निस्वार्थ प्रेम भाग २३#मराठी कादंबरी

Avinash reveals Sanjay's truth in front of sarswati but sarswati is not believing on avinash.

मागील भागाचा सारांश: अविनाशच्या बहिणीच्या लग्नासाठी दिगंबर, सरस्वती, निर्मला आणि शालिनी गावी जातात, तिथे जाऊन सर्वजण लग्नाचा आनंद घेतात. गावावरुन परत आल्यावर अविनाश सरस्वतीच्या वडिलां सोबत एका हॉटेलमध्ये मिटिंग साठी जातो, त्या हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये अविनाशला संजय एका मुलीसोबत स्विमिंग करताना दिसतो. सरस्वतीचे वडील अविनाशला सांगतात की संजय नेहमीच इथे वेगवेगळ्या मुलींसोबत स्विमिंग करताना दिसतो.

आता बघूया पुढे...

सरुने अचानक उपस्थित केलेल्या प्रश्नाने संजय सुरवातीला जरा चाचपलाच होता. संजय मला म्हणाला," अरे अविनाश तु तिकडे आलाच होतास तर माझी येऊन भेट घेतली असती तर त्या मुलीची व तुझी ओळख करुन दिली असती."

मी म्हणालो," मी तुझी भेट घेणार होतो पण सरुच्या बाबांना दुसरे महत्त्वाचे काम असल्याचे आम्हाला तेथून लगेच निघावे लागले."

सरु थोडी चिडून म्हणाली," अरे संजय पहिले माझ्या प्रश्नाचं उत्तर दे ना की ती मुलगी कोण होती?"

संजय म्हणाला," सरस्वती तु माझ्यावर संशय घेत आहेस का? तु ह्या अविनाशचं काही ऐकू नकोस, तो उगाच तुझ्या डोक्यात संशयाचं रोप पेरत आहे."

मी संजयचं वाक्य तोडत म्हणालो," मी का म्हणून सरुच्या डोक्यात संशयाच रोप पेरु, जर मला तस करायचं असतं तर या आधीच खातरजमा न करता तुझ्या बद्दल मी सरुला सांगितलं असतं. तु माझ्यावर घसरण्या पेक्षा सरुच्या प्रश्नाचं उत्तर दे."

संजय म्हणाला," ती मुलगी माझी चुलत बहीण होती, तिला स्विमिंग शिकायचं होतं, ती माझ्या कधीची मागे लागली होती म्हणून गेल्या काही दिवसांपासून मी तिला स्विमिंग शिकवत आहे. अविनाश तुला स्विमिंग शिकायचं असेल तर मी तुला शिकवू शकतो."

मी म्हणालो," मी लहान असतानाच मला माझ्या बाबांनी आमच्या शेतातील विहिरीत पोहायला शिकवलेले आहे."

संजय म्हणाला," बरं सरस्वती तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळाले असेल तर मी निघतो, मला घरी जरा लवकर जायचे आहे."

सरुने मान हलवून होकार दिला. संजय तेथून निघून गेल्यावर मी सरुला म्हणालो," सरु मला वाटतंय की संजय खोटं बोलत आहे, ती मुलगी त्याची चुलत बहीण नसेल, आपल्या चुलत बहिणीला कोणी मिठीत घेऊन स्विमिंग शिकवत नाही."

सरु म्हणाली," संजय माझ्या सोबत कधीच खोटं बोलू शकत नाही, तुझा काहीतरी गैरसमज होतो आहे. संजय असा मुलगा नाहीये."

मी म्हणालो," सरु मला माहिती आहे की आज तुझा माझ्यावर विश्वास बसणार नाही पण संजय पासून तु थोडी अंतर राखून वाग. मला तो चांगला मुलगा वाटत नाहीये."

सरु चिडून म्हणाली," अविनाश तुझा सल्ला तुझ्या कडे ठेव, मी संजयला खूप दिवसांपासून ओळखत आहे, तो मला कधीच फसवणार नाही. आणि यापुढे कधीही मला संजयच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करु नकोस, जर समजा तु असा प्रयत्न पुन्हा केलास तर त्याच दिवशी आपली मैत्री तुटली अस समज."

आता सरु असं बोलल्यावर मी काय बोलणे अपेक्षित होते. आता जर एखादी व्यक्ती काचेवरच पाय ठेवायला गेली तर आपण त्यात काय करू शकतो. शिकारी सावजाला आपल्या जाळयात ओढण्याचा प्रयत्न करत होता आणि इथं तर सावज स्वतःहून शिकाऱ्याच्या जाळयात अडकायला तयार झाले होते. सरुने मला होस्टेलला सोडले, वाटेत आम्ही एकमेकांशी काहीच बोललो नाही. मी होस्टेलला पोहोचल्यावर काही वेळाने संजय होस्टेलच्या खाली येऊन थांबला व त्याने निरोप देऊन मला बोलावून घेतले. मी संजयला अचानक बघून जरा गोंधळूनच विचारले, "संजय तु आत्ता यावेळी इथे काय करतोस? माझ्याकडे एवढं काय अर्जंट काम काढलंस?"

संजय म्हणाला," तुला हेच सांगायला आलोय की तु सरस्वतीला माझ्या विरोधात कितीही भडकवायचा प्रयत्न केला तरी ते अशक्य आहे कारण सरस्वतीचा माझ्यावर जरा जास्तच विश्वास आहे. सरस्वतीच्या बाबांनाही माहीत आहे की मी वेगवेगळ्या मुलींसोबत फिरतो पण त्यांना हे माहीत नाही की मी त्यांच्या मुलीला सुद्धा फिरवत आहे. सरस्वती तिच्या बाबांना इतक्यात तरी माझ्या बद्दल काही खरं सांगणार नाही तेव्हा तिला माझ्या बद्दल काही खरं कळणार नाही. तु ही हा प्रयत्न करु नकोस."

मी म्हणालो," तु मला धमकी द्यायला आला आहेस का?"

संजय म्हणाला," धमकी द्यायची असती तर एकटा आलो नसतो पूर्ण गँगला सोबत घेऊन आलो असतो. तुला धमकी द्यायची गरज नाहीये कारण सरस्वती माझ्यासाठी एवढी ही महत्त्वाची व्यक्ती नाहीये, समजा तिचा तुझ्या बोलण्यावर विश्वास ही बसला तरी जास्तीत जास्त होऊन होऊन काय होईल, ती माझ्या सोबत असलेले संबंध तोडून टाकेल एवढेच ना, मला त्याने काही फरक पडणार नाही. माझ्या आयुष्यातून एक सरस्वती गेली तर मला काहीही वाटणार नाही."

मी म्हणालो," तुझं बोलून झालं असेल तर तु जाऊ शकतोस."

संजय तेथून निघून गेला. मी संजयला जेवढ नीच समजत होतो तो तर त्याच्या पेक्षाही जास्त नीच निघाला होता. आजपर्यंत प्रेम आंधळ असतं हे ऐकलं होतं पण आज सरुला बघून याचा अनुभव सुद्धा आला.मी सरुला काही बोलायला गेलो तर ती माझ्याशी मैत्री तोडून टाकणार असल्याने मी आपला शांत राहण्याचा मार्ग स्विकारला. 

सरुची व माझी रोज भेट होत असे पण मी सरुकडे कधीही संजयचा विषय काढला नाही. दादाचे लग्न एक आठवड्यावर आले असता मी गावी गेलो, यावेळी कॉलेजला सुट्टी नसल्याने दादाच्या लग्नाला यायला कोणालाच जमणार नव्हते. मी दहा दिवसांची सुट्टी घेऊन गावी गेलो. ताई प्रमाणेच दादाचेही लग्न थाटामाटात पार पडले. शैला आमच्या घरी लक्ष्मी म्हणून आली असेच म्हणावे लागेल कारण दादाचं लग्न झाल्यापासून आमची घरची आर्थिक परिस्थिती सुधारली होती. पिकाला चांगला भाव मिळायला लागला होता, दुधाचे, तुपाचे भावही वाढले होते. दादाने नवीन मोटरसायकल घेतली होती, काही दिवसांनी दादाने पुण्याला येऊन मला नवीन सायकल घेऊन दिली. नवीन सायकल घेतल्या पासून मी कंपनीत, कॉलेजला सायकलनेच ये जा करु लागलो. काही महिन्यांनी दादाने नवाकोरा ट्रॅक्टर घेतला. शैला दादाच्या खांद्याला खांदा देऊन शेतीत राबायची. घरातील कामांना आईला अजिबात हात लावू देत नसायची.

माझे कॉलेजचे दुसरे वर्ष संपले होते. आता कॉलेजचे एकच वर्ष राहिले होते. संजय मुळे सरु व माझ्या मैत्रीत थोडा का होईना दुरावा आलाच होता. निर्मला सोबत अधून मधून गप्पा व्हायच्या. दिगंबर व शालिनीचे मस्त चालले होते. शालिनीने तिच्या घरी दिगंबर बद्दल आधीच कल्पना देऊन ठेवली होती. येणाऱ्या सुट्टीत दिगंबर शालिनीच्या आई वडिलांना भेटण्यासाठी गावी जाणार होता. शालिनीच्या घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम होती तेव्हा ते दिगंबरला आर्थिक परिस्थिती वरुन नाकारण्याची शक्यताच नव्हती. दिगंबर कष्टाळू, निर्व्यसनी होता. प्रत्येक मुलीच्या आई वडिलांना हेच हवे असते ना.निर्मलाच्या आयुष्यात अजून तरी कोणी नव्हतं आणि माझे सरुवर प्रेम असून त्याचा काही उपयोग होईल असं वाटतं नव्हतं.

आमचं कॉलेजचं तिसरं वर्ष सुरू झालं होतं, शेवटचं वर्ष असल्याने अभ्यास थोडा जास्त होता. कंपनीत साहेबांनी माझ्या पगारात वाढ केली होती. कंपनीतील अकाऊंट डिपार्टमेंट मधील माणसाने काही दिवसांसाठी सुट्टी घेतली होती त्या काळात साहेबांनी अकाऊंट डिपार्टमेंटची जबाबदारी माझ्यावर सोपवली. मला अकाऊंट डिपार्टमेंटचा इतका अनुभव नव्हता पण कुठलेही काम पहिल्यांदा करताना त्याचा अनुभव आपल्याला नसतोच ना. माझ्यावर सोपवलेले काम मी काळजीपूर्वक व अचूकपणे करण्याचा प्रयत्न करत होतो. अकाऊंट डिपार्टमेंट मधील माणूस परत आल्यावर त्याने साहेबांना सांगितले की ह्या मुलाने त्याचे काम अचूकपणे केले आहे, इथून पुढे त्याला माझा मदतनीस म्हणून ठेवला तर खूप बरे होईल, त्यामुळे माझी बदली कंपनीच्या वर्कशॉप मधून ऑफिसमध्ये झाली. मी हेही काम मन लावून शिकत होतो. सोबत शेवटच्या वर्षाचा अभ्यास सुद्धा मन लावून करत होतो. शालिनीने लायब्ररीतील नोकरी सोडली होती. मेसवाल्या काकांनीही दिगंबरच्या कामात त्याला बढती दिली होती. दिगंबर कडे मेसचा हिशोब लिहिण्याचे काम दिले होते. दिगंबर त्याचे काम प्रामाणिकपणे करत होता. दिगंबरला काही अडलं तर मी मदतीला होतोच.

आतापर्यंतच्या सर्व एक्साम मध्ये मी पहिल्या पाच विद्यार्थ्यांमध्ये येत असायचो, आता शेवटच्या एक्साम मध्ये सुद्धा मला पहिल्या पाचात यायचेच होते, त्यासाठी मी दिवसरात्र अभ्यास करत होतो. दिगंबर, निर्मला सोबत गप्पा मारणे मी कमी केले होते. एक्सामच्या एक महिना आधी आमच्या कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाच्या मुलांना सेन्डऑफ दिला जायचा, त्या दिवशी सर्व मुली साड्या घालून आल्या होत्या तर आम्ही मुले शर्ट पॅन्ट व टाय असा वेश परिधान करुन आलो होतो, शिक्षकांनी हुशार मुलांचे कौतुक केले, आमच्यातील काही विद्यार्थ्यांनी कॉलेज, शिक्षक, व या तीन वर्षांच्या प्रवासा बद्दलच्या आठवणी भाषणातून सांगितल्या. सरुने व शालिनीनेही भाषण केले होते. आम्ही एकत्र फोटो काढले होते, मी सरुसोबत एकटा फोटो घ्यायला विसरलो नाही. फोटो सेशन झाल्यावर आम्ही सगळे कॉलेज कॅन्टीन मध्ये गेलो व तिथे जाऊन नाश्ता केला. यानंतर आम्ही कॉलेजला फक्त एक्साम पुरतेच येणार होतो. एक्साम झाल्यावर आमचे सर्वांचे मार्ग वेगवेगळे असणार होते. आम्ही नाश्ता करत असतानाच निर्मलाला उलटी आल्यासारखे झाल्याने ती पळतच बेसिनच्या दिशेने गेली, तिच्या पाठोपाठ शालिनीही गेली होती. बऱ्याच दिवसापासून निर्मलाचा चेहरा सुकलेला दिसत होता. मी अभ्यासात इतका व्यस्त होतो की साधी तिची चौकशी करायला सुद्धा गेलो नाही. निर्मलाची तब्येत अचानक बिघडण्यामागे काय कारण होते याची कल्पना कोणालाच नव्हती. 

सेंड ऑफचा कार्यक्रम संपल्यावर मी थेट कंपनीत जाऊन साहेबांची भेट घेण्यासाठी त्यांच्या केबिनमध्ये गेलो. साहेब त्यांच्या कामात व्यस्त होते.

"मे आय कम इन सर" मी विचारले

साहेबांनी वर मान करून पाहिले व ते म्हणाले, "अरे अविनाश ये ना"

मी आत गेल्यावर साहेबांनी मला त्यांच्या समोरील खुर्चीत बसायला सांगितले, मी खुर्चीत बसलो.

साहेबांनी मला विचारले," अविनाश माझ्याकडे काही काम काढलं होत का?"

मी म्हणालो," साहेब मला एक्साम होईपर्यंत सुट्टी पाहिजे होती."

साहेब म्हणाले," अरे हो तुमची फायनल एक्साम जवळ आली आहे ना, यावेळीही तु पहिल्या पाच विद्यार्थ्यांमध्ये येशीलच यात काही शंकाच नाहीये. तुला हवी तेवढी सुट्टी घे. पुढचा काही प्लॅन ठरवला आहे की नाही, म्हणजे कॉलेज संपल्यावर पुढे शिकणार आहेस की नोकरी करणार आहेस?"

मी म्हणालो," साहेब अजून तरी मी काही पक्के ठरवले नाहीये पण शक्यतो नोकरीच करेल."

साहेब म्हणाले," आमची सरु तर MBA करायचं म्हणत आहे, तस मीच तिला सुचवलं आहे,एवढी मोठी कंपनी चालवायची म्हटल्यावर शिक्षणही तसेच पाहिजे ना. मला वाटतंय की तु एक्साम संपल्यावर आपल्याच कंपनीत पूर्णवेळ नोकरी करावी, मी तुला पगारही चांगलाच देईल, सोबतच तु बँकेच्या परीक्षा दिल्या तर अति उत्तम होईल. बँकेत नोकरी लागल्यावर तु बाहेरून परीक्षा देऊन पुढील शिक्षणही करु शकतोस."

मी म्हणालो," साहेब तुम्ही सांगत आहात म्हटल्यावर हे माझ्यासाठी योग्यच असेल पण या सर्वाचा निवांत विचार मी एक्साम संपल्यावर करेल."

साहेब म्हणाले," ठीक आहे जशी तुझी इच्छा, व्यवस्थित अभ्यास कर हे तुला सांगण्याची गरज नाहीये तरी पण सांगतो की नीट लक्ष देऊन अभ्यास कर."

मी साहेबांना पाया पडून नमस्कार केला, साहेब म्हणाले की माझा आशिर्वाद कायम तुझ्या सोबत आहे, यशवंत हो. 

साहेबांना भेटल्यावर मी विजय दादांचा आशिर्वाद घ्यायला त्यांच्याकडे गेलो. विजय दादा हे मला माझ्या गुरु सारखेच होते, कंपनीतील काम मला त्यांनीच शिकवले होते. 

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all