निरोप तुला देताना..

निरोप तुला देताना..

निरोप तुला देताना..

निरोप तुला देतांना.. नकळत एक सर बरसली. पुन्हा वेदना उसवून गेली. जखम पुन्हा ओली. मन पुन्हा भूतकाळाकडे धाव घेऊ लागलं एखादया लहान बाळासारखं.. आठवणींचं आभाळ भरून आलं आणि हसऱ्या मुखवट्या आड लपलेला चेहरा अलगद समोर आला. इतके दिवस छान निभावून नेलं होतं त्या मुखवट्याने. पण संयमाचा बांध तुटावा आणि डोळ्यांनी जणू बंड पुकारावं अगदी तसंच घडलं.

आयुष्याची बेरीज वजाबाकी मांडताना आठवलं मला., वर्षाच्या सुरुवातीलाच जगावर आलेलं कोरोना आजाराचं सावट आणि त्यामुळे हरवलेली मायेची माणसं. त्यांचं हरवणं, सोडून जाणं आणि मग आठवू लागला तो एक वेदनेचा प्रवास. लोकांच्या नोकऱ्या गेल्या. काही छोटे छोटे उद्योग बंद पडले. हॉटेल, रेस्टॉरंट, ट्रॅव्हल्स एजन्सी यांचे व्यवसाय मंदावले. सर्वसामान्य लोकांवर उपासमारीची वेळ आली. आजारापेक्षा उपासमारीने मरण्याची वेळ आली. मग लक्षात येऊ लागलं की सारंच उणें झालं. मग जमा खर्च मांडण्याचा निष्फळ प्रयत्न काय कमावलं आणि गमावलं याचा. पण मेळच बसत नाही. सारंच गमावल्याचा भास आणि डोळ्यांतून अविरत बरसणारे मेघ. जवळ आठवणींची शिदोरी.. अन त्यात पडणारी एक नवीन आठवणींची भर.

पण याच आजाराने बरंच काही शिकवलंही , बरंच काही दाखवलंही. या आजाराने माणसांतल्या परमेश्वराचा साक्षात्कार घडवला. डॉक्टर, पोलीस, सैनिकांच्या वेषातल्या देवमाणसाची गाठ घालून दिली. त्यांच्या रूपाने धावून येणारे मदतीचे हात दाखवले. स्वच्छतेची महती सर्वांना पटवून दिली. माणसांतलं माणूसपण जागवलं. मग लक्षात आलं माझ्या.. देवाचं गणित कधीच चुकत नाही. तो त्याच्या गणितातल्या चिन्हांचा वापर अगदी योग्य रितीने करतो आणि मग उकल मिळून जाते. तो कधीच नापास होत नाही.

स्वतःला बंदिस्त करून घेताना शिकवलं या आजाराने आत्मपरीक्षण करायला. आत्मचिंतन करायला. आपल्या माणसात राहून शिकवलं त्याने मनं जपायला. घरातल्या गृहिणींची व्यथा वाचायला अन वेचायलाही. ‘ती घरी बसून काय करते’ या प्रश्नाचं उत्तर आता नक्कीच सर्वांना उमजलं असेल ना!

मागे वळून पाहतांना आठवतं मला.. विश्वासाचे पंख गळून पडल्यावर माझं कोसळणं. नात्यांवरचा, मैत्रीवरचा विश्वास उडल्यावर माझं स्वकोषात जाणं. माझं श्रीरंगाच्या चरणी लीन होणं., त्याच्या सेवेत मन रमवणं., त्याच्या रंगात रंगून जाताना स्वतःला विसरून जाणं आणि मग आठवतं मला माझं अविरत लिहत राहणं.. लिहता लिहता मग ‘राधायना’ सारखं लिखाण भगवंताने माझ्याकडून करवून घेणं.. काय किमया आहे नाही त्याची!

मागे वळून पाहताना आठवतं मला लिखाणाच्या निमित्याने भेटलेला नवनवीन साहित्यिकांचा खळखळून वाहता झरा आणि माझ्या श्रीरंगाची साथ.. तेवढी ही एकच गोष्ट जमेची. नव्याने जगायला शिकवलं त्यांनी. दुःखाला कवटाळून बसण्यापेक्षा, त्याला कशी बगल द्यावी शिकवलं त्यांनी. अजूनही शिकतेय.

पण मग आठवणींच काय करायचं? कधी कधी वाटतं आठवणींना संपवण्याची असेल का रे कोणती थेरेपी? वेदनांची तीव्रता कमी करणारी.. नाहीच बहुधा..


हे गतवर्षा! निरोप तुला देताना आठवतं इतकंच आयष्याच्या वाटेवरचं वेदनेचं एक वळण पार झालं. नव्याने उभं राहायचं नव्या दुःखासाठी. नवे आव्हान पेलण्यासाठी. जगायचं अजून बरंच काही सोसण्यासाठी. मागायचं मला महाराणी कुंतीसारखं दुःखाचं दान जेणेकरून माझ्या श्रीरंगाचं विस्मरण मला कधीच होणार नाही. उभं राहायचं नव्याने नियतीला खिजवत. सुखाच्या प्रतीक्षेत. सज्ज व्हायचं नवीन वर्षाच्या स्वागतासाठी. पुन्हा एकदा.. पुन्हा एकदा.

सर्वांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा..
© निशा थोरे (अनुप्रिया)
३१.१२.२०२१