निरूपद्रवी अंधश्रद्धा

Some Logical Myths

"अरे साखर तरी खाऊन जा चिमूटभर,खायचं नांव काढलंय तर..." पाठीवर सॅक घेऊन निघालेल्या प्रणवला आईनं रोखलं...

प्रणवला कॉलेजला जायची घाई... त्यामुळे नाष्टा नकोय म्हणाला अन् आईला काळजी पोरगा दुपारी दोन वाजेपर्यंत उपाशी राहील ह्याची.. शेवटी प्रणव न खाताच निघाला अन् आई त्याच्या पाठोपाठ साखरेचा डबा घेऊन धावली.

"हे काय गं आई... काय साखर तरी खा! प्रणव वैतागला.

"अरे खाण्याचं नांव घेऊन बाहेर जाऊ नये, नाट लागतो"

असं म्हणत आईनं चिमूटभर साखर प्रणवच्या तोंडात घातली अन् पाठीवर धपाटा मारत बाय केलं.

हे अश्या प्रकारचे प्रसंग घरोघरी घडत असतात...असे काही ठोकताळे आपण अगदी आजी पणजीच्या काळापासून ऐकतोय.

आता हेच बघा ना, खाण्याचे नांव घेऊन किंवा कुणी खाण्याचा आग्रह केला तर त्याला पाठ दाखवू नये ही फक्त अंधश्रद्धा आहे का?

मला तर ह्यात असा तर्क वाटतो की बाहेर जाणाऱ्या मनुष्याला घरी परतायला उशीर होऊ शकतो. महत्वाचे काम असेल तर अडचणी उद्भवू शकतात. कामात व्यस्त असल्यास बाहेर जेवण उपलब्ध असलं तरी ते आवडेल, जेवायला वेळ मिळेल असं नाही.

त्यामुळे घरून पोटभर खाऊन निघालं तर बाहेर येणाऱ्या अडचणींना, विलंबाला सामोरं जायला बळ मिळतं, पोट भरलेलं असलं की डोकं शांतपणे काम करतं आणि अडचणींतून मार्ग काढता येतो.

ह्याचा अर्थ प्रत्येक वेळी बाहेर जाताना जेवण डावलून गेलं तर अडचणी येतील असं नाही... पण म्हणून ही केवळ अंधश्रद्धा आहे असं मला वाटत नाही. असलीच तर ही निरूपद्रवी अंधश्रद्धा आहे.

घरातील एखादी व्यक्ती बाहेरगावी गेली की लगोलग त्याचा बिछाना उचलू नये, घर-अंगण झाडू नये, अंघोळीला जाऊ नये.. असं माझी आई म्हणते.अपशकून असतो म्हणे तो...कारण एखादी व्यक्ती मरण पावली की तिला दहनासाठी नेल्यावर घरातून बाहेर नेल्यावर लगेच त्याचा बिछाना उचलून टाकतात,घर-अंगण झाडून काढतात,अंघोळ करतात.

ही अंधश्रद्धा असेलही कदाचित पण मला वाटतं, घरातील व्यक्ती बाहेर चालली आहे आणि तिचा बिछाना अस्ताव्यस्त आहे हे कसं वाटेल? त्या व्यक्तीने स्वतः किंवा इतर कुणी त्याचा बिछाना आवरून ठेवावा हे ह्यामागचं लॉजिक असावं. आणि एखादे दिवशी अंघोळ बाहेरगावी जाणाऱ्या व्यक्तीच्या सोयीने लवकर किंवा जरा उशिरा केली तर कुठे बिघडलं?

सोमवारी केस कापू नयेत, शनिवारी तेल विकत आणू नये, बुधवारी डोक्यावरून नाहू नये ह्या "अंधश्रद्धा" असल्या तरी हे पाळल्याने फारसं काही बिघडतं असं मला तरी वाटत नाही.

फक्त ह्या गोष्टी पाळण्यासाठी योग्य नियोजन महत्वाचं! उदा. मी तेल संपत येण्याची वाट न बघता आधीच आणून ठेवते त्यामुळे अगदी शनिवारीच तेल अगदी संपलंय आणि आता घरात फोडणीला तेल नाही अशी वेळ येत नाही.

तसंच केस धुणे किंवा केस कापणे ह्याचं नियोजन मी आधीच करून ठेवते त्यामुळे ऐन वर्ज्यवारी केस खूप खराब झालेत आता धुवावे लागणार असं होत नाही.

घरात भांड्यांचा आवाज होऊ नये, किंवा कात्रीचे, अडकित्त्याचे पाते एकमेकांवर आपटू नये असं म्हणतात. त्यामुळे घरात भांडणं होतात म्हणे...तसंच बाहेर जाताना कोणाला टोकू नये, कुठे चाललास असं विचारू नये...

वास्तविक घरात भांड्यांचा आवाज करत काम करणारी व्यक्ती म्हणजे धसमुसळी असणार किंवा अतिशय घाईघाईने काम करणारी... तसंही भांड्यांचा आवाज कानाला बरा वाटत नाही. शिवाय बरेचदा व्यक्तींना विचारांच्या तंद्रीमध्ये कात्री,अडकित्ता किंवा तत्सम वस्तू आपटत राहायची सवय असते. ही अशी तंद्री लागणं पण वाईटच. म्हणून अश्या कृत्यामुळे घरात भांडणं होतात असा समज दृढ झाला असावा.

त्याचप्रमाणे बाहेर जाणाऱ्या व्यक्तींना महत्वाचे काम असू शकते, त्यात प्रश्न विचारून त्यांचा वेळ घेऊ नये हा "कुठे चाललास" असे न विचारण्यामागचा उद्देश असावा. तसंही कुणाला गरज नसताना व्यक्तिगत/ खाजगी प्रश्न विचारणं - फुकट चौकश्या करणं हे सभ्यपणाचं नाही.

काही समजूती (कदाचित त्यांना अंधश्रद्धा म्हणणं योग्य नाही) मनात खॊल रुजलेल्या असतात. त्या अमलात आणल्यास कुणाचेही काही नुकसान होत नाही... अश्यावेळी त्यांचा तर्कशुद्ध केला आणि त्यातला आशय समजून घेतला तर त्यांचा आपल्या व्यक्तीमत्व विकासासाठी उपयोग होऊ शकतो असं मला वाटतं.

अर्थात ही मतं माझी स्वतःची आहेत... ह्यामध्ये दुमत असूच शकतं....पण ह्या विषयावरचं तुमचं मत कॉमेंट मध्ये जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल.

मग लिहिताय ना!