निशिगंधा

story of a girl having dream of running school in the village

निशिगंधा

भाग १

एका गावात एका टुमदार घरात .. सनई चौघडे वाजत होते .. अंगणाला मंडप घातला होता .. दाराला केळीचे खांब बांधले होते .. टुमदार कौलारू घराला झेंडूच्या पिवळ्या आणि केशरी फुलांच्या माळा  लागल्या होत्या .. घरात असंख्य माणसे ये जा करत होती .. कोणाच्या हातात फुलांचे ताट होते तर कोणाच्या हट्टा तुपातल्या बुंदीच्या पाकातल्या लाडूचा  रचलेला डोंगर घेऊन जात होते आणि त्याच्या खमंग सुवास पसरत होता.. बाहेर अंगणात एका बाजूला मोठं मोठ्या पातेल्यात जेवणं शिजत होते आणि जेवणाचा  खमंग वास सगळीकडे सुटला  होता ..

पोरी बाळी .. परकर पोलके .. गजरे , दागिने , हातावर मेहंदी काढून घरभर नाचत होत्या .. पुरुष मंडळी झब्बे , लेंगे, शेरवानी , फेटे , पायात मोजड्या , आणि कपाळाला नाम काढून इकडे तिकडे फिरत होती आणि सगळे काम नीट व्यवस्थित पार पडतंय ना या कडे जातीने लक्ष देत होते .. आनंदी प्रसन्न चेहरे दिसत होते ..

हरी भाऊ " रामा , अरे ए रामा .. भटजी का बघ अजून आला नाही रे .. एव्हाना यायला पाहिजे होता "

रामा " हो आताच आलोय त्यांना आवाज देऊन .. येतीलच ते पाच मिनिटात .. काही काळजी नसावी "

हे हरी भाऊ म्हणजे गावचे सरपंच .. ५० घरांचे आनंदी गाव .. गावात कसली कमतरता नाही .. शेती वाडी .. खाऊन  पियुन सुखी गाव .. गावात भाऊ बंधकी पण खूप .. लोक सुख दुःखात एकेमेकांना हजर राहायचे .. आज त्यांच गावातल्या एका मुलीचे लग्न आहे .. तिचे नाव निशिगंधा .. नवा प्रमाणेच निशिगंधाच्या फुला  सारखी सूंदर, नाजूक आणि पवित्र असे तिचे तेज होते .. हरी भाऊंना ती मुली सारखीच .. हो मुली सारखीच कारण तिचे आई आणि बाबा आता  हयात  नाहीत .. प्रकाश राव हे गावातले एकमेव शिक्षक होते आणि गावातल्या मुलांना ते शिकवत असत तेही घराच्या अंगणात त्यांनी शाळा सुरु केली होती .. सुरुवातीला फार कमी मुले यायची पण नंतर नंतर घराचे नंदनवन झाले आणि  अंगणात रोज मुलांची शाळा भरू लागली .. स्वतःचे पैसे खर्च करून प्रकाश रावांनी मुलांना पाट्या पुस्तके आणून दिली आणि वरतून शिक्षण पण दिले तेही पैसे न घेता .. ज्ञान दाना इतके पवित्र दान नाही असे ते नेहमी म्हणत ..

अचानक हार्ट अटॅक ने पत्नी गेली गेले .. आणि त्यांच्या पाठोपाठ तेही गेले.. मागे राहिली ती त्यांची गोड मुलगी निशिगंधा .. नाही म्हणायला हे वाड्या  सारखे टुमदार कौलारू घर वडिलोपार्जित असल्यामुळे तिच्या नावावर होते त्यामुळे राहायला घर तर नक्कीच होते डोक्यावर .. आणि शिक्षकाची मुलगी म्हणून ज्ञान पण होतेच .. लहान पणा पासून आई वडिलांनी चांगले संस्कार करून तिला लहानाची मोठी केली होती ..

मग तिने वडिलांचा वारसा चालू ठेवला .. गावातल्या मुलांना ती शिकवू लागली ... तोच तिचा विरंगुळा आणि तीच मुल तीचा एकांत कमी करत असत .. मग कधी कोणी गव्हाचे पोते द्यायचे .. कोणी तांदळाचे पोते द्यायचे ... कोणी डाळ द्यायचे .. शिवाय छोटी मोठी काम करून ती तिचे पोट भरायची .. कधी कोणाच्या शेतात पेरणी ला जायची .. कापणी जायची ,, धन्याची पोती मोजायची आणि त्याचा हिशोब लावून द्यायची .. कोणत्या भावाला बाजारात विकावी वगैरे असे सल्ले द्यायची .. पैशाची अपेक्षा नसायची पण देवाने कधी तिला काही कमी पडूच दिले नाही ...

शिवाय गावातील लोकांमध्ये इतका एकोपा होता कि तिला सर्व जण आपली मुलगीच मानायचे ..

एक दिवस पलीकडच्या गावातील शंकर रावांच्या मुलं कडून हरी भाऊ कडे तिच्या साठी स्थळ आले आणि लगेचच लग्न ठरले .. हरी भाऊ तिला वडील स्थानी असल्यामुळे .. त्यांनी घेतलेल्या निर्णयाला तिने पण होकार दिला आणि लग्नाला आनंदात उभी राहिली .. आज अख्खा गाव तिच्याच घरात तिच्या लग्नाची तयारी करतोय .. सगळे जण जणू घरच्या लग्ना सारखी काम करत आहेत .. शिक्षकांची मुलगी आपल्या गावची जवाबदारी आहे असे समजून ...

हरी भाऊंची बायको राधाक्का .. निशिगंधाला  साडी नेसवत होती

तिला छान लग्नासाठी तयार करत होती .. तिच्या बरोबर निशिगंधाची मैत्रीण सुनंदा पण होतीच

नंदा " निशी , हे मोगऱ्याचे गजरे आपण सगळ्यात शेवटी घालू .. नाहीतर आधीच घातले तर फुले कोमेजतील .. तुझ्या कडे तुझ्या आई चे  दागिने आहेत का ? आधी ते घालू ?"

निशी " अरे हो , मी विसरलेच .. थांब हा घेऊन येते " आणि निशिगंधाने एका काळया सागवानी कपाटातून एक पितळ्याचा डबा बाहेर काढला ..

आज आता या क्षणी आई बाबांची तिला खूप आठवण येत होती आणि तिने एकांत मिळाल्यावर एक हुंदका भरला .. तिथेच बाजूला पत्र्याची पेटी होती .. तिने ती पेटी उघडली .. त्यात तिच्या जीव भावाचे खूप सामान होते .. तिच्या लहानपणीच्या आठवणी होत्या .. काही फोटो होते .. जुने पुराणे .. कदाचित आई बाबांचे असतील .. एकदा त्या फोटोंवर प्रेमाने हात फिरवला आणि ते फोटो आपल्या छातीशी धरले आणि पुन्हा भरून आलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली तिने..

तेवढ्यात राधाक्काने आवाज दिला " निशी .. अग  आवर ... किती वेळ लावते .. चल आटप .. मुलाकडचे येतीलच इतक्यात .. तसे तिने ती पेटी बंद केली

दागिन्यां चा डब्याला तसाच आधी देव घरात नेला .. आणि पुढे ठेवला .. डोळे मिटून शांत चित्ताने तिने देवाची आणि आई वडिलांची आठवण केली त्यांना मनोमन नमस्कार केला  मग तीने तो डबा घेऊन नंदाच्या हातात दिला.

नंदा " अग , माझ्या कडे कशाला देतेस .. तुझं उघड आणि घाल ना त्यात जे आहे ते "

तिने तिच्या हाताने तो डबा उघडला तर डब्यात नाही म्हणायला एक सोन्याची चेन आणि अंगठी होती .. आणि एक छोटासा नेकलेस ..होता

निशी " बघितलेस नंदा , आई बाबांनी होणाऱ्या जावयाची पण सोय करून ठेवलीय .. आता हीच चेन आणि अंगठी आपण त्यांना देऊ "

नंदा " त्यांना का लगेच .. काल पर्यंत तर संजोग एकेरी नावाने बोलत  होतीस त्याला "

निशी " ए हळू बोल .. होणाऱ्या नवऱ्याचे असे नाव नसते घ्यायचे असे राधाक्का म्हणाली मला "

नंदा ने तिला घट्ट मिठी मारली .. " मला विसरू नकोस काय ?  गावाला विसरू नकोस . मला तुझी खूप आठवण येईल .. या गावालाच तुझी खूप आठवण येईल .. हि शाळा आता इथे कोण चालवणार .. ? भरल्या डोळ्याने नंदा बोलत होती

निशी " शाळा तर इथेच चालू राहिल.. माझे सासर काही लांब नाहीये इथून .. त्यांनी त्यांच्या गाडीवरून सोडले तर २० मिनिटात मी येऊ शकते .. लगेच नाही कारण मी ऐकलंय त्यांची आई खूप कडक आहे म्हणून "

नंदा " खरं सांगू का निशी .. संजोग ठीक आहे ग .. पण त्याचे आई आणि बाबा दोघेही मला खटकतात .. खूप लालची आहेत असे वाटते .. तरी पण त्यांनी तुझ्या  सारख्या मुलीचा हात मागितला म्हणजे सातवे आश्यर्य आहे .. कारण संजोग तसा दिसायला बरा आहे .. थोडा फार शिकलाय .. शेती वाडी भरपूर आहे तरी सुद्धा मुली कडच्यांकरून काहीच अपेक्षा कशा ठेवल्या नाहीत त्यांनी "

निशी " अग , आपल्याला वाटते तशी नसतात माणसे ... त्यांना मी आवडली हेच मी माझे भाग्य समजते ग .. नाहीतर कोण माझ्या सारख्या पोरक्या मुलीला सून करून घ्यायला तयार होईल "

बाहेरून कोणी तरी म्हटले " आवरा रे पटापटा भटजी आले .. नवऱ्या कडची मंडळी आता येतीलच इतक्यात जे मंदिरात गेलेत ..

तशी राधाक्का ने आरोळी ठोकली " आवरा ग पोरींनो .. नवरदेव वाजत गाजत निघालाय "

नंदा " हो .. राधाक्का .. हे काय आत आहे गजरे लावले कि झाले .. कि आमची नवरी तयार " आणि तिने निशीगंधाला गजरे लावले .. वर पासून खाल पर्यंत बघितले तर सरस्वती  देवीचं रूप होते तिचे .. मुद्दामून ल्क्षमी च रूप नाही म्हटले .. म्हणतात ना सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र नांदत नाहीत तसेच तिचे पण होते .. गळ्यात फक्त नाजूक एक हार बाकी सगळी लंकेचीच पार्वती होती ती .. पण म्हणतात ना रूपाचे तेज इतके होत कि तिला सुंदर दिसायला दागिन्यांची गरजच नव्हती

तेवढ्यात बँड चा आवाज आला म्हणजे नवरा मुलग्याची वरात दारात आली हे तिला कळले आणि एक अनामिक हुरहूर लागली तिच्या जीवाला .. हे आपले घर आता सोडून जायचे . जर सासू बाईंनी काम करायला परवानगी नाहीच दिली तर .. अशी भीतीही वाटू लागली .. घशाला कोरड पडली आणि ती आई बाबांच्या फोटो समोर उभी राहून रडून घेत होती .. जस जशी लग्न घटिका जवळ येत होती तस तशी तिची बेचैनी वाढत होती .. एकीकडे नव वधू म्हणून मनात हलचल होत होती तर एकीकडे हे गाव , ह्या गावातली माणसे सोडून नवीन गावात जायचे म्हणून अनामिक धडधड होत होती

नवरदेवाला भटजींनी मंडपात हार घेऊन उभे राहायला बोलावले .. तसा बसलेला संजोग उभा राहिला आणि मंडपा कडे जाऊ लागला तर तेवढयात

संजोग चे बाबा " हरी भाऊ , थोडे बोलायचे होते "

भटजी " अहो .. आता मुहूर्ताची घटिका समीप आली .. नंतर बोला काय ते " आणि नवरदेवाला इशार्यानेच मंडपात बोलवू लागले

संजोग चे बाबा " नाही हे बोलणे गरजेचे आहे .. नाही तर तुम्ही नंतर आम्हाला नावे ठेवाल कि आम्ही फसवलं म्हणून "

हरी भाऊ " जे काही बोलायचंय ते आपण लग्ना नंतर बोलू .. कारण मुहूर्तावर लग्न लागणे गरजेचे आहे .. नाही का ?"

संजोग चे बाबा " हे जे मुलीचे घर आहे ते पाडून संजोग इथे फॅक्टरी लावणार आहे .. याची फक्त कल्पना तुम्हाला असू द्यावी हेच सांगायचे होते "

हरी भाऊ " हे बघा .. हे घर निशिगंधाचे आहे हे तर नक्कीच आणि लग्ना नंतर नवरा बायको ने मिळून ह्यावर निर्णय घ्यावा .. तिला या बद्दल काहीच आक्षेप नसावा .. "

बाहेर काय बोलणे चालू आहे नंदा ने येऊन निशी ला सांगितले .. आणि निशिगंधाच्या पाया खालची जमीन सरकली .. आता तिला कळले कि माझ्याशी लग्न करण्याचा हेतू हा आहे तर ..

संजोग मंडपाकडे निघू लागला

तर आतून राधाक्का हरी भाऊंच्या कानात काहीतरी बोलू लागल्या

हरी भाऊ " थांबा .. निशी गंधाला संजोग शी एकट्याशी काहीतरी बोलायचे आहे .. "

संजोग चे बाबा " अक्षता डोक्यावर पडायच्या आधी नवऱ्याने नवरीला पहायचे नसते .. आणि आवरा लवकर .. मुहूर्ताची वेळ निघून जातेय "

हरी भाऊ " हे बघा , निशिगंधा डोक्यावर पदर घेऊन त्याचे कडे न बघता बोलेल .. याची खरबरदारी माझ्या सौ. राधा घेतील .. आता विषय तुम्ही छेडला च आहे तर विषय पूर्ण होऊनच लग्न लागू दे ... भटजी बुवा .. आजचा चा पुढचा मुहूर्त आहे का बघा "

भटजीने पंचाग बघितला आणि सांगितले  २. ०० चा आहे मग .. थांबावे लागेल सर्वांना "

हरिभाऊ " थांबू कि .. निवांत बसून गप्पा मारू ... नक्की संजोग कसली फॅक्टरी टाकणार आहे .. हे तरी कळू देत आम्हाला "

🎭 Series Post

View all