निस्वार्थ प्रेम भाग १ #मराठी कादंबरी

Saswati is meeting with her old friend after a very long time

किचनमध्ये श्रेया केक बनवत होती,केक जवळपास तयार होतच आला होता तोच बेल वाजली. केक फ्रीजमध्ये ठेऊन श्रेया दरवाजा उघडण्यासाठी गेली. दरवाजा उघडताच श्रेया आश्चर्यचकीत होऊन म्हणाली,"अरे मॅडम तुम्ही आणि इथे?"

दरवाजात उभ्या असणाऱ्या बाई म्हणाल्या, "अविनाश देशमुख इथेच राहतात ना?"

"हो मॅडम,अविनाश देशमुख माझे डॅड आहेत, तुम्ही आत या ना" श्रेया म्हणाली

"अविनाश घरात आहे का?" बाईंचा दुसरा प्रश्न आला.

श्रेया म्हणाली," डॅड आत्ता घरात नाहीये, इथे जवळच मार्केटमध्ये गेले आहे, तुम्ही आत या ना,डॅड येतीलच इतक्यात, सरस्वती मॅडम तुम्ही मला ओळखलं नाही का? आत्ता काही वेळापूर्वी कॉलेजमध्ये तुम्ही मला बक्षीस दिलेत.

श्रेयाच्या आग्रहाखातर सरस्वती मॅडम घरात येऊन सोप्यावर बसल्या व म्हणाल्या," अरे हो तरीच मी विचार करत होते की तुला कुठंतरी बघितल्यासारखे वाटत आहे आणि शिवाय तु मला कशी ओळखतेस हा प्रश्नही पडला होता."

किचनमध्ये जाऊन सरस्वती मॅडमसाठी पाणी घेऊन येते व पाणी देताना विचारते," मॅडम चहा घेणार की कॉफी?"

"अग काहीच नको, अविनाशला यायला वेळ लागणार आहे का? मग मी जाते, नंतर कधीतरी येईल." सरस्वती बोलली.

यावर श्रेया म्हणाली," मी डॅडला फोन लावून विचारले असते पण डॅड फोन इथेच ठेऊन गेले आहेत, मला बक्षीस भेटल्याच्या खुशीत ते आईस्क्रीम घ्यायला गेले आहेत, जास्त वेळ लागणार नाही, इतक्यात येतीलच."

सरस्वती मॅडम म्हणाल्या," ठीक आहे थोड्यावेळ वाट बघते, घरात तु एकटीच आहे का? म्हणजे तुझी आई कुठे आहे?"

श्रेया म्हणते,"माझी आई मी लहान असतानाच देवाघरी गेलीय, मी आणि माझे डॅड असे आम्ही दोघेच राहतो. तुम्ही माझ्या डॅडना कश्या ओळखतात?"

सरस्वती मॅडम म्हणाल्या,"अविनाश व मी आम्ही एका कॉलेजमध्ये होतो, आम्ही एकाच ग्रुपमध्ये असायचो, कॉलेज संपले आणि ग्रुपमधील सर्वजण इतरत्र विखुरले गेले, काही जणांशी संपर्क राहिला तर काहीजण संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेले, त्यावेळी काही मोबाईल, सोशल मीडिया असले काही प्रकार नव्हते. अविनाशने तर कोणाशीच संपर्क ठेवला नाही, आमचा खूप मोठा ग्रुप होता."

"हो का पण डॅड कधीच त्यांच्या कॉलेजबद्दल किंवा मित्रांबद्दल बोलले नाहीत, माझ्यात आणि डॅड मध्ये मैत्रीचे नाते आहे म्हणजे मी डॅड सोबत कुठल्याही विषयावर बोलू शकते पण डॅडने त्यांची कॉलेज लाईफ कधीच शेअर केली नाही." श्रेया म्हणाली

सरस्वती मॅडम म्हणाल्या,"अविनाशला त्याच्या कॉलेज लाईफबद्दल काही सांगावेसे नसेल वाटले म्हणून नसेल सांगितले, असो तुला वक्तृत्वस्पर्धेत बक्षीस मिळाले ना? भाषण करण्यासाठी तु कुठला विषय निवडला होतास? निवडक भाषणे मी ऐकली होती पण नेमकी कोणती? कोणाची? हे आठवत नाहीये."

श्रेया म्हणाली,"आई म्हणजे काय असते? या विषयावर मी भाषण केले."

सरस्वती मॅडम आश्चर्यचकीत होऊन तिच्याकडे बघत म्हणाल्या,"ओके म्हणजे ते भाषण तु केलेस तर मी ऐकलं आहे, भाषण ऐकताना डोळ्यातून पाणीच आले ग, हृदयस्पर्शी भाषण होते. तुला तर आई नाही मग तु एवढे सुंदर भाषण कशी काय करू शकली?"

"मला आई नाही म्हणूनच मी असे भाषण करू शकले असेल, मॅडम तुम्हाला कल्पना नसेल पण मी तुमची भाषणे ऎकूनच मी भाषण करायला शिकले आहे, वक्तृत्व असावे तर तुमच्या सारखेच, सोशल मीडियावर तुमच्या भाषणांचे बरेचसे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.मॅडम भाषण करणे इतके सोपे नसते ना? वक्तृत्वसोबतच हजरजबाबीपणा असणंही तितकंच महत्त्वाचं असत ना? तुमच्या हातून बक्षीस मिळाल्यामुळे मी जास्त खुश आहे." श्रेया बोलली.

सरस्वती मॅडम म्हणाल्या," अरे वा म्हणजे माझे व्हिडीओ बरेच व्हायरल झालेले दिसत आहेत, अजून थोडी प्रॅक्टिस केलीस तर तुही वक्तृत्वस्पर्धेत कायम अव्वल राहशील शिवाय तु मोटीवेशनल स्पिकरही होऊ शकशील. फॅमिली बिजनेस मुळे मला पूर्ण वेळ वक्तृत्वात घालवता आला नाही."

श्रेया म्हणाली," मॅडम मी तुमची खूप मोठी फॅन आहे, तुमचा जीवनप्रवास, स्ट्रगलचे दिवस ऐकायला नक्कीच आवडेल शिवाय मला तुमच्या आयुष्यातून, अनुभवातून शिकायला भरपूर मिळू शकते तसेच इन्स्पिरेशनही मिळेल."

सरस्वती मॅडम काही बोलणार इतक्यात दरवाजावरची बेल वाजते, दरवाजा उघडण्यासाठी जात असलेली श्रेया म्हणाली, "डॅड आले असतील."

श्रेयाने दरवाजा उघडला, समोर उभ्या असलेल्या डॅडला ती म्हणाली," डॅड तुम्हाला भेटायला कोणीतरी आलं आहे, बघूया तुम्ही ओळखता की नाही?"

आपल्या हातातील पिशवी श्रेयाच्या हातात देत डॅड घरात येऊन कोण आलं ते बघतात आणि आश्चर्य चकीत होऊन विचारतात,"सरस्वती तु? इकडे कशी? तुला माझ्या घरचा पत्ता कोणी दिला?"

सरस्वती हसून म्हणाली,"अविनाश किती प्रश्न विचारशील? मला बघून आनंद नाही झाला वाटतं. एवढ्या वर्षांनी आपण भेटतोय आणि तु साधा कशी आहेस? हा प्रश्न सुद्धा विचारला नाहीस आणि इतर प्रश्नांची सरबत्तीच चालू केलीस."

"तु इकडे कशी? माझा पत्ता तुला कोणी दिला?" अविनाशने पुन्हा प्रश्न केला

सरस्वतीला आता उत्तर द्यावेच लागणार होते, "मला श्रेयाच्या कॉलेजमध्ये आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होते, ह्याच कॉलेजमध्ये आपला सिनिअर गोपाल प्रोफेसर आहे त्यानेच तुझा पत्ता दिला. माझ्याकडे मोकळा वेळ होता आणि तुझी भेट घ्यावीशी वाटली म्हणून विचार चला बालपणीच्या मित्राला जाऊन भेटुयात."

श्रेया म्हणाली," डॅड मी ज्यांचे इन्स्पिरेशनल व्हिडीओ बघत असते त्या याच मॅडम आहेत, मी ह्यांची खूप मोठी फॅन आहे, आजचे बक्षीसही मला मॅडमच्याच हातून भेटले आहे. तुम्ही यापूर्वी सांगितले नाही की गोपाल सर तुमचे सिनिअर होते, याआधी ओळख माहिती असती तर तोंडी परीक्षेत गुण मिळायला मदतच झाली असती ना?"

अविनाश म्हणाला,"श्रेया तु इतकी हुशार आहेस की तुला माझ्या काय पण कुणाच्याच शिफारशीची गरज नाहीये.तु सरस्वतीला चहापाणी विचारलेस का?"

"डॅड मॅडम चहा किंवा कॉफी करायला नको म्हणाल्या" श्रेयाने उत्तर दिले.

अविनाश म्हणाला,"अग मग तु बनवलेला केक आणि मी आणलेले आईस्क्रीम घेऊन ये, तुझा व तिचा आवडता फ्लेवर सारखाच आहे. सरस्वती माझी मुलगी केक अप्रतिम बनवते."

सरस्वती कौतुकाने श्रेयाकडे बघत म्हणाली, "मला वाटलं होतं की तुझ्या मुलीला फक्त भाषणच छान करता येत असेल पण ती कुकिंग मध्येही एक्सपर्ट दिसतेय"

अविनाश म्हणाला," माझी मुलगी ऑल राऊंडर आहे,तिला सगळं काही येतं. आई विना वाढलेली मुलगी आहे पण तिच्याकडे बघून कोणी अस म्हणणार नाही."

अविनाशच्या डोळ्याच्या कड्या ओलावल्या होत्या, अविनाशच्या डोळ्यातील पाणी बघून सरस्वती म्हणाली," अविनाश I am really sorry for your loss, निर्मला अचानक कशी काय गेली? म्हणजे काही आजार की अपघात?"

"निर्मलाला कॅन्सर झाला होता" अविनाशने उत्तर दिले

सरस्वती व अविनाशची चर्चा चालू असतानाच श्रेया केक व आईस्क्रीम घेऊन येते.सरस्वती केकचा एक तुकडा उचलून त्याची चव चाखून बघते व म्हणते," श्रेया केक अप्रतिम झाला आहे,तुझ्या हातात तर जादू आहे, केकचा क्लास केला आहेस का?"

श्रेया खुश होऊन म्हणाली,"नाही मॅडम, ऑनलाईन व्हिडीओ बघून शिकले आहे. मॅडम मी तुमच्यासोबत एक सेल्फी घेऊ शकते का?"

सरस्वती हसून म्हणाली," Yes, why not? तुझ्यासारख्या हुशार मुलीसोबत फोटो काढायला कोणाला आवडणार नाही"

श्रेया सरस्वती सोबत एक सेल्फी घेते. सेल्फी घेऊन झाल्यावर श्रेया डॅडला विचारते, "डॅड तुमच्या दोघांचा एक फोटो घेऊयात का? दोन जुन्या मित्रांचे परत भेट अस काहीतरी कॅप्शन आपण देऊ शकतो."

अविनाश म्हणाला," बेटा मला काही फोटो काढण्यात इंटरेस्ट नाहीये. बाजूच्या आहेर काकूंना केक देऊन ये व त्यांच्याकडे थोड्या वेळ गप्पा मारत बस.मला सरस्वती सोबत थोडं बोलायचं आहे."

श्रेया गालातल्या गालात हसून म्हणाली, "डॅड सरळसरळ सांगा ना की तुम्हाला प्रायव्हसी आहे म्हणून, तुम्ही खूप वर्षांनी भेटला आहात, बोलण्यासारखे तुमच्याकडे भरपूर काही असेल."

अविनाश सारवासारव करत म्हणाला," तसं काही नाहीये बाळा, एवढंच आहे की सर्वच काही तुझ्यासमोर बोलता येणार नाही म्हणून बोललो की तु थोड्यावेळ बाहेर फिरून ये."

श्रेया म्हणाली," डोन्ट वरी डॅड मी लवकर काही परत येत नाही, तुमचं झालं की फोन करा मगच मी येते. सरस्वती मॅडम एखाद्या दिवशी माझ्या हातचं जेवण करायला नक्की या."

सरस्वतीने चेहऱ्यावर स्माईल आणून मानेनेच होकार दिला.सरस्वती दोघा बापलेकीचा संवाद ऐकून हसत होती, थोडक्यात काय तर ती परिस्थितीचा आनंद घेत होती. काही वेळातच श्रेया घराबाहेर पडली. श्रेया गेल्यावर सरस्वती म्हणाली,"तुझी मुलगी खरंच खूप गोड आहे"

अविनाश म्हणाला," हो ती वयाच्या मानाने अतिशय समजदार आहे, श्रेयाचा विषय सध्या बाजूला राहूदेत पण मला सांग की तु इथं कशाला आली आहेस? आणि तुला काय हवं आहे?"

सरस्वती म्हणाली," अवि मला काय हवं आहे? हे तुला चांगलंच माहीत आहे, इतकी वर्ष तुला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण तु काही सापडला नाहीस. निर्मला सोबत लग्न केलंस हेही तु मला सांगितलं नाहीस, लग्न झाल्यापासून सर्वांशी संपर्क तोडून कुठे गायब झाला होतास? आणि का?, एवढा सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारा मुलगा, प्रत्येक संकटात साथ देणारा, कायम पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा मित्र अचानक गायब का होऊ शकतो? अवि भूतकाळाचा विचार केला की हे सर्व प्रश्न डोळ्यासमोर येऊन उभे ठाकतात. आज मला या सर्व प्रश्नांची उत्तरं हवी आहेत."

अविनाश म्हणाला," सरस्वती एकतर मला अवि म्हणू नकोस आणि दुसरं म्हणजे भूतकाळाचा विचार करणं सोडून दे म्हणजे हे सर्व प्रश्न तुला पडणार नाहीत. वर्तमानात जग आणि आपल्या कुटुंबासोबत खुश रहा."

सरस्वती भावनिक होऊन म्हणाली," कोणते कुटुंब अवि? बाबांच्या हट्टाखातर ज्या मुलासोबत लग्न केले, तो व्यसनी,व्यभिचारी निघाला, त्याला असलेल्या व्यसनांपायी लग्नानंतर दोन वर्षातच त्याला lung cancer झाला आणि वर्षाच्या आत त्याला मरण आले. सासरच्या लोकांनी मला तिथे ठेऊन घ्यायला नकार दिला आणि मग त्या दिवसापासून मी माहेरी राहत आहे. बाबांचा बिजनेस सांभाळायला लागले, स्वतःला कामात खूप व्यस्त करून घेतले जेणेकरून भूतकाळातील कटू आठवणी त्रास देणार नाहीत.पण अस होत नाही ना.नको असणाऱ्या आठवणी आपण पुसू शकत नाही हीच मोठी शोकांतिका आहे."

अविनाश म्हणाला," हे बघ सरस्वती, जे झालं ते आपण बदलू शकत नाही, जे आपल्या भाग्यात असतं तेच घडतं, जी परिस्थिती समोर आली त्याला सामोरे जायला हवे.भूतकाळात घडून गेलेल्या चुकांची सावली वर्तमानकाळावर पडू देऊ नकोस. आपला भूतकाळ मी विसरून गेलो आहे, त्या आठवणींना माझ्या आयुष्यात काहीच स्थान नाहीये."

सरस्वती म्हणाली," अविनाश मला तुझं म्हणणं पटतंय, जे घडून गेलं त्यात तुझी काहीच चूक नव्हती, माझ्या एका चुकीमुळे तुला सर्व काही सहन करावे लागले. तुला जो काही त्रास झाला त्यासाठी मला माफ कर. मला तुझ्या मदतीची गरज आहे, प्लिज मला मदत करशील का? मला माझा मित्र परत हवा आहे, तो मला भेटेल का?"

अविनाश म्हणाला," सरस्वती आजची आपली शेवटची भेट आहे, इथून पुढे तु मला भेटण्याचा किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नकोस, मला तुला कुठल्याही प्रकारची मदत करता येणार नाही, माझ्यातील मित्र कधीच मरण पावला आहे.मैत्रीचे नाते निभावता निभावता मी स्वतःचीच वाट लावून घेतली होती. सरस्वती एक विनंती करतो, आपल्या भूतकाळाबद्दल माझ्या मुलीला काही कळता कामा नये.मी माझ्या वर्तमान काळात खूप खुश आहे."

सरस्वती नाराज होऊन म्हणाली," ठीक आहे जशी तुझी इच्छा, तुला भूतकाळाची गरज नसेल पण मला आहे, तुझा जर विचार बदलला तर मला संपर्क कर, मी माझे व्हिजिटिंग कार्ड इथे ठेऊन जात आहे."

अविनाशने काही न बोलता दरवाजा उघडला व सरस्वतीला जाण्यास सांगितले.

सरस्वती व अविनाशचा भूतकाळ काय असेल हे बघूया पुढील भागात...

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all