निस्वार्थ प्रेम भाग २२ #मराठी कादंबरी

Avinash saw sanjay with another girl

मागील भागाचा सारांश: सरस्वतीने अविनाशला एक चिठ्ठी दिली त्यात तिने तिची व संजयची भेट कुठे व कशी झाली हे सविस्तर लिहिले होते तसेच त्यांच्यात प्रेमाचे अंकुर कसे फुलले हेही लिहिले होते. सरस्वतीने अविनाशची माफी सुद्धा मागितली होती. अविनाशने सरस्वतीला माफ करण्याचे ठरवले होते. सरस्वतीने अविनाशची ओळख संजय सोबत करुन दिली. सिंहगडावर फिरायला जायच्या निमित्ताने संजयची ओळख दिगंबर सोबत झाली तसेच सरस्वती, निर्मला व शालिनी या तिघीमध्ये मैत्री झाली, त्यांचा सर्वांचा मिळून एक ग्रुप तयार झाला होता, ते सर्व मिळून वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाऊ लागले.

आता बघूया पुढे....

आमच्या दुसऱ्या वर्षाची पहिल्या सेमिस्टरची एक्साम झाल्यावर कॉलेजला पंधरा दिवसांची सुट्टी होती आणि याच सुट्टीत माझ्या ताईचे लग्न होते. दिगंबर ताईच्या लग्नाला येणारच होता पण माझी इच्छा होती की सरु, शालिनी व निर्मलानेही लग्नाला यावं. सरुला आमंत्रण द्यायचं म्हटल्यावर संजयलाही लग्नाचे आमंत्रण द्यावे लागणार होते. मी सर्वांनाच लग्नाचे आमंत्रण दिले होते. सरुच्या घरी जाऊन आत्त्यांना व साहेबांना मी ताईच्या लग्नासाठी आमंत्रण दिले. 

कॉलेजला सुट्टी लागल्या लागल्या मी गावी गेलो. दिगंबर एका आठवड्याने गावाला येणार होता. सरु, निर्मला व शालिनीचे पक्के ठरलेले नव्हते. घरी गेल्यावर कामांचा भला मोठा डोंगर पुढे वाढलेला होता. पाहुण्यांच्या घरी जाऊन त्यांना लग्नासाठी आमंत्रित करायचे होते. दोन तीन दिवसांत आमंत्रण द्यायचे काम संपले होते. मावशी, मामा, आत्या आणि त्यांची मुले घरी आली होती, लहान मुलांची गडबड गोंधळ चालू होता. पूर्ण घर पाहुण्यांनी भरले होते.आमच्या गावाकडे ही पद्धतच होती की लग्नघरी जवळचे पाहुणे लग्नाच्या पंधरा दिवस आधीच हजर होत असे. चार पाच दिवसांनी दिगंबर गावी आला, तो आल्याने माझी बरीचशी कामे हलकी झाली होती. लग्नाच्या आठ दिवस आधी घरी जागरण गोंधळ घालण्यात आले, त्या दिवसापासूनच लग्नाच्या कार्यक्रमाना सुरुवात झाली होती.

दिगंबर त्याच्या बहिणीचे लग्न असल्या सारखेच कामे करत होता. लग्नाच्या दोन दिवस आधी सरु निर्मलाला व शालिनीला सोबत घेऊन गावी पोहोचल्या, त्यांनी अचानक येऊन मला सारप्राईजच दिले होते. सरुने निर्मला व शालिनीची रहायची सोय तिच्या मामाच्या घरी केली होती. हळदीच्या दिवशी आम्ही सर्वांनी हळद खेळून खूप धमाल केली होती. फोटोग्राफरने आमचे सर्व खास क्षण कॅमेऱ्यात कैद केले होते. दिगंबर व मी दोघांनी मिळून सरुला हळदीत पूर्ण माखून टाकले होते. गावातील वयस्कर बायका म्हणत होत्या की कुवाऱ्या मुलांना हळद नसते लावायची पण आम्ही थोडंच कोणाचं ऐकणार होतो.

मी माझ्या इतर भावंडांसोबतही हळद खेळलो होतो. लग्नाच्या दिवशी हळदीमुळे का कशामुळे माहीत नाही पण सरुच्या चेहऱ्याचा रंग अधिकच खुललेला होता. सरुने हिरव्या रंगाची साडी घातलेली होती, तिच्या गोऱ्या रंगावर हिरवी साधी शोभून दिसत होती. शालिनी व निर्मलाही नटल्या थटल्या होत्या पण माझी नजर फक्त सरुवरच होती.माझी नजर काही तिच्या वरुन हटत नव्हती.

ताईचे लग्न वाजत गाजत पार पडले. कन्यादानाच्या वेळी आई बाबांचे डोळे पाणावले होते. खरंच किती कठीण प्रसंग असतो ना,आपली मुलगी आपण लहानाची मोठी करायची आणि एक दिवस ती दुसऱ्याच्या हवाली करुन द्यायची. आपण आपली एखादी वस्तू समोरच्याला देताना किती वेळ विचार करतो ही तर जिवाभावाची मुलगी असते. कन्यादान करण्यासाठी खूप मोठे मन असावे लागते. लग्नातील सर्व विधी उरकले होते, आता ताईची सासरी जायची वेळ झाली होती, मला वाटलं होतं की माझ्या डोळ्यात पाणी येणार नाही पण वातावरणच असे होते की आपोआप डोळयात पाणी भरुन आले. मी दादाकडे बघितलं तर दादाच्याही डोळ्यात पाणी होते. ताई तर खूपच रडत होती. ताई आईच्या गळ्यात पडून रडली तो क्षण तर बघवतच नव्हता. आम्ही सर्वांनीच पाणावलेल्या डोळयांनी ताईला निरोप दिला होता. 

लग्न झाल्यानंतर काही पाहुण्यांनी आमचा निरोप घेऊन ते त्यांच्या घरी निघून गेले तर काही पाहुणे थांबून होते. दुसऱ्या दिवशी सरु, शालिनी, निर्मला व दिगंबर चौघेही सोबत गावावरुन निघाले होते, त्यांना अजून थोडे दिवस थांबण्याची इच्छा होती पण सुट्टी संपणार असल्याने त्यांना जाणे भाग होते. ताईचं परतमूळ राहील असल्याने मला काही लगेच जाता येणार नव्हते. पुढील तीन चार दिवसांत ताईचे परत मूळ झाले. दादाच्या लग्नाची तारीख पुढील दोन महिन्यांनी काढली होती. शैला घरी आली म्हणजे आईच्या कामाला हातभार लागेल तसेच आमच्या घरातील ताईची कमी शैला भरुन काढू शकते म्हणून लग्नाची तारीख जवळचीच धरण्यात आली होती.

ताई तिच्या घरी गेल्यावर मी पुण्यात परतलो. पुन्हा तेच रुटीन सुरू झाले, कॉलेज, कंपनी, रविवारी कुठेतरी बाहेर फिरायला जाणे. आता मी राजनची ट्युशन घेणे बंद केले होते कारण त्याचा गणिताचा पाया पक्का झाला होता व पुढील अभ्यासा साठी त्याने दुसऱ्या सरांकडे ट्युशन चालू केली होती. माझे कामातील सातत्य बघून साहेबांनी माझ्या पगारात वाढ केली होती. साहेब माझ्यावर महत्त्वाची कामे सोपवू लागले होते. एके दिवशी साहेब मला एका महत्वाच्या मिटिंगला सोबत घेऊन गेले होते. ती मिटिंग एका मोठया हॉटेलमध्ये ठेवलेली होती. मिटिंग झाल्यावर साहेबांनी मला हॉटेलच्या रिसेप्शन जवळ बसण्यास सांगितले व ते दुसऱ्या कंपनीच्या मालकाला भेटायला निघून गेले. मी हॉटेलच्या रिसेप्शन एरियात पेपर वाचत बसलो, पेपर वाचत असताना मला अचानक ओळखीचा आवाज आला म्हणून मी त्या दिशेने बघितले तर तो आवाज संजयचा होता. रिसेप्शन एरियाला लागूनच स्विमिंग पूल होता, तसही मला एकट्याला तिथे बसून बोअर झालं होतं म्हणून मी संजयच्या दिशेने गेलो, मी त्याला आवाज देणार इतक्यात एक मुलगी येऊन त्याला बिलगली.मी तर थोड्यावेळ शॉकच झालो, हे जे काही आत्ता आपण बघितले ते खरे आहे की खोटे याची खातरजमा करुन घेण्यासाठी मी अजून थोडा पुढे गेलो, तर संजय त्या मुलीसोबत स्विमिंग करत होता, त्या मुलीने स्विमिंग costume घातला होता आणि ते दोघे जरा जास्तच जवळ होते. माझ्याकडे त्या वेळेस कॅमेरा असत तर मी त्या दोघांचा फोटो काढून सरुला दाखवला असता. संजय सरुला फसवत होता हे धडधडीत दिसत होते. माझ्या रागाचा पारा खूप चढलेला होता. संजय सरुचा विश्वासघात करत आहे हे मला सहनच होत नव्हते.

साहेब मला शोधत शोधत स्विमिंग पुलच्या दिशेने आले, मी माझ्या आपल्या वेगळयाच विचारात हरवलेला होतो, साहेब माझ्या जवळ येऊन म्हणाले," अविनाश अरे मी तुला तिकडेच शोधत होतो,तु इकडे का आलास?"

मी म्हणालो," रिसेप्शन जवळ मला बसून बसून कंटाळा आला होता, इकडे स्विमिंग पूल दिसला, थोडा विरंगुळा म्हणून इकडे आलो."

साहेब म्हणाले," अरे ठीक आहे, पुलच्या त्या टोकाला जो मुलगा दिसत आहे ना, तो सरुचा मित्र आहे संजय म्हणून, तु सरुच्या तोंडून याच नाव एकदातरी ऐकलं असशीलच ना?"

मी काहीच उत्तर नाही दिले, काय बोलणार होतो? मी हे सांगायला हवे होते का? की हा तुमच्या मुलीचा खूप जवळचा मित्र आहे आणि तुमच्या मुलीचे या मुलावर खूप प्रेम आहे,हा मुलगा तुमच्या मुलीचा विश्वास घात करत आहे. मी माझ्याच विचारात हरवलेला होतो, साहेबांच्या मागे मागे गाडीच्या दिशेने चाललो होतो. गाडीत बसल्यावर साहेबांनी मला काहीतरी विचारले पण मी उत्तर न दिल्याने ते मला म्हणाले," अविनाश तु कसला विचार करत आहेस याची कल्पना मला आहे, मघाशी तु संजयला त्या मुलीसोबत ज्या अवस्थेत बघितलं त्याचाच विचार करत असशील ना? अरे बाबा संजय हा एका मोठया माणसाचा मुलगा आहे, त्यांच्या कडे बक्कळ पैसा आहे, हा इथे नेहमी येत असतो,प्रत्येक वेळी मुलगी वेगवेगळी असते. तुझी जडणघडण गावाकडे झालेली असल्याने तुला ह्या सर्व गोष्टी झेपत नसतील. माझा मुलगा जर अस वागला असता तर मलाही ते चाललं नसतं, आता त्याच्या वडिलांना हे सर्व पटतं तर आपण तरी काय करु शकतो? अजून तुला खूप काही बघायचं आहे, आपल्या सारखं साधं सरळ हे जग नाहीये."

साहेबांनी मला या नवीन जगाची ओळख करुन दिली होती पण त्यांनी ह्या जगाची ओळख त्यांच्या मुलीला करुन देणे गरजेचे होते.मी ठरवले होते की सरुला जाऊन संजयच्या खऱ्या रुपाची ओळख करुन देऊ. मी होस्टेलला पोहोचल्यावर दिगंबरला हे सर्व सांगितले व म्हणालो," संजय किती नीच माणूस आहे, सरु त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत आहे. ही तर सरळसरळ फसवेगिरी आहे. मला तर त्या क्षणाला जाऊन वाटले होते की आपण जाऊन याच्या एक कानफडात दयावी व विचारावे की तुला सरुला फसवण्याचा काय अधिकार आहे? पण मी स्वतःला खूप मुश्किलीने रोखलं. सरु त्याच्यावर किती प्रेम करते आणि तो"

दिगंबर म्हणाला," तुला संजयचा राग आला हे मला मान्य आहे, मीही त्या जागी असतो तर मलाही त्याला मारायची इच्छा झाली असती. तु त्याला जाब विचारायला जाशीलही पण कुठल्या नात्याने? सरु तुझी जवळची मैत्रीण आहे तिथपर्यंत ठीक आहे पण ही जी काही गोष्ट आहे ती सरस्वती व संजय यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील आहे, या बाबतीत आपल्या सारख्यांना बोलण्याचा काहीच अधिकार नसतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेव, संजय हा एका पैश्या वाल्याचा मुलगा आहे तु जर त्याच्याशी काही पंगा घ्यायला गेलास तर तो काहीही करु शकतो. आपण आपल्या जीवाला सांभाळून रहावे. मेसवाले काका सांगत होते की त्यांची मेस अजून एका कॉलेजच्या इथे चालू असते, तेथील गोष्ट ते सांगत होते, एका मुलीवरुन दोन मुलांमध्ये मारामारी झाली, त्यात एक मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत, तर एका मुलाचा हात मोडला आहे.म्हणून मी तुला सांगतो संजय पासून दूर रहा."

मी म्हणालो," म्हणजे मग मी संजय बद्दल सरुला सर्व खरं खरं सांगू की नको?"

दिगंबर म्हणाला," तु सरस्वतीला या सर्वाची कल्पना दे पण ती तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवेल का? आधी हे बघ. तिला तु सर्व सांगू शकतोस फक्त काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण होणार नाहीत याची काळजी घे."

दोन तीन दिवसांनी कंपनीतून निघाल्यावर मी व सरु कॉफी पिण्यासाठी गेलो असता तिथे संजयही आला होता. गावावरुन आल्यापासून संजय मला पहिल्यांदाच भेटत होता. मला तर संजय सोबत बोलण्याची इच्छा नव्हती पण सरु समोर असल्याने बोलावे लागणार होते. संजय मला म्हणाला," अविनाश ताईचे लग्न खूपच जोरात झाले म्हणायचे,सरस्वती सांगत होती तुझ्या ताईच्या लग्नाबद्दल."

मी म्हणालो," हो आमच्या गावाकडे अशीच लग्ने होतात. तु लग्नाला का आला नाहीस? तु आला असता तर तुलाही लग्नाचा आनंद घ्यायला भेटला असता."

संजय म्हणाला," अरे हो मलाही लग्नाला यायला आवडलं असतं पण नेमकी त्याच वेळी माझी स्विमिंग competition होती ना, म्हणून मला यायला जमले नाही."

आता त्याने स्वतःहून स्विमिंगचा विषय काढला होता म्हणजे अस झालं होतं की गळ मास्यापर्यंत पोहोचण्या आधीच मासा स्वतःहून गळाला लागायला आला होता. मी म्हणालो, "मला नव्हतं माहीत की तु स्विमिंग मध्ये एवढा तरबेज असशील."

सरु अभिमानाने म्हणाली," अरे हो संजय शाळेत असल्यापासूनच स्विमिंग मध्ये तरबेज आहे, प्रत्येक स्पर्धेत संजय पहिला नंबर काढतो."

मी म्हणालो," हो का? अरे मग बरोबर आहे, मी त्या दिवशी सरुच्या वडिलांसोबत मिटिंग साठी क्लब हाऊस शेजारच्या हॉटेलमध्ये गेलो होतो, तिथे मी तुला स्विमिंग पुलवर बघितल्या सारखे वाटले पण मला वाटलं की तो दुसरा कोणी मुलगा असेल कारण तु एका मुलीसोबत स्विमिंग करत होतास ना? म्हटलं हा आपला संजय असूच शकतं नाही."

सरु लगेच म्हणाली," संजय ती मुलगी कोण होती? आणि तु तिच्या सोबत स्विमिंग का करत होतास?"

संजय सरस्वतीच्या प्रश्नाचे काय उत्तर देईल? हे बघूया पुढील भागात...

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all