Jan 26, 2022
प्रेम

निरोपाची कथा

Read Later
निरोपाची कथा

*निरोप*

सकाळपासून लीला ताईंची फार गडबड चालली होती. त्या लवकर उठत पण आज भल्या पहाटेच उठल्या होत्या. उत्साह ओसंडून वहात होता. लवकर लवकर कामाची लगबग चालली होती. काय करू नी काय नको असे झाले होते. घरातल्यांना त्या ऑर्डर सोडत होत्या. हे करा, ते करा. स्वयंपाक काय करायचा याचा विचार गेले आठ दिवस करीत होत्या. काय करायचे कुठे जायचे याचे त्यांचे नियोजन चालू होते. एवढी लगबग एवढा आनंद एवढा उत्साह कशासाठी तर कारणही तसेच होते. आज यांचा राहुल सुनबाई नातू येणार होते. खूप दिवसांनी त्याला बरीच सुट्टी मिळाली होती. त्याचा त्यांना खूप आनंद झाला होता. याआधी एका दिवशी एखादी रात्र यायचा. चुटपुट लावायचा. धावती भेट घ्यायचा. डोळे डबडबायचे. तुआ पुन्हा कामाला लागायच्या. पुढच्या भेटी पर्यंत मागच्या आठवणींच्या शिदोरीवर राहायचे,असेच चालायचे. यावेळी मात्र दहा-बारा दिवस त्याला रजा मिळाली होती. कोण आनंद झाला त्यांना. पुण्याला गेल्यापासून वीस वर्षांनी तो इतके दिवस येणार त्यामुळे त्या खुश होत्या. काय करू नी काय नको असे त्यांना झाले होते. डोळे सारखे रस्त्याकडे लागले होते. गाडीचा हॉर्न वाजला की धावत बाहेर येत. दिसला नाही राहुल ही नाराज होत. तासातासाला त्याला फोन करत होत्या. अरे कुठपर्यंत आलास.. तोही उत्साहाने बोलत होता, अगं आई आलोच बघ थोड्यावेळात.  त्यांचे लक्ष लागत नव्हते. येरझाऱ्या चालू होत्या. गाडी थांबल्याचा आवाज आला राहुल जोरजोरात हॉर्न वाजवत होता. त्या धावत बाहेर आल्या,क्षणभर थबकल्या. त्याला बाहेर थांबायला सांगून भाकर तुकडा घेऊन आल्या. सुनबाई,राहुल व नातवाला ओवाळले. टाकला पाय देऊन राहुल घरात आला लिंबू सरबत दिले आणि स्वयंपाक घरात गेल्या. सगळ्यांना जेवायला बोलावले. धाकटा मुलगा सून नातू त्यांच्याबरोबर असत. दोन्ही नातवंडे आनंदाने उड्या मारू लागली, धावू लागली. यजमानांनी सर्वांची खुशाली विचारली. जेवायला सगळे बसले. त्यांनी आज छानसा बेत केला होता. भरली वांगी, अळू वडी, चिंचगुळाची आमटी, कोशींबीर, चटणी, आमरस असा छान बेत होता. सर्वांनी छान जेवण केले. मग त्या सुनेबरोबर गप्पा मारत बसल्या. इकडचे तिकडचे वातावरण, त्याची दगदग, तब्येत सर्व विषयांवर गप्पा झाल्या. संध्याकाळी छान जेवण झाले. दोन दिवसांनी दोन्ही मुलांनी छोटीशी ट्रीप करायचे ठरवले. त्याप्रमाणे दोन्ही मुले सुना नातवंडे या आणि त्यांचे यजमान छान पैकी दांडेली ला जाऊन आले. धमाल करून आले. पुन्हा थोडी विश्रांती. असे आठ-दहा दिवस गेले. परसदारातील झाडाचे आंबे त्यांनी मजेत खाल्ले. नातवंडं मजेत होती. दोन्ही सुना मैत्रिणी सारख्या हसत होत्या. गप्पा गोष्टी, चेष्टा मस्करी करत होत्या. भाऊ भाऊ एकमेकांच्या कामाचे व्याप, तसेच इतर गप्पागोष्टी करण्यात दंग असायचे. या अगदी सुखावून गेल्या. त्यांचे यजमानही आग्रह करून मुलांचे नातवंडांचे हट्ट पुरवत होते. कौतुक करत होते.
राहुलचा जाण्याचा दिवस जवळ आला यांचा जीव खालीवर होत होता. तो थांबावं असे त्यांना वाटत होते. पण नोकरी पुढे इलाज नव्हता. त्याच्या जाण्याची सर्व तयारी त्यांनी अगोदरच करून ठेवली होती. जाताना त्याला, सुनबाईला काय द्यायचे नातवंडांना काय द्यायचे सर्व ठरले होते. सुनबाईसाठी ताजा मसाला, तिखट करून आणले. लोणच्याची बरणी तयार ठेवली. नातवासाठी बेसन लाडू, राहुल साठी चकली सगळे तयार ठेवले. दोन्ही सुनांना,नातवंडांना त्यांनी पैसे दिले. तुमच्या आवडीचे काही घ्या म्हणाल्या. सर्व तयारी झाली. गाडीत सामान भरले. राहुल देवाच्या पाया पडू लागला. आता मात्र त्यांचा बांध फुटला. बाळा म्हणून त्यांनी त्याला मिठी मारली.  त्या कावऱ्या बावऱ्या झाल्या. छोट्या वेदने त्यांच्या पाठीवर हात फिरवला. जाऊदे दादाला आम्ही आहोत ना. होय रे बाळा म्हणून त्यांनी डोळे पुसले. राहुल ची गाडी सुरू झाली. वळणावरुन वळेपर्यंत त्या उभ्या होत्या. डबडबलेल्या डोळ्यांनी त्या पाहत होत्या.  परत फिरल्या त्याच्या परत येण्याची आस धरूनच. गाडी नजरेआड झाली आणि घरात येऊन त्यांनी देवापुढे हात जोडले. परमेश्वरा माझ्या बाळाला सुखरूप ने..

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now