Aug 05, 2021
स्पर्धा

निस्वार्थ प्रेम भाग १६ #मराठी कादंबरी

Read Later
निस्वार्थ प्रेम भाग १६ #मराठी कादंबरी
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

मागील भागाचा सारांश: दिगंबर अविनाशला समजावून सांगतो की सरस्वती त्याची मैत्रीण म्हणून ठीक आहे पण त्याच्या व्यतिरिक्त तिच्या प्रती असलेल्या भावनांना तुला आवर घालावा लागेल, अविनाश व सरस्वतीच्या राहणीमानात कश्या प्रकारची तफावत आहे हेही त्याने समजावून सांगितले. सरस्वतीला प्रेम या विषयावर भाषण करायचे असल्याने तिने अविनाशची मदत मागितली व त्याच्या मते प्रेमाची व्याख्या काय आहे?हेही समजून घेतले. दिगंबरला कॉलेजमध्ये शालिनी नावाची मैत्रीण भेटली, तिची व दिगंबरची ओळख कशी झाली हे त्याने अविनाशला सांगितले.

आता बघूया पुढे...

पायाला दुखापत झाल्यामुळे सकाळी उठायची सवय मोडून गेली होती. सोमवारी सकाळी घड्याळाचा गजर झाल्यावर उठायचे खरंच खूप जास्त जीवावर आले होते पण दुसरा पर्याय नसल्याने उठावे लागले. दिगंबर व मी कॉलेजमध्ये जाण्यासाठी निघालो,कॉलेजला जात असताना वाटेत दोन मुली सायकल वर चालल्या होत्या, त्यांना बघून दिगंबरने सायकलचा स्पीड कमी केला, त्या मुलीही दिगंबरकडे बघून हसल्या. मला अंदाज आला होता की ह्यातली नक्कीच एक शालिनी असेल. दिगंबरने म्हणाला," अविनाश ही शालिनी व ही निर्मला, आणि शालिनी हाच तो अविनाश ज्याला तुला भेटायचे होते."

शालिनी व निर्मलाने माझ्याकडे बघून स्माईल दिली मग मीही त्यांच्याकडे बघून स्माईल दिली व म्हणालो," भाषणाची तयारी झाली का?"

शालिनी म्हणाली," हो तयारी केली तर आहे बघू आता स्पर्धेच्या वेळी काय होईल?"

मी दिगंबरला हळूच म्हणालो," दिगंबर आपण जर ह्याच स्पीडने चाललो तर तिकडे वक्तृत्व स्पर्धा संपून जायची."

मी अस म्हटल्यावर दिगंबरने सायकलचा स्पीड वाढवला आणि मग आम्ही शालिनी व निर्मलाच्या पुढे निघून गेलो. माझा पाय अजून पूर्णपणे बरा न झाल्याने मला लंगडत चालावे लागत होते. कॉलेजमध्ये जो कोणी ओळखीचा भेटेल तो हेच विचारायचा की तुझ्या पायाला काय झालंय? सर्वांना एकच उत्तर देऊन कंटाळा आला होता. कॉलेजमध्ये आज लेक्चर्स नव्हतेच पूर्णवेळ वक्तृत्व स्पर्धाच असणार होती. वक्तृत्व स्पर्धेच्या आधी माझी व सरुची भेट होऊ शकली नाही. 

काही वेळातच कॉलेजच्या एका हॉल मध्ये वक्तृत्व स्पर्धा सुरू झाली, सुरवातीला दोन तीन भाषण झाल्यावर शालिनीचे भाषण झाले, शालिनीचे छान भाषण केले होते, पण माझा इंटरेस्ट सरुचे भाषण ऐकण्यात होता. दिगंबरने शालिनीचे भाषण खूप मन लावून ऐकले. शालिनी नंतर एक दोन जणांनी भाषण केल्यावर सरुचा नंबर आला. मी सरुचा एक न एक शब्द मन लावून ऐकत होतो. सरुने भाषण करायला सुरुवात केली, तिचा आवाज सर्वांमध्ये एकदम खणखणीत होता. मी तर तिचा खणखणीत आवाज ऐकून शॉकच झालो होतो.अजूनही तिच्या भाषणाचा एकेक शब्द माझ्या लक्षात आहे,' माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो तुमच्या पैकी बऱ्याच जणांना तुमचं प्रेम सापडलं असेल किंवा काहीजण प्रेमाच्या शोधात असाल बरोबर, किंवा आपल्यापैकी बरेच जण असतील ते समोरच्यावर प्रेम करत असतील पण ते व्यक्त करण्याची हिम्मत त्यांना होत नसेल. मी तर हे म्हणेल की तुम्ही जर समोरच्या व्यक्तीवर प्रेम करत असाल तर परिणामांची पर्वा न करता आपले प्रेम व्यक्त करावेत.आता प्रेमाची व्याख्या ही प्रत्येकाची वेगळी असते, आपल्या सर्वांना एकाच पत्त्यावर पोहोचायचे आहे पण आपल्या सर्वांच्या वाटा वेगळ्या असतात तसच प्रेमाचंही असतं, आपण सगळेच सगळ्यांवर प्रेम करत असतो फक्त ते दाखवायची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते.

अस अजिबात गरजेचं नाहीये की आपण प्रेम फक्त आपल्या जोडीदारावरच करावे, आपलं पहिलं प्रेम असतं ते म्हणजे आपले आई वडील मग भावंडे, नंतर मित्र मैत्रीण आणि सगळयात शेवटी येतो तो आपला आयुष्याचा जोडीदार. आई आपल्यावर आपले लाड करून, हट्ट पुरवून तिचे प्रेम व्यक्त करते तर बाबा आपल्यावर ओरडून प्रेम व्यक्त करतात, आपले बाबा आपल्या चांगल्या साठीच आपल्यावर ओरडत असतात. प्रत्येक नात्याची प्रेम व्यक्त करण्याची गरज व पद्धत वेगवेगळी असते. अलीकडेच माझ्या एका मित्राने सांगितले की त्याचे सर्वात जास्त प्रेम त्याच्या कुत्र्यावर आहे. प्रेम हे प्रेम असते ते किलो, लीटर अश्या मापकात मोजता येत नाही. एकतर प्रेम असते किंवा नसते. मला तर वाटतं की प्रेम हे सहवासातून निर्माण होते. ज्याचा सहवास आपल्याला अधिक आवडतो त्या व्यक्तीवर आपले आपसूकच प्रेम जडते. आता मी तुम्हाला जास्त बोअर न करता, मी प्रेमा बद्दल केलेली एक कविता किंवा आपण त्याला चारोळीही म्हणू शकतो ती वाचून दाखवते,

प्रेम म्हणजे मैत्री

प्रेम म्हणजे विश्वास

प्रेम म्हणजे सहवास

प्रेम म्हणजे आधार

प्रेम म्हणजे त्याग

प्रेम म्हणजे भांडण

प्रेम म्हणजे माघार

प्रेम म्हणजे हसू

प्रेम म्हणजे अश्रू

प्रेम म्हणजे मिठी

प्रेम म्हणजे स्पर्श

प्रेम म्हणजे साथ

सरुच्या भाषणाचा उत्तरार्ध ऐकून माझ्या डोळ्यात पाणीच आले होते. सरुचे भाषण संपले आणि सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट झाला होता. सरुचा वक्तृत्व स्पर्धेत पहिला नंबर आला होता. सरु ट्रॉफी घेताना खूप खुश दिसत होती. ट्रॉफी मिळाल्यानंतर मला तिला भेटायचे होते पण सरु घाईघाईने तेथून निघून गेली होती, जाताना सरुचा चेहरा रडवेला झालेला दिसला म्हणून मी सरुच्या मैत्रिणींकडे चौकशी केली तेव्हा सरुच्या मैत्रिणींनी येऊन मला सांगितले की तिचे आजोबा वारले. 

सरुचे आजोबा म्हणजे आमच्या गावचे जमिनदार, माझ्या डोळ्यासमोर लगेच त्यांचा चेहरा उभा राहिला, त्यांच्या डोक्यावर कायम सफेद फेटा बांधलेला असायचा, मी कधीच त्यांना फेट्या विना बघितलं नव्हतं. जमिनदारांचा तोरा काहीतरी वेगळाच होता, गावातील कोणीच त्यांच्यापुढे ब्र शब्दही काढत नव्हते.जमिनदारांचा शब्द आमच्या गावातील लोकं तर सोडाच पण आजूबाजूच्या गावातील लोकही तोलून धरत होते, आमच्या गावात जर कोणाचं भांडण झालं तर ते मिटवण्याचे काम जमिनदार करत होते, जमिनदार गरिबांचे वाली होते. माझी आणि त्यांची झालेली शेवटची भेट मला अजूनही आठवते, मी पुण्याला पहिल्यांदा येण्याआधी आई बाबांच्या सांगण्यावरून त्यांचा आशिर्वाद घेण्यासाठी गेलो होतो तेव्हा ते म्हणाले होते की पोरा शिकून सवरून मोठा हो, तुझे मायबाप तुम्हा पोरांसाठी रात्रीचा दिवस करत आहेत,त्यांना चांगले दिवस दाखव. मी त्यांना खूप घाबरत असायचो, त्यांचा आवाज वाडा दणाणून टाकायचा. ते गोर गरीबांना अन्न, वस्त्र पुरवायचे. जमिनदार नेहमी मिशांना पीळ देत बोलायचे. त्यानंतर माझ्या डोळ्यासमोर आक्कांचा चेहरा आला, आक्कांच्या कपाळावरील भरजरीत कुंकू आठवला, आक्कांचे कपाळ बिना कुंकवाचे कसे दिसेल हा विचार करूनच माझे हात पाय गळाले होते. आक्कांचा सर्व साज शृंगार आता उतरला जाणार होता.

आयुष्याचे चक्र कसे आहे ना? दुःखामागून सुख व सुखामागून दुःख हे चालूच असते. आता सरूचाच विचार केला तर काही वेळापूर्वी भाषण चांगले केल्याने सरुला ट्रॉफी मिळाली होती, सरु किती खुश होती आणि काही वेळातच तिचे आजोबा निधन पावल्याने तिच्या आयुष्यात दुःख आले होते. सरु तिच्या आजोबांची खूप लाडकी होती. सरुला किती दुःख झाले असेल हे मी समजू शकत होतो पण माझा नाईलाज होता की मी सरु जवळ पोहोचू शकत नव्हतो. पुढचे पंधरा दिवस तरी सरु गावावरुन येणार नाही ह्याची कल्पना मला होतीच.

दोन चार दिवसांनी माझा पाय अजून थोडा बरा झाल्यावर मी कंपनीत जाऊ लागलो. पूर्वी कॉलेजला जाताना मी व दिगंबर असे दोघे असायचो पण आता आम्ही चौघे सोबत कॉलेजला जाऊ लागलो, आमच्या सोबत शालिनी व निर्मला दररोज येऊ लागल्या. शालिनी दिगंबर सारखीच बडबडी होती पण निर्मला खूप शांत होती. शालिनी पन्नास शब्द बोलल्यावर निर्मला कुठे जाऊन एक शब्द बोलायची. शालिनी व निर्मला दोघीही रुममेट होत्या. मी दोघींसोबत कमीत कमी बोलायचो. एकतर मला सरु सोडता इतर मुलींशी बोलायला एवढं आवडत नसायचं पण आता काय करणार शालिनी दिगंबरची मैत्रीण असल्याने मला तिच्या सोबत थोडंफार का होईना बोलावं लागायचं.सुरवातीला शालिनी सोबत बोलतांना काय बोलावं हे सुचायचे नाही पण कालांतराने त्याची सवय झाली. शालिनी व दिगंबर मध्ये नेहमीच छोट्या मोठ्या कुरबुरी चालू असायच्या, त्यांचं कसं होतं ना तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना.

मला सरुची खूप आठवण यायची पण तिला फोन ही करु शकत नव्हतो. घरी काय चालू असेल? याचीही चिंता लागली होती, ताईच्या लग्नाच्या जमवाजमवीचे काय झाले असेल? हेही कळायला मार्ग नव्हता. फोन करुन घरच्यांची चौकशी करावी म्हटली तर जमीनदारांच्या घरी वेगळाच गोंधळ सुरू आहे आणि आपण त्यात फोन करून आपल्या घरच्यांपर्यंत निरोप कसा काय पोहोचवायला लावायचा हा एक मोठाच प्रश्न होता. रविवारी राजनची ट्युशन घ्यायला जायचं तर त्यांच्या घरी कोणी नसल्याने जाऊन काहीच उपयोग नव्हता. रविवारी दिवसभर असाच लोळत बेडवर पडलो होतो तोच दिगंबर रुममध्ये धावत पळत आला व म्हणाला," अव्या तुझे आई बाबा तुला भेटायला आले आहेत आणि ते इथे वरच येत आहेत"

आई बाबा असे अचानक कसे आले असतील म्हणून मी दचकून उठून बसलो तोपर्यंत आई बाबा रुममध्ये आले सुद्धा. दिगंबरने त्याच्या बेडवरील पसारा बाजूला सारून आईला व बाबांना बसायला जागा दिली. आई माझ्या जवळ आली तिने माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवला व म्हणाली," पोरा पायाला एवढी दुखापत झाली होती तरी एक फोन करुन सांगितलं सुद्धा नाहीस, परवा जमिनदारांच्या घरी माझी व सरुची भेट झाली तेव्हा तिने मला तुझ्या पायाच्या दुखापती बद्दल सांगितलं.आठ दिवस बेडवर पडून होतास, तुझी सेवा करायला का तुझी काळजी घ्यायला इथे कुणी आहे का? जेव्हापासून मला कळालं तेव्हापासून माझा जीव थाऱ्यावर राहिला नाही की डोळ्याला डोळा लागला नाही, माझी ती अवस्था पाहून तुझे बाबा म्हणाले चल आपण पुण्याला जाऊन अविनाशला आपल्या डोळ्यांनी पाहून येऊ म्हणजे मनाला समाधान लाभेल."

आईच्या डोळ्यातील पाणी पाहून मलाही भरुन आले होते, दिगंबर हे सर्व एका कोपऱ्यात उभा राहून बघत होता,त्याला कळले की हे वातावरण जरा जास्तच भावनिक झाले आहे, आपल्यालाच हे निवळावे लागेल म्हणून तो म्हणाला," मावशी अविनाशची काळजी घ्यायला इथे कोणी नाही असं परत कधी म्हणू नका. मी जोपर्यंत याच्या सोबत तोपर्यंत तुम्ही याची काळजी करू नका. तुम्ही चहा घ्याल का? मी आत्ता खाली मेसमध्ये जाऊन चहा घेऊन येतो."

आई दिगंबरकडे बघत म्हणाली," अवि हा कोण आहे?"

मी म्हणालो," आई हा दिगंबर, मी घरी आलो होतो तेव्हा याच्याबद्दल कल्पना दिली होती ना? यानेच माझी खूप काळजी घेतली, मला बेडवरुन उतरू सुद्धा दिले नाही."

दिगंबर चहा घेण्यासाठी खाली निघून गेला मग मी त्याची पूर्ण कथा आई बाबांना सांगितली. मनातल्या मनात म्हटलं, ह्या सरुला काही डोकं बिक आहे की नाही कशाला आई बाबांना माझ्या पायाच्या दुखापती बद्दल सांगायचस, त्यांना एवढ्या लांब यायची गरज नसती पडली. सरु पण ना काय निरोप द्यायचा नी काय नाही द्यायचा हेच तिला कळत नाही. दिगंबर आई बाबांसाठी चहा घेऊन आला. दिगंबर व बाबांमध्ये बऱ्याच गप्पा झाल्या, शालिनी सोबत मैत्री झाल्यापासून दिगंबर थोडा टाळ्यावर आला होता म्हणून तर तो बाबांशी एवढा चांगल्या रीतीने गप्पा मारु शकला.

जमीनदारांचे निधन कश्याने झाले हे आईने मला तंतोतंत सांगितले, तसेच त्यांच्या घरातील परिस्थिती आता कशी आहे हेही सांगितले, आक्कांची तब्येत खालावल्याचेही आईकडून समजले. आमच्या मायलेकाच्या गप्पा चालू असताना दिगंबर बाबांना घेऊन आसपासचा एरिया दाखवायला घेऊन गेला. दिगंबरचे व बाबांचे सूत जुळले होते.

©®Dr Supriya Dighe

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now