निस्वार्थ प्रेम भाग ३ #मराठी कादंबरी

Avinash and sarswati's childhood life

मागील भागाचा सारांश: सरस्वती घरी आल्याबद्दल अविनाशने त्याचा मित्र दिगंबर यास सांगितले तसेच सरस्वती परत आल्याने भूतकाळातील सत्य श्रेयासमोर येईल की काय? ही मनातील भीती त्याने दिगंबर कडे बोलून दाखवली.दिगंबरने अविनाशला सुचवले की श्रेयाला सर्व काही सत्य परिस्थिती सांगून टाक म्हणजे काही टेन्शन राहणार नाही. अविनाशने घरी येऊन श्रेयाला त्याच्या भूतकाळाबद्दल सर्व काही सांगायला सुरुवात केली.

आता बघूया पुढे....

आक्कांनी घरी काहीही गोड पदार्थ केला की आम्हा मुलांना बोलावून त्या देत असत. माझे दादा आणि ताई आक्कांच्या घरी नेहमी जात येत असत.मी स्वभावाने शांत असल्याने आक्कांच्या घरीच काय पण गावात कुठेही जास्त करून जात नसे.पहिल्या वर्गापासूनच माझा गणित हा विषय खूप चांगला होता.मला गणितं सोडवायला नेहमीच आवडायची.

सरस्वती ही आक्कांच्या मुलीची मुलगी, तिच्या घरातील सर्व तिला सरु म्हणत असे.सरु उन्हाळ्याच्या व दिवाळीच्या सुट्टीत गावी यायची.

सरुच्या वयाच्या आमच्या गावातील मुली दोन वेण्या घालायच्या, वेणीला रिबीन लावायच्या. सरुचे केस मात्र कापलेले असायचे, केसांना वेगवेगळे हेअरबेल्ट लावलेले असायचे.माझी व सरुची भेट आक्कांच्या घरीच झाली होती, त्यावेळी मी दहा वर्षांचा असेन.मी तूप द्यायला म्हणून आक्कांच्या घरी गेलो होतो तेव्हा आक्कांनी माझी ओळख सरुच्या वडिलांसोबत करुन दिली होती. सरुच्या वडिलांना कळाले की माझं गणित चांगलं आहे तेव्हा त्यांनी मला सांगितले की सरु सुट्टीत आल्यावर तिला गणित शिकवायचे कारण सरुला गणित हा विषय अजिबात आवडत नव्हता. मी तिला खेळता खेळता गणित शिकवायचो म्हणजे उदा.आम्ही आमराईत खेळायला गेलो की तिथे आंब्याची झाडं मोजायला लावायचो तर कधी झाडावरील आंबे, अश्या विविध प्रकारे मी तिला गणित शिकवायचो.

मी सरुला गणित शिकवायला लागल्यापासून तिचा गणितात इंटरेस्ट वाढला होता तसेच ती आवडीने गणितं सोडवायची. गणित शिकवण्याच्या निमित्ताने आम्ही इकडे तिकडे भटकत असू, कधी आमच्या सोबत आमची भावंडे असायची तर कधी आम्ही दोघेच फिरायचो. मी सुरवातीला सरुसोबत जास्त बोलत नसायचो, फक्त कामापुरत बोलायचो. सरुच्या तोंडाचा पट्टा मात्र सतत सुरू असायचा, तिच्यात कॉन्फिडन्स खूप होता. सरु आम्हाला शहरातील गमती जमती सांगायची.सरु जेव्हा जेव्हा शहराचं वर्णन करत असे त्या त्या वेळी आपण कधी एकदा शहर जाऊन बघतो अस व्हायचे.

सुट्टी लागली की सरु गावाला यायची आणि आमची गणिताची शाळा सुरू व्हायची. सरुची, तिच्या बोलण्याची सवय झाल्यावर मीपण तिच्यासोबत गप्पा मारु लागलो. मला सरुसोबत गप्पा मारणे आवडू लागले होते. माझी ताई सोडता मी दुसऱ्या कुठल्याही मुलीशी एवढ्या गप्पा मारायचो नाही पण सरु त्याला अपवाद होती. सरु बालिश होतीच पण तेवढीच समजदारही होती.

मला खूप शिकायचे होते, शिक्षण घेऊन शहरात जाऊन नोकरी करायची होती.मी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत होतो तर सरु मात्र एका मोठ्या खासगी शाळेत होती. मला इंग्लिश शिकण्याची प्रचंड आवड होती. माझ्या शाळेत इंग्लिश जेमतेम शिकवत असे. सरुकडे मी इंग्लिश शिकण्याबद्दल बोललो असता तिने स्वतःहूनच मला इंग्लिश शिकवण्याची तयारी दाखवली. आज माझे जे काही प्रभुत्व इंग्लिशवर आहे ते केवळ सरुमुळेच.

सरु सुट्टीला येताना इंग्लिश पुस्तके,वर्तमानपत्रे घेऊन यायची जेणेकरून माझे इंग्लिश चांगले व्हावे. एखाद्या सुट्टीत सरु जर थोड्या कमी दिवसांसाठी आली तरी मी खूप दुःखी व्हायचो. कधी एकदा शाळेला सुट्टी लागते आणि सरु येते अस मला होऊन जायचं.मला सरुची सोबत असण्याची खूप सवय झाली होती. सुट्टीतील आमचे रुटीन ठरलेले असायचे, सकाळी घरातून जेवण करून निघायचे,मग करवंदाच्या झाडावर चढून करवंदे खायची, आमराईत जाऊन आंबे तोंडून खायचे, आमच्या गावात एक मंदिर होते ते डोंगरावर होते, मग आम्ही रोज देवाच्या पाया पडायच्या निमित्ताने डोंगरावर चढायचो. खूप मज्जा यायची.

सरु जेव्हा तिच्या शहरातील मित्र मैत्रिणींचे कौतुक करायची किंवा त्यांचे किस्से सांगायची तेव्हा माहीत नाही का पण मला चांगले नाही वाटायचे. मी सरुला माझी जवळची आणि खास मैत्रीण मानायचो, माझी अशी इच्छा होती की सरूनेही मला तिचा खास मित्र मानावा, माझ्या शिवाय तिचा जवळचा मित्र कोणीच नसावा.

सरु आठवीच्या सुट्टीत आली होती त्यानंतर ती कधी जास्त दिवसांसाठी आलीच नाही. नववीच्या सुट्टीत तिला दहावीचे क्लास लावण्यात आले होते म्हणून तिला गावी येता आले नाही. दहावीच्या सुट्टीत ती फक्त दोन की तीन दिवसांसाठी आली होती कारण त्याही सुट्टीत तिच्या बाबांनी तिला कॉम्प्युटरचे वेगवेगळे क्लास लावले होते. सरुचे बाबा मोठे बिजनेस मॅन होते.पुढे जाऊन सरुने त्यांचा बिजनेस सांभाळावा ही त्यांची प्रबळ इच्छा असल्याने ते सरुला दहावी झाल्यापासूनच ट्रेन करत होते.

मला दहावीत चांगले गुण मिळाले होते, मी शाळेत पहिला आलो होतो. चांगले गुण मिळाल्याने मला तालुक्यातील नं एक च्या कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटले. माझे कॉलेज घरापासून जवळजवळ पंधरा किलोमीटरवर होते. मी सायकलने कॉलेजला ये जा करायचो. माझा दादा व ताईचे शिक्षण जेमतेम दहावी पर्यंत झाले होते. सरुची व माझी त्यानंतर निवांत भेट कधी झालीच नाही.

बारावीच्या सुट्टीत सरुचे बाबा गावी आले असता माझे बाबा त्यांना म्हणाले की "आमचा अवि अभ्यासात खूप हुशार आहे, त्याला पुढे शिकायची जिद्द आहे, बारावीतही त्याला चांगलेच गुण मिळतील, पठ्ठ्याने जीव तोडून अभ्यास केला आहे.मला तर शिक्षणातील काही कळत नाही, जर तुम्ही थोडे मार्गदर्शन केले तर बरे होईल."

यावर सरुचे बाबा म्हणाले," अविनाश हुशार आहे हे मी तो लहान असतानाच हेरले होते, त्याला कष्ट करण्याची आवड सुद्धा आहे.पुढे शिक्षण घ्यायचे म्हटल्यावर पैसे भरपूर लागतात. अविनाश जर पुण्यात आला तर नोकरी करता करता शिक्षणही घेऊ शकतो. पुण्यात सरकारी होस्टेल आहे जिथे कमी पैशात रहाण्याची व खाण्याची सोय होऊ शकते. बारावीत गुण चांगले मिळाले तर त्याचे सहजासहजी चांगल्या एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन होऊ शकते."

माझे बाबा म्हणाले," अविनाश ला नोकरी कोण होईल? शिवाय त्या नव्या ठिकाणी, नव्या शहरात जिथे आमची कोणाशीच ओळख नाही अश्या ठिकाणी अविनाश एकटा कसा राहील?"

सरुचे बाबा म्हणाले," आम्ही आहोत ना, आम्ही तुमचे कोणीच नाही का? मी माझ्या कंपनीत अविनाशला पार्ट टाइम जॉब देतो, अविनाश सारखा होतकरु मुलगा आम्हाला तरी कुठून भेटणार. तुम्ही काही काळजी करू नका. मी सगळं बघून घेईल. शिवाय यात माझाही एक स्वार्थ आहे, तो असा की सरुसोबत हा कॉलेजला असेल तर सोबत अभ्यास करून आमच्या सरुचे गणित अजून सुधारेल. बारावीचा निकाल लागला की तुम्ही अविनाशला माझ्याकडे घेऊन या, मी त्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन व होस्टेलमध्ये राहण्याची सोय करुन देतो."

हे सगळं ऐकून माझ्या बाबांच्या डोळ्यात पाणीच आले, माझ्या बाबांनी सरुच्या बाबांचे हात जोडून आभार मानले. त्या दिवसापासून मी पुण्यात जाऊन तिथे शिक्षण घेण्याचे व काम करण्याचे स्वप्न रंगवू लागलो. सरुला दररोज भेटता येईल हा आनंदही होताच.

बारावीचा निकाल लागला, मला ८० टक्के गुण मिळाले होते. निकाल लागल्यानंतर मी व बाबा आम्ही पुण्याला गेलो. आम्हाला पुण्यातील काहीच माहिती नसल्यामुळे सरुच्या बाबांनी आम्हाला घेण्यासाठी बस स्टँडवर गाडी पाठवली होती.मी एवढ्या मोठ्या शहरात पहिल्यांदाच आलो होतो, सरुने वर्णन केल्यापेक्षाही हे शहर खूप मोठे होते, आमच्या गावात सर्वात जास्त गर्दी मी यात्रेच्या वेळेस बघायचो पण इथे तर दररोजच एवढी गर्दी दिसते, शहरातील मोठ्या इमारती बघून मी मजलेच मोजत राहिलो, किती उंचच उंच इमारती होत्या, आकाशाला भिडत होत्या. आम्ही सरुच्या घरी गेलो असता मी सरुचे घर बघून चकीतच झालो. कुठे आमचे ते गावाकडील कौलारू घर आणि हा मोठा लखलखीत बंगला. इतक्या मोठ्या बंगल्यात राहत असताना सुद्धा त्याचा माज सरुच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर नव्हता. सरुच्या आई वडिलांनी आमचे चांगल्या रित्या स्वागत केले, जेऊ खाऊ घातलं. सरुच्या आईने मला दोन चांगले नवीन ड्रेस दिले कारण कॉलेजमध्ये मी गेल्यावर माझी कोणी चेष्टा करायला नको म्हणून, त्या दिवशी सरुची व माझी भेट होऊ शकली नाही कारण ती तिच्या मैत्रिणींसोबत बाहेर गेली होती.

सरुच्या बाबांनी आमच्या सोबत एक माणूस पाठवून माझी राहण्याची सोय एका होस्टेलमध्ये करून दिली तसेच माझे ऍडमिशन सुद्धा करून दिले. सरुचे बाबा नसते तर कदाचित माझे पुढे शिकण्याचे स्वप्नही अपुरे राहिले असते. सरुच्या बाबांनी त्यावेळी केलेली मदत मी कधीच विसरू शकणार नाही. माझी सर्व सोय लागल्यावर बाबा गावी जायला निघाले त्यावेळी माझ्याही डोळ्यात पाणी होते आणि बाबांच्याही, मी आई बाबांना सोडून पहिल्यांदाच घराबाहेर राहणार होतो. शहर तर आवडले होते पण आपल्या घरापासून दूर रहावे लागणार याचे दुःख जास्त होते. बाबांनी मला चार शब्द समजूतीचे सांगितले व त्यांनी माझा निरोप घेतला. आत्तासारखे त्यावेळी घरोघरी फोन किंवा मोबाईल नव्हते. गावात एखादं दुसऱ्याच्या घरी फोन असायचा. आमच्या गावात जमीनदाराच्या घरी फोन होता म्हणजे मला जर घरी काही निरोप द्यायचा असेल तर त्यांच्याकडे फोन करून निरोप सांगावा लागणार होता. बाबांनी खर्च करण्यापुरते थोडे पैसे दिले होते, ते पैसे म्हणजे तुझा एक दिवसाचा पॉकेटमनी एवढे होते. त्या पैश्यांमध्ये पुढचे किती दिवस घालवावे लागणार होते याची कल्पनाही मला नव्हती. वाटेत भूक लागेल म्हणून आईने दशम्या करून दिल्या होत्या तसेच मला आवडतात म्हणून रव्याचे लाडूही करून दिले होते. बाबा निघून गेल्यानंतर जेव्हा भूक लागली तेव्हा दशमी व लाडू खाताना आईची आठवण झाली. पहिल्याच दिवशी संध्याकाळी मेसमध्ये जेवण करायला गेलो, जेवणाची चव चाखली असता आईच्या हातच्या जेवणाच्या आठवणीने जीव कासावीस झाला. इथून पुढे आपल्याला असच बेचव जेवण खायला मिळणार ही कल्पनाही सहन नव्हती. पण पुढे ह्या जेवणाची सवय होऊन गेली होती.

सरुचे एकत्र कुटुंब होते त्यात आजी बाबा, एक काका काकू , त्यांची दोन मुले, आई बाबा आणि सरु असे होते. सरु तिच्या आई वडिलांना एकटी मुलगीच होती आणि शिवाय तिच्या काकांनाही दोन्ही मुलेच असल्याने ही घरातील एकमेव मुलगी होती म्हणून ती खूप लाडाची होती. सरुने एखादी गोष्ट मागितली आणि त्याला कोणी नाही म्हणालं अस कधीच झालं नाही.

सरु व मी एकाच कॉलेजला होतो फक्त तुकड्या वेगवेगळ्या होत्या.सरुची व माझी भेट झाली ती कॉलेज मध्येच. मला वाटलं होत की माझा असा खेडूत अवतार बघून सरु मला ओळख देणार नाही. पण सरुने मला ओळख दिलीच शिवाय तिच्या मित्र मैत्रिणींसोबतही ओळख करून दिली. सरुचे रूप पालटून गेले होते, सरु दिसायला खूप सुंदर लागली होती. मी पहिल्यांदा सरुला कॉलेजमध्ये बघितलं आणि मी कितीतरी वेळ तिच्याकडे बघतच राहिलो होतो. सरु कॉलेजला गाडीवर येत असे. सरुला गाडी चालवता येते हे बघून खूप भारी वाटलं होतं. लहानपणीची सरु आणि ही सरु ह्यात एकच बदल झाला होता तो असा की सरु सुंदर दिसायला लागली होती आणि दुसरा असा की तिच्यातील बालिशपणा कमी झाला होता.

सरुने माझी ओळख तिच्या सर्व मित्र मैत्रिणींसोबत करून दिली होती. कॉलेज सुटल्यानंतर सरुला तिच्या मित्र मैत्रिणींसोबत भटकायला प्रचंड आवडायचे. सरुचे मित्र मैत्रिणी तिच्यासमोर माझ्याशी चांगले वागायचे पण ती सोबत नसल्यावर माझ्याशी ते चांगलं वागायचे नाही, माझ्या राहणीमानाची, बोली भाषेची मजा ते घ्यायचे. माझी खिल्ली उडवायचे. तेव्हाच मला समजले होते की आपले ह्यांच्यासोबत जमणार नाही. माझी विचार करण्याची पद्धत व त्यांची विचार करण्याची पद्धत खूप वेगळी होती, शहरातील व खेड्यातील राहणीमानात जेवढी तफावत असते ना तेवढीच तफावत विचारांमध्येही असू शकते हे त्यावेळी मला उमगले.

सरुच्या मित्र मैत्रिणींमुळे अविनाशच्या व तिच्या मैत्रीत फरक पडेल का? बघूया पुढील भागात....

©®Supriya Dighe

🎭 Series Post

View all