निःशब्द..!
खरंच, बऱ्याचदा न बोलताही चेहऱ्यावरील हावभाव बरच काही व्यक्त करून जातात. आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपल्या बोलण्याची शैली, चेहऱ्यावरील हावभाव, प्रत्येक शब्द एक अर्थपूर्ण भाव व्यक्त करतात. आपण प्रेमाने बोलतो तेव्हा प्रेमाचे भाव सहज उमटतात. रागाने बोललो तर रागीट भाव चेहऱ्यावर दिसून येतात. आणि जर रागाने बघितलं तर समोरच्या व्यक्तीच्या मनावरही नकळतं ते रागाचे भाव शब्दासारखे वारं करतात. जर कोणी रडत आवाजात बोलला तर दुःखद भाव त्या चेहऱ्यावर दिसून येतात. आणि बघणाऱ्या व्यक्तीच्या मनातही ते भावं बघून दुःखामुळे मन दाटून येतं. या निःशब्द बोलण्यातील शब्दांची व्याप्ती खूप मोठी असली तरी समोरच्या व्यक्तीच्या मनाला आपलंसं करणारी असते. आपल्या वेदना, दुःख, प्रेम, आपुलकी सहज आपल्या बोलण्यातून कधी न बोलताही व्यक्त होत असते. ते त्या बोलण्याचा अर्थ आणि त्याला सहाय्य असा प्रतिसाद दिला जातो. जर आपण बोललोच नाही तरी देखील आपला चेहरा आपल्या बोलण्यातील भावना न बोलता सारं व्यक्त करतात. जस तारुण्यात होणार प्रेम, नजरेला नजर भिडली कीं नकळत मनामध्ये 'मोगरा फुलतो' जशी प्रेमाची सुरुवात नजर भेटीतून सुरु होते व नंतर प्रत्यक्ष बोलणे सुरु होतात. पण प्रत्येक वेळी माणसाला बोलूनच व्यक्त होता येत नाहीं. सर्व काही बोलून सांगता ही येत नाही. एखाद्यावर दुःखाच डोंगर कोसळलेल असेल त्या वेळी तो व्यक्ती आपले दुःख बोलून सांगण्याऐवजी रडत आपले दुःख सांगतो. त्याचे रडणे हे त्याचे, त्याच्या मनातील दुःख व्यक्त करतात. एखाद्या गोष्टीला घेऊन किंवा अचानक हव ते मिळालेलं असेल किंवा परीक्षेला म्हणाव त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त गुण मिळाले असेल तर तो आनंद उड्या मारून, जोरात ओरडून, किंवा आपल्या आईला, बहिणीला, भावाला किंवा आपल्या प्रिय बाबाला जोरात मिठी मारून आनंद व्यक्त केला जातो. येथे बोलायची जास्त गरज पडत नाही. सार काही आपला चेहरा आपल्या मनातील भाव व्यक्त करून देतात. एखाद रडणार बाळ बघितल्यावर सहज लक्षात येते की त्या बाळाला भूक लागलेली आहे. किंवा दूर हात करून रडत असेल तर त्या बाळाला त्याच्या आईकडे जायचे आहे. त्या बाळाला त्याची आई पाहिजे, हे सारं चेहऱ्यावरून दिसून येते. एखादा व्यक्ती खूप शांत असेल तर सहज लक्षात येते की समोरचा व्यक्ती खूप मोठ्या दुःखात आहे. हा भाव जाणून घेण्याची जी मानवनिर्मित क्षमता आहे, ती खूप कमालीची आहे. प्रत्येक व्यक्तीने या क्षमतेचा चांगला उपयोग करावा. आपल्या बोलण्यातील शब्दांचे चढ-उतार, आवाज हे समोरच्या व्यक्तीला आपलस करू शकतात किंवा कायमच दूरही करू शकतात. चेहऱ्याचे हावभाव किंवा आपले बोलणे भांडणाला निमंत्रण देणारे नसावे. आपसात होणारी भांडणे ही एकमेकांच व्यवस्थित बोलणं, बोलण्यातील शब्द समजून न घेतल्यामुळे होतात. समोरचा व्यक्ती जर रागात दिसून येत असेल तर आपण शांत रहावे. जर कोणी रडत असेल तर आपल्या हाताने त्याचे अश्रू पुसावे. आपुलकीचा आधार दयावा. आपण मनुष्य प्राणी आहोत आणि आपल्याला प्रेमाची, माणुसकीची, जिव्हाळ्याची भाषा जास्त आवडते, जास्त कळते. सतत रागात असणारे, आडव बोलणारे, अति मस्करी करणारे, उगाच बडबड करणारे व्यक्ती कोणालाही आवडतं नाहीं. जरा बोलणं कमी आणि न बोलता समजून घेण्यात जो समजूतदारपणा आहे तो कायमचाच नात्यात प्रेमाचा गोडवा वाढवणारा असतो.
निःशब्द हळवी आपुलकी
आपुलकीचा प्रेमळ शब्द,
यात समतोल असावा लागतो.
निःशब्द भावनांना समजून
चेहऱ्यावरील अबोला उमजून,
नात्याचा निभाव लागतो.
आपुलकीचा प्रेमळ शब्द,
यात समतोल असावा लागतो.
निःशब्द भावनांना समजून
चेहऱ्यावरील अबोला उमजून,
नात्याचा निभाव लागतो.
©®चैताली वरघट
मूर्तिजापूर, जि अकोला
मूर्तिजापूर, जि अकोला
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा