निरूपण

निरूपण या पुस्तकाचे पुस्तक रसग्रहण



गोष्ट छोटी डोंगरएवढी
विषय- वाचाल तर वाचाल (पुस्तक रसग्रहण)

पुस्तकाचे नाव- निरूपण
लेखक- डॉ. संतोष मोतीराम मुळावकर
प्रकाशक- देशमुख आणि कंपनी प्रा. लि. पुणे

निरूपण

या साहित्यवारीचे आपण सगळे वारकरी! प्रत्येकाच्या मनात त्या विठ्ठलाच्या मूर्तीची निरनिराळी रुपं साठलेली! आपल्या सर्वांना ओढ त्या विठ्ठलाची! साहित्याची!


पुस्तकाशिवाय साहित्याची कल्पना अशक्यच! नाही का?


या साहित्यमेळ्यात असंख्य पुस्तकं आहेत… खरंतर प्रत्येकच पुस्तक चांगलं असतं कारण लेखकाने त्यात आपला जीव ओतलेला असतो. काही पुस्तकं मात्र सतत वाचावी अशी असतात, कायम आपल्या हृदयाच्या जवळ असतात.


असंच माझं आवडतं, माझ्या हृदयाच्या अगदी जवळ असलेलं, ज्याची मी पारायणं केलीत ते पुस्तक म्हणजे "निरूपण".


तियांपरी श्रोता ।
अनुभवावी हे कथा ।
अति हळुवारपण चित्ता ।
आणुनियां ।। (सार्थ श्री ज्ञानेश्वरी १.५७)

प्रा. डॉ. संतोष मुळावकर यांच्या 'निरुपण' या पुस्तकाची सुरुवात सार्थ श्री ज्ञानेश्वरीच्या या ओवीने होते. खरंच आहे, अगदी घाई घाईत वाचण्यासारखं हे पुस्तक नाहीच मुळी. निरूपण हे पुस्तक नुसतं वाचण्यासाठी नाही तर जगण्यासाठी आहे.

एखाद्या गोष्टीचे स्वरूप आणि लक्षण यांचे समप्रमाणात केलेलं वर्णन म्हणजे निरूपण अशी निरुपणाची व्याख्या आपल्याला माहितेय.

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, नामदेव, गोरा कुंभार, चोखामेळा, जनाई, मुक्ताई, सावतामाळी असे कितीतरी संत आपल्याला माहिती आहेत. या संतांनी आपल्या अभंगांतून, ओवीतून जीवनाचा सार आपल्याला समजावून सांगितला आहे आणि या संत-साहित्याची आपल्या जीवनात प्रत्येक क्षणाला कशी प्रचिती येते हे या पुस्तकातल्या कथा वाचल्यावर जाणवतं. वाचताना कथा जाणवणार नाही कारण तो आपल्या जीवनात, आपल्या घरात घडणारा रोजचा संवाद आहे. (मला तर हे पुस्तक वाचताना नेहमी माझ्या आई-पप्पांमधला संवाद जाणवतो.)


या पुस्तकात तीस कथा आहेत, कथा म्हणण्यापेक्षा तीस निरुपणं आहेत असं म्हणणं जास्त योग्य वाटतं. निरूपण या पुस्तकात अनुक्रमणिका सुद्धा 'निरुपणानुक्रम' होऊन जाते.


पहिलं निरूपण 'जातं जनाईचं…' या आधुनिक काळात घराची व्याख्या आता बदलली आहे. अंगण, परसदार, माजघर असलेलं घर आता फ्लॅट संस्कृतीत अलगद विसावलंय; पण घराचं घरपण मात्र अजूनही जपलं आहे, जपलं जात आहे. घराचं हे घरपण जपताना घरात जातं असावं, जात्याची घरघर असावी ह्याचं अगदी मनाला भिडणारं निरूपण वाचण्यासारखं आहे. घरात जातं हवं; पण साधं-सुधं जातं नाही, जातं जनाईचं हवं.

दळूं कांडू खेळू। सर्व पाप ताप जाळूं।।
सर्व जिवामध्ये पाहूं। एक आम्ही होउनी राहूं।।
जनी म्हणे ब्रम्ह होऊं। ऐसें सर्वांघटी पाहू।।

असं हे जनाईचं जातं… अध्यात्माचं जातं घरात असावं. जातं असावं वैभवासाठी, जातं असावं जनाईच्या ओवीसाठी… हे वैभव, ही ओवी आपल्याला पुढच्या पिढीला देता यावी म्हणून जातं असावं घरात.

जनाईच्या जात्यापासून सुरु झालेलं हे निरुपण संत तुकाराम महाराजांचा अभंग 'वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरें' म्हणत घेऊन जातं ते बाप-लेकीच्या आंब्यांच्या रस्त्याने… सासरी गेलेली लेक उन्हाळ्यात माहेरी येताना रस्त्याने एकही झाड नसल्याने उन्हामुळे अगदी कोमेजून जायची. आपल्या लाडक्या लेकीला सावली मिळवी म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजूने सासरपासून माहेरपर्यत आंब्यांची झाड लावायचं काम एक बापच करू शकतो. नाही का?

बाप-लेकीच्या या आंब्याच्या रस्त्यानं गेल्यावर निरूपण आपल्याला नेतं संत सावता माळ्याच्या मळ्यात.


कांदा मुळा भाजी। अवघी विठाबाई माझी॥

घर छोटं असलं तरी बागेसाठी जागा नाही म्हणून कुरकुर न करता गच्चीच्या टेरेसवर मळा फुलवता येतो; पण हा मळा साधासुधा मळा नको, हा मळा संत सावता माळ्याच्या मळ्यासारखा हवा. ह्या मळ्यातल्या पाना-फुलांत विठाई दिसायला हवी. भक्ती आणि कृती एक असायला हवी.


सावता माळ्याच्या मळ्यातलं हे निरुपण 'गीतेची ज्ञानेश्वरी' होत, 'तुकोबांकडून तुकोबांकडं' जात 'ज्ञानेश्वर' होतं. 'नातं आनंदाचं' होत 'संतांच्या संगतीत' संतांसारखंच होऊन जातं.


संत-साहित्याची अशी ही निरुपणं आपल्या आपल्या आयुष्यात कसे प्रत्येक प्रसंगी येतात याचं वर्णन तीस निरुपणांमध्ये अतिशय सुंदर प्रकारे, भावनिकरित्या लिहिलेलं आहे. 


'माणसाला संत नामदेवांसारखं जगता आलं पाहीजे. कारण संत नामदेव माणसासारखे जगले होते. संत नेहमी माणसांसारखे आणि माणसांसाठी जगत असतात. तो म्हणजे मी असं समजून जगत असतात. माणसांच्या हासवाशी, आसवाशी आणि आठवांशी सदैव अद्वैत साधत असतात. आपल्या आईसारखंच संतांचं आपल्या सुखदुःखाशी, आठवणींशी अद्वैत असतं. ठेच आपल्याला लागते आणि आपल्या आईच्या डोळ्यात पाणी येते पटकन. असंच घडत असतं आपल्या आणि संतांच्या बाबतीत. म्हणूनच तर संतांना माउली म्हणतात. संत माउलीच असतात. जे माउली नसतात ते संतच नसतात. हे अद्वैत, हे आतड्याचं नातं. हा आत्मोपगम्य भाव हेच तर संतत्त्वाचं लक्षण असतं. संत असेच जगत असतात आपल्यासाठी.' पुस्तकाच्या शेवटच्या पानावरची ही वाक्ये आपलं जीवन जगण्याचा दृष्टीकोन बदलून टाकतात.


डॉ. संतोष मोतीराम मुळावकर यांनी लिहिलेलं आणि देशमुख आणि कंपनी प्रा.लि. पुणे यांनी प्रकाशित केलेलं 'निरूपण' हे पुस्तक सर्वांनी एकदातरी नक्की वाचावं त्याहीपेक्षा एकदा तरी नक्की जगावं.

कांही बोलिलो बोबडे । माय बाप तुम्हापुढे ॥
सलगी लाडे कोडे । मज क्षमा असावी ॥ ( तुकाराम गाथा १९२१)

सध्याचा पूर्णविराम! कारण निरूपण कधी संपत नसतं.

© डॉ. किमया संतोष मुळावकर