निस्वार्थ प्रेम भाग २४ #मराठी कादंबरी

Avinash's brother is met with an accident.

मागील भागाचा सारांश: अविनाश,संजय व सरस्वती हे तिघे कॉफी पित बसलेले असताना अविनाशने संजयला स्विमिंग पुलच्या इथे संजयला एका मुलीसोबत बघितल्याचे सांगितले असता संजयने ती मुलगी माझी चुलत बहीण असून मी तिला स्विमिंग शिकवत होतो असं सांगून वेळ मारुन नेली. संजय नसताना अविनाशने सरस्वतीला सांगितले की संजय तुला फसवत आहे यावर सरस्वतीने अविनाशला सांगितले की मला संजयच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करु नकोस नाहीतर मी आपली मैत्री तोडून टाकेल. अविनाशच्या दादाचे लग्न धुमधडाक्यात पार पडते. शैला लक्ष्मीच्या रुपाने घरात प्रवेश करते, ती घरात आल्यापासून अविनाशच्या घरच्यांची खूप प्रगती झाली. तिसऱ्या वर्षाची शेवटची परीक्षा जवळ आल्याने अविनाश साहेबांकडे एक महिन्याची सुट्टी मागायला गेला असता त्यांनी पुढे जाऊन कॉलेज संपल्यावर काय करशील या बद्दल सल्ला दिला.

आता बघूया पुढे....

मी त्या एका महिन्यात दिवसरात्र अभ्यास केला. सकाळी लवकर उठून अंघोळ करुन लायब्ररीत अभ्यासाला जाऊन बसायचो ते थेट संध्याकाळीच होस्टेलला परतायचो. दिगंबरचं आपलं टंगळमंगळ करत अभ्यास चाललेला असायचा, शालिनी त्याच्याकडून अभ्यास करुन घ्यायची. शालिनीमुळे का होईना दिगंबर अभ्यास तर करायला लागला होता. निर्मलाला बरे वाटत नसल्याने ती घरी निघून गेली होती. या एका महिन्यात सरुसोबत मी काहीच संपर्क साधला नाही.

एक्सामचा दिवस उजाडला, एकेक पेपर होऊ लागले. सर्वच अभ्यास झाल्याने मला सर्वच पेपर चांगले गेले होते, या कॉलेजमधील ही शेवटची परीक्षा मस्त पार पडली होती. सरुची व माझी भेट शेवटच्या पेपरच्या दिवशी झाली होती. त्यावेळी सरुला मला काहीतरी सांगायचे होते पण आजूबाजूला इतका गोंधळ होता की आम्हाला काही बोलताच आले नाही. सरु चेहऱ्यावरून जरा टेन्शन मध्ये असल्या सारखी दिसत होती. मला वाटलं की तिला एखादा पेपर अवघड गेला असेल म्हणून ती चेहरा पाडून बसली असेल. निर्मला एक्साम साठी सुद्धा गावावरुन परतली नाही. निर्मला एक्सामला का नाही आली? याचे कारण शोधण्यासाठी आम्हाला तिच्या गावी जावे लागणार होते, मी शालिनी व दिगंबर आम्ही तिघांनी मिळून ठरवले की दुसऱ्याच दिवशी आपण निर्मलाच्या गावी जाऊन तिची चौकशी करुया. 

आम्ही सामानाची पॅकिंग करायला सुरुवात केली तोच माझ्या घरुन मेसवाल्या काकांच्या फोनवर फोन आला होता. मेसवाल्या काकांनी फोन घेतल्या पासून मी घरी त्यांचाच फोन नंबर देऊन ठेवला होता. मी फोन घेतल्यावर मला असे कळाले की दादा ट्रॅक्टर घेऊन मार्केटला गेला असता परत येताना ट्रॅक्टरचा अपघात झाला आणि त्यात दादाचा एक पाय फ्रॅक्चर झाला. मला ताबडतोब गावाला बोलावले होते. दुसऱ्या दिवशी मी निर्मलाच्या गावाला न जाता माझ्या गावाला निघून गेलो. दिगंबर व शालिनी हे दोघेच निर्मलाच्या गावी जाणार होते.

मी घरी गेल्यावर बघितले तर गाईचे दूध काढताना गाईने बाबांना लाथ मारल्याने त्यांच्या कंबरेला बऱ्यापैकी मार लागलेला होता, दादाचा पाय फ्रॅक्चर झाल्याने तोही एका जागी पडलेला होता. ते म्हणतात ना की वाईट वेळ ही सांगून येत नाही. अगदी तसंच आमच्या घराचं झालं होतं. आता घरात एकमेव मीच शाबूत उरलो होतो. ताईला आठवा महिना असल्याने ती डिलिव्हरी करता घरी आली होती. जी शेतीची व गाई म्हशींची कामे मी काही वर्षांपासून करायची सोडली होती, आता परत मला तीच कामे करावी लागणार होती. शैला वहिनी व आई माझ्या सोबतीला होत्या पण त्या तरी किती कामे करणार होत्या. आधीच घरात दोन आजारी माणसे त्यात अजून ताई आली असल्याने घरातील कामांमध्ये वाढ झालेली होती. 

दुसऱ्या दिवसापासून सकाळी उठल्यापासून माझ्या कामांना सुरुवात व्हायची ती रात्री झोपेपर्यंत काही ना काही कामे असायचीच. मी घरच्या कामात इतका व्यस्त झालो होतो की मला निर्मलाचा निरोप फोन करुन घ्यावा हेही लक्षात आले नाही. दादाला अधूनमधून हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे लागायचे तर कधी ताईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे लागायचे. घराचा सर्व भार माझ्यावर आल्यासारखे झाले होते. बाबांची कंबर हळूहळू बरी होत होती पण वय जास्त झाल्याने बाबांना पहिल्या सारखी कष्टाची सर्व कामे जमत नव्हती. बाबा खऱ्या अर्थाने आता थकले होते. आपल्या बाबांना अस थकलेलं बघायला खर तर मला आवडत नव्हतं म्हणजे ते मनालाच पटत नव्हतं, एके दिवशी रात्री बाबांचा बी पी वाढल्याने त्यांना त्रास सुरू झाला होता, तेव्हा मला एका क्षणाला असे वाटून गेले की बाबा आपल्याला सोडून निघून तर जाणार नाही ना? पण नशीब असे काही झाले नाही. बाबांना दवाखान्यात नेल्यावर डॉक्टरांनी सांगितले की बाबांचा बी पी वाढल्याने त्यांना हा त्रास होत आहे, काही काळजी करण्याची गरज नाहीये.

बाबांची फक्त तब्येत बिघडली तर मला एवढा त्रास झाला होता तेव्हा मला दिगंबरच्या दुःखाची तीव्रता कळाली, त्याला बिचाऱ्याला किती कमी वयात या दुःखाला सामोरे जावे लागले होते, त्यावेळी मला दिगंबरची खूप आठवण आली होती, पण मला त्याला भेटायला जाणे शक्य नव्हते. मला वाटलं होतं की दादाचा अपघात झाल्याचे कळल्याने दिगंबर दादाला भेटायला गावी येईल पण असेही झाले नाही. दिगंबर नक्की कुठे अडकला असेल हेही कळायला मार्ग नव्हता. पुढील काही दिवसांतच ताईची डिलिव्हरी झाली, ताईला मुलगी झाली होती, मी मामा झालो होतो. आमच्या घरात पहिलं बाळ आलं होतं. ताईची मुलगी दिसायला अगदी ताई सारखी होती.

दादाच्या पायाचे प्लास्टर निघाले होते, त्याला थोडे थोडे चालता यायला लागले होते. बाळाकडे बघून बाबांचीही तब्येत हळूहळू सुधारत होती. आपल्यावर जो दुःखाचा काळ आला होता लोटून गेला असे वाटत होते. सरुचे बाबा काहीतरी कामाच्या निमित्ताने गावी आले होते, ते आमच्या घरी आले, त्यांनी बाबांना सांगितले की अविनाशला असं किती दिवस घरी बसून ठेवणार आहात, पुढच्या आठवड्यात याचा निकाल आहे, त्याचं नुकसान होऊ देऊ नका, पुण्यात आला तर चांगली नोकरी भेटेल, त्याचा पुढील आयुष्याचा मार्ग सुकर होईल. मी साहेबांना गाडीपर्यंत सोडायला गेलो असता त्यांनी मला सांगितले की अविनाश लवकरात लवकर पुण्याला निघून ये, तुझ्या वाचून खूप महत्त्वाचे काम अडले आहे,मला तुझ्या मदतीची गरज आहे. साहेब निघून गेल्यावर मी विचारात पडलो की साहेबांचे माझ्याकडे असे कोणते महत्त्वाचे काम असेल की त्यांनी मला ताबडतोब पुण्याला निघून यायला सांगितले.

साहेब बाबांना असे बोलून गेल्यावर बाबा मला म्हणाले," अविनाश पोरा आमच्यासाठी तुझं नुकसान का करत आहेस? दादाचा पाय आता बरा होत आला आहे, त्याची काम तो सांभाळून घेईल, तु उद्या जरी पुण्याला गेलास तरी चालेल."

मी म्हणालो," बाबा अजून दादाचा पाय पूर्ण बरा झालेला नाहीये, येत्या दोन तीन दिवसांत पेरणीची कामे उरकून जातील मग मी पुण्याला जाईल. एवढे दिवस थांबलोच आहे तर अजून थोड्या दिवसांनी काय होणार आहे?"

शेतातील पेरणीची कामे झाल्यावर मी आपल्या सामानाची बांधाबांध केली व पुण्याला जाणाऱ्या एस टीत बसलो. पुण्याला पोहोचायला मला संध्याकाळ होऊन गेली होती. मी होस्टेलला पोहोचलो तर माझ्या खोलीला कुलूप लावलेले होते, दिगंबर कुठेतरी बाहेर गेला असेल हा विचार करून मी माझ्याकडे असणाऱ्या चावीने कुलूप उघडून आता गेलो तर बघतो काय? रुममध्ये फक्त माझ्या एकट्याचेच सामान होते, रुममध्ये दिगंबरचे काहीच सामान दिसत नव्हते. मला न सांगता दिगंबर असा अचानक रुम का सोडून गेला असेल या विचारात मी होतो. असे काय झाले असेल की दिगंबर होस्टेल सोडून गेला. दिगंबरला जायला तर दुसरे ठिकाण नव्हते मग हा गेला तरी कुठे असेल? मेसवाल्या काकांना काही माहीत असेल म्हणून मी त्यांच्याकडे गेलो व विचारले," काका दिगंबर कुठे गेला आहे?"

काका म्हणाले," तो कुठे गेला हे मलाही माहीत नाही. पण सुट्टी लागल्यावर चार पाच दिवसांतच तो माझ्याकडे येऊन म्हणाला की काका आता मला तुमच्याकडे नोकरी करता येणार नाही, मी हे होस्टेल सोडून चाललो आहे. मी त्याचा माझ्याकडे बाकी असलेला पगार दिला, ती आमची शेवटची भेट होती, त्यानंतर तो कुठे आणि कधी गेला ह्याची मला कल्पना नाही."

आता इतक्या मोठ्या शहरात मी दिगंबरला कुठे शोधणार होतो काय माहीत? तो ह्या शहरातही आहे की दुसऱ्या कुठे गेला हेही मला माहित नव्हते. दिगंबरचा थांगपत्ता कसा लावायचा हा मला खूप मोठा प्रश्न पडला होता. दुसऱ्या दिवशी आमचा निकाल होता, जर तो निकाल घेण्यासाठी दिगंबर आला तरच आमची भेट होऊ शकणार होती. शालिनी किंवा दिगंबर या दोघांपैकी एकजण जरी आला तरी सर्वांची माहिती मिळणार होती. निर्मलाची तब्येत कशी आहे याबद्दलही मला काहीच कल्पना नव्हती. रात्रभर या सर्वाचा विचार करुन माझे डोकं दुखायला लागलं होतं. उद्याची सकाळ कधी होईल आणि मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं कधी मिळतील असं मला झालं होतं.

दुसऱ्या दिवशी सकाळी मी जरा लवकरच कॉलेजमध्ये जायला निघालो, कॉलेजला जाताना वाटेत शालिनीच्या होस्टेलला जाऊन चौकशी केली असता मला कळले की शालिनी व निर्मला या दोघीही होस्टेल सोडून गेल्या आहेत. मी तीन महिने गावाला काय गेलो पण इकडे तर सगळेच जण गायब झाले होते. मी कॉलेजला पोहोचलो तेव्हा वर्गातील ओळखीच्या मुलांकडे मी दिगंबरची चौकशी केली तर त्यांनाही दिगंबर बद्दल काहीच माहीत नव्हते. निकाल लागायला अजून एक तास बाकी होता. मी कॉलेजच्या गेटजवळच उभा होतो, दिगंबरच्या वाटेवर नजर ठेऊन उभा होतो पण दिगंबर काही येत नव्हता.सरुच्या मैत्रिणी दिसल्या पण सरु त्यांच्या सोबत नव्हती. मी मनातल्या मनात म्हणालो की आता उभा सरुला काय झालं असेल? ती निकाल घ्यायला का आली नसेल? निकाल लागला हे ऐकल्यावर मी नोटीस बोर्ड कडे धाव घेतली, निकाल बघून माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. मी कॉलेजमध्ये पहिला आलो होतो, सर्वजण माझं अभिनंदन करत होते, माझ्या डोळयात आनंदाश्रू आले होते. माझा निकाल बघून झाल्यावर मी सरुचा निकाल बघितला तर सरुला नेहमीपेक्षा खूपच कमी मार्क्स मिळाले होते. दिगंबरला कधी नव्हे तो फर्स्ट क्लास मिळाला होता, शालिनीला distinction मिळाले होते. अजूनही दिगंबर आलेला नव्हता.

वर्गातील एका दुसऱ्या मुलासोबत मी बोलत असताना माझ्या पाठीवर जोरात धपाटा घालून दिगंबर म्हणाला," अरे भावा तु तर लई मोठी हवा केलीस, तु कॉलेजमध्ये पहिला आला आहेस."

मी मागे वळून दिगंबरकडे पाहिले व त्याच्या जोरदार कानशिलात लगावली व म्हणालो, "तु आत्ता येतो आहेस, तुला कल्पना तरी आहे का? की काळजीने मला किती धडधडायला लागले होते. मी काल गावावरुन आलो तेव्हा समजले की तु होस्टेल सोडून निघून गेलास, तुझा कोणालाच पत्ता नाही. मी तुला कुठे शोधणार होतो, याचा थोडा तरी विचार तु केलास का? आज सकाळी कॉलेजमध्ये येताना शालिनीच्या होस्टेलला गेलो तर तिथे कळाले की शालिनी व निर्मला दोघींनी होस्टेल सोडले म्हणून. आता राहिली सरु तर तीही निकाल घेण्यासाठी आली नाही. नेमकं यार तुमच्या सगळ्यांच काय चालू आहे? हे कोणी मला सांगेल का? हे सर्व प्रश्न बाजूला राहूदेत पण मला सांग की तुम्ही निर्मलाच्या गावी गेला होतात ना? तिची तब्येत कशी आहे? ती एक्साम द्यायला का आली नव्हती?"

दिगंबर म्हणाला," तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील पण आत्ता इथे नाही. तुझा निकाल तु फोनवर तुझ्या घरच्यांना कळव, संध्याकाळी मी तुला होस्टेलला घ्यायला येतो मग आपण या सर्व प्रश्नांवर बोलू."

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all