Jan 23, 2022
वैचारिक

निष्पाप तरीपण शिक्षा!

Read Later
निष्पाप तरीपण शिक्षा!

प्राचीला घेऊन तिचा पती तिच्या माहेरी आला होता. प्राचीच्या हातात मोठी बॅग होती. महेश खूप रागात दिसत होता. प्राची गंभीर होती. रडत होती. प्राचीच्या आईला त्यांना असं बघून धक्काच बसला. त्या खूप घाबरल्या. त्याने दारातूनच बॅग आतमध्ये फेकली. प्राचीला पण आतमध्ये लोटलं. तिचा भाऊ रवी पण घरातच होता. तिच्या भावाला व आईला नेमकं काय झालं ते कळेना.

 

 

 

तो म्हणाला, "ठेवा तुमच्या पोरीला तुमच्याकडेच."

 

 

 

तिच्या आईने व्याकुळ होऊन विचारलं, "काय झालं? काही चुकलं का तिचं? भांडण झालं का?"

 

 

 

तो उत्तरला, "काय झालं! तुमची पोरगी दिसते तशी नाही. गोगलगाय आणि पोटात पाय आहे. तिला मी इतकं चांगलं वागवतो. तिला कशाचीच कमी पडू देत नाही. कशाचाच त्रास नाही तिला. एवढा चांगला नवरा मिळाला आहे आणि ती."

 

 

 

तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. ती हात जोडून गुडघ्यावर उभी राहून फक्त रडत होती.

 

 

 

तो पुढे बोलू लागला, "सांगायला पण कसं तरी वाटतंय. दुसऱ्या पुरुषासोबत संबंध आहेत तिचे. माझ्या जागी कुणीही असतं तरी त्याने हेच केलं असतं."

 

 

 

तिच्या आईला व भावाला त्याने काहीच बोलू दिलं नाही. बिचारे साधेभोळे, गरीब लोक ते. त्याने त्यांच्यासमोर हात जोडले. ती त्याचे पाय पकडून रडू लागली. त्याने तिला पायाने लाथाडले. त्याचा आवाज इतका मोठा होता की त्याने आजूबाजूचे सर्व लोक जमा झाले होते. ते तिच्याकडे तिरस्काराच्या नजरेने बघत होते. त्यांची कुजबुज सुरु झाली होती. कुणाच्या चांगल्याबद्दल बोलतांना हेच लोक मुंग गिळून बसतात ; पण कुणाच्या फाटक्यात पाय द्यायला मात्र यांच्या जिभेला धार येऊन जाते.

 

 

 

ते गरीब असले तरी त्यांचं घर सुसंस्कृत होतं. रवीने दार लावून घेतलं. त्याच्या आईचं आणि तिचं रडणं थांबेना.

 

 

 

रवी विचार करू लागला. त्याला तर कणभर पण विश्वास बसत नव्हता त्याच्या कानांवर. त्याला पूर्ण विश्वास होता की ती असं करूच शकत नाही. दोन वर्षांनी तर लहान होती ती त्याच्यापेक्षा. तो लहानपणापासून बघत होता तिला. दोघे सोबतच शाळेत जायचे. कॉलेजला पण ती त्याच्यासोबतच जायची व त्याच्यासोबतच यायची. किती गुणी मुलगी होती ती! त्याचं पूर्ण लक्ष असायचं तिच्यावर. साधीसरळ होती ती. घरातून सरळ शाळेत किंवा कॉलेजला व तेथून सरळ घरी. कुणाच्याही घरी ना दारी. त्याने कधीही तिला कोणत्या मुलासोबत साधं बोलतांना सुद्धा बघितलं नव्हतं. जास्त मैत्रिणी पण नव्हत्या तिच्या. त्याच्या डोक्यात प्रश्नांचं वादळ भिरभिरत होतं. ज्या मुलीला लग्नाअगोदर कुण्या मुलाशी साधं बोलणं सुद्धा अयोग्य वाटायचं ती मुलगी असं कशी काय करू शकते? शक्यच नाही. तो तिच्याजवळ गेला व तिच्या खांद्यावर हात ठेवला. ती त्याच्या गळ्यात पडून रडू लागली.

 

 

 

ती म्हणाली, "दादा. मी काहीच केलेलं नाही. विश्वास ठेव माझ्यावर."

 

 

 

तो म्हणाला, " हो, ताई. मला माहित आहे तू असं करूच शकत नाही. "

 

 

 

त्याने तिच्या पाठीवर हात ठेवला. वेदनेने तिच्या तोंडातून आवाज निघाला. त्याने पदर सरकावून बघितलं. तिच्या पाठीवर मारल्याचे निशाण होते! त्याच्या डोळयांत पाणी आलं. फुलासारखं वागावलेल्या लहान बहिणीला अशा अवस्थेत बघून त्रास तर होणारच. तिची आई पण रडत होती. तिला ते निशाण बघून अजूनच रडू आलं. तिलाही माहित होतं की त्यांची मुलगी असं नाही करू शकत.

 

 

 

ते सर्वजण बरोबरच होते. तिची काहीच चूक नव्हती. मुळात तिचा पती महेशच दुसऱ्या एका मुलीवर भाळला होता. त्यांचे संबंध इतके घट्ट झाले होते की त्याला त्याची पत्नी नकोशी वाटत होती. त्याला तिचा राग येत होता. तो तिचा द्वेष करत होता. तिने त्याला सोडून द्यावं म्हणून तो तिला त्रास देत होता. विनाकारण मारहाण करत होता. एवढं सगळं तिने शांतपणे सहन केलं. एक शब्दही बोलली नाही. नंतर जेव्हा त्याला जाणवलं की ही अश्याने जाणार नाही तेव्हा त्याने हा आरोप तिच्यावर केला.

 

 

 

तो रागात तेथून निघून गेला होता ; पण त्याचं मन हसलं असणार. त्याला जे हवं होतं ते झालं होतं पण यांचं काय? त्याला काय फरक पडत होता! पण तिचं तर आयुष्य खराब झालं होतं. त्याने ओरडून सांगितलेली खोटी कथा सर्वांनी ऐकली होती व ती सर्व जगात पसरणार होती. ते कुणाकुणाचं तोंड बंद करणार होते?

 

 

 

नियती पण कधीकधी किती कठोर होऊन जाते ना! ज्याने गुन्हा केलेला असतो तो मान वर करुन वावरतो व जो निष्पाप असतो तो नजर खाली करुन. जीवनात बऱ्याच वेळा चांगल्या व्यक्तींवर अन्याय होतो. असह्य शिक्षा भोगावी लागते निष्पाप माणसांना. निष्पाप असल्याचं, चांगुलपणाचं किती वाईट फळ मिळालं होतं त्यांना! चारित्र्यावर लागलेले आरोप सर्वांत जास्त त्रासदायक असतात.

 

 

 

आता कोण लग्न करणार होतं तिच्याशी? काय गुन्हा होता तिचा? का एवढी मोठी शिक्षा झाली तिला? रवीचं पण नेमकंच लग्न जमलं होतं. हे ऐकून त्यांनीही लग्नाला नकार दिला होता. त्याचे आईवडील मुलीच्या वडिलांचे पाय पकडत होते. पण ते कुठं ऐकणार होते! एका क्षणात आयुष्याचा सर्वनाश झाला होता. त्यांच्या जीवनात कायमचा काळोख दाटला होता.

 

 

 

आवडल्यास share नक्की करा.

 

 

 

©Akash Gadhave

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Akash Gadhave

Engineering Student

नमस्कार.