निस्वार्थ प्रेम भाग १५ #मराठी कादंबरी

Digambar gives some suggestions to avinash

मागील भागाचा सारांश: अविनाशच्या पायाला दुखापत झाल्याने तो कॉलेजला जाऊ शकला नाही. दिगंबर कॉलेज वरून येताना त्याच्या सोबत सरस्वती अविनाशला भेटण्यासाठी आली. सरस्वतीने अविनाश साठी जेवणाचा डबा आणला होता. अविनाश व सरस्वती मध्ये बऱ्याच गप्पा झाल्या. सरस्वती निघून गेल्यावर अविनाश व दिगंबर मध्ये तिच्या वरून चर्चा झाली, अविनाशने सांगितले की सरस्वती मला आवडते यावर दिगंबरने त्याला सांगितले की तुला जरी ती आवडत असेल पण तिला तु आवडत असेल असं नाही, ती तुला तुझा मित्रच मानत असेल आणि हेही सांगितलं की मी तिला दुसऱ्या एका मुलासोबत बघितले होते.

आता बघूया पुढे.....

दिगंबर माझ्या डोक्यात सरुबद्दल खटकी टाकून त्याच्या कामाला निघून गेला, आमचं बोलणंही अर्धवट राहिलं. माझ्या मनात अनेक विचारांनी गर्दी केली, सरुचा तो मित्र कोण असेल? सरुचे त्याच्यावर प्रेम असेल का? आमच्या पेक्षा त्यांच्यात घनिष्ठ मैत्री असेल का? आता ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे हवी असेल तर आपल्याला सरु सोबत बोलावं लागेल पण तिच्याशी डायरेक्ट कसं बोलायचं हेच कळतं नव्हतं. विचार करुन करुन डोकं दुखायला लागलं होतं. 

रात्री दिगंबर माझ्यासाठी जेवणाचं ताट घेऊन आला त्यावेळी मी फक्त छताकडे पाहत पडलो होतो. दिगंबर माझ्या जवळ येऊन म्हणाला, "अविनाश झोपला होतास का रे? तुला बरं वाटत नाहीये का?"

मी त्याला म्हणालो," तु माझ्या डोक्यात सरु बद्दल ठिणगी टाकून गेलास आणि म्हणतोस की बरं वाटतं का?"

दिगंबर म्हणाला," सरुचा विषय बाजूला राहूदेत, आता उठ आणि जेवण करुन घे, तुला औषधे घ्यायची आहेत."

मी उठण्यासाठी आढेवेढे घ्यायला लागलो पण दिगंबरने मला बळजबरीने उठवलेच. मी जेवण करेपर्यंत दिगंबर इकडच्या तिकडच्या विषयावर बोलत होता. माझे जेवण झाले, औषधे घेतली गेली आणि मग तो म्हणाला, "अव्या चांगल्या मित्रांचे काम असते की आपल्याला बरोबर मार्गदर्शन करणे, तो जर कुठे चुकीच्या दिशेला वाहवत जात असेल तर त्याला वेळीच अडवणे.मागच्या आठवड्यात ज्या वेळेस मी खचलो होतो तेव्हा तुच मला आधार दिला होतास, आता माझी वेळ आहे. तुला सरस्वती आवडते हे मला मान्य आहे, तुला तिच्या बद्दल प्रेम वाटू शकते हेही ठीक आहे. पण आपण आपली पायरी ओळखून प्रेम करायला हवे."

यावर मी लगेच म्हणालो," आपली पायरी ओळखून प्रेम करायला हवे म्हणजे?"

दिगंबर म्हणाला," आता तु तुझ्या गावाकडच्या मित्राची रवीची प्रेमकथा मला सांगितलीस बरोबर आता रवीमध्ये आणि सुरेखात साम्य काय होते? तर ते एका गावात वाढलेले होते म्हणून त्यांची विचारसरणी सारखी होती, रवी हा त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता, त्याच्या कडे जमीन जुमलाही चांगला होता, रवी कष्टाळू होता आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे रवी आणि सुरेखा हे दोघेही खूप काही शिकलेले नाहीये, हे सगळं बघता सुरेखाच्या वडिलांनी रवीला नकार देण्याचे काहीच कारण नव्हते. आता सरस्वती आणि तुझ्या बाबतीत विचार करायचा झाला तर समजा सरस्वतीला तु आवडत असशील पण हा विचार कर की तुमच्यात काय साम्य आहे? सरस्वतीचे बाबा काय विचार करुन त्यांच्या मुलीचे लग्न तुझ्या सोबत लावून देतील. तुझी जडणघडण एका खेडेगावात झाली आहे तर सरस्वतीचा जन्मच पुण्यासारख्या मोठ्या शहरात झाला आहे, कितीही नाही म्हटलं तरी तुमच्या विचारसरणीत फरक जाणवेलच. तुझे आई वडील शेतकरी आहेत तर सरस्वतीच्या बाबांची कंपनी आहे, त्यांच्या घरी कामासाठी नोकर चाकर आहेत. सरस्वतीला कॉलेजला येण्या जाण्यासाठी गाडी आहे, आपल्याकडे तर साधी सायकलही नाही. तु हॉटेलमध्ये गेल्यावर पैसे वाचावेत म्हणून पुरीभाजी ऐवजी वडापाव खातोस, सरस्वती हॉटेलमध्ये गेल्यावर हा विचार करत असेल का? आज रोजी जरी तु आणि सरस्वती एका कंपनीत सोबत काम करत असाल तरी उद्या सरु त्या कंपनीची मालकीण असणार आहे आणि तु साधा कामगारच असशील. तुझ्या स्वभावाकडे , कष्टाळू वृत्तीकडे बघून सरस्वतीच्या बाबांनी जरी तिचे लग्न तुझ्या सोबत लावून दिले तरी तुला सरस्वतीचा खर्च पेलवणार आहे का? किंवा तुला जर ते म्हटले की तु घरजावई म्हणून आमच्या घरी रहायला ये तर हे सर्व तुला चालेल का? तु तुझा स्वाभिमान सोडशील का? आज जरी तुला माझे बोलणे कडू वाटले तरी ते सत्य आहे. माझे काम होते की तुला सत्य परिस्थिती समजून सांगणे, आता तुला जे करायचं ते करू शकतोस. सरस्वती सोबतची मैत्री तोड असंही मी सांगणार नाही पण तिच्या बद्दल ज्या भावना तुझ्या मनात आहे त्यांना आवर घाल, नाहीतर त्याचा तुलाच पुढे जाऊन त्रास होईल."

दिगंबरच्या या बोलण्यावर काहीच बोललो नाही. खरं बघायला गेलं तर तो काहीच चुकीचं बोललं नव्हता पण माझे मन मानायला तयार नव्हते. अशक्य गोष्ट शक्य करायची असा माझा पहिल्या पासूनचा स्वभाव होता, त्यामुळे मेंदू सांगत होता की दिगंबरचे ऐक आणि मन सांगत होते की दिगंबरचे काही ऐकू नकोस, आपण सरुला ओळखतो तो थोडीच तिला ओळखतो. मला दिगंबरच्या बोलण्याचा मनापासून राग आला होता. काही दिवसांपासून मी सरुसोबत आयुष्य घालवण्याचे स्वप्न पाहत होतो पण दिगंबरमुळे त्या स्वप्नांना सुरुंग लागला. मला राग आला आहे असे दिगंबरला मी दाखवले नाही पण एक गोष्ट ठरवली की इथून पुढे सरु हा विषय दिगंबर पुढे काढायचा नाही.

माझा पाय बरा व्हायला पुढचे आठ दिवस निघून गेले, रुममध्ये बसून बसून खूप कंटाळा आला होता, दिगंबरने मला वाचण्यासाठी लायब्ररीतुन काही पुस्तके आणून दिली होती. दरम्यानच्या काळात दोनदा सरु मला भेटायला आली होती, दरवेळी येताना ती माझ्यासाठी खायला काही ना काही घेऊन यायची. माझ्या सोबत मनसोक्त गप्पाही मारायची. एके दिवशी सरु माझ्याशी बोलता बोलता म्हणाली, "अविनाश पुढच्या आठवड्यात आपल्या कॉलेजमध्ये वक्तृत्व स्पर्धा आहे, मी त्या स्पर्धेत भाग घेतला आहे, मला भाषण लिहायला मदत करशील का?"

मी म्हणालो," हो का नाही, मी तुला मदत करेल पण विषय काय आहे?"

सरु म्हणाली," प्रेम हा विषय आहे"

मला सरुच्या मनातील काढायचे असल्याने मी म्हणालो," प्रेमाचा आणि माझा तर काही संबंध नाहीये म्हणजे तसा मला अनुभव तरी नाहीये, तुला प्रेमाचा अनुभव आहे का?"

सरु म्हणाली," अविनाश प्रेमा बद्दल लिहायला प्रेम करणे गरजेचे नाही आणि प्रेम हे कुणा बद्दलही असूच शकते ना? आपण आपल्या आई वडिलांवर प्रेम करतोच ना, आपल्या भावंडांवर आपले प्रेम असतेच ना आणि मित्र मैत्रिणींवरही आपले प्रेम असू शकते ना. प्रेम करण्यासाठी आपल्याला विशिष्ट नात्याची गरज असते अस काही नाही ना?"

मी म्हणालो," तुला तर प्रेमा बद्दल सर्वच माहीत आहे मग मला का विचारत आहेस?"

सरु म्हणाली," प्रेमाची व्याख्या प्रत्येकाच्या नजरेतून वेगवेगळी असते, तुझी प्रेमा बद्दलची व्याख्या काय आहे?"

मी थोडा विचार करुन म्हणालो, "प्रेम म्हणजे दीर्घ सहवास, म्हणजे हेच बघ ना मी लहान असताना आमच्याकडे एक वासरू होते ते मला खूप आवडायचे, मी त्याला गवत खायला घेऊन जायचो, पाणी पाजायचो, मी त्याच्या सहवासात जास्त काळ असल्याने मला ते आवडायला लागले म्हणजे काय तर माझे त्याच्यावर प्रेम जडले होते. काही वर्षांनी ते वासरू वारले तेव्हा मी दोन तीन दिवस जेवलो नसेल, कितीतरी दिवस मला करमायचेच नाही. कालांतराने मी त्याला विसरून गेलो पण त्याच्या आठवणी आजही माझ्या सोबत आहे. कोणतंही वासरू दिसलं की मला त्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही."

सरु म्हणाली," तुझ्यामते ज्याच्या सोबत आपण जास्त काळ राहू म्हणजे ज्याचा जास्त सहवास त्याच्या प्रती आपले प्रेम जास्त असेच ना?"

मी म्हणालो,"नाही, तु चुकीचा अर्थ घेत आहेस, ज्याचा सहवास आपल्याला आवडतो त्याच्यावर आपले प्रेम जडते अस मला वाटतं."

सरु म्हणाली," अच्छा आता समजलं. सहवास हा मुद्दा मी माझ्या भाषणात नक्कीच ऍड करेल. बरं माझं भाषण ऐकायला कॉलेजमध्ये तु येणार आहेस."

मी म्हणालो," त्यापेक्षा तु आत्ताच भाषण ऐकव, मला तिथे येण्याची काय गरज आहे?"

सरु म्हणाली," नाही खरं बघायला गेलं तर मी तुला माझ्या भाषणातील काही मुद्दे सांगणार होते पण मग तु भाषण ऐकायला कॉलेजमध्ये येणार नाहीस. अजून तु माझी वकृत्व कला बघितली नाहीये, आजपर्यंत अस कधीच झालं नाही की मी वक्तृत्वस्पर्धेत भाग घेतला आणि माझा नंबर आला नाही."

मी म्हणालो," ठीक आहे मग तर मला तुझं भाषण ऐकायला यावच लागेल."

सोमवारी सरुच भाषण असल्याने मला कॉलेजला जायचंच होत, तोपर्यंत काही झाल तरी माझा पाय थोडा तरी बरा व्हायला पाहिजे होता. भाषण ऐकल्यावर सरुच प्रेमाबद्दल नेमकं मत काय आहे हे तरी कळेल. रविवारी रात्री मी दिगंबरला म्हणालो," दिगंबर मला उद्या कॉलेजला यायचे आहे, रुमवर बसून खूप कंटाळा आला आहे, मला चालताही येत आहे."

दिगंबर हसून म्हणाला,"मला महिती आहे की तु उद्या कॉलेजमध्ये कशाला येणार आहेस? सरस्वतीने वक्तृत्वस्पर्धेत भाग घेतलेला आहे ना, तीच भाषण ऐकायला यायचं असेल. तुला एक गोष्ट सांगायचीच राहून गेली. तु नसताना मी कॉलेजमध्ये एकटाच असायचो, एक दिवस मी लायब्ररीत जाऊन बसलो होतो तेव्हा माझ्या शेजारी एक मुलगी येऊन बसली व तिचा पेन चालत नसल्याने तिने माझ्याकडे पेन मागितला. मी तिला पेन दिला व तिने कसला तरी फॉर्म भरला आणि माझा पेन मला न देता निघून गेली. दुसऱ्या दिवशी मी सायकल स्टँड मधून सायकल काढत असताना ती मुलगी माझ्याजवळ येऊन म्हणाली," सॉरी काल मी माझ्या कामाच्या गडबडीत तुझा पेन परत करायचाच विसरले"

त्यावर मी म्हणालो," काही प्रोब्लेम नाहीये, माझ्याकडे दुसरा पेन असल्याने मला काही अडचण भासली नाही."

त्या मुलीने मला पेन परत केला, मला होस्टेलवर यायला उशीर होत असल्याने मी लगेच निघालो. आम्हाला एकमेकांचे नावही माहीत नव्हते की ती कुठल्या तुकडीत आहे हेही माहीत नव्हते. दुसऱ्या दिवशी तुझ्यासाठी पुस्तकं घ्यायला लायब्ररीत गेलो तेव्हा ती लायब्ररीच्या काउंटरवर बसलेली होती. तिने माझ्याकडे बघून स्माईल दिली मग मीही तिला स्माईल देऊन विचारले," तुम्ही आणि इकडे?"

तेव्हा तिने मला सांगितले की ती कमवा व शिका या योजनेतून लायब्ररीत नोकरीला लागली आहे, कॉलेजला जाताना आपण डावीकडे वळतो ना तिथे एक सरकारी लेडीज होस्टेल आहे बघ, तिथेच ती राहते.तिला सुरवातीला वाटले की मी अविनाश आहे आणि मीच इतके पुस्तकं घेतले आहेत. कॉलेजमध्ये न ठरवता आमच्या भेटी होऊ लागल्या मग आमच्यात थोडे फार बोलणे होऊ लागले. आता तु सोमवारी कॉलेजला येशील आणि समजा ती समोर येऊन माझ्याशी बोलली तर तुला प्रश्न पडायचा की तुझी व तिची काय ओळख? म्हणून आत्ताच तुला सर्व कल्पना देऊन ठेवत आहे."

मी म्हणालो," दिगंबर ती मुलगी कोण आहे ते मला माहीत नाही पण तिच्या बद्दल तु जेव्हा सांगत होतास ना त्यावेळी मला वाटत होते की तुझ्यातला जुना दिगंबर जागा झाला आहे म्हणून."

दिगंबर म्हणाला," अरे हो मी तर तुला तिचे नावच सांगायचे राहून गेले, तिचे नाव आहे शालिनी. आमच्यात बऱ्यापैकी चांगली मैत्री झाली आहे, आणि हो तिला तुला भेटायचे आहे, तीच म्हणणं आहे की जो मुलगा इतके पुस्तकं वाचतो आणि वरुन पहिल्या दहामध्ये येतो अश्या मुलाला तिला भेटायचे आहे. शालिनीने सुद्धा वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतलेला आहे."

मी म्हणालो, "अरे वा छानच आहे की मग शालिनीचेही भाषण ऐकायला भेटेल. मी वक्तृत्व स्पर्धेसाठी खूपच उत्सुक झालो आहे. आपले दोन खेळाडू आहेत म्हणायचे."

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all