निस्वार्थ प्रेम भाग १० #मराठी कादंबरी

Conversation between avinash and digambar

मागील भागाचा सारांश: सरु अविनाशला एक चिठ्ठी देते.अविनाशला चिठ्ठीत काय लिहिलेलं असेल याची उत्सुकता लागून राहते. अविनाशला सर्वांसमोर चिठ्ठी वाचायची नसल्याने तो लेक्चर संपल्यावर लायब्ररीत जाऊन चिठ्ठी वाचण्याचा निर्णय घेतो पण त्याच वेळेस दिगंबरलाही लायब्ररीत जायचे असते, अविनाश विचार करतो की आपण जर दिगंबर सोबत लायब्ररीत गेलो तर चिठ्ठी काही वाचता येणार नाही म्हणून अविनाशने त्याला सोबत येण्यास विरोध केला, त्यामुळे दिगंबरला अविनाशचा राग येतो. अविनाश लायब्ररीत जाऊन चिठ्ठी वाचतो.सरुने थँक्स म्हणण्यासाठी चिठ्ठी लिहिलेली असते. संध्याकाळी सरु बाबांना सरप्राईज देण्यासाठी कंपनीत जाते, अविनाश तिला पूर्ण कंपनी दाखवतो.सरु अविनाशला आपल्या गाडीवरून होस्टेलला सोडते तसेच अविनाश व सरस्वती सोबत कॉफी पितात.

आता बघूया पुढे....

एरवी जेवण झाल्यावर दिगंबर टंगळमंगळ करत, ह्या मुलाशी बोल, त्या मुलाशी बोल अस करत बराच वेळ खालीच घालायचा. रात्री उशिरा कधीतरी रुममध्ये येऊन झोपायचा. आज मात्र पटकन जेवण आटोपून मला घेऊन रुममध्ये गेला. दिगंबर मला म्हणाला," अव्या मघाशी कोणत्या चिठ्ठी बद्दल बोलत होतास? जरा सांगतोस का? कोणी कोणाला चिठ्ठी दिली."

मला दिगंबरच्या चिठ्ठी बद्दल असणाऱ्या कुतुहलतेचे हसू येत होते. मी त्याची उत्सुकता अजून ताणण्यासाठी म्हणालो," आपल्या वर्गातील एका मुलाला आपल्याच कॉलेज मधील दुसऱ्या तुकडीत असणाऱ्या मुलीने चिठ्ठी दिली."

दिगंबर डोळे विस्फारून म्हणाला," अरे सांगतोस काय? कोणाला दिली सांग ना, मी ओळखतो का त्याला,उद्या कॉलेजमध्ये गेल्यावर त्याची कशी घेतो बघ."

मी शांतपणे म्हणालो," तु त्या मुलाला चांगलेच ओळखतोस, मुलाचे नाव आहे अविनाश देशमुख."

मी अश्या सुरात सांगितले की त्याला कळालेच नाही की मी स्वतःचे नाव सांगितले असेल म्हणून. दिगंबर डोके खाजवत म्हणाला, "अविनाश देशमुख नाव तर ऐकल्यासारखं वाटतंय रे पण नेमका चेहरा डोळ्यासमोर येत नाहीये."

दिगंबर विचार करत होता पण त्याच नशीब चांगलं की काय म्हणून त्याच्या शेजारीच माझी एक वही पडलेली होती व त्यावर माझे नाव लिहिलेलं होत, त्याची नजर वहीकडे गेली व तो जोरात टाळी वाजवून म्हणाला," अरे अव्या म्हणजे तुला चिठ्ठी दिली आहे की, अरे असं डायरेक्ट सांगायचं ना लेका की चिठ्ठी तुला दिली आहे म्हणून."

मी म्हणालो," मी डायरेक्ट सांगितलं असतं तर ही एवढया वेळ चाललेली मजा आली असती का?"

दिगंबर म्हणाला," तु तर लईच छुपा रुस्तम निघालास रे, तु मुलींकडे बघत नाहीस मग तुला मुलीने चिठ्ठी कशी काय दिली? आणि कधी? कारण लायब्ररी लायब्ररी वगळून सर्वच ठिकाणी तु माझ्याबरोबर होतास.बरं तेही राहूदेत पण चिठ्ठी दिली कोणी आणि त्या चिठ्ठीत काय लिहिले आहे?"

मी म्हणालो," अरे किती प्रश्न विचारशील, आता तुझ्या एकेक प्रश्नांचे उत्तर देतो. सकाळी तु जेव्हा सायकल स्टॅन्ड मध्ये सायकल लावायला गेला होता त्यावेळी त्या मुलीने मला चिठ्ठी आणून दिली, त्या मुलीचे नाव आहे सरस्वती आणि त्या चिठ्ठीत मला थँक्स असं लिहिलं आहे कारण काल मी तिला तिच्या आई बाबांच्या लग्नाच्या वाढदिवसा साठी ग्रीटिंग बनवायला मदत केली तसेच त्यांना काय गिफ्ट दिले पाहिजे हे सुचवले."

दिगंबर म्हणाला," तु पण ना माझ्या उत्सुकतेची सारी वाट लावलीस. तुझी ती सरस्वती तुझ्यासोबत साधं कॉलेजमध्ये बोलत नाहीस आणि ती काय चिठ्ठीत लिहिलं, तिच्याकडून अपेक्षा तरी काय करु शकतो. मला वाटलं होतं की आपल्या भावाच्या कोणी प्रेमात पडलं की काय?"

मी म्हणालो," अरे मलाही चिठ्ठी बघून धडधडच झाली होती, सरुने चिठ्ठीत काय लिहिले असेल याचाही मला प्रश्नच पडला होता. एकांतात बसून चिठ्ठी वाचता यावी म्हणूनच मी तुला लायब्ररीत येऊ नकोस म्हणालो होतो. मी विचार केला की चिठ्ठीत जर काही वेगळं लिहिलं असेल तर उगाच तु काही चर्चा करत बसला असतास."

दिगंबर म्हणाला," बास का भावा, तु आपल्याला एवढंच ओळखलस का? तुला त्या चिठ्ठीत काय लिहिलेल अपेक्षित होतं?"

मी म्हणालो," माहीत नाही रे, पण अश्या एखाद्या मुलीने आपल्याला चिठ्ठी देणे ही पहिलीच वेळ होती ना म्हणून माझा मीच गोंधळून गेलो होतो, आणि मुख्य म्हणजे कालच मी व सरु भेटलो होतो, मला प्रश्न पडला होता की सरुने असं चिठ्ठीत काय लिहिलंय की जे ती समोरासमोर सांगू शकली नाही आणि तिला चिठ्ठीचा आधार घ्यावा लागला."

दिगंबर म्हणाला, "तु तुझ्या सरुच एवढं कौतुक करत असतोस पण ती तुझ्याशी कॉलेजमध्ये बोलत नाही याचं तुला वाईट वाटतं नाही का?"

मी म्हणालो," सुरवातीला मला वाईट वाटलं होतं पण त्यामागील कारण कळाल्यानंतर एवढं काही वाटलं नाही, कदाचित मी तिच्या जागेवर असतो तर असंच वागलो असतो."

दिगंबर म्हणाला," बरं, इथून पुढे तुला चिठ्ठी मिळो वा अथवा शिव्या मिळो मला सांगायचं, माझ्या पासून काहीच लपवायचं नाही."

मी म्हणालो, "हो रे बाबा इथून पुढे तुझ्यापासून काही लपवून ठेवणार नाही."

सरु दररोज दोन तीन तासांसाठी का होईना कंपनीत येऊ लागली. विजय दादा व मी आम्ही दोघे मिळून कंपनीतील कामे शिकवू लागलो.सरु सोबत असल्याने कंपनीतील कामाचा वेळ भर्रकन निघून जात असे. सरु कंपनीत यायला लागल्याने मला कंपनीतील कामात अजून इंटरेस्ट यायला लागला. सरु रोज मला होस्टेलला सोडत असे. आठवड्यातून एकदा तरी आम्ही सोबत कॉफी पित असू. मला सरुची सोबत आवडू लागली होती. 

एके दिवशी मी दररोज प्रमाणे रात्री जेवणानंतर रुममध्ये अभ्यास करत बसलो होतो, दिगंबर टवाळक्या करुन रुममध्ये आला व बेडवर जाऊन झोपला, त्याला अचानक काय झाले काय माहीत? तो उठून माझ्या बेडजवळ येऊन बसला व मला म्हणाला, "अव्या तुला रोज सरस्वती होस्टेलला सोडायला येते का?"

"हो का रे?" मी विचारले

"तुझ्यात आणि सरस्वती मध्ये काही चालू आहे का?" दिगंबर म्हणाला

मी हातातील पुस्तक बाजूला ठेवत म्हणालो, "दिगंबर तुला बोलत बोलत कुठल्या दिशेला जायचे आहे? तुझ्या मनात जो प्रश्न आहे तो डायरेक्ट विचार ना? एवढे आढेवेढे का घेत आहेस?"

यावर दिगंबर म्हणाला," सरस्वती कंपनीत यायला लागल्यापासून तु जरा जास्तच खुश असतोस, एरवी कंपनीतून यायचास तर थकलेला असायचा आणि आता एकदम खुशीत येतोस म्हणून विचारलं."

मी म्हणालो," कंपनीतून येताना सरुसोबत गाडीवर येतो त्यामुळे जास्त थकवा येत नाही आणि शिवाय गाडीवर आम्ही गप्पा मारत येतो म्हणून माझा मूड फ्रेश असतो बाकी काही नाही."

दिगंबर म्हणाला," तुला सरस्वती आवडते का?"

मी म्हणालो," माहीत नाही पण कधी मी या प्रश्नाचा विचार केला नाही, ती मला मैत्रीण म्हणून आवडते एवढंच मी आत्ता सध्या सांगू शकतो."

दिगंबर म्हणाला," मग एकदा विचार कर"

मी म्हणालो," हे बघ दिगंबर ,आपली सेमिस्टर एक्साम काही दिवसांवर येऊन ठेपली आहे, माझे पूर्ण लक्ष मला अभ्यासावर केंद्रित करायचे आहे.अभ्यास केला तर परीक्षेत चांगले गुण मिळतील आणि चांगले गुण असतील तरच चांगल्या पगाराची नोकरी मिळेल आणि मला ते जास्त महत्त्वाचे आहे."

दिगंबर म्हणाला," ठीक आहे आपण या विषयावर एक्साम झाल्यावर बोलू."

मला कळतंच नव्हतं की दिगंबरच्या डोक्यात मधेच हे काय खूळ उठले आहे. एक्साम जवळ आल्याने सरुने कंपनीत येणेही बंद केले होते आणि मी पण राजनची ट्युशन थोड्या दिवसांसाठी बंद केली होती, त्यामुळे जवळजवळ तीन आठवडे माझी व सरुची भेट झाली नाही किंवा आमच्यात बोलणेही झाले नाही. एक्सामच्या एक आठवडा आधी दिगंबर अभ्यासाला लागला होता.मी जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळ फक्त अभ्यासच करत होतो. कंपनीतून सुट्टी घ्यावी तर पगार कापला जाण्याची भीती असल्याने सुट्टी घेणेही टाळले, एक्साम झाल्यावर काही दिवस कॉलेजला सुट्टी असणार होती, मला त्या सुट्टीत घरी जायचे होते आणि घरी जाऊन माझ्या पगाराचे पैसे जसेच्या तसे बाबांच्या हातात टेकवायचे होते. 

दिवस किती पटकन निघून जातात ना? बोलता बोलता कॉलेज सुरू व्हायला सहा महिने पूर्ण झाले होते. एक्सामच्या काळात मात्र मला कंपनीतून सुट्टी घेणे भाग पडले. चांगला अभ्यास झाल्याने सर्व पेपर्स सोपे गेलेत. प्रत्येक पेपर वरून आल्यावर दिगंबरचे एक वाक्य ठरलेले असायचे,' अव्या आपण फक्त पास झालो ना पास, खूप नाही फक्त काठावर' एक्साम संपली, दुसऱ्या दिवसापासून कॉलेजला पंधरा दिवसांची सुट्टी लागली होती. खरं पाहता मला दुसऱ्या दिवशी लगेच घरी जाता आले असते पण माझी एक्सामच्या दरम्यान एक आठवडा झालेली सुट्टी मी भरून काढायचे ठरवले. सलग पूर्णवेळ चार दिवस जरी काम केले तरी माझी सुट्टी भरून निघणार होती आणि तसही चार दिवस उशिरा घरी गेलो तर कुठे बिघडणार होते.

कंपनीतून मी रूमवर आलो तर दिगंबर त्याच्या सामानाची आवराआवर करत होता, मी त्याला विचारले, " अरे दिगंबर कुठे जाण्याची तयारी करत आहेस?"

दिगंबर म्हणाला," अरे मला ज्या मुख्याध्यापिका बाईंनी आसरा दिला त्यांच्या शेतीवर थोडं काम चालू आहे,मला त्या म्हणाल्या की तुला सुट्टी आहेच तर जरा तिकडे जाऊन लक्ष देतोस का? आता मी त्यांना नाही म्हणणे शक्य नाहीच. तसही इथं बसून काय करणार तर जाऊद्यात आपला जर कोणाला उपयोग होत असेल तर होऊदेत."

मी म्हणालो," मी चार दिवसांनी गावाला चाललो आहे.तर मला वाटलं होतं की सोबत तुलाही घेऊन जावं."

दिगंबर म्हणाला," पुढच्या सुट्टीत मी नक्की येईल, आता नको."

दुसऱ्या दिवशी दिगंबर आपले सामान घेऊन गावाला निघून गेला, त्याला घ्यायला गाडी आली होती. दिगंबरच्या चेहऱ्यावरून तर वाटत होते की त्याला काही जायची इच्छा नाहीये पण तो बळजबरीने जात आहे. मी सकाळीच लवकर कंपनीत जायचो आणि उशिराने यायचो जेणेकरून कामाचे जास्त तास भरतील व पगार जास्त भेटेल. एक्साम झाल्यावर सरु आजारी पडली म्हणून ती कंपनीत आली नाही. कंपनीत सरु नसल्यामुळे खूप बोअर व्हायचे आणि रूमवर आल्यावर डोकं खायला दिगंबरही नव्हता. आपले मित्र आपल्या आसपास असणे किती महत्त्वाचे आहे हे मला त्यावेळी जाणवले होते. चार दिवस झाल्यावर मी गावी जायला निघालो, खिशात थोडेसे पैसेही होते, घरी जाताना सर्वांसाठी काहीतरी घ्यावे असे सारखे वाटत होते पण आपण काहीतरी अगदी हौसेने घ्यायचे आणि घरी जाऊन बाबांचा ओरडा खावा लागेल म्हणून मी काहीच घेतले नाही. तसाच रिकाम्या हाताने गावी गेलो. एस टी जेव्हा गावाच्या दिशेने सुरू झाली तेव्हा खूप भारी वाटत होते, मी खिडकीच्या कडेला जागा शोधून बसलो, मला खिडकीतून बाहेर बघायला खूप आवडायचे. एस टी अजून पुण्यातच होती तेव्हा माझ्या नजरेला एक उंच इमारत दिसली, त्यावेळेस मनात पक्के केले की कितीही कष्ट करावे लागले तरी करायचे आणि अश्या इमारतीत आपल्या मालकीचे एक तरी घर घ्यायचे. 

थंड वाऱ्यामुळे मला झोप लागली होती तसेही गेले काही दिवस अभ्यासाच्या टेन्शन मुळे नीट झोप लागली नव्हती. झोपेत मला एक स्वप्न पडले, त्या स्वप्नात एक मोठे आलिशान घर होते, त्या घरात मी सूट बूट मध्ये सोप्यावर पेपर वाचत बसलेला होतो आणि त्याच घरात सरु किचनमधून बाहेर येताना दिसली, नेमकी त्याच वेळी एस टी खड्ड्यात आदळली व माझी झोप मोडलीच पण त्यासोबत माझे स्वप्नंही अर्धवट राहिले.मी विचार करू लागलो की सरु आपल्या स्वप्नातील घरात काय करत होती?

अविनाशला त्याला पडलेल्या स्वप्नाचा अर्थ समजेल का? बघूया पुढील भागात...

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all