निस्वार्थ प्रेम भाग १२ #मराठी कादंबरी

Avinash is coming back to hostel

मागील भागाचा सारांश: अविनाश सुट्टी साठी त्याच्या गावी गेला. सहा महिन्यांनी घरच्यांना भेटून त्याला आनंद झाला तसेच घरच्यांनाही त्याला बघून बरे वाटले. अविनाशची भेट सरुच्या मामांसोबतही झाली होती. अविनाशची भेट त्याच्या शाळेतील मित्र रवी याच्यासोबत झाली, रवीने त्याचे लग्न जमल्याची बातमी अविनाशला दिली. रवीचे लव मॅरेज असल्याने त्याची प्रेमकथा त्याने अविनाशला सांगितली.

आता बघूया पुढे....

रवीने मला विचारले होते की ताईच्या लग्नाची कुठेतरी जमवाजमवी चालु आहे का? म्हणून पण मला तर घरच्यांनी कोणीच काही सांगितलं नाही. मी घरी गेल्यावर दादा बाहेर अंगणात बसलेला होता,तो म्हणाला," रवीकडे बऱ्याच वेळ गप्पा रंगल्यात वाटतं."

"हो दादा रवी त्याची लग्नाची स्टोरी सांगत बसला होता." मी उत्तरलो

दादा म्हणाला," आमच्याही जवळ बसून जरा गप्पा मार की, सुट्टी इतक्यात संपून जाईल."

मी दादाजवळ बसत म्हणालो, "दादा तुझ्याशी तर गप्पा मारायच्याच आहेत पण तुम्ही सगळ्यांनीच मला खूप परकं करून टाकलं आहे."

माझ्या अशा बोलण्यावर दादा माझ्याकडे आश्चर्याने बघत म्हणाला," परकं आणि तुला? कोणी केलंय? तु असं का बोलत आहेस.तुला आम्ही परकं का मानू. वेडा आहेस का?"

मी म्हणालो," परकं तर केलंच आहे, आपल्या घरातील बातम्या मला बाहेरच्यांकडून समजत आहेत मग अस म्हणावच लागेल ना."

दादा म्हणाला," तुला आपल्या घरातील कोणती बातमी बाहेरच्यांनी दिली आहे, स्पष्ट बोल बरं."

मी म्हणालो," दादा आपल्या ताईची लग्नाची जमवाजमवी चालू होती म्हणे."

दादा म्हणाला," ही बातमी होय, नक्कीच तुला रवीने सांगितली असेल."

मी म्हणालो," हो त्यानेच सांगितलं पण तुम्ही मला काहीच बोलला नाहीत."

दादा म्हणाला," त्याच झालं असं की रवीच्या वडिलांनी त्याच्या आत्त्याच्या मुलाचं स्थळ ताईसाठी घेऊन आले होते, आम्ही मुलाची चौकशी केली असता कळलं की मुलाला दारूचे व्यसन आहे मग मला तुच सांग अश्या मुलाला आपण आपली ताई देऊ का? सरळ नाही म्हणता कसं येईल म्हणून बाबांनी त्यांना सांगितलं की आमची दुसरीकडे जमवाजमवी चालू आहे."

मी म्हणालो," असं झालं होय, म्हणजे आपल्या ताईसाठी दुसरं कुठलं स्थळ आलं होत का?"

दादा म्हणाला," ताईसाठी एक स्थळ आलं होतं, बाबांच्या मावस बहिणीचा मुलगा आहे, बी कॉम झालेला असून बँकेत नोकरीला आहे, ताईला त्याने व त्याच्या घरच्यांनी कुठल्या तरी लग्नात बघितलं होतं, तेव्हापासून ते लोक मागे लागले आहेत. बाबा म्हणाले की अजून सहा महिने थांबा मग लग्नाचं बघू."

मी म्हणालो," आपली ताई आहेच लाखात एक, तिच्यामागे ते लागलेत हे विशेष नाहीये पण जर स्थळ खरंच चांगलं असेल तर हातचं सोडून देणे चुकीचे आहे, बाबा सहा महिने थांबा अस का म्हणाले?"

दादा म्हणाला," त्या मुलाचे सध्या ट्रेनिंग चालू आहे, सहा महिन्यांनी नोकरी पक्की होईल."

मी म्हणालो," तोपर्यंत सुपारी फोडून ठेवायची ना."

दादा म्हणाला," माझं ही हेच म्हणणं होतं पण ट्रेनिंग चालू असल्याने त्याला सुट्टी भेटत नाहीये, त्याच ट्रेनिंग संपलं की जोरदार बार उडवून देता येईल."

मी म्हणालो," चांगलं आहे मग, सर्व करण्याआधी मला सांगा म्हणजे झालं."

दादा म्हणाला," अवि तुला नाही सांगणार तर कोणाला सांगणार. पुढच्या महिन्यात बाबा, काका असे दोन चार जण त्यांच्या घरी जाऊन लग्नाची पुढील बोलणी करणार आहे, तेव्हाच सगळं पक्कं होईल."

मी दादाला चिडवण्यासाठी म्हणालो," दादा आता ताईच तर लग्न जमल्यातच जमा आहे, जशी रवीच्या आयुष्यात सुरेखा आली तशी आपल्या आयुष्यात तर कोणी आली नाही ना? असेल तर मला सांग, मी बाबांना तयार करतो."

दादा म्हणाला," अरे बाबा इथं शेतीची व गुरा ढोरांची कामे करता करता जीव जातोय, कामांसाठी दिवस पुरत नाही आणि माझ्या आयुष्यात कोणी येईल तरी कशी आणि केव्हा? मागच्या आठवड्यात मामा येऊन गेला त्यानंतर मी आईचे व बाबांचे बोलणे ऐकले की मामा म्हणत होता की शैला तुला सून करून घेशील का म्हणून."

मी म्हणालो," हो का, मग आईने काय उत्तर दिले?"

दादा म्हणाला,"तिने सांगितले वाटतं, दादाला आणि ह्यांना विचारून कळवते."

मी म्हणालो," मग आईने तुला विचारले का?"

दादा म्हणाला,"नाही अजून"

मी म्हणालो," आईने जर तुला विचारले तर तु काय उत्तर देशील?"

दादा म्हणाला," तसा मी काही एवढा विचार केला नाहीये पण तशी शैला बघायला गेलं तर दिसायलाही ठीक ठाक आहे, स्वभावाने पण शांत आहे. आईला व बाबांना पसंत असेल तर मी नकार देण्याचं काही कारण वाटतं नाही. ताईचं लग्न पुढील सहा महिन्यांनी होईल मग त्यानंतर माझ्या लग्नाचा विषय होईल, तोपर्यंत आपण एकटे बरे आहोत."

मी म्हणालो," येत्या वर्षभरात आपल्या घरात दोन लग्न आहेत म्हणायचं. लग्नाच्या तारखा धरताना माझ्या सुट्टीचा विचार करा म्हणजे झालं"

दादा म्हणाला," हो रे बाबा."

बोलता बोलता सुट्टी संपत आली होती. सुट्टीचे दिवस कसे गेले हे कळालेच नाही. आईने चिवडा, रव्याचे लाडू, शंकरपाळे तयार केले होते, होस्टेलला गेल्यावर भूक लागल्यावर मला खाता येईल म्हणून. परतीच्या प्रवासाला लागल्यावर मी एस टीत खिडकीच्या शेजारीच बसलो होतो, खिडकीच्या शेजारील सीट माझ्या आवडीचे होते. वाऱ्याच्या मंद झुळकेने मला झोप लागली होती आणि पुन्हा तेच स्वप्न पडले की जे येत्या वेळी पडले होते, तेच स्वप्नातील घर व त्या घरात सरु. मी पुन्हा विचार करू लागलो की सरु आपल्या स्वप्नातील घरात का दिसली असेल? आपल्याला सरु आवडत तर नाही ना? आपण तिच्या प्रेमात तर पडलो नाही ना? मी कुठल्या तरी चित्रपटात बघितले होते की आपण डोळे बंद केल्यावर आपल्या समोर जो चेहरा येईल ती व्यक्ती आपल्या सर्वांत जवळची असते. आता तो सगळा वेडेपणा वाटतो पण त्यावेळेस आपण बालिशपणा किंवा वेडेपणा करत आहोत याची जाणीव सुद्धा झाली नाही. मी डोळे बंद केले तर माझ्या डोळ्यासमोर सरुचा हसरा चेहरा आला.मी त्याक्षणी ठरवले की होस्टेलवर गेल्या गेल्या आपण दिगंबरला हे सर्व सांगू. बिचारा मला कधीचा विचारत होता, त्याचे यावर काय मत आहे? हेही कळेल. आपल्याला सरु आवडते हे समजल्यापासून सरु सोबत घालवलेले सर्व क्षण नजरे समोरुन जात होते, मी आठवणींच्या जगात रमलो होतो, पुणे कसे आले हेही कळले नाही. तेव्हा मी विचार केला की सरुच्या आठवणींमध्ये हा प्रवास कसा गेला? हे कळले नाही तसेच तिच्या सोबत हे आयुष्यही कसे निघून जाईल हे कळणार नाही.

मी होस्टेलला पोहोचलो तर दिगंबर आलेला नव्हता, मला दिगंबरला कधी भेटू असे झाले होते पण महाशय अजून आलेलेच नव्हते. दुसऱ्या दिवशी येईल असे वाटून मी त्या दिवशी जेवण करुन झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ उरकली व मी कॉलेजला जाण्यासाठी तयार झालो. आज कॉलेजला जाण्यासाठी दिगंबरची सायकल नसल्याने पायी जायला लागणार होते म्हणून जरा कॉलेजला जायला लवकरच निघालो. तस बघायला गेलं तर दिगंबरची सायकल होस्टेललाच लावलेली होती, सायकलची चावी कुठं होती हेही मला माहित होते, मी त्याची सायकल घेऊन जाऊ शकलो असतो आणि तोही काही म्हणाला नसता पण माझ्या मनाला तसे करणे पटत नव्हते म्हणून मी पायीच कॉलेजला गेलो.कॉलेजमध्ये दिगंबर सोबत असण्याची इतकी सवय झाली होती की त्या दिवशी कॉलेजला करमतच नव्हते.लायब्ररीत जाताना सरु ही दिसली मी तिच्याकडे बघून नकळतपणे स्माईल दिली पण तिने माझ्याकडे बघितले सुद्धा नाही.

तस बघायला गेलं तर सुट्टीला जाण्याआधी पण सरु कॉलेजमध्ये माझ्याकडे बघायची नाही व मीही तिच्याकडे बघायचो नाही पण यावेळी का कुणास ठाऊक तिने माझ्याकडे बघितले नाही याचे मला वाईट वाटत होते. लायब्ररीत जरा वेळ बसलो, मग होस्टेलवर जाऊन मेसमध्ये जेवण केले. दुपार झाली होती तरी दिगंबर आला नव्हता. मी जेवण करून कंपनीत निघालो त्यावेळी मला वाटले की दिगंबर संध्याकाळ पर्यंत येईल.

कंपनीत जाऊन विजय दादांची भेट घेतली, त्यांनी घरच्यांची ख्याली खुशाली विचारली. मी आपल्या कामाला लागलो, काही वेळातच सरुही कंपनीत आली. विजय दादांनी आज तिला वेगळे काम दिले असल्याने माझ्यात व तिच्यात बोलणे होऊ शकले नाही. कंपनीतून माझी निघण्याची वेळ झाली तेव्हा सरुही कंपनीतून घरी जायला निघाली होती. सरु मला म्हणाली की चल आपण कॉफी प्यायला जाऊयात. मलाही सरुसोबत गप्पा मारायच्या असल्याने मीही कॉफीला नाही म्हणालो नाही. रेस्टॉरंट मध्ये गेल्यावर सरुने कॉफीची ऑर्डर दिली व ती म्हणाली," किती दिवस झाले ना की आपण सोबत बसून कॉफी घेतली नाही."

मी म्हणालो," हो ना तु एक्सामच्या आधी बरेच दिवस सुट्टी घेतली होतीस, आपल्यात निवांत गप्पाही झाल्या नाहीत."

सरु म्हणाली,"हम्मम बाकी घरी सर्व ठीक आहे ना, सुट्टीवरून परत यायला जीवावर आले असेल ना?"

मी म्हणालो," घरी सर्व मजेत आहेत, तुला खरं सांगू घरी गेल्यावर एक दिवस मला तिथे करमलेच नाही, इकडची आठवण येत होती. घरून निघताना नक्कीच पाय निघवत नव्हता पण इतकेही काही वाईट वाटले नाही."

सरु म्हणाली," एकदा रुटीन सेट झाले की घरापासून दूर रहायलाही काही वाटत नाही.तु घरापासून इतक्या दूर कसा राहतोस हे तुझं तुलाच माहीत, मी तर घरापासून दूर रहाणे शक्यच नाही."

यावर मी तिला चिडवण्यासाठी म्हणालो," लग्न झाल्यावर तर तुला घरापासून दूर रहावेच लागेल ना?"

सरु चिडून म्हणाली," गप रे, मी असं ठरवलंय की लग्न करताना अश्या मुलाशी करेल की जो माझ्या सोबत माझ्या घरी येऊन राहील."

मी म्हणालो,"म्हणजे तु घरजावई शोधणार आहेस तर."

सरु म्हणाली," आपण लग्न हा विषय सोडून बोलूयात का?"

मी म्हणालो," हो चालेल की, मी तुला चिडवण्यासाठी मुद्दाम हा टॉपिक काढला."

सरु म्हणाली," आज कॉलेजमध्ये तु माझ्याकडे बघून स्माईल का दिलीस?"

सरुच्या या वाक्यावर मी मनातल्या मनात म्हणालो, चला सरुचे आपल्यावर लक्ष आहे म्हणायचं, आता हिला काय सांगणार की मी तुझ्या प्रेमात पडलो आहे म्हणून मी तुझ्याकडे बघून माझ्या नकळतपणे स्माईल दिली.

मी सरुला म्हणालो," बऱ्याच दिवसांनंतर मी तुला बघितले म्हणून स्माईल दिली असेल, स्माईल दिल्यानंतर आठवले की आपण दोघांनी कॉलेजमध्ये एकमेकांशी बोलायचे नाही हे ठरवले आहे."

सरु म्हणाली," ओके, पण आज तु एकटाच का होतास? तुझा तो मित्र कुठे गेला?"

मी म्हणालो," त्याच नाव दिगंबर आहे, तो अजून गावावरून परत आलाच नाहीये."

सरु म्हणाली," त्याची सुट्टी अजून संपली नसेल. चला आपण निघुयात, घरी जायला उशीर होईल."

आम्ही रेस्टॉरंट मधून निघालो, सरुने मला होस्टेलला सोडले. मला वाटलं होतं की आता तरी दिगंबर आला असेल पण नाहीच तो आलाच नव्हता. पुढील आठ दिवस मी दिगंबरची वाट रोज सकाळ संध्याकाळ बघत होतो. दिगंबर जिकडे गेला होता तिकडचा माझ्याकडे फोन नंबर ही नसल्याने मला त्याच्या सोबत संपर्क साधता येत नव्हता. माझे रुटीन पहिल्या प्रमाणेच चालू होते.कॉलेज, कंपनी, होस्टेल यात फक्त कमी होती ती दिगंबरची. रविवारचा दिवस उजाडला तरी साहेबांचा काही आतापताच नव्हता. रविवारी मी नाश्ता करून राजनची ट्युशन घेण्यासाठी त्याच्या घरी गेलो, बरेच दिवस झाले राजनच्या ट्युशनला सुट्टी होती. राजनची ट्युशन घेऊन मी जेव्हा होस्टेलला पोहोचलो तर बघतो काय? रूमचा दरवाजा उघडा होता. दिगंबर आला असेल ह्या खुशीत मी घाईघाईत रुममध्ये गेलो तर मला बघून दिगंबर माझ्याजवळ आला आणि गळ्यात पडून जोरजोरात रडू लागला.

दिगंबर अविनाशच्या गळयात पडून का रडत होता? हे जाणून घेऊया पुढील भागात...

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all