बसला आहेस? इतर मुलांसोबत खेळायला का गेला नाहीस?"

त्यावर मी बाईंना मामाकडे घडलेली सर्व हकीकत सांगितली व हेही सांगितलं की मला आईची किती कमी भासत आहे. 

यावर बाई मला म्हणाल्या," इथून पुढे तु सुट्टीत कुठेही जायचे नाही. इथेच शाळेत रहायचे, सुट्टीत बागकाम करायचे, झाडांची निगा राखायची. तुझ्या आईची इच्छा होती ना की तु खूप शिकावं म्हणून, मग आई बघायला नसली म्हणून काय झालं? तीच स्वप्न तर तु पूर्ण करायलाच हवे ना?"

बाईंनी जस सांगितलं तस मी सुट्टीत शाळेतच रहायला लागलो.बाई मला त्यांच्या कुटुंबासोबत फिरायलाही घेऊन जायच्या. मी पुन्हा थोडाफार अभ्यास करू लागलो. आश्रम शाळेत दहावी पर्यंतचे वर्ग होते, त्यानंतर बाईंच्याच ओळखीने माझे अकरावीला ऍडमिशन एका सरकारी कॉलेजात करण्यात आले. माझ्याकडे जी ही सायकल आहे ती बाईंनीच दिली आहे. माझ्या आत्ताच्या शिक्षणाचाही खर्च बाईच करत आहे. आपण ज्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहोत ना त्या कॉलेजचा शिक्का एकदा सर्टिफिकेट वर पडला ना की कुठेही सहजासहजी नोकरी मिळेल. मी ऐकलंय की पुण्यात शिक्षण झाले की इथेच नोकरी करायला सोपं जातं. अशी आहे माझी जीवनकथा"

दिगंबर बद्दल ऐकून खरंच खूप वाईट वाटलं, मी म्हणालो," तुझ्याकडे बघून कोणीच म्हणणार नाही की तुझ्या आयुष्यात एवढं सगळं घडून गेलं असेल म्हणून, इथून पुढे तुला काही मदत लागली की मला सांग, माझ्याने जेवढी मदत शक्य असेल तेवढी मी करण्याचा प्रयत्न करेन"

दिगंबर हसून म्हणाला," माझ्या सोबत आयुष्यभर मैत्री ठेव म्हणजे झालं, बाकी मला काहीच नको"

कॉलेजला पोहोचायला थोडा अवकाश होता, दिगंबरने त्याची कथा सांगितल्यावर माझ्या डोक्यात आले की आपण खरंच किती नशीबवान आहोत की आपल्याला असे आई बाबा भेटले आहेत जे आपला, आपल्या भविष्याचा विचार करतात. बिचारा दिगंबर वडिलांचे तर प्रेम मिळालेच नाही पण आईचे छत्रही इतक्या कमी वयात हरवले.

बोलता बोलता कॉलेज कधी आले हे आम्हाला कळालेच नाही.सायकल स्टँडला जाऊन दिगंबरने सायकल लावेपर्यंत मी बाहेरच कॉलेजच्या गेटजवळ उभा होतो, तेवढ्यात सरु गाडी पार्क करून गेटच्या दिशेने येताना दिसली. मी सरुकडे बघून हसलो पण सरु माझ्याकडे न बघताच निघून गेली, मी तिला आवाजही दिला पण सरुने मागे वळून बघितले सुद्धा नाही. सरु अशी का वागली? ह्या विचारात मी असतानाच दिगंबर आला व म्हणाला, "कोण होती रे ती मुलगी? आणि तु तिला आवाज का देत होतास? तिने तर तुझ्याकडे वळून सुद्धा बघितले नाही."

मी म्हणालो," ती सरस्वती आहे, माझी लहानपणाची मैत्रीण, मी हिच्याच बाबांच्या कंपनीत नोकरीसाठी जातो, तिच्या बाबांनीच माझे ह्या कॉलेजमध्ये व होस्टेलला ऍडमिशन करायला मदत केली. काल तर सरु माझ्याशी बोलली होती एवढंच नाहीतर तिने माझी ओळख तिच्या मित्र मैत्रिणींसोबत करून दिली. आत्ता तर ती एकटीच होती तरीही माझ्यासोबत का बोलली नाही?"

दिगंबर म्हणाला," हे आता तिलाच विचारायला लागेल, असा इथेच विचार करत बसशील तर तिकडे लेक्चर चालू होऊन जाईल."

सरस्वती अविनाश सोबत का बोलली नसेल? हे बघूया पुढील भागात...

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all