बाप्पा, निरोप तुला देताना..

निरोप तुला देताना..

 

!!गणपती बाप्पा मोरया!!

प्रिय बाप्पा,

हे पार्वतीनंदन गजानना! आज निरोप तुला देताना फार जड जातंय. अगदी हृदयाजवळचं कोणीतरी निरोप घेतंय असं वाटू लागलंय. दहा दिवस नुसता आनंदी आनंद होता. घरात मंगलमय वातावरण होतं. एक चैतन्य होतं. मनोभावे पूजाअर्चा होत होती. रोज धूप अगरबत्तीच्या सुवासाने घर अगदी भरून जायचं रोज गोडाचा नैवेद्य.. बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक.. गौरीई आली तेंव्हा पुरणपोळीचा नैवेद्य केला. तेलातुपाचा दिवा लावताना बाप्पा तू छान मंद हसतोय असं मला वाटलं. इतकं व्यस्त असताना, घर ऑफिस दोन्ही जबाबदारी सांभाळताना अजिबात दमले नाही की कंटाळा आला नाही बघ.. कायम तुझाच वास घरात, मनात जाणवत होता.

बाप्पा, दरवर्षी तू आल्यावर घर नेहमी गजबजलेलं असायचं. टाळ मृदुंगाच्या गजरात देवाला आर्जवे केली जायची. आईबाबा, भाचेमंडळी, सगळे आवर्जून यायचे पण यावेळीस मी एकटीच होते रे.. खूप गडबड झाली. एकटीला नीट कळत नव्हतं. मला खरंच तुझ्यासाठी सगळं साग्रसंगीत नाही करता आलं रे.. माझ्या मनासारखी तुझी सेवा नाही करता आली रे बाप्पा.. तांदळाच्या उकडीचे मोदक करताना का कोणास ठाऊक! उगीच डोळे भरून येत होते. तुझी सेवा करण्यात हेळसांड तर झाली नाही ना? ही भावना मनात दाटून आली. पण देवा, आमच्याकडून तुझी सेवा करण्यात काही चुकलं असेल तर तू मला क्षमा कर देवा.. तुझ्या गरीब भोळ्याभाबड्या भक्तांची सेवा गोड मानून घे रे देवा!

हे गणराया, आज तू निरोप घेतोयस, आज मी तुझ्या जवळ माझं मन मोकळं करणार आहे. तुझ्यासमोर माझी विवंचना, कैफियत मांडणार आहे. आणि खरंतर तुझ्याशिवाय आहे तरी कोण मला माझं ऐकून घेणारं? तुझ्या कुशीतच तर ती ऊब, ती शांतता मिळते मला.. म्हणूनच रे देवा, तुझ्यापुढेच मी माझं गाऱ्हाणं मांडतेय, तूच निवारण कर.. मार्ग दाखव. 

भगवंता, गेली दोन वर्षे कोरोनाच्या आजारामुळे म्हणावं तसं तुझं स्वागत करता नाही आलं. सारं जग दुःखाने भरून गेलेलं असताना तुझं स्वागत तरी कसं करावं? ते चैतन्य तरी कुठून आणावं? या आजाराने किती जवळची माणसं कायमची निघून गेली. काहींचा आधारच गेला. कुटुंबाचा कणा मोडून पडला. काहींच्या नोकऱ्या गेल्या. उद्योग बुडाले. मग देवा तो आनंद तरी कुठून आणणार? त्यामुळे थोडा जल्लोष, रोषणाई कमी झाली. पैपाहुण्यांची जास्त वर्दळ नव्हती. पण देवा, तशाही अवस्थेत आम्ही पुन्हा उभे राहिलो, नव्या उर्मीने, नव्या जोशात तुझ्या स्वागतासाठी सज्ज झालो आणि पूर्वीचाच उत्साह तसाच कायम ठेवत आरत्या म्हणताना अगदी मनोभावे मोठ्या भक्तिभावाने देवाची उपासना केली कारण माहित मला प्रत्येक दुःखाचं हरण करण्याची शक्ती तुझ्याचकडे आहे किंबहुना त्या दुःखाशी लढण्याचं बळ तूच आम्हाला देतोस. अंनत तुझे उपकार देवा!

देवा दोन वर्षांनंतर यावेळेस अनेक गणेशोत्सव मंडळानी बाप्पा बसवले. ढोलताश्यांच्या गजरात बाप्पा विराजमान झाले. सर्वसामान्य जनतेकडून, व्यवसायिकांकडून, दुकानदारांकडून वर्गणी गोळा करण्यात आली. विद्युतरोषणाई करून पूर्ण परिसर सजवून टाकला. लाखो पैसे खर्च करून ऑर्केस्ट्रा, स्टेजशो, तमाशा असे विविध कार्यक्रम करण्यात आले पण लंबोदरा, खरंच इतक्या भपकेबाजीची गरज आहे? तुला या रोषणाईचा, शोबाजीचा हव्यास आहे? नाही भगवंता.. तू तर निव्वळ भक्तीचा भुकेला. साधी भोळी सेवा गोड मानून घेणारा देव तू.. आणि तुला ही शिकवण तुझ्या पित्याकडून देवांचे देव महादेवांकडूनच मिळालीय ना? तोही साधा भोळा शिव आपल्या भक्तांवर आपली कृपादृष्टी ठेवून आहे. तसाच तूही रे.. 

हे गजानना, तुला सांगायला खरंच खूप वाईट वाटतंय रे.. की, आज आम्ही नवीन तंत्रज्ञान, सोशल मीडिया, मोबाईल्स यामध्ये हरवत चाललोय. कोणालाच कोणासाठी वेळ नाही. नाती दुरावत चाललीय. तू पाहतोयस ना गणराया?. पूर्वी नातेवाईकांना भेटायला जाताना कोणत्याही औपचारिकता दाखवण्याची गरज नसायची. एकमेकांना भेटण्याची मुभा असायची. कोणतीही पूर्वसूचना न देता नातेवाईकांकडे बिनधास्त जायचो. त्यांच्यासाठी तो आनंदाचा सुखद धक्का असायचा पण आता फोन आला आणि त्यासोबत आली औपचारिकता.. अचानकपणे भेटण्यातली मज्जा, तो आनंद निघून गेलाय बघ.. अचानकपणे आलेले पाहुणे पाहून कपाळावर आट्या पडू लागल्या. नाकं मुरडली जाऊ लागली. आता सर्वजण त्या मोबाईल नावाच्या यंत्रात डोकं खुपसून बसलेले असतात. तुझ्या पूजेपासून ते तुला दाखवलेल्या प्रसादाचे, नैवेद्याचे फोटोज, व्हाट्सअप, इन्स्टाग्राम या सारख्या सोशल मीडियावर अपलोड करण्यासाठीची चढाओढ दिसून येतेय. इतरांपेक्षा आपली आरास किती भारी हे दाखवण्याचा, शोबाजी करण्याचा हव्यास, अट्टहास बळावत चाललाय आणि त्यामुळेच नात्यातला संवाद लोप पावत चाललाय. प्रत्येकजण जणू आपापल्या वेगळ्या विश्वात वावरतोय. याला काही अपवाद असतीलही पण बहूसंख्य माणसं अशीच वागताहेत बघ.. देवा, तुझ्या भक्तांमध्ये झालेला हा बदल तुलाही जाणवला असेलच ना रे? मोठमोठ्या आवाजात वाजणारे डीजे, म्युजिक सिस्टीम यांनी तुझं डोकं दुखलं असेल ना रे? तुझ्या भक्तांचा मद्यपान करून केलेल्या धिंगाणा, नाच तुला बघवला नसेल ना रे? ते सर्व पाहून तुला किती यातना झाल्या असतील हे समजू शकते रे भगवंता! 

हे गणधीशा, विघ्नहर्ता! माझ्यासाठी एक करशील? आपापल्याच वेगळ्या विश्वात एकटं रममाण झालेल्या तुझ्या भक्तांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी तू येशील का रे? उसवलेली नात्यांची वीण घट्ट करण्यासाठी येशील ना? नात्यातला हरवत चाललेला सुसंवाद घडवायला एकदा ये ना प्लिज..

हे वक्रतुंड गणेशा! तू उत्सवप्रिय, सकारात्मक विचारांनी ओतप्रोत भरलेलं सकळ जणांचं लाडकं दैवत.. तुझ्या भक्तांचा जल्लोष तुला अतिशय प्रिय.. पण देवा, मनात झालेली नकारात्मक भावनांची गर्दी कमी करायला येशील का रे?

हे गणपती बाप्पा! आज तू निरोप घेतोयस पण खरं सांग.. तुझ्याही डोळ्यात पाणी दाटून आलं ना रे? मला जाणवलं ते. प्रत्येक वर्षी असंच होतं. बाप्पा तू येतोस, आनंद देतोस सगळीकडे चैतन्य पसरवतोस आणि पुन्हा एकदा ती वेळ येतेच. बाप्पा तुझ्या निरोपाची.. नकोशी वाटणारी.. 

हे गणाधिशा! तू विघ्नहर्ता.. कायम माझ्या पाठीशी उभा राहिलास. जगण्याचं, संकटाशी लढण्याचं बळ दिलंस. तसाच वरदहस्त कायम सर्वांच्या मस्तकी असू दे रे.. सर्वांची सर्व विघ्न दूर कर.. संकटाशी सामना करण्याचं बळ दे. पुन्हा नव्याने उभं राहण्याची शक्ती दे. तुझा आशीर्वाद सतत साऱ्या जगावर राहू दे आणि पुढच्या वर्षी पुन्हा नवीन जल्लोषात लवकर येशील हे आश्वासन दे.. बस्स इतकंच मागणं रे देवा..


तुझीच

© निशा थोरे (अनुप्रिया) 

०९.०९.२०२२